लढाऊ वारकरी संपादक

लढाऊ वारकरी संपादक

अनंतराव भालेराव

अनंतराव भालेरावांचं लहानपण घडलं वारकरी कुटुंबात, वारकरी वातावरणात. तिथं त्यांची नैतिक घडण झाली.

अनंतराव भालेरावांचं तरूणपण घडलं हैदराबाद मुक्ती संग्राम चळवळीत. तिथं त्यांची राजकीय घडण झाली.

अनंतराव अचानक, त्यांच्या ध्यानी मनी नसतांना संपादक झाले. तिथून नैतिक, राजकीय मूल्यांच्या पायावर त्यांची  पत्रकारी घडण.

।।

अनंतराव शाळेत  आणि कॉलेजात जायच्या वयात असताना मराठवाड्यात हैदराबाद संस्थानातून मुक्त होण्याची चळवळ आकाराला येत होती. अनंतराव चळवळीत ओढले गेले. हैदराबाद मुक्ती लढ्याचं संघटन करणाऱ्या काँग्रेस आणि नंतर स्टेट काँग्रेसमधे  अनंनतराव पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले. परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यात ते कार्यरत होते. काही काळ त्यांनी सेलूच्या शाळेत शिक्षकी केली.

याच काळात भाषिक घुसमट होणाऱ्या मराठी साहित्यिक आणि रसिकांनी मराठी भाषा जपण्याचे प्रयत्न केले. मराठवाड्यात साहित्य संमेलनं भरवली. मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग संघटित केले.  स्वातंत्र्य लढ्यातल्या नेत्या-कार्यकर्त्यांचा  या प्रयत्नांना पाठिंबा होता. या प्रयत्नांना स्वातंत्र्य लढ्यानं प्रोत्साहन दिलं, कार्यक्रम घडवण्यात मदत केली. अप्रत्यक्षपणे वरील प्रयत्नांचा फायदा स्वातंत्र्य चळवळीलाही होत होता. अनंतराव साहित्य परिषदेचं काम करत असत.

हैदराबाद मुक्ती संग्रामानं सशस्त्र चळवळीचं वळण घेतल्यानंतर अनंतरावांनी  शस्त्रं गोळा केली, सशस्त्र कारवाया केल्या.  सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अनंतरावांनी उमरी बँक लुटली. लुटलेले पैसे पै न पैच्या हिशोबासह सरदार पटेलांना सुपूर्द केले.

पोलिस कारवाईनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं आणि मराठवाडा विभागातल्या आंदोलनाचं एक पर्व संपलं.या पर्वात निजामी राजवटीतल्या अन्याय आणि अत्याचार अनंतरावांनी अनुभवला.  निजामी राजवट मराठवाड्यातल्या ( व संस्थानातल्या इतर ठिकाणच्याही ) हिंदू प्रजेवर अत्याचार करत होती. जनतेला कोणतंही स्वातंत्र्य नव्हतं. मराठी भाषाही मारून टाकण्याचा, मराठीच्या जागी उर्दू प्रस्थापित करण्याचा  निजामाचा प्रयत्न होता. मराठवाड्यातील प्रजेला कमालीची घुसमट सहन करावी लागत होती.

चळवळीमधे अनंतरावांवर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांचा प्रभाव होता. वरील नेत्यांवर गांधीजींचा प्रभाव होता. गांधीजींचे विचार अनंतरावांनी स्वीकारले. याच काळात एकीकडं गांधींजींचे विचार आणि त्या सोबत त्या काळात मूळ धरत असलेला मार्क्सवाद-समाजवाद  या दोन्ही विचाराधारांचं  मनन अनंतरावांनी केलं.

अनंतरावांचं व्यक्तिमत्व घडण्यात या काळाचा मोठा वाटा होता. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून अनंतराव मराठवाडाभर हिंडत. साधनं नव्हती, पैसे नव्हते. जिद्द येवढ्याच बळावर कार्यकर्ते कार्यरत असत. खिशात दमडा नसतांना गावोगाव फिरणं. आज या घरी, उद्या त्या घरी. आज इथं नाष्टा उद्या तिथं जेवण. प्रवासासाठी कोणी तरी पैसे देत असे. मानधन अगदीच अपुरं असे. त्यात संसार चालवावा लागे. या खटाटोपात अनेक माणसं अनंतरावांनी पाहिली, अनुभवली. मराठवाड्यातल्या माणसाचं जगणं, त्यांच्यावरचे अन्याय, त्याची आर्थिक स्थिती, त्यांचं मन इत्यादी साऱ्या साऱ्या गोष्टी अनंतरावांच्या विचारविश्वाचा, भावविश्वाचा भाग झाल्या. तुरूंगवास. पोलिसांची मारझोड. भूमिगत रहाणं. यातून एक कणखरपणा अनंतरावांच्या व्यक्तिमत्वात तयार झाला.

मुक्ती संग्रामाच्या काळात मराठवाडा हे  मुक्ती संग्रामाचं  मुखपत्र आ.कृ.वाघमारे चालवत असत. या मुखपत्रावर निजाम सतत बंदी घालत असे. वाघमारे  नाव बदलत, छापण्याचं ठिकाण बदलत,  मराठवाडा प्रसारित करत होते. मराठवाड्याबाहेर मराठवाडा छापायचा आणि तो मराठवाड्यात पोचवायचा अशी पद्धत होती. हैदराबाद संस्थानातून मुक्ती मिळाल्यानंतर वाघमारे यांनी मराठवाडा हैदराबादमधून औरंगाबादी आणला. औरंगाबादमधे भारत मुद्रक आणि प्रकाशक या नावानं एक कंपनी स्थापून   मराठवाडा द्वीसाप्ताहिक प्रसिद्धी सुरू झाली. सुरवातीला अनंतराव भारत मुद्रकच्या जयहिंद प्रेसचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मराठवाडा द्वीसाप्ताहिक  छापणं ही जयहिंद प्रेसची जबाबदारी होती. त्या क्षणापर्यंत अनंतरावांचा पत्रकारीशी संबंध नव्हता. चळवळीतले एक कार्यकर्ते या भूमिकेत  ते जयहिंद प्रेसचं काम पहात. वाघमारे संपादक होते, तेच संपादकीय लिहीत. स्वातंत्र्य चळवळीची भूमिका वाघमारे अग्रलेखात मांडत असत. वाघमारे यांच्या लेखनात सैद्धांतिक, तात्विक भूमिका असत.

अचानक वाघमारेंनी निवृत्ती जाहीर केली आणि मराठवाडा नियतकालिकाचं संपादकपण अनंतरावांकडं सरकवलं. लेखन किवा पत्रकारीचे कोणतेही गुण प्रकट झाले नसतांनाही अनंतराव संपादक झाले.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री आणि अनंतराव

कार्यकर्त्याचा संपादक झाला. तेव्हां त्यांना कोणी विचारलं असतं ” अनंतराव, तुम्ही कसे काय संपादक होणार बुवा.  किती अवघड असतं हो ते संपादकीय लिहिणं.”

अनंतरावांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं असतं ” ऊं:. त्यात काय मोठंसं. लोकांची दुःखं आपल्याला माहित आहेत. त्यातून वाट कशी काढायची ते गांधीजी, स्वामीजी, गोविंदभाई यांनी सांगून ठेवलंय. तेच लिहायचं झालं.”

राजवट बदलली होती, प्रश्न बदलले होते. मराठवाड्यातली जनता हैदराबाद राज्यात सुखी नव्हती. भाषावर राज्यांची मागणी देशभर होऊ लागली होती. हैदराबाद राज्यात उस्मानिया विद्यापीठ होतं. त्या विद्यापीठात मराठीला महत्व नव्हतं. हैदराबाद राज्यात तेलगु आणि कानडी भाषकांची बहुसंख्या   होती. मराठवाडी जनतेला भाषिक  घुसमट जाणवत होती.  मराठीपण, मराठवाडापण टिकवायचं असेल तर एका स्वतंत्र विद्यापीठाची गरज होती. उस्मानिया विद्यापीठात मराठी विभाग अगदीच लहान होता,  मराठी विद्यापीठ व्हायला हवं होतं.

‘ मराठवाडा ‘ नं आपल्याला विद्यापीठ हवं ही मागणी केली, लावून धरली. जनतेचीही ती मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी, विद्यापीठाच्या उभारणीचा अभ्यास करण्यासाठी एक कमीशन न्या. पळणीटकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्यात आणि महत्वाच्या तालुक्यात फिरलं. कमीशननं एक प्रश्नावली केली होती. त्यातला एक प्रश्न होता की या विद्यापीठाला कोणतं नाव असावं. औरंगाबाद, अजंठा, एलोरा इत्यादी नावांचा उल्लेख प्रश्नात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही नाव त्या प्रश्नात होतं. सर्व ठिकाणी लोकांनी एकमतानं मराठवाडा हे नाव ठेवावं अशी मागणी केली. मराठवाडा या प्रादेशिक नावामधे मराठवाडा या प्रदेशातलं सारं काही येत होतं. या विभागाची घडण, या विभागाचं सोसणं, या विभागातली सगळी माणसं आणि त्यांचे प्रश्न असं  सगळं या प्रादेशिक नावात येत होतं. मराठवाड्यातले दलित, मराठवाड्यातल्या लोकांचं आर्थिक मागासपण हेही त्यात येत होतं. कमीशननं जनतेचं मत मान्य केलं आणि मराठवाडा विद्यापीठ अस्तित्वात आलं.

मराठवाडा हा विभाग हैदराबाद विभागातून बाहेर काढून स्वतंत्र एकभाषक महाराष्ट्राचा भाग बनावा अशी जनतेची अपेक्षा होती. ‘ मराठवाडा ‘नं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या पुरस्कार केला. तत्कालीन पंतप्रधान नेहरू भाषावर प्रांत रचनेच्या विरोधात होते. त्यामुळं महाराष्ट्रातली काँग्रेसही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या विरोधात होती. अनंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन लावून धरलं. कोणत्याही अटी न घालता मराठवाडा महाराष्ट्रात सामिल झाला.

पुन्हा मागले पाढे पंचावन्न. राज्यकर्ते बदलले, मराठवाड्यातल्या जनतेचे हाल शिल्लकच. हैदराबाद राज्यातून आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकार सवतभावानं वागवत होतं. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या ज्येष्ठता, वेतनश्रेणी मराठवाडातील कर्मचाऱ्यांना लागू होईनात. अनंतरावांनी हा वरवर साधा वाटणारा प्रश्न लावून धरला कारण त्यात केवळ कर्मचाऱ्यांवर नव्हे   मराठवाडा या विभागावर अन्याय होत होता.

मराठवाडा महाराष्ट्रात सामिल झाला खरा पण मराठवाड्याच्या आर्थिक मागासपणाकडं महाराष्ट्र सरकार लक्ष देत नव्हतं. दुष्काळ आणि नापिकी हे मराठवाड्याचं दुःख लक्षात घेऊन मराठवाडात विशेष रुपात आर्थिक गुंतवणूक होणं आवश्यक होतं. झुकतं माप दिल्याशिवाय मागासपण दूर होत नसतं. मराठवाड्याचं दुर्दैव असं की झुकतं माप तर सोडाच पण साधं मापही  पदरात पडत नव्हतं. क्षुल्लक रकमेवर मराठवाडाची बोळवण होत होती आणि ती रक्कमही वापरली जात नव्हती. अनंतरावांनी मराठवाडामधून मागासपणाचा प्रश्न सतत लावून धरला, आंदोलनं घडवली.

मराठवाडा विभागातली एक जीवघेणी घटना म्हणजे नामांतराचं आंदोलन. दलितांच्या विकासाचा प्रश्न मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर या प्रतिकात्मक मागणीनं महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी हाती घेतला. अनंतराव दलित विकासाच्या बाजूनं होते. इतके की त्यांचे मित्र त्यांना दलितांचे पुरोहित असं म्हणत असत.  अनंतरावांची दलित विकासाची भूमिका व्यापक होती. दलितांचा आर्थिक विकास झाला पाहिजे आणि आर्थिक विकास मराठवाड्याच्या एकूण आर्थिक विकासाचा भाग असेल अशी अनंतरावांची धारणा होती. दलितांच्या आर्थिक विकासासाठी वेगळे प्रयत्न झाले पाहिजेत असं ते मांडत असत. नामांतराची मागणी प्रतिकात्मक आणि भावनात्मक होती. विद्यापीठाला आंबेडकरांचं नाव दिल्यानं आंबेडकरांचा गौरव होत होता आणि समाजाचं दलितांकडं लक्ष आहे हे सिद्ध होत होतं. परंतू त्या पलिकडं राजकीय पक्षांनी दलितांच्या आर्थिक विकासाचा आराखडा मांडला नव्हता.  स्वतंत्र  विद्यापीठ स्वतंत्रपणे दलितांचे व्यापक प्रश्न सोडवणारं असायला हवं असं अनंतराव अग्रलेखातून मांडत असत.  स्वतंत्र विद्यापीठासाठी पैसे जमवायला आणि उभारणीला आपण उत्सूक आहोत असं अनंतरावांनी लिहिलं.

राजकीय पक्षांना विद्यापीठाचं नामांतर करून शॉर्टकटनं स्वतःची व्यापक दलित विकासातून सुटका करून घ्यायची होती. राजकीय पक्षांच्या मागणीशी  मराठवाड्यातल्या जनतेचे मतभेद होते. आंबेडकरांबद्दल पूर्ण आदर राखूनही मराठवाड्यातली जनता आणि अनंतराव नामांतर होऊ नये असं म्हणत होते. दै.मराठवाडानं नामांतर आणि नामांतरविरोधी अशा दोन्ही बाजू मांडल्या पण नामांतर विरोधात संपादकीय भूमिका घेतली.

आणीबाणीतल्या तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर

अनंतराव प्रादेशिक होतेच पण तरीही राष्ट्रीयही होते. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यावर लोकशाही आणि स्वातंत्र्याचं आंदोलन भारतभर उभं राहिलं. मराठवाडा दैनिक त्या आंदोलनात उतरलं. अनंतरावांनी आंदोलनात तुरुंगवास पत्करला.

संपादक या नात्यानं हैदराबादपासून मुक्ती झाल्यानंतर थेट आणीबाणीपर्यंतच्या काळात मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आणि मतं अनंतरावांनी दै. मराठवाडात मांडली, त्या मतांसाठी आंदोलनात उतरले, त्या आंदोलनात कधी हारतुरे तर कधी गोटेमार सहन केली. त्यांच्या पत्रकारीचा मुख्य मुद्दा होता जनतेला न्याय मिळणं. त्यासाठी ते कायम जनतेच्या बाजूनं उभे राहिले. त्या खटाटोपात सत्तेशी आणि राजकीय पक्षांशी त्यांनी पंगा घेतला. सत्ता आणि राजकीय पक्षांच्या भ्रष्टाराचावर त्यांनी सतत कोरडे ओढले.

मराठवाडा हे पत्र कशासाठी असेल या बाबतची स्वच्छ कल्पना अनंतरावांच्या डोळ्यासमोर होती.

अनंतरावांची भूमिका अशी होती – ‘ लोकशाही आणि समाजवादावर आमची असीम श्रद्धा आहे. या दोन रचना निर्दोषपणे देशात सिद्ध झाल्या नाहीत तर हा देश सर्वसामान्यांना आपला वाटणार नाही, त्यांना भवितव्य उरणार नाही…शोषण संधिसाधूपणा, लाचखोरी, लांड्यालबाड्या आणि फोडाफोड यावर जे आपले प्रपंच उभे करतात, त्यांना सर्वसामान्यांच्या हितासाठी नुसताच विरोध करून चालत नाही तर सर्व कुप्रवृत्तींचा निःपात करू शकेल येवढी जनतेची शक्ती वाढवावी लागते. आजवर मराठवाड्यानं हे व्रत यथामति आचरले आहे आणि इतःपरही ते चालू रहाणार आहे.’

वरील व्रत आचरत असताना अनंतराव म्हणतात – ‘ व्यक्तिविरोध आम्ही निषिद्ध मानला आहे.व्यक्तीवर  वेळी, प्रसंगी प्रहार करावा लागला तो केवळ त्यांच्या धोरणावर, व समाजजीवनावर परिणाम करणाऱ्या त्यांच्या आचरणावर. सहकाराचे, समाजवादाचे, लोकशाहीचे नाव घ्यावयाचे, प्रत्यक्ष आचरणात मात्र या सर्व सिद्धांतांना काळिमा फासावयाचा, असे जेथे घडले तेथेच व्यक्तीच्या विरोधी लेखणी उचलावी लागेल. एरव्ही व्यक्तीच्या खासगी जीवनाशी आम्हाला काही कर्तव्य नाही. ज्या व्यक्ती समाजाच्या व सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येतील, दंभ माजवतील सत्तेच्या मस्तीने धुंद होऊन जे जनतेच्या डोक्यावर वरवंटा फिरवू बघतील त्यांना कडवा विरोध करण्याचे आमचे आजवरचे व्रत दैनिकातही चालू राहील…’

अनंतराव लिहितात- ‘ लोकमत विरूद्ध ठेवून फक्त हुकूमशाहीचा कायदाच अस्तित्वात राहू शकतो, हे राज्यकर्त्यांनी नीट उमजून असावे… आमच्या राज्यकर्त्यांची शक्तिबुद्धी लोकहिताच्या सर्वच प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनाशून्य बनली आहे…काँग्रेसच्या मंदिरासमोर तत्वशून्य तडजोडीची किती मिथुने कोरलेली आहेत ते बघणे हिताचे ठरेल…भुकेच्या पोटी सामान्यांच्या मुखातून जेव्हां किंकाळी फुटते, तेव्हां मंत्र्यांच्या मुखातून ढेकर बाहेर पडतो. संत्रस्त नागरिक दुःखनिवारणार्थ जेव्हां मोर्चे काढून अन्यायाविषयीची चीड ओकत असतो, तेव्हां मंत्री जांभया देत असतात. त्यांची ही वेळ निद्रेची असते. अशा गोंधळाच्या, संमोहाच्या अवस्थेतून सत्य सदासर्वकाळ मंत्र्याच्याच बाजूला असते. कारण सत्य हे हल्लीच्या काळात सत्तेच्या रुपानेच आविष्कृत होत असते… मेहेरबानी करून आता महाराष्ट्र, शिवाजी, लोकमान्य आणि गांधी यांची नावे बडबडू नका. लोकांनी प्रतिज्ञा केली आहे की तेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवतील आणि भारताचे संरक्षण करतील. तुम्ही मात्र डोक्यावर पदर घेऊन दिल्लीश्वरांच्या अंतःपुराच्या दारात जाऊन ‘ गडे, आम्हाला रुसू द्या ‘ म्हणून प्रार्थना करीत बसा. परमेश्वर तुमचे भले करो… राजनीती ही वारांगनेसारखी असते ही म्हण आपण नेहमी ऐकतो, वापरतो; परंतू ती वारांगना सत्तेची मोहनास्त्रे सोडून महाराष्ट्रातील झुंजार, लढाऊ, त्यागी, कृतविद्य वगैरे उपाधींनी विभूषित होणाऱ्यांना प्रेयसीच्या दाराशी माती खायला लावील अशी कल्पना नव्हती… सत्तेच्या मोहक उद्यानातील इष्काच्या बुल्बुलांचे कुजन ऐकून मस्तकलंदर बेभान होत असतील; पण या उद्यानाच्या बाहेर रखरखीत वाळवंटात होपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न यामुळे कसे सुटायचे?

औरंगाबादेत मराठवाडा सुरु झालं तेव्हां  सुरवातीला हैदराबादमधलीच मंडळी औरंगाबादी आली. टायपाची जुळणी करणारी माणसं उत्तम मराठी जाणणारी तेलुगू भाषक होती. अनंतरावांनी मराठवाडाची रचना नव्यानं आरंभली.  चळवळीतले कार्यकर्तेच त्यांनी बातमीदार म्हणून उभे केले. बातमीदार माणसं व्यावसायिक बातमीदार नसत, ती माणसं समाजात वावरणारी साधी माणसं होती. ती माणसं समाजाचं मन जाणत या मुद्द्यांवर त्यांना बातमीदार केलं गेलं.

अगदी सुरवातीच्या काळात काशीनाथ कुलकर्णी या एका नवख्या माणसाला अनंतरावांनी बातमीदार बनवलं.  अन्याय अचूक हेरणं आणि त्याची बातमी देणं त्याला शिकवलं. त्या काळात काशीनाथ कुलकर्णी म्हणजे टेरर असे. लोक त्यांना घाबरत असत. पुढं चालून अशा बातम्यांची परंपरा मराठवाडात सुरु झाली.

एकनाथ तेलवाडकर हेही एक असेच बातमीदार अनंतरावांच्या तालमीत तयार झाले होते. तेलवाडकरांचं शिक्षण जेमतेम झालं होतं. त्यांचं हस्ताक्षर नवसाक्षरासारखं असे, अक्षरं नाईलाजानं कागदावर उतरलीत असं वाटत असे.   घुवट पांढरा लेंगा शर्ट हा त्यांचा पेहराव. आपल्याला काहीच कळत नाही, आपण गरीब आहोत असा भाव चेहऱ्यावर असे. हातात बंदाची कापडी पिशवी. पिशवीत पान तंबाखू आणि पिवळ्या न्यूज प्रिंटवर लिहिलेली बातमी. तेलवाडकर मराठवाड्यात पोचले की अनंतराव विचारत ” बोला महाशय, काय बातमी आणलीत.”

आपल्या बातमीबद्दल तेलवाडकर वरच्या आवाजात आणि हुशारी मारल्यागत बोलत नसत. ‘ काही तरी आणलय झालं ‘ असा भाव असे.  बातमी बेरकी असे. गावातली बित्तंबातमी बातमीत असे.

सेलूचे चारठाणकर असोत की लातूरचे जीवनधर शहरकर. शहरकर पेशानं शिक्षक होते.   सामाजिक कार्यकर्ते  असल्यानं त्यांच्या पायाला भिंगरी लागलेली असे. समाजातल्या सर्व थरातल्या सर्व महत्वाच्या माणसांच्या संपर्कात ते असत. लातूर शहरात काय चाललंय हे त्यांना खडानखडा माहित असे. बातमी  घडण्याच्या प्रक्रियेत असतानाच शहरकरांना माहित असे.

लातूरमधला शर्मा हा मराठवाडाचे अंक घरोघरा टाकणारा माणूस. तोही बातमीचा उगम असे. फरक येवढाच की तो बातमी कागदावर लिहत नसे, फोनवरच्या संभाषणातून देत असे.  तोंडानं फटकळ. शर्मा फोन करून थेट अनंतरावांना सांगे ” अमूक माणूस, तुम्ही त्याची बातमी छापलीय. तो नालायक आहे. अशा माणसांच्या बातम्या छापू नका.”

कुलकर्णी, शहरकर व इतर बातमीदारांकडून येणाऱ्या बातम्या वाचून राजकीय लोक, पुढारी म्हणत की  मराठवाडा हे एक तक्रार पत्र आहे, सतत कुरकुर असते, हे चुकलं, ते चुकलं, असं व्हायला नको, तसं व्हायला हवं असंच मराठवाडात येतं. अनंतरांवाना भेटून पुढारी तशी तक्रार करत.   पुढारी आणि राजकारणी मराठवाडातल्या बातम्यांमुळं उघडे पडत.  अनंतराव  सांगत की अन्याय आणि दुःखं मांडणं हे मराठवाड्याचं कामच असल्यानं त्यांचा   इलाज नाही.

अनंतराव  सांगत की म्हणत की मी एक प्रादेशिक वृत्तपत्रं चालवतो. राज्यात इतरत्र घडणाऱ्या घटना, देशात आणि विश्वात घडणाऱ्या घटना याबद्दल लोकांना वाचायचं असेल तर त्यासाठी इतर वृत्तपत्रं आहेत, ती त्यानी वाचावीत. या प्रदेशाच्या अनेक समस्या आहेत, प्रश्न लोंबकळत पडले आहेत, अन्याय होतोय, तेव्हां या प्रदेशाचं हित हेच आपलं उद्दिष्ट आहे असं ते म्हणत.

अनंतरावांचा पिंड राजकीय कार्यकर्त्याचा असल्यानं आपले सहकारी  आपले जिवाभावाचे कुंटुंबीय घटत आहेत असं अनंतराव मानत. ते  वेतनधारी नोकर आहेत असं त्यांनी कधीच मानलं नाही. सहकाऱ्यांच्या कुटुंबाचीही काळजी ते घेत असत.   यातून निर्माण होणाऱ्या तणावांनाही त्यांना तोंड द्यावं लागत असे. अनंतराव स्वतः अगदीच साधे रहात, अगदीच नाममात्र वेतन घेत. हालअपेष्टांची त्यांना आवडच होती की काय असं वाटावं अशा अवस्थेत ते व त्यांचं कुटुंब रहात असे. अगदी नकळत अनंतराव आपल्या सहकाऱ्यांकडूनही तशीच रहाणी अपेक्षीत. परंतू हे सारे तणाव अनंतरावांच्या स्वभावातील निरलसता आणि गोडवा यामुळं मराठवाडा दैनिकावर परिणाम घडवू शकले नाहीत.

अनंतराव दररोज कचेरीत होणाऱ्या बैठकीत आपल्या सहकाऱ्यांशी बोलत. कोणत्या बातम्या व्हायला हव्यात, त्या कशा असायला हव्यात ते सांगत असत. उभी हयात लोकांमधे गेलेली असल्यानं गावात कोण कोण महत्वाची माणसं आहेत, कोण बेरकी आहे, कोण अचूक माहिती देईल, कोण लबाड आहे हे अनंतरावांना माहित होतं. ते बातमी मिळवण्यासाठी कोणाकडं जायला हवं ते  सुचवत. अनंतराव चोविस तास संपादक असल्यानं सक्काळपासून त्यांच्या घरी माणसांचा राबता असे. बातमीदारही अगदी सकाळीही अनंतरावाकडं पोचत असत.

त्यातही गंमत असे. घरात किंवा कचेरीत त्यांच्याभोवती अनेक माणसं असत. बातमीदार एकाद्या माणसाबद्दल, त्यानं दिलेल्या माहितीबद्दल बोलत. हजर असलेल्यांपैकी एकादा दाणकन सांगून टाके की तो माणूस लबाड आहे आणि त्याची माहिती चुकीची आहे. अनंतराव आश्चर्यानं आणि लहान मुलाच्या निष्पाप मोकळेपणानं म्हणत ” अरेच्च्या. तो इतका लुच्च्या आहे हे मला माहितच नव्हतं. बरं झालं तुम्ही सांगितलंत.” बातमीदारानं या संभाषणातून योग्य तो अर्थ घ्यायचा असे.

कधी कधी हजर माणसं एकमेकाला छेद देणारी माहिती देऊन गोंधळही उडवत असत.

अनंतरावांचे अग्रलेख हे मराठवाडाचं मुख्य अंग होतं.

त्या काळात पत्रकारी हे स्वतंत्र मूल्यं मानलं जात नसे. पत्रकारी कुठल्यातरी ध्येयासाठी केली जात असे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर इत्यादी नेत्यांनी चळवळीसाठी नियतकालिकांचं संपादन केलं होतं. लोकांना शहाणे करून सोडण्यासाठी जांभेकरानी दर्पण सुरु केलं होतं. शहाणे करून सोडणं म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं. म्हणजे संपादकीय किंवा अग्रलेख लिहिणं. सामान्यतः  संपादक त्यांच्या अग्रलेखांसाठी ओळखले जात. अनंतराव त्या परंपरेतले होते.

घडण्याच्या वयात अनंतराव स्वातंत्र्य लढ्याच्या धामधुमीत असल्यानं औपचारिक शिक्षणाला मुकले होते. इंटरपर्यंतच ते शिकू शकले. दीर्घ शिक्षणामधून तयार होणारी तात्विक, सैध्दांतीक – अकॅडमिक बैठक त्यांना जमवता आली नाही. तत्कालीन प्रभाकर पाध्ये किंवा पां. वा. गाडगीळ या संपादकांच्या  पद्धतीनं विषयाची वैचारिक मांडणी अनंतराव करत नसत. परंतू विविध विचारधारांचं आणि सिद्धांतांचं  मर्म त्यांनी वाचनातून आणि अभ्यासकांच्या  सहवासातून समजून घेतलं होतं.   मोठाले लेखक, ग्रंथ, वैचारिक इत्यादींचे संदर्भ न देता ते नेमका विचार मांडू शकत होते. त्यांचे संदर्भ होते गांधी, तुकाराम, ज्ञानदेव आणि नामदेव.

वाचकाला माहिती देत असताना ती  भावनात्मक अधिक असावी, अनाकर्षक वैचारिक असू नये असं अनंतरावांना वाटत होतं. मराठवाडातल्या बातम्या, अग्रलेख, लोकांना चेतवणारे असत, अन्यायाविरोधात चवताळवणारे असत. बातम्या आणि अग्रलेखांना एक धग असे. मराठवाडयातलं फी वाढ विरोधी आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन, आणीबाणीविरोधातलं आंदोलन ही काही उदाहरणं. मराठवाडा  वाचून लोक भारले जात, आरामखुर्ची सोडून रस्त्यावर उतरत.

अनंतराव बोली भाषेत लिहीत. मराठवाड्यातल्या घराघरात बोलली जाणारी भाषा ते वापरीत.   मराठवाडी मातीत तयार झालेली भाषा स्वाभाविकपणे त्यांच्या बोलण्या लिखाणात येत असे. त्या भाषेवर शेती आणि वारकरी संस्कृतीचा प्रभाव होता. शेती आणि वारकरी परंपरेतल्या शब्द आणि  प्रतिमा त्यांच्या भाषेत असत.

सामान्य माणसाची दैना व्यक्त करणाऱ्या एका अग्रलेखाचं शीर्षक होतं- पोटोबा वखवखता ठेवून लोकशाहीचा विठोबा विटेवर टिकायचा कसा. १९६४ साली तल्यारखान खटल्यातून सुटल्यानंतर लिहिलेल्या अग्रलेखाचा मथळा होता – ठेवितो हा पायी जीव थोडा. समाजवादी पक्षातला एक गट काँग्रेसवासी व्हायला निघाला होता त्या घटनेवरच्या अग्रलेखाचं शीर्षक होतं -गंगे सावधान, घोडे येत आहेत.  मराठवाडा दैनिक स्वरूपात प्रसिद्ध झालं तेव्हां लिहिलेल्या अग्रलेखाचं शीर्षक होतं- साच भावे वर्ताया.

तुरुंगातून सुटल्यानंतर लिहिलेल्या अग्रलेखात तुरुंगातले काही प्रसंग अनंतरावांनी लिहिलेत, त्यातल्या एक –  तुरुंगातून सुटत असताना एक गुन्हेगार कैदी त्यांना म्हणतो –  ‘ दोन नक्षत्रे संपली, पावसाचा थेंब नाही. लोक हवालदिल झाले असतील. दादा, तुम्ही बाहेर जातच आहा तर आमच्यातर्फे बाहेरच्या लोकांसाठी पाऊस घेऊन जा.’ योगायोग असा की, या वेदनायुक्त अंतःकरणाचा हुंकार यथार्थ ठरला. आम्ही बाहेर पाऊल ठेवले आणि आभाळ भरून आले.शिऊरपर्यंत आलो तोच पावसाला आरंभ झाला.

अनंतरावांच्या काळात संपादकीय लिहितांना संपादक स्वतःचा उल्लेख  ‘ आम्ही ‘ असा करत असत. तो काळच असा होता की चळवळीमुळं ‘ मी ‘ चा ‘ आम्ही ‘ होत असे. संपादक ही व्यक्ती न रहाता एका चळवळीचा भाग होत असे.

हे ‘ मी ‘ आणि ‘ आम्ही ‘ कसे होते? अनंतराव एक गोष्ट सांगत. उमरी बँक लुटल्यानंतर गोळा केलेले पैसे कार्यकर्त्यांनी गोविंदभाई श्रॉफ यांच्याकडं सोपवले, पै अन् पैचा हिशोब दिला. हिशोबात काही रुपयांची तफावत दिसत होती. कार्यकर्त्यांपैकी एकानं ते पैसे स्वतःच्या पदरातून भरायची तयारी दाखवली. यथावकाश हिशोब तपासून गोविंदभाई श्रॉफ यांनी पैसे जमा केले आणि एका कपाटात ठेवले. कपाटाला कुलूप नव्हतं. त्यानंतरचा संवाद साधारपणे असा.

” गोविंदभाई, कपाटाला एक कुलूप लावूया.” अनंतराव.

” कशाला?  कुलुपावर पैसे कशाला खर्च करायचे?.” गोविंदभाई.

” अहो, येवढी मोठी रक्कम अशी उघड कशी ठेवायची?”. अनंतराव.

” या पैशाला कोण हात लावणार आहे? रक्कम सुरक्षित आहे.” गोविंदभाई.

मराठवाडा दैनिकाच्या कार्यालयात अनंतराव आणि जॉर्ज फर्नाडिस

अनंतरावांचा कान जनसामान्यांच्या मनात काय आहे यावर असे.  पोलिटिकली करेक्ट भूमिका घेण्याचं बंधन ते पाळत नसत.  राजकारणातल्या लोकांचं मतांवर लक्ष असतं. निवडणूक त्यांना महत्वाची असते.  त्यांना अनेक वेळा स्थानिक लोकमताकडं काणाडोळा करावा लागे. मराठवाडा विभागातल्या मतांपेक्षा एकूण महाराष्ट्रातली मतं पक्षांना हवी असल्यानं मराठवाड्यातल्या जनतेच्या मतांकडं राजकीय पक्ष दुर्लक्ष करत. अनंतराव पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणात नसल्यानं आणि खुल्लेआम प्रादेशिक भूमिका घेत असल्यानं पक्ष, पुढारी, मंत्री यांच्यावर लिहितांना अनंतरावांचं बॉल पेन वस्तरा बनत असे. अनंतरावांची नियत साफ असल्यानं, त्यांच्या भूमिका स्वार्थी नसल्यानं त्यांचे फटके सहन करूनही पुढारी त्यांच्याशी चांगले संबंध राखत.

महाराष्ट्रातले सर्व मुख्यमंत्री मुद्दाम अनंतरावांना भेटत असत. यशवंतराव चव्हाण नेहमी अनंतरावांना भेटून जात. लालकृष्ण अडवाणीही त्यांच्याकडं एकापेक्षा अधिक वेळा भेटायला गेले होते. पीव्ही नरसिंह राव मुक्ती संग्रामात अनंतरावांचे सहकारी होते. हे नातं नरसिंह रावांनी  सत्तेच्या सोपानावर सर्वोच्च पायरीवर जाऊनही टिकवलं होतं, अनंतरावांना ते भेटत. अनंतरावांच्या घरी चहा आणि पोहे किंवा बिस्किटं असत. इतमामाच्या भाषेत बोलायचं तर अनंतरावांचा पाहुणचार असून नसल्यागत असे. पण भेटीत होणारी चर्चा हा पाहुण्याना आवडणारा खुराक होता.

सर्व पक्षाचे पुढारी अनंतरावांना भेटून तासनतास चर्चा करत.या चर्चेमधे त्या त्या पक्षातले अंतर्गत प्रश्न असत, पक्षातली भांडणं असत. अमूक एक पुढारी माझ्या विरोधात उचापत्या करतोय, तुम्ही त्याला समजून सांगा अशी विनंती पुढारी अनंतरावांना करीत. अनेक वेळा पुढारी राजकीय किवा व्यक्तिगत अडचणीत सापडलेले असत. अनंतराव त्यांची सुटका करू शकत नव्हते, कारण अनंतरावांकडं सत्ता नव्हती. ना ते पैसे देऊ शकत होते ना त्यांच्याकडं दबाव करण्याची क्षमता होती. पण ते सल्ला देत. त्यांचा सल्ला एका अनुभवी, सज्जन माणसाचा सल्ला असे. त्यांच्या सल्ल्यात स्वार्थ नसे. कधी ते मोठा भाऊ होत, कधी ते वडील होत, कधी ते जिव्हाळ्याचा मित्र होत.

मुख्यमंत्री किंवा मंत्री यांचं सभोवताली वावरणं याचा गैरपरिणाम अनंतरावांवर झाला नाही.

एकदा  पन्नालाल सुराणा यांनी दै. मराठवाडामधे एक लेख लिहिला. त्यात तल्यारखान या काँग्रेसच्या मंत्र्याच्या भ्रष्टाचारावर टीका होती. तल्यारखान यांनी अनंतराव आणि सुराणा यांच्यावर बदनामीचा खटला भरला. दोघांना तीन महिन्यांची शिक्षा झाली. त्या वेळी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. ही घटना घडण्याच्या आधी वसंतराव नाईक अनेक वेळा अनंतरावांना भेटले होते. औरंगाबादमधे आले की ते अनंतरावांना घरी जाऊन भेटत असत. त्यांच्या मनमोकळ्या गप्पा होत. तल्यारखान यांनी खटला मागे घ्यावा यासाठी अनंतरावांनी वसंतरावांवर दडपण आणलं नाही.

खटला गाजला. अनंतरावांची शिक्षा गाजली. अनंतराव तुरुंगातून सुटल्यावर त्यांचं ठिकठिकाणी स्वागत झालं. अनंतरावांचं तुरुंगातून सुटणंही राज्यभर गाजलं. नंतर काही दिवसांनी वसंतराव नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं औरंगाबादी अनंतरावांना भेटले. मनमोकळ्या गप्पा झाल्या. दोघांनी खटला आणि शिक्षा प्रकरणाला स्पर्श केला नाही, इतर गप्पा मारल्या.

पुढारी मंडळी फटके सहन करूनही अनंतरावांकडं येत यात त्यांचा एक स्वार्थही होता. पुढाऱ्यांना जनतेच्या मनात काय असतं ते जाणून घ्यायचं असतं.  नामांतर आंदोलनात मराठवाड्यातली जनता सरकारी निर्णयाबरोबर नव्हती. आणीबाणी विरोधी आंदोलनात जनता सरकार सोबत नव्हती. दै. मराठवाडामधून त्यांना जनमताची कल्पना आली.

            शरद पवार यांच्याशी गप्पा करतांना अनंतराव

नामांतर आंदोलनाच्या काळातली एक गोष्ट. मराठवाड्यातल्या एका पुढाऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं साहित्यिक, पत्रकार, पुढारी यांना गोळा केलं. राजकारण आणि इतर क्षेत्रातल्या लोकांमधे संवाद व्हावा अशी त्यांची भूमिका होती. एका ठिकाणी चहापाण्याची व्यवस्था केली होती. गप्पा झाल्या. शरद पवार गप्पांच्या फडात होते.  त्या वेळी ते गृह खात्याचे राज्यमंत्री होते. चर्चेमधे बोलतांना ते म्हणाले ” मी दैनिक मराठवाडा दररोज वाचतो. मुंबईतही मी मराठवाडा मागवून घेतो.  मराठवाड्यात काय चाललंय ते मराठवाडा वाचल्यानंतर कळतं.  मराठवाड्यात काय चाललंय हे मला जितकं मराठवाडा वाचून कळतं  तितकं ते इतर पेपरांतून कळत नाही. ”

व्यापक राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण यांच्या धबडग्यात साहित्याचं काही एक स्थान अनंतरावांनी निश्चित केलं होतं. वर्तमानपत्राच्या जागेतही ते स्थान ठरलेलं  असे, दिवाळी अंक आणि रविवार पुरवणी हे साहित्याचं स्थान असे. अनंतरावांचं वाचन,चिंतन आणि लोकसंपर्क यामधेही अनंतरावांनी साहित्याची पैस ठरवली होती.

अनंतराव मराठी, हिंदी, उर्दू कथा कादंबऱ्या वाचत असत. इंग्रजी साहित्यही त्यांनी वाचलं. औरंगाबादमधे विविध भाषांचे अभ्यासक आणि साहित्यिक अनंतरावांच्या निकट वर्तुळात होते. लिहितांना जिथं जिथं साहित्याचा संदर्भ येत असे तिथं तिथं अनंतराव त्या त्या भाषेतल्या लेखक अभ्यासकांशी बोलून आपल्या माहितीची खातरजमा करून घेत असत. महाराष्ट्रातल्या समकालीन साहित्यिकांशी त्यांचा सतत जिवंत संपर्क होता. कुसुमाग्रज, जीए कुलकर्णी, बा.भ.बोरकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, विद्याधर पुंडलिक, दुर्गा भागवत, पु.ल.देशपांडे, रा.रं.बोराडे या व इतर सर्व नामांकितांशी त्यांचा पत्रव्यवहार होता.

मराठवाडा दिवाळी अंकात कथा, कविता असत. दिवाळी अंकाचे वेध लागले की औरंगाबाद आणि मराठवाड्यातले लेखक, कवी, समीक्षक यांच्या समवेत अनंतरावांच्या दीर्घ बैठका सुरु होत.  कोणते लेखक-कवि निवडायचे याच्या चर्चा झडत. त्यांच्याकडून आलेलं साहित्य स्वतः अनंतराव तर वाचत असतच परंतू वरील निकटवर्तीयांकडूनही वाचून घेऊन त्यावरचा संपादन व्यवहार अनंतराव पक्का करीत असत.

आणीबाणीच्या काळात अनंतराव तुरुंगात असल्यानं लेखक-कवींना पत्रं पाठवण्यास विलंब झाला होता. अजून अनंतरावांचं पत्रं कां आल नाही या विचारानं बा.भ.बोरकर गोव्यात अस्वस्थ होते. मराठवाडासाठी त्यांनी एक कविता लिहायला घेतली होती, कवितेच्या काही ओळी लिहून झाल्यावर मराठवाड्याच्या चिंतेनं बोरकर थबकले होते. दै. मराठवाडाचं पत्र आलं आणि त्यांची कविता पूर्ण झाली. खुद्द बोरकरांनी ही गोष्ट अनंतरावांना सांगितली.

बोरकर औरंगाबादेत अनंतरावांकडं आले की अनंतरावांच्या घरी एक उत्सवच असे. अनंतरावांना मान्य नसलेल्या अनेक सवयी बोरकरांना माफ होत्या. कुसुमाग्रजांचंही अनंतरावांकडलं वास्तव्य असाच उत्सव असे.

औरंगाबादमधे मे.पु.रेगे यांची सौंदर्यशास्त्रावर तीन भाषणं झाली. अनंतरावांनी स्टाफवरच्या एका बातमीदाराला ती भाषणं कव्हर करायला सांगितली. बातमीदार  सर्वसाधारण बातम्या देणाऱ्यांपैकी होता. सौंदर्यशास्त्र हा विषय त्याच्या परिचयाचा नव्हता. त्यानं एक भरड बातमी दिली.   सौदर्यशास्त्राचं मर्म त्या बातमीत येत नव्हतं.

अनंतरावांनी ती भाषणं ऐकलेले समीक्षक आणि प्राध्यापक सुधीर रसाळ यांना  बोलावून घेतलं आणि त्यांना भाषणाचा सविस्तर वृत्तांत लिहायला सांगितलं. रसाळ म्हणाले ” अहो हा विषय कठीण आहे, सामान्य माणसाला तो समजणार नाही, त्याला हा  विषय खोलात समजून घेण्याची  जरुरही नाही. तुमचा वाचकवर्ग खेड्यातला आहे. तो कुठं हा किचकट विषय वाचणार आहे?”

अनंतराव म्हणाले ” तुमचं म्हणणं बरोबर आहे. भले खेड्यातल्या वाचकाला सौंदर्यशास्त्र समजणार नाही. पण निदान तो वृत्तांत चाळेल तरी. असा काही तरी विषय असतो, त्यावर विद्वान माणसं संशोधन करत असतात हे त्याला कळेल तरी. मराठवाड्यातल्या जनतेची आर्थिक-सामाजिक-राजकीय समज वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्याच बरोबर त्याची सांस्कृतीक उंचीही वाढली पाहिजे. ”

तीन अंकांमधे दीर्घ वृत्तांत दै. मराठवाडानं प्रसिद्ध केला.

अनंतरावांच्या अग्रलेखामधे उपमा आणि रुपकं भरपूर असत. राजकीय घडामोडी आणि राजकारणातल्या व्यक्ती यांच्या भोवती अग्रलेख असत.  घटना आणि माणसांच्या अल्याड पल्याडच्या अंधाऱ्या जागा अनंतराव हुडकत. त्या जागांत अनंतरावांची कल्पनाशक्ती मुक्तपणे विहार करत असे. लेनिन यांचं वर्णन करताना अनंतराव लिहितात की विचार आणि कल्पनेच्या रिंगणात अडकून पडलेला मार्क्सवाद लेनिननी बाहेर काढला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मृत्यूची दखलही महाराष्ट्रातल्या काँग्रेसी नेत्यांनी घेतली नाही याचं दुःख व्यक्त करणाऱ्या अग्रलेखात अनंतराव लिहितात – महाराष्ट्रातील सत्ताधुंद दिग्गजांना आणि उगवत्या सूर्याला दंडवत घालणाऱ्या धूर्त कोल्ह्यांना (स्वामी रामानंद तीर्थांच्या मृत्यूबद्दल) काही वाटले नाही. अगदी यःकश्चित कामासाठी सरकारी पैशावर दाहीदिशा उडत फिरणारे सत्तेच्या कमळातील हे भ्रमर हैद्राबादला काही येऊ शकले नाहीत, त्यांचा जीव (दिल्लीत- निवडणुकीच्या) तिकिटांच्या सोडतीत अडकला होता ना. .. अनंतराव लिहितात – स्वामीजी, तुम्ही एकाद्या सहकाही बँकेचे अध्यक्ष असता, एकाद्या सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असता किंवा सत्तेच्या रिंगणात असेच कुठे तरी असता तर ते तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करायला आले असते…एकादा सहकार महर्षी मेला की, यांचे अष्टभाव जागृत होतात. डोळ्यांचे पाणी खंडत नाही. मृतांच्या फोटोसमोर असे बसून राहतात की, जणू यांचा सख्खा बापच मेला आहे. काय तो सुतकी चेहरा, काय ते रडण्याचे सोंग…

जनता पार्टीचा विजय झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी एक भाषण केलं. त्यात यशवंतराव म्हणाले होते की  जनता पक्षाचा अश्वमेधाचा घोडा जो दिल्लीतून सुटला व उत्तर पादाक्रांत करून दक्षिणेत येऊन ठेपला तो विंध्य पर्वताच्या पायथ्याशी लवांकुशांकडून (दादा व तिडके) नक्कीच अडवला जाणार आहे. यावर यशवंतरावांचा समाचार घेताना अनंतराव लिहितात- गावखोरीच्या वेशीवर लोकशाहीच्या नावानं ठणाणा करीत हिंडणारे हे बारगीर इंदिरा गांधी आणि संजय गांधींच्या घोड्याचा खरारा करण्यात मग्न होते.त्यांची ती खोडच आहे. सत्ता ज्याच्या हाती त्याला कुर्निसात करायची. त्याच्यासाठी खरारा करून घोडे तयार ठेवायचे व स्वतःच्या पाठीची रिकीब करून सत्ताधारी अलगद सत्तेच्या घोड्यावर बसवावयाचा अशी ज्यांना गेल्या तीस वर्षात सवय जडली आहे त्यांनी अश्वमेध आणि अश्वमेधाचा घोडा अडविणे वगैरेची भाषा कशाला करावी? या अग्रलेखाला अनंतरावांचं शीर्षक होतं – खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा कसा अडविणार?

महाराष्ट्रातले एक मंत्री हरिभाऊ वर्तक यांच्या घरी मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांनी महिलांचा लाटणं  मोर्चा नेला. वर्तक पुरवठा मंत्री होते. जनतेला पुरेसं धान्य मिळत नव्हतं आणि जे मिळत होतं तेही निकृष्ट होतं. हे वास्तव वर्तकाना कळावं यासाठी वरील मोर्चा होता. ही घटना घडत  असताना तिथं वर्तकांच्या  घरातील एक गलेलठ्ठ बोका मोर्चेकऱ्यांच्या समोर आला.  या घटनेवर अग्रलेख लिहितांना अनंतरावांच्या कल्पनेचा घोडा चौखुर उधळला.   बोका हे सूत्र धरून अनंतरावांनी ‘  रोडावलेल्या मांजराचं रहस्य ‘ असा अग्रलेख लिहिला. अनंतराव लिहितात – वास्तविक आपल्या घरातील बोका गलेलठ्ठ आहे या बाबत मंत्र्याला  एवढा न्यूनगंड असायचं कारण काय, हे आम्हाला समजत नाही. उलट मुक्या प्राण्यांवर दया करण्याचा आपला बाणा आहे, हे मंत्री सिद्ध करू शकले असते. आमच्या ताटाखालील मांजर बना, तुम्ही असेच गलेलठ्ठ बनाल, असं घेराव करणाऱ्या त्या उर्मट महिलांना मंत्री महोदय सांगू शकले असते. पाच उंदीर एका माणसाचे अन्न खातात असे म्हणतात. त्यामुळे अन्नधान्याची ही नासाडी थांबविण्यासाठी  आपण मूषकसंहारासाठी या बोक्याची खास नेमणूक केली असल्यानं उंदीर खाऊन हा बोका गलेलठ्ठ झाला आहे असाही युक्तीवाद करणे त्यांना शक्य होते. मागे पंजाबच्या एका मंत्र्याने उंदीर हे फार रूचकर व पौष्टिक अन्न आहे, असे सप्रयोग सिद्ध केले होते. आपल्या बोक्याचा आधार घेऊन या पंजाबी मंत्र्याच्या विधानाचे सत्यत्व सदर महिलांना जर मंत्रीमहोदयांनी पटवून दिले असते तर एका नव्या पूरक अन्नाला चालना देऊन अन्नपरिस्थितीवरील ताण कमी करण्याचे श्रेय श्री. वर्तक यांना मिळाले असते…

अनंतरावांनी स्वतंत्रपणे ललित लेखन केलं. ‘ मांदियाळी ‘ या  लेख संग्रहातला प्रत्येक लेख अनंतरावांच्या ललित साहित्य क्षमतेचा आविष्कार   आहे. या संग्रहात  अनंतरावांनी व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत.  व्यक्तींच्या माहितीच्या पलिकडं जाऊन या लेखात काळ उभा रहातो, काळाची शिवण दिसते, माणसांमाणसांमधील व्यामिश्र संबंध वाचकासमोर उलगडतात. हे साहित्य अपूर्व आणि अद्वितीय आहे.

काशीनाथ बुवा खंडाळकर या लेखात अनंतरावांनी आपल्या वडिलांवर लिहिलं आहे.   वडिलांबद्दलची चरित्रात्मक माहिती त्या लेखात आहे. पण त्या पलिकडं जाऊन आपली कल्पनाशक्ती आणि बौद्धिक शक्ती वापरून तो काळ, त्या काळातलं जगणं, वारकरी जीवन, वारकरी मूल्यं  यांचं एक चित्र अनंतरावांनी रेखाटलं  आहे.   निकटचे सहकारी नागनाथ परांजपे यांच्यावर लिहिलेल्या लेखामधे अनंतराव   लिहितात – नागनाथासारखी माणसे आपल्या कल्पनेत कायमचीच तरूण, अवखळ, भडकू आणि बेछूट असतात. ती अमर नसतात पण अजर नक्कीच असतात.  तो गेल्या काही वर्षांपासून अबोल, उदास, पूर ओसरल्यावर एकादा ओढा दिसतो तसा स्वतःत हरवलेला असा झाल्याचेही कानावर येत होते…

अनंतरावांचा एक बालणीचा मित्र होता ‘ पखवाज्या, रायरंदाचा गजानन ‘ अनंतराव त्याचं वर्णन करतात – तो दिसायलाही असाधारण म्हणजे व्यंगचित्रासारखा विचित्र होता. खूपच ठेंगणा होता. ठेंगू म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यातलाच हा गजानन. डोके भले मोठे, डोळे बारीक व खोल. भुवया खूप जाड. पापण्या विरळ आणि खूप पुढं आलेल्या. ओठ आफ्रिकेतील नीग्रोसारखे जाड. हनुवटी छोटी व तिच्यावर भलामोठा मस. बोकडासारखी कधी दाढी  तर कधी चक्क घोटलेली. गजानन खरोखरीच अजानबाहू होता. त्याचे दंड, मनगट, हात आणि बोटे भली मोठी. कसलेल्या पहिलवानासारखी. बोटे लांब पण टोकाला खूप जाड. तसेच त्याचे पाय. तो चाले तेव्हां काही तरी लुटुलुटू चालले आहे असा भास होई. आवाज एकदम पहाडी. गजाननचे हसू सर्व टापूत प्रसिद्ध होते. खो खो करून तो मोठ्याने हसे आणि तसेच काही तरी असेल तर गडबडा लोळत असे. तो स्वतःच सांगे की आईच्या पोटात नऊ महिने राहाण्याचा त्याला धीर निघाला नाही. पोर जन्मतःच एकाद्या चिन्हासारखे दिसले. मेले म्हणून पालकाने दुर्लक्ष केले. आई कशीबशी वाचली. गजानन म्हणे, पांडुरंगानंच मला मरू दिले नाही. लोक म्हणत ‘ गजाननच्या बोटात काचेच्या गोट्या बसवलेल्या आहेत. तो मृदंगावर आला की मृदंग वाजत नाही तर चक्क बोलतोच. राम कृष्ण हरी या भजनाचे अगदी स्पष्ट बोल, तो पखवाजातून काढून दाखवी.

अनंतराव बालवयात होते तेव्हां त्यांच्याकडं एक ‘ मास्तर ‘ येत असत. मास्तर वारकरी होते. अनंतरावांच्या वडिलांच्या निकट वर्तुळातले होते. अनंतरावांचं वाचन, संस्कृत आणि संत साहित्याचा अभ्यास पाहून मास्तर अनंतरावांना कीर्तन करण्याचा आग्रह करीत. एकदा त्यांनी अनंतरावांची पूर्व तयारी केली.

‘ रूप पाहता ‘  किंवा ‘ सुंदर ते ध्यान ‘ या अभंगानं प्रारंभ. त्या आधी ‘ राम कृष्ण हरी ‘  हे भजन. मग पंचपदी. मधूनमधून भजन. ते संपल्यावर निरूपणाचा अभंग. निरूपणाचा अभंग सुरु होण्याच्या आधी बुवानं वीणा दुसऱ्याला द्यायचा व उपरण्यानं कंबर बांधून नमन करायचं. मग अभंग. त्याच्या शेवटच्या कडव्याला कोणातरी टाळकऱ्यानं चाल लावायची. मग परत अभंग.

मास्तरांनी अनंतरावांना सगळं समजावलं आणि रात्री शिऊरला कीर्तनाला उभं केलं.

अनंतराव थरथर कापत होते. तोंडाला कोरड पडली होती. आपण रेडा झालो तर आपल्या तोंडून ज्ञानेश्वर काही तरी म्हणवून घेतील असं त्याना वाटू लागलं. मंगलाचरण झालं. निरूपणाचा अभंग कसाबसा आटोपला. भजन झालं. अनंतराव चरणाच्या अभंगाचा अर्थ सांगू लागले आणि गडबड झाली. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. रडू फुटणार होते. शेवटी विठ्ठलाला नमस्कार करून कमरेचं उपरणं सोडून अनंतराव चक्क खाली बसले. लोकांनी गंमत आणि कौतुक म्हणून सारं सहन केलं. त्यानंतर पुन्हा कधीही अनंतराव कीर्तनाकडं वळले नाहीत.

मास्तरांची शिकवणी  अनंतरावांच्या मनात आणि हृदयात पक्की होती. आ.कृ.वाघमारे यांनी मराठवाडाचे अग्रलेख अनंतरावांच्या हाती सोपवले आणि तिथून अनंतरावांचं निरूपण नव्यानं सुरु झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळं संपादकपद सोडल्यावरही ते स्वतंत्रपणे निरूपण करत राहिले, शेवटचा श्वास असे पर्यंत.

 

One thought on “लढाऊ वारकरी संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *