नसिरुद्दीनको गुस्सा क्यों आता है

नसिरुद्दीनको गुस्सा क्यों आता है

नसिरुद्दीन शहा प्रॅक्टिसिंग मुस्लीम नाहीत. ते मशिदीत जात नाहीत, मुस्लीम माणसं जे धार्मिक विधी वगैरे करतात ते ते करत नाहीत. त्यांना भौतिक जगात काही अडलं तर त्या बाबत ते देवाचा, प्रेषितांचा, देव आणि प्रेषित यांच्या वतीनं सांगितलेल्या गोष्टीचा सल्ला किंवा मार्गदर्शन ते घेत नाहीत. भारतीय राज्यघटना, कायदा आणि स्वतःची विवेकबुद्धी यांच्या आधारे ते जगतात. त्यांच्या हातून जे काही घडतं, ते जे काही करतात ते स्वतःच्या जबाबदारीवर करतात. घातक किंवा उपकारक असं काहीही त्यांच्या हातून घडलं तर ते त्यासाठी स्वतःला जबाबदार मानतात.
थोडक्यात असं की त्यांच्या जगण्याचा धर्माशी संबंध नाही. ते मुस्लीम आईच्या पोटी जन्मले आणि त्यांचा जन्मदाता मुस्लीम होता म्हणून ते मुस्लीम आहेत येवढंच. लहानपणी त्यांना अरबी भाषेतलं कुराण वाचायला लावण्यात आलं कारण आई वडिल आणि सभोवताल मुस्लीम होता. शहा म्हणतात की त्याचा येवढाच फायदा झाला की त्यांचे उच्चार सुधारले. उच्चार सुधारण्यासाठी रामायणाचाही उपयोग होतो असं शहा म्हणतात.
शहा यांची पत्नी रत्ना पाठक. पाठक हिंदू आईच्या पोटी जन्मल्या म्हणून हिंदू झाल्या. त्यांच्या घरचं वातावरण धार्मिक नव्हतं. त्यांच्या जगण्याशी धर्माचा संबंध नव्हता. नसिरुद्दीन शहा नावाच्या जन्मानं मुस्लीम असलेल्या माणसाशी त्यांचा विवाह सुखात झाला, आजवरचं जगणं सुखात आहे.
शहा दांपत्याला दोन मुलं आहेत. धर्माशी संबध नसलेल्या आई वडिलांच्या वातावरणात ते वाढले. त्यांना धर्म नाही.
हिंदू आई व वातावरण यात जन्मलेला हिंदू होतो.
मुस्लीम आई व वातावरणात वाढलेला हिंदू होतो.
कोणताही धर्म नसलेल्या आई वडिलांच्या सहवासात जन्मलेला माणूस धर्मुमुक्त होतो.
इतका साधा मामला आहे.
धर्म किंवा संस्कृतीचा वास येणारी दंगल होते, तणाव निर्माण होतात, तेव्हां समाजाची धर्मगटानुसार विभागणी होते. १९८४ च्या दिल्ली दंगलीत शिख शिख होते म्हणून मारले गेले. २००२ च्या दंगल व तणावात मुसलमान मुसलमान होते म्हणून मारले गेले, हिंदू हिंदू होते म्हणून मारले गेले. मरणं, जगणं, सुखानं रहाणं हे धर्मावर आधारलंय असं त्या काळात लक्षात आलं. अलीकडं गोमांस खातो, गोमांस बाळगतो, गोमासाचा व्यापार करतो इत्यादी कुठल्याही संशयाखातर माणसं मारली जातात, काहीही सिद्ध न होता. बस, संशयच पुरेसा असतो माणूस मारायला किंवा त्याचे तुकडे करायला.
नसिरुद्दीन शहा यांनी याच वास्तवावर बोट ठेवलं. आपली मुलं जर कुठं सापडली तर त्यांना धर्म विचारतील, धर्म तर त्यांना नाहीच आहे, पण नाव विचारतील आणि नाव मुस्लीम आहे असं म्हणून त्यांचं काहीही होईल अशी भीती शहा यांनी व्यक्त केली. या स्थितीचा आपल्याला राग येतो असं ते म्हणाले.
कुठल्याही समाजात विविध धार्मिक, सांस्कृतीक, पंथीय, भाषिक गट असतात. नेहमीच. या गटांमधे तणाव आणि समजूत अशांचा मिळून एक तोल तयार झालेला असतो. समाज एकजीव नसतात तरीही एकत्र नांदत असतात. जगात कुठंही. अलीकडं एकत्र हा प्रकार अस्थिर झाला आहे. माणसाचं वेगळेपण सहन न करणं, त्या वेगळेपणाची शिक्षा त्याला देणं हा प्रकार वाढताना दिसतोय.
बेळगावात तणाव निर्माण झाल्यावर कन्नडिंगांच्या घोळक्यात मराठी माणूस सापडला तर त्याचं खरं नसतं. तसंच मराठींच्या तावडीत कन्नडिंग सापडला तर त्याचंही खरं नसतं.
महाराष्ट्राला कधी कधी मराठी असण्याची उबळ येते. त्या वेळी उत्तर प्रदेशी किंवा गुजराती माणूस मराठींच्या तावडीत सापडला तर त्याचे वांधे असतात.
कर्नाटकाच्या कन्नडिंग बहुल भागात तामिळांचा वावर कठीण असतो आणि त्याच कर्नाटकातल्या तामिळ बहुल भागात कन्नडिंगाना अनेक वेळा वावरता येत नाही.
देशभर कमी अधिक फरकानं हीच परिस्थिती आहे.
संस्कृती या नाजुक प्रकरणाची जाण साहित्यिक, कलाकाराला अधिक असते. युरोपात चित्रकारांनी आपल्या चित्रातून ख्रिस्त, पऱ्या, देवदूत यांना कटाप केलं आणि त्यातूनच युरोपात प्रबोधनाची चळवळ सुरु झाली. चित्रकार, कवी, नाटककार यांनी बोचऱ्या युरोपीय वास्तवावर बोट ठेवलं तिथून युरोपात बदल सुरु झाले. विज्ञान तिथंच जन्मलं, शिक्षण व्यवस्था तिथंच सुधारली, मार्क्सही त्याच वातावरणात वाढला. कलाकार, साहित्यिक, विचारवंत जितके जास्त संवेदनशील आणि जितके थेट व्यक्त होणारे असतात तितका समाज अधिक पुढं जाण्याची शक्यता अधिक. या मंडळीनी शेपूट घातली किंवा या मंडळीची संवेदनशीलता बोथट झाली किंवा या मंडळींना काही समजेनासं झालं किंवा या मंडळींनी वास्तवाला सलाम केला की समाजाचं पुढं जाणं सोडाच, समाज थिजतो.
आणीबाणीच्या काळाचा राजकीय भाग सोडून द्या. दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे जेव्हां बोलू लागले तेव्हांच वातावरण बदललं. मंगेश पाडगावकर यांच्यासारखा अन्यथा अराजकीय माणूसही जेव्हां भिंत नावाची कविता मराठवाडा दिवाळी अंकात लिहू लागला तेव्हांच लोकांना पटलं की समाजात काही तरी गडबड आहे.
नसिरुद्दीन शहा नट आहेत, दिग्दर्शक आहेत. जाने भी दो यारो ही समाजातलं वास्तव दाखवणारी बोचरी फिल्म ते आणि त्यांचे सहकारी एके काळी करू शकले. आज शहा म्हणतात की तशी फिल्म करणं अशक्य झालंय. कुठल्याही पात्राचं नाव काय आहे यावरूनच गोंधळ सुरु होतो. कृष्ण हे प्रतीक वापरून खूप विनोदी प्रसंग लोकसाहित्यात लिहिले गेले आणि अद्यात्मातही त्या पात्राचा वापर महाकवीनी केला. आज कृष्णाचा उल्लेखही करायचा झाला तर कोणाकोणाच्या परवानग्या काढव्या लागतील ते सांगता येत नाही. अर्थात ते केवळ कृष्णाच्या बाबतीतच आहे असं नाही. इस्लामी प्रतिकांचीही थट्टा करणं किवा त्यावर वैचारिक चर्चा करणं अशक्य झालंय. एकाद्यानं एकाद्या भाषेचं विश्लेषण केलं, ती भाषा मागास झालीय, थिजलीय वगैरे वैचारिक विश्लेषण केलं तर त्याही माणसाला समाज जगू देणार नाही.
अशोक शहाण्यांनी एके काळी मराठी भाषेवर क्ष किरण टाकून त्या काळातल्या सर्व थोर्थोर साहित्यिकांना केराच्या टोपलीत टाकलं होतं. कोणीही शहाण्यांना मारलं नाही की त्यांच्या घरावर मोर्चे वगैरे काढले नाहीत. ज्यांच्यावर टीका केली होती ते साहित्यिकही शहाण्यांचे मित्र झाले, मित्र उरले. टिळकांनी स्वराज्याच्या खटाटोपात सर्व समाज सामिल व्हावा यासाठी गणेशोत्सव सुरु केला खरा पण त्यात धोके आहेत, धर्म अशा रीतीनं रस्त्यावर आणणं बरोबर नाही असं त्या काळी आणि नंतरही लिहिलं गेलं. टिळकांच्या बाजूनं मोर्चे निघून तसं विवेचन करणाऱ्यांना मारझोड झाली नाही.
समाजात कधी काळी एक थिजलेपण येतं. निर्बुद्ध प्रशंसा, निर्बुद्ध अनुयायित्व हे त्या काळाचं एक महत्वाचं लक्षण बनतं. तो काळ भारतात पुन्हा आलाय.
नसीरुद्दीन शहा एक कलाकार आहेत. अलीकडंच त्यांनी एक नाटक सादर केलं आणि त्यात अलझायमर झालेल्या व्यक्तीच्या आप्तेष्ठांच्या जीवनात कशी वादळं उठतात याचं चित्रण केलं. अत्यंत तरल परंतू डोक्याला भोकं पाडणारं वास्तव शहा यांनी त्या नाटकात मांडलं होतं. त्यातली अलझायमर झालेल्या माणसाची भूमिका शहा यांनी केली होती. तरल आणि तीव्र अशा संवेदना शहा यांच्याकडं आहेत हे त्यांच्या वरील नाटकांतून आणि त्यांनी निर्मिलेल्या अनेक नाटक चित्रपटातून समाजाला दिसतं.
शहा यांचं राग व्यक्त करणारं वक्तव्य हा एका नाटकाचा, सिनेमाचाच विषय आहे.
अशी नाटकं, सिनेमे, पहाण्याची सवय समाजाला राहिलेली नाही.
नसिरूद्दीन शहा हा एक डोकं आणि हृदय जागच्या जागेवर असणारा संवेदनशील कलाकार अजून जिवंत आहे आणि व्यक्त होतोय ही त्यातली आनंदाची गोष्ट.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *