राजकारणी कधी कधी सभ्य, संवेदनशील, प्रामाणीक, विचारशील असू शकतो!

राजकारणी कधी कधी सभ्य, संवेदनशील, प्रामाणीक, विचारशील असू शकतो!

राजकारणी कधी कधी सभ्य, संवेदनशील, प्रामाणीक, विचारशील असू शकतो!
||
To Castle and Back
Vaclav Havel
||
कॅसल म्हणजे किल्ला म्हणजे झेक प्रेसिडेंटचं निवास स्थान.
व्हाक्लाव हावेल १९८९ ते २००३ या काळात झेकोस्लोवाकियाचे प्रेसिडेंट होते. प्रेसिडेट होण्यापूर्वी ते एक नाटककार होते, रशियातल्या कम्युनिष्ट सत्तेविरोधात लिहिल्याबद्दल त्यांना ४ वर्ष तुरुंगात काढावी लागली होती.कम्युनिष्ट सत्ता उलथवणारी मखमली क्रांती झेक जनतेनं केली आणि हावेल यांना प्रेसिडेंटपदी बसवलं.
राजकारण हा हावेल यांचा पिंड नव्हता. पूर्णपणे नाटकात बुडालेला माणूस. राजकारणाबद्दल घृणा असणारा आणि विचारवंताच्या वळणानं नितळ जगणारा माणूस. कम्युनिष्टांचं क्रौर्य, गळेचेपी, स्वातंत्र्य तुडवणं हावेलनी नाटकांतून चितारलं. राजकारणी लोकांचा दंभ, खोटेपणा, सत्तापिपासा इत्यादी गोष्टी त्यांनी नाटकातून मांडल्या. जनतेनं आदरानं हावेलना प्रेसिडेंटपदावर नेऊन बसवलं. आपण आयुष्यभर सत्ता कशी असावी यावर लिहिलं आणि सत्तेत जायची वेळ आल्यावर पळ काढणं योग्य नाही हावेलना वाटलं आणि हा माणूस प्रेसिडेंट झाला.
प्रेसिडेंट असताना हावेल विचारपूर्वक वागले. जबाबदारीनं वागले. एकही भानगड केली नाही. नव्या पैशाचा गैरव्यवहार केला नाही. कमीत कमी खर्च केला, साधेपणानं राहिले. इतर देशांचे प्रमुख प्रागमधे गेले असताना हावेल त्यांच्यासह फक्त पाच सात माणसांनाच खाना देत असत, मोठी पार्टी देत नसत. टेबलावर कमीत कमी पदार्थ आणि कमीत कमी क्रोकरी असेल असं पहात. परदेशात दौऱ्यावर जाताना एकाच छोट्या विमानानं जात, अगदी कमीत कमी माणसं बरोबर घेऊन जात.
सत्तेची झूल त्यांनी अंगावर किंवा मनावर घेतली नाही.
प्रेसिडेंट बिल क्लिंटन सॅक्साफोन हे वाद्य वाजवत. ते प्रागमधे पोचले तेव्हां प्रेसिडेंट हावेल त्यांना एका बार-रेस्टॉरंटमधे घेऊन गेले, जिथं आम झेक माणूस जमत असे. क्लिंटननी तिथं सॅक्साफोन वाजवला, जमलेल्या नाटकवाल्या लोकांनी छान मद्यपान करत हा प्रसंग पुरेपूर अनुभवला.
हावेल सत्तेला कंटाळले. आपल्याला नाटक लिहिता येत नाहीये या भावनेनं ते जाम अस्वस्थ झाले. आपण देशाचे अध्यक्ष झालो खरे पण आपल्या हातून देशाचं आणि जगाचं खरंच काही भलं होतंय कां असा विचार त्याना छळू लागला. हावेलनी आपणहून प्रेसिडेंटपद सोडलं. प्रेसिडेंट होत असताना अपूर्ण राहिलेलं नाटक त्यांनी पदावरून खाली उतरल्यावर पूर्ण केलं.
पद सोडल्यावर ते २००५ साली हावेल अमेरिकेत गेले. अमेरिकन ग्रंथालयानं त्यांना रहायला एक फ्लॅट दिला, एक चिटणीस दिला, एक लेखक दिला, ग्रंथालय दिलं. हावेल यांचा घनिष्ठ परिचय असलेला एक झेक लेखक हावेल यांच्या दिमतीला दिला. त्यानं हावेलना प्रश्न विचारायचे, अवघड प्रश्न विचारायचे, कोपरखळ्या मारायच्या, हावेलना बोलतं करायचं. सत्तेत कां गेलात, तिथं काय केलंत, कां सत्ता सोडलीत, सत्तेत गेलात तेव्हां तुमचे मित्रांशी असलेले संबंध टिकले कां, तुम्ही अमूक माणसाला कां झापलं नाहीत, तमूक माणसापुढं तुम्ही कायम नमतं कां घेतलंत, तुम्ही बोटचेपे आहात कां, तुम्ही देशाचं भलं केलंत कां असे नाना मुद्दे त्या लेखक मित्रानं काढले. हावेलनी लेखक मित्राला प्रांजपणानं उत्तरं दिली. प्रेसिडेंट असताना त्यानी काढलेले आदेश, केलेली भाषणं, काही घटना इत्यादीही हावेलनी लिहिल्या.
पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत हावेल यांनी लिहिलं होतं .. वाचताना कुठं कुठं तुम्हाला कंटाळा येईल, कुठं कुठं काही गोष्टी स्पष्ट केलेल्या नाहीत असं वाटेल. ठीक. पानं उलटा, वाचू नका.
टू कॅसल अँड बॅक वाचताना कंटाळा येत नाही.
नाटककार हावेल यांना सर्वात पवित्र आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शब्द आणि भाषा. त्याचाच गैरवापर कम्युनिष्ट करतात याचा राग हावेल यांना होता. या पुस्तकात हावेल यांना सतत भाषणं लिहिण्याची चिंता लागून राहिलेली दिसते. देशात, परदेशात, कुठल्याही प्रसंगासाठी योजलेल्या भाषणाचा हावेल फार गंभीर विचार करत, भाषण स्वतः लिहून काढत. जे म्हणायचंय ते अचूक आलय की नाही ते तपासायला आपल्या सहकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देत. संसदेत केलेली चाकोरीतली भाषणंही साहित्याचा नमुना असत, त्यात चिंतन असे.
” राजकारण हा मानवी जीवनातला एक वैषिष्ट्यपूर्ण भाग आहे. तिथं राजकारणी माणसाला क्वचितच त्याचं ध्येय स्पष्टपणे आणि विनागोंधळ दिसतं. राजकारण म्हणजे सतत एक कणीक तिंबणं असतं. ते कधीच संपत नाही. चला झालं माझं काम, गाठलं माझं ध्येय असं म्हणून राजकारणी माणूस कधीच मोकळा होत नाही.….गोर्बाचेवना कुठं माहीत होतं की त्यांच्या ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रॉयकानं काय गोंधळ होणारे. भांड्यातली वाफ जाऊ द्यावी म्हणून त्यांनी झाकण काढलं. पण आत येवढी वाफ कोंडली होती की भांड्यावर पुन्हा झाकण काही ठेवता आलं नाही….”
” मी निर्मिती करणारा माणूस आहे. एकादी गोष्ट नष्ट करायची तर त्याचं कारण समजायला हवं, ते कारण मला समजलं नाही, जे आहे ते कां आणि कसं मोडायचं ते कळत नाही तोवर मी ती गोष्ट मोडून टाकत नाही. जे आहे ते घेऊन मी पुढं सरकतो, …”
” इतिहास घडवायला निघालेल्या माणसांबद्दल मला शंका वाटते. ती माणसं कम्युनिष्टांसारखी असतात. कम्युनिष्टांना वाटतं की त्याना जगातलं सगळं कसं लख्ख कळत असतं आणि गोष्टी कशा घडवायच्या तेही त्याना परफेक्ट माहित असतं. कधी कधी समोर आलेल्या गोष्टी त्याना कळत नाहीत. त्या वेळी कम्युनिष्ट त्या गोष्टी आपल्या समजुतीत कोंबण्याचा प्रयत्न करतात. ”
ब्रिटीश पंतप्रधान दर बुधवारी एक तास राणीची भेट घेऊन राज्य कसं चालतंय ते सांगतो. तशीच प्रथा पाडावी असं हावेलना वाटलं. पंतप्रधानानं प्रेसिडेंट हावेल यांना आठवड्यातन एकदा भेटायचं. पण पंतप्रधान चॅप्टर होते. या भेटीत ते हावेल यांची मापं काढत, हावेलवरच टीका करत. खोटे नाटे आरोप करत, वर्तमानपत्रात पिकवलेल्या कंड्या ते वापरत. हावेल कधी भांडत नसत, ऐकून घेत असत, त्यामुळं ते दुबळे आहेत अशी पंतप्रधान व अनेकांची समजूत होती. बैठक बंद करायचं हावेलनी ठरवलं. पंतप्रधानांना ते आपण न सांगताच कळावं असं हावेलना वाटे, तसं हावेल सूक्ष्मपणे बैठकीत सूचित करत. पण पंतप्रधान ऐकायला तयार नाहीत. पंतप्रधानांना झापून बैठक बंद करणं हे हावेल यांच्या व्यक्तिमत्वात बसत नव्हतं. शेवटी काय घडलं? एकदा त्याच दिवशी हावेलना दुसरं काम निघालं आणि बैठक रद्द झाली. पुन्हा बैठक रद्द झाली. पुन्हा बैठक रद्द झाली. त्यामुळं प्रेसिडेंटांच्या कार्यालयानं ही बैठकच वेळा पत्रकातून कटाप केली आणि प्रथा मोडीत निघाली.
झेकोस्लोवाकिया रशियाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर हावेल पहिल्याच अधिकृत भेटीसाठी मॉस्कोला गेले. आता आपले संबंध दोन स्वतंत्र देशातली समान दर्जाचा देशांमधले संबंध असतील असं सांगणारा कराराचा मसुदा हावेल यांनी तयार केला.
गोर्बाचेव आणि हावेल एकमेकांना प्रथमच पहात होते. हावेल अगदीच अनौपचारिक कपडे, जीन्स वगैरे नेसून होते. गोर्बाचेव उत्सूकतेनं पहात होते की कसा आहे हा बंडखोर माणूस. कोणाही कम्युनिष्ट नेत्यानं बंडखोराची अशी भेट कधी घेतली नव्हती. हावेलनी कराराचा मसुदा कोटाच्या खिशात ठेवला होता. करारामधे हावेलनी म्हटलं होतं की आता झेकोस्लोवाकिया रशियाचं सॅटेलाईट रहाणार नाही. हा शब्द कडक होता. दोन देशांमधल्या करारात असे शब्द वापरण्याची प्रथा नाही. गोर्बाचेनी शब्द मान्य केला. म्हणाले की झेक प्रेसिडेंट एक नाटककार असल्यानं त्यांना अशा शब्दाची निवड करायची परवानगी आहे. गोर्बाचेवनी लगेच मसूदा मान्य केला.
क्रेमलिनमधे धुम्रपानाला परवानगी नव्हती.हावेलना सिगरेट ओढल्या शिवाय रहावत नव्हतं. त्यांनी गोर्बाचेवना विचारलं सिगरेट ओढली तर चालेल कां. गोर्बाचेवनी आश्चर्यानं हावेलकडं पाहिलं. हसले. म्हणाले हरकत नाही. ताबडतोब अॅश ट्रे हजर झाले. रशियाच्या इतिहासात क्रेमलिनमधलं ते पहिलं धुम्रपान.
हावेल व्हाईट हाऊसमधे होते तेव्हाची गोष्ट. किती तरी तास ते व्हाईट हाऊसमधे होते. सिगरेट ओढल्या शिवाय त्यांना रहावत नव्हतं. व्हाईट हाऊसमधे सिगरेट ओढण्याची प्रथा नाही. हावेलनी काकुळतीला येऊन सिगरेट ओढू कां असं विचारलं. त्यांना परवानगी मिळाली.
गोर्बाचेवची भेट झाली त्यावेळची गोष्ट. देशप्रमुखांच्या अधिकृत भेटीच्या वेळी देशाचं सांस्कृतीक वगैरे प्रतीक असलेली भेटवस्तू देण्याची प्रथा असते. भेटवस्तू वगैरे प्रकरण त्यांच्या डोक्यात नव्हतं कारण हावेल हा एक अनौपचारीक आणि नाटककार माणूस. आयत्या वेळी राजशिष्टाचार अधिकाऱ्यानं सांगितलं की काही तरी वस्तू द्यायला पाहिजे. मॉस्कोला जाण्याआधी हावेल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तिथं एका मित्रानं त्यांना आदिवासी इंडियन लोक ओढतात तो पाईप भेट म्हणून दिला होता. सामानात तो पाईप होता. हावेलनी तो पाईप गोर्बाचेवना भेट दिला.
गोर्बाचेवना काय वाटलं असेल? त्याना अशी भेट स्वीकारावीशी वाटली नसेल? मी स्मोकिंग करत नाही येवढंच गोर्बाचेव म्हणाले.
पोप झेकोस्लोवाकियाच्या दौऱ्यावर होते. लोकसभेमधे त्यांचं स्वागत करताना हावेल म्हणाले ” पोप महाराज, आम्हा पाप्यांमधे मी तुमचं स्वागत करतो…”
इस्रायलच्या भेटीत हावेलनी फ्रँझ काफ्का या लेखकाशी आपले असलेले भावनीक आणि वैचारिआक संबंध सांगितले. काफ्काच्या शैलीत ते म्हणाले ” मी आता प्रेसिडेंट झालोय खरा पण मला सांगता येत नाही की कधी एकादे वेळेस माझ्यावर आरोप होतील आणि मला तुरुंगात ढकललं जाईल. … मी प्रेसिडेंट आहे खरा, पण मी रस्त्यावर असतो तेव्हां मला वाटतं की मी योग्य जागी आहे, मी उंचावर जातो तेव्हां मला वाटतं की ती माझी जागा नाही, मी चुकून या उंचावरच्या जागी आलोय…”
हावेल लिहितात की राजकारण म्हणजे एक आकड्यांचं यंत्र झालंय. तिथं फक्त आकडे दिसतात, मतदारांचे आकडे. मतदारांची संख्या. माणसं ही एक हाडीमाशी जिवंत गोष्ट असते हे राजकारणाला मान्य नसतं. भांडवलशाही असो की कम्युनिझम, दोन्ही व्यवस्थांमधे माणसांना किमत नसते, दोन्ही व्यवस्था माणसांना शक्तीहीन करून टाकतात, दुबळं करून टाकतात. राजकारण सुष्ट आणि दुष्ट यातला फरक नष्ट करून टाकतं. विचारधारा, इझम, सरकार, नोकरशाही हे सर्व पोकळ, अर्थहीन, कृत्रीम घोषणा करत असतात, जुमले ऐकवत असतात.
शक्तीहीनांसाठी शक्ती हे हावेल यांचं सूत्र होतं. ते त्यांनी गांधींपासून घेतलं होतं.
आठवणी, प्रश्णोत्तरं, काही दस्तैवज, काही प्रसंग यांची एक विस्कळीत गुंफण असं या पुस्तकाचं रूप आहे.
राजकारणी सभ्य, संवेदनशील, प्रामाणीक, विचारशील असू शकतो ही आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणारी गोष्ट कधी काळी कुठं तरी वास्तव होती हे हावेल यांच्या पुस्तकातून डोक्यात उतरतं.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *