जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

जनतेच्या मनात काय दडलंय? भाग १.

भाग १.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ७ ते ११ नव्हेंबर इतका काळ चालली.  देगलूर, नांदेड, नायगाव ही शहरं; वन्नाळी, अटकळी, भोपाळा, रामतीर्थ, धुप्पा, हिप्परगा (माळ)नरसी,नायगाव, पार्डी इत्यादी दहाबारा छोटी गावं या मार्गात होती. राहूल गांधी नांदेडमधे १२५ किमी चालले. ६ विधानसभा मतदारसंघ आणि ३ लोकसभा मतदार संध या यात्रेत होते.

सकाळी यात्रा सुरू होत असे, दुपारी विश्रांती. संध्याकाळी यात्रेचा दुसरा टप्पा. रात्री विश्रांती.  सकाळी एक नाका सभा, संध्याकाळी एक नाका सभा, दुपारी पत्रकार परिषद आणि निवडक लोकांशी चर्चा. रात्री एकादी मोठ्ठी जाहीर सभा. अशी पद्धत.

।।

यात्रा कशी घडली,कशी घडवली गेली?

यात्रेचा कार्यक्रम ठरल्यावर १४ सप्टेंबर रोजी नांदेडला काँग्रेस पक्षाची पहिली बैठक होऊन कार्यक्रमाच्या आखणीला सुरवात झाली.केरळमधे यात्रेला सुरवात झाल्यावर नांदेडहून ७ कार्यकर्ते केरळात गेले आणि दोन दिवस यात्रेबरोबर चालले. यात्रा कशा रीतीनं चालते ते त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. तयारीला लागले. जेवण, रहाणं, वाहतूक, संपर्क इत्यादी व्यवस्थांच्या कमिट्या तयार केल्या.

वाटेत कुठली गावं असतील, त्यापैकी कुठल्या गावात ‘अचानक’ ठरल्यासारखं थांबायचं; कुठल्या गावात ‘अचानक’ छोट्या  मुलांना किंवा कोणाला तरी भेटायचं; याचंही नियोजन काही ठिकाणी करण्यात आलं होतं.

देगलूर, नांदेड या मोठ्या शहरात मुक्काम असेल तेव्हां तिथं येणारे पत्रकार, त्यांची पोचण्याची व रहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

राहुल यांच्यासोबत ११२ भारत यात्री होते. अख्ख्या भारतातून ते निवडले होते, प्रशिक्षित होते, कन्याकुमारीपासून सोबत होते, काश्मिरपर्यंत रहाणार होते. त्यांचा मुक्काम कंटेनरमधे असे. त्यांचा गट अ. त्यानंतर यात्रेसोबत चालणाऱ्या ५०० लोकांची आगाऊ निवड झालेली असे, हा झाला ब गट.  त्यांना पास दिलेले असत. या गटात कोण माणसं सामिल होती याचं नियोजन करण्यात आलं होतं. या गटातले कोण राहुलबरोबर काही अंतर चालतील याचंही नियोजन करण्यात आलं होतं.नंतरचा  क हा गट म्हणजे सर्वसाधारण नागरिकांचा. म्हणजे गर्दी. ही गर्दी पाच हजार ते पंचवीस पन्नास हजार अशी कितीही मोठी असे. यात्रा ज्या गावात मुक्काम करत असे तिथं  दुपारचं आणि रात्रीचं जेवण व इतर व्यवस्था करावी लागली.काही ठिकाणी ही व्यवस्था जिल्हा काँग्रेस, राज्य काँग्रेस पक्षानं केली तर काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी निधी उभा केला.

नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचं काम आणि क्षमता होती, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांचे पुत्र अशोक चव्हाण दोन वेळा मुख्यमंत्री होते. त्यामुळं ऐवज आणि लवाजमा काँग्रेस पक्षाजवळ होता. पण नांदेडला लागून असलेल्या हिंगोली जिल्ह्यात  पक्षात बजबजपुरी होती. त्यामुळं मुंबईच्या वर्षा गायकवाड आणि लातुरचे अमीत देशमुख यांच्यावर आर्थिक जबाबदारी सोपवण्यात आली होती.

दिल्लीत एक ऑफिस होतं, राज्यांत एक ऑफिस होतं, तिथून सारं नियोजन करण्यात आलं होतं.जयराम रमेश आणि दिग्वीजय सिंग यांनी सारं नियोजन सांभाळलं होतं. 

काटेकोर नियोजन आणि अंमलबाजवणी हे या यात्रेचं वैशिष्ट्यं होतं. 

किती पैसे खर्च झाले (यात्रावाले आणि स्थानिक मिळून) याचा काही अंदाजच लागत नाही. नांदेडच्या काँग्रेस पक्षाकडं चौकशी केली तर ते सांगू शकले नाहीत. १० कोटी रुपये खर्च झाले असू शकतील. 

रामतीर्थ  या गावात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पक्षाची माणसं आहेत. राष्ट्रवादी एकाद दुसराच. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भारत जोडोमधे मदत केली नाही, ते यात्रेत गेले नाहीत.

रामतीर्थमधल्या  लोकांचं म्हणणं असं की गावात राजकीय पक्ष असतात ते केवळ निवडणुकीपुरतेच. निवडणुक आली की हिरीरीनं वाद होतात, पण निवडणुक आटोपल्यावर गावात पक्ष पातळीवरची भांडणं नसतात, गाव नेहमी एकत्र असतो. भारत जोडो हे प्रकरण जवळजवळ निवडणुकीसारखंच झाल्यानं भाजपचे गाववाले कार्यक्रमापासून दूर राहिले.

रामतीर्थचे पंच हनुमंत वाडेकर, धुप्पाचे माजी सरपंच माधव कंधारे आणि गावचे एक कार्यकर्ते संतोष पुयड यांनी गावाबद्दलची माहिती पुरवली.

पार्डी या गावात वेगळी स्थिती दिसली. गावात भाजप, सेना, काँग्रेस असे तीनही पक्ष आहेत. निवडणुक आली की पक्ष कार्यकर्त्यांमधे वाद, भांडणं होतात.  निवडणुक झाली की भांडणं संपतात, गाव एकत्र असतो. भारत जोडो यात्रेत भाजपचे कार्यकर्तेही सामिल होते. त्यांनी वर्गणी दिली, स्वयंसेवक म्हणून कामं केली, यात्रेबरोबर काही काळ चालले, यात्रेकरूंची सरबराई करतांना त्यांनी वाटून दिलीघेतलेली कामं केली.

यात्रेची तयारी करण्यासाठी दोन दिवसांचं एक शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्यात पार्डीहून ३ जणं गेली होती.   

माजी सरपंच निळकंठ मदने म्हणाले ‘शिबिरात स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगण्यात आला. चले जाव, दांडी सत्याग्रह, बारडोलीचा लढा इत्यादी गोष्टी सांगण्यात आल्या.सावरकर माफी प्रकरणं, संघाचा इतिहास, गोळवलकरांचे विचार इत्यादी विषयही शिबिरात मांडण्यात आले होते.’

मदने म्हणाले ‘आमचा गाव सर्व पक्षांशी प्रेमानं वागतो. आमचा गाव  एकच बाजू घेत नाही. आमच्या गावानं जिल्हा परिषदेसाठी सेनेच्या उमेदवाराला मतं दिली, विधानसभेसाठी काँग्रेसला मतं दिली आणि भाजपचा माणूस खासदार म्हणून निवडून दिला.’

#

गावातल्या लोकांशी बोललो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोललो. काँग्रेसबद्दल प्रेम नसलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी बोललो. पत्रकारांशी बोललो. एबीपीमाझाच्या वार्ताहराशी बोललो.

नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत सुमारे दोन लाख लोकं बाहेरून आले, यात्रेबरोबर चालले. ती माणसं आपली आपण आली होती. त्यांना रोजंदारीवर कोणी आणलं नव्हतं.

वाटेतल्या गावांतले वीसेक हजार लोक ही यात्रा घडवण्यात तरी गुंतले होते किंवा यात्रा जात असताना रस्त्याच्या दुरतर्फा उभे राहून यात्रा पहात होते, राहुल गांधींना पहात होते. ही माणसंही उत्सूकतेनं आपली आपणच यात्रेचा अनुभव घेत होती.

।।

Comments are closed.