राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

राजा राणींचं खाजगी जगणं पडद्यावर, क्राऊन.

क्राऊन या मालिकेचा पाचवा सीझन सुरु झाला आणि पहिल्याच दिवशी ११ लाख ब्रिटिशांनी तो पाहिला. अर्थात नंतरही ही मालिका पाहिली जाणार आहे. सीझन ब्रिटीश राणीच्या जीवनावर असल्यानं तो  ब्रिटीश माणसं चवीनं पहाणार, पण या मालिकेच्या देखणेपणामुळं जगातले इतरही लोक ती चवीनं पहात आहेत.

जगभरच्या लोकांना ती पहावीशी वाटतेय कारण ती चटकदार आहे, तिच्यात थरार आहे, तिच्यात राजकारणाचे पृष्ठभागाखालचे थर पहायला मिळतात.अर्थात हेही सत्य आहे की इतिहास माहीत असायला हवा.

पाचव्या सीझनमधे आपल्याला युवराज चार्ल्स, राणीला सिंहासानावरून उतरवायचा प्रयत्न करतोय असं दाखवलंय. राणी एलिझाबेथ म्हातारी झालीय, काळाशी तिचा सांधा जुळत नाहीये असं चार्ल्सचं मत झालेलं असतं. तसंच राणी म्हातारी होत चाललीय आणि आपणही म्हातारे होत चाललोय, राणी फार काळ जगली तर आपल्याला राजमुकुट फार काळ मिळणार नाही असंही युवराजाला वाटत असावं. युवराज चार्ल्स प्रधानमंत्री जॉन मेजर यांच्यावर दबाव आणतो की त्यानी राणीला पटवावं,राणीनं आपणहून सिंहासन मोकळं करून चार्ल्सला सिंहासन सुपूर्द करावं.

राणी सांगते की ते शक्य नाही. कारण राजा किंवा राणी तहहयात राजा किंवा राणी असतात, ते कधीही राजीनामा देत नसतात. म्हणजे आपण सत्तेच्या मोहामुळं नव्हे तर परंपरा पाळण्यासाठी सिंहासनावर आहोत असं राणीचं म्हणणं असतं.

प्रत्यक्षात चार्लसनं हा उद्योग केला होता? कळायला मार्ग नाही.  तसे कोणतेही पुरावे नाहीत. राजवाड्याच्या आत काय घडतं ते कधीच बाहेर येत नाही, राजवाडा कमालीची गुप्तता पाळत असतो. अनेक गोष्टी घडत असतात,  राजवाडा त्यावर चकारशब्द काढत नाही. चार्ल्स आणि कॅमिला पार्कर यांचे संबंध, चार्ल्स आणि डायना यांच्यातला बेबनाव जगजाहीर होता, पण राजवाड्यातून त्यावर कधीही मत व्यक्त झालं नव्हतं. चार्ल्स आणि डायना विभक्त झाले, त्यांचा काडीमोड झाला या घटना घडल्या पण त्या घडत असताना राजवाडा गप्प होता. 

सीझन पडद्यावर आल्यावर हे प्रकरण म्हणजे पर्वतप्राय खोटेपणा आहे असं जाहीर केलं, नाराजी व्यक्त केली, निषेध केला. या सीझनमधे काही वेळा टोनी ब्लेअर (माजी प्रधान मंत्री) दिसतात. राणीनं  कमीशन केलेलं जहाज मोडीत काढायच्या प्रश्नी ब्लेअर यांनी घेतलेली भूमिका आणि केलेले प्रयत्न एका एपिसोडमधे दाखवलेत. तेही खोटं आहे असं सांगून क्राऊनवर ब्लेअर यानी टीका केली आहे.

गंमत पहा. मेजर (कंझर्वेटिव) आणि ब्लेअर (लेबर) यांनी क्राऊनवाल्यावर खटला भरला नाही, पेपरात लेख लिहिले नाहीत, कंझर्वेटिव पक्षाची माणसांनी क्राऊनच्या ऑफिसवर जाऊन  दंगे केले नाहीत किवा क्राऊन दाखवण्यावर सरकारनं बंदी घालावी अशी मागणी केली नाही. राणी एलिझाबेथ परवापरवापर्यंत जिवंत होत्या, त्यांनी क्राऊनबद्दल चकार शब्द काढला नाही. राणीनं ही मालिका पाहिली की नाही याबद्दलही राणीकडून कोणतीही माहिती प्रसिद्ध झाली नाही.

साहित्यामधे, फिक्शनमधे जे घडलेलं नाही पण घडू शकतं असं दाखवलेलं असतं. बाजीराव पेशव्यांवर मध्यंतरी एक हिंदी सिनेमा येऊन गेला. त्यात बाजीराव आणि मस्तानी धम्माल नाच करतांना दाखवलंय. बाप रे. केवढी बोंबाबोंब. बाजीराव असा नाचेल काय असं लोकांनी विचारलं. अनेक प्रसंग बाजीरावाच्या जीवनात घडत होते जेव्हां बाजीराव मनातल्या मनात तरी नाचला असेल,नाचू शकेल. मग तो नाचतांना दाखवायला काय हरकत आहे असं फिक्शनवाले म्हणतात. घाशीराममधे नाना नाचतांना, प्रणय करताना दिसला तेव्हां केवढा गहजब झाला होता, किती मोर्चे निघाले होते, किती वेळा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता.  एकादी लोकप्रीय,लोकमान्य व्यक्ती साहित्यात येते तेव्हां लोचा होतो. बाजीरावाचं नाव न घेता एकादा राजा नाचताना दाखवला असता तर लोकांनी शिटया वाजवू वाजवू त्याला नाचताना पाहिलं असतं. पण बाजीराव असं नाव आलं रे आलं की लोकं बिथरतात.

क्राऊनमधे राणी एलिझाबेथ आणि त्यांचा नवरा प्रिन्स फिलिप यांच्यातल्या तणावाचे प्रसंग दाखवले आहेत. फिलिपला राणीशी लग्न करावं लागल्यानं त्याचं स्वातंत्र्य हरवलं आहे. त्याला सैन्यात करीयर करायचं असतं, ते राजवाडी परंपरा करू देत  नाही. त्याला विमान चालवण्याचा थरार अनुभवायचा असतो, तो त्याला गमवावा लागतो. राणीचा पदर धरून जगावं लागतं. यानं तो वैतागला होता. रशियात अधिकृत दौऱ्यावर असताना दोघांमधल्या तणावांचा उद्रेक (अर्थात खाजगीतच) होतो. त्याला एक मैत्रीण हवी असते. फिलिप  आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या असलेल्या स्त्रीशी मैत्री करतो.

प्रत्यक्षात असं घडलं असेल काय? नसेलही. पण घडू शकतं की नाही? नक्कीच घडू शकतं. नावं बदलून ते सारं कल्पित असल्यासारखं न दाखवता क्राऊनवाल्यानी ते नावासकट दाखवलं. राजवाडा, फिलिप, राणी इत्यादी मंडळी जाम वैतागली असणार. परंपरेनं तोंडाला शिवण घातली असल्यानं गप्प राहिले. 

साहित्यीक स्वातंत्र्य हा सध्या महाराष्ट्रात एक मोठ्ठा मुद्दा उपटलाय. राजेशिवाजी,राजे संभाजी या ऐतिहासिक व्यक्तींबद्दल. त्या व्यक्ती सिनेमात जशा दाखवल्यात ते अनेक लोकांना पसंत नाहीये. राडा चाललाय. जो उठतो तो इतिहास आणि साहित्य या विषयावर बोलतो. ब्रीटन व तिथली संस्कृती वेगळी आहे, तिथं राजा राणी कसेही दाखवले व त्यांच्यावर कितीही टीका केली तरी चालते. मराठी, भारतीय संस्कृती आणि परंपरा वेगळ्या आहेत, त्या फार हळव्या आहेत, त्यांना मोकळेपणा वगैरे चालत नाही. जे आहे ते असं आहे हे लक्षात ठेवायचं. 

याच सीझनमधे डायनाच्या व्यक्तिगत जीवनातलं वादळ रंगवलेलं आहे. एकटी पडलेली डायना. राजवाड्यानं,नवऱ्यानं, सासरनं नाकारलेली डायना. तिच्यावर प्रेम करणारं कोणीतरी तिला हवंय. खान नावाच्या एका डॉक्टरशी ती संबंध ठेवते. त्या खानमधे ना ग्लॅमर, ना पैसा, ना प्रतिष्ठा. एक साधासुधा डॉक्टर.  मैत्रीला भुकेली डायना त्याच्याकडं जाते, त्याला चोरून भेटते. डायना ही भावी राजाची भावी राणी   कोणी ओळखणार नाही अशा तऱ्हेचे कपडे घालून खान बरोबर एका सिनेमाघरात जाऊन सिनेमा पहाते.

रोमन हॉलिडे हा सिनेमा आठवून पहावा. एक राजकन्या. राजवाड्यातल्या कोरड्या शिस्तीला आणि पोकळ प्रतिष्ठेला कंटाळलेली असते. तिला म्हणजे एका तरूण मुलीला रस्त्यावर फिरायचं असतं, भेळपुरी खायची असते, गर्दीत मिसळून मज्जा करायची असते. चक्क राजवाड्याला दांडी मारून ती बाहेर पडते आणि धम्माल करते. पण शेवटी ती राजकन्याच असल्यानं ही चार घटकांची मजा झाल्यावर एका क्षणी ती राजवाड्यात परतली. ग्रेगरी पेक आणि ॲाड्री हेप्बर्ननी धमाल उडवलीय, एक धमाल रोमॅंटिक एतिहासीक कॅामेडी धडून गेली.

रोमन हॅालिडे हे फिक्शन होतं. चित्रपट हाताळण्याची ती एक शैली होती. क्राऊनमधे डायना हा विषय तोच, हाताळणी २०२० सालची आहे. रोमन हॅालिडे फीचर फिल्म आहे, क्राऊन या मालिकेच्या आठ तासातली काही मिनिटं डायनाच्या वाट्याला येतात. विषयाची आर्तता तेवढीच. रोमन हॉलिडेतली राजकन्या कल्पित होती, क्राऊनमधली प्रिन्सेस डायना कल्पित नाही, वास्तवातली आहे येवढाच फरक.

राजा, राणी, राजकन्या, राजपुत्र ही माणसं. त्यांचे कपडे कसेही असोत, त्यांची घरं कोणतीही असोत. ती माणसंच असतात, तुमच्या आमच्यासारखीच. तशीच दु:खं, त्याच व्यथा. भावाबहिणींमधली तीच भांडणं, नवरा बायको यांच्यातले तेच तणाव. ते सारं सारं देखणं करून दाखवलं जातं. आपलंच दु:ख बकिंगहॅम राजवाड्यात आपण पहातो तेव्हा काही क्षण कां होईना आपण बकिंगहॅममधे असतो, काहीसे सुखावतोही.

रोमन हॅालिडे पहातांना वाटतं की कधी तरी एकादी राजकन्या आपल्यालाही आपल्या गावात भेटेल, आपण स्त्री असलो तर आपल्याला कधी तरी ग्रेगरी पेक भेटेल आणि आपण त्याच्याबरोबर धमाल करू.

म्हणून तर सिनेमे आपण पहातो, क्राऊन पहातो.

Comments are closed.