लॉकडाऊनमधेही चित्रपट करता येतो

लॉकडाऊनमधेही चित्रपट करता येतो

 झूम कॉन्फरन्सवर केलेला सिनेमा-होस्ट

।।

पडद्यावर लॅपटॉपचा स्क्रीन दिसतो. पाच मैत्रिणी आणि एक मित्र असे सहा जण झूम कॉन्फरन्स सुरु करतात. 

सेलन नावाची बाई पडद्यावरच्या एका चौकोनात दिसते. ती इतरांच्या साक्षीनं एका मेलेल्या माणसाच्या आत्म्याला झूमवर संवाद करायला बोलावते.

आत्माच तो. तो दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व झूमवरच्या मित्रांना कळू लागतं.

हा आत्मा या सर्वांशी बोलणार असतो, त्यांचे प्रश्न जाणून घेणार असतो, त्यांच्या अडचणी सोडवणार असतो.

सिआन्स नावाचा हा विधी युरोपच्या लोकपरंपरेत आहे, त्यात अशा रीतीनं माणसं एकत्र येतात आणि आत्म्याला नियंत्रित करणारी एकादी मध्यस्थ व्यक्ती जमलेली माणसं आणि आत्मा यांच्यात संवाद घडवते.

 संवाद सुरु होतो.सेलन स्क्रीनवरच्या सहा जणांना सांगते की आता त्यानी कल्पना करायची की त्यांच्या कंबरेला एक दोरी बांधलीय आणि तिचं दुसरं टोक आत्म्याला बांधलंय.  त्या दोरीमुळं माणसं परलोकाला जोडली जातील. भाग घेणारे तशी कल्पना करतात. मध्यस्थ स्त्री मेणबत्ती लावून विधी सुरु करते.

विधीच्या दरम्यान आत्म्याचा अपमान होतो, तो चिडतो. 

 एकीच्या घराचा दरवाजा आपोआप उघडतो. घरात कोणी तरी वावरत आहे असं वाटतं पण कोणी दिसत नाही. 

एकीचा गळा कोणी तरी अदृश्य शक्ती दाबत असते. 

एक मुलगी खुर्चीवर बसलेली मुलगी खुर्चीसकट दूर खेचून नेली जाते.  खेचणारं माणूस तर दिसत नाही. 

एकीच्या घरात विचित्र आवाज येऊ लागतात.

एकीच्या पोटमाळ्यावर कोणाचे तरी पाय लटकलेले दिसतात.

एकीच्या घराची काच अचानक फुटते.

  चिडलेला आत्मा खून करत सुटलेला असतो. पडद्यावरची मंडळी जाम टरकलेली असतात, म्हणतात की आता हा विधी संपवूया.

मंडळी कंबरेची दोरी सोडतात, पृथ्वीवर येतात. 

कॉन्फरन्स संपते.

सगळे जण सुस्कारा टाकतात, संपलं एकदाचं सेशन असं म्हणून आपापल्या घरात मस्ती करायला सुरवात करतात.

पण सेशन संपलेलं नसतं. आत्मा अजून शिल्लक असतो.

तो एकीला हवेत अधांतरी टांगून ठेवतो.

एकीच्या नवऱ्याला मारून टाकतो. नंतर तिलाही मारून टाकतो.

एकीचं शिर छिन्नविच्छिन्न होतं.

एक भयानक रक्ताळलेला चेहरा एकीवर हल्ला करतो या दृश्यावर चित्रपट संपतो. आणि ऋणनिर्देश दिसू लागतात.

काही क्षणांपूर्वी पडद्यावर परलोक असतो आता पडद्यावर या लोकांतल्या २०२० सालातल्या कलाकारांची नावं यायला लागतात.

सारा मामला लॅपटॉपच्या पडद्यावर. 

चित्रपट ५७ मिनिटांचा आहे. 

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहाता येतो परंतू मोठ्या पडद्यावरही लॅपटॉवरचं झूममधलीच दृश्य दिसत असतात.

म्हणजे एकूणात हा चित्रपट लॅपटॉप आणि सेल फोन या दोन उपकरणांच्या सहाय्यानं तयार केलेला आहे. स्टुडियो नाही, आऊड डोअर चित्रीकरण नाही.

१७ पानांच्या पटकथेवर हा चित्रपट फक्त ३ महिन्यात तयार झाला आणि प्रदर्शितही झाला.

लाखो लोकांनी तो पाहिला, निर्मात्याला भरपूर पैसेही मिळाले.

हा एक नॉर्मल भयपट आहे.   

भाग घेणारे सात जणं आपापल्या घरी बसून हातातल्या सेल फोन कॅमेऱ्याचा वापर करून आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर राहून अभिनय करतात. झूम कॉलमधे जशी माणसं एकत्र येऊन गप्पा करतात तसलाच हा प्रकार पण गप्पा करणारी माणसं अभिनय करतात.

रॉब सॅवेज नावाच्या दिग्दर्शकानं  पटकथा लिहिली.ती लंडनमधल्या सात नटांना पाठवली. त्यांनी काय करायचंय, कोणती वाक्य म्हणायचीयत हे सारं पटकथेत होतं. भयदृश्यांसाठी लागणारी सामग्री सॅवेजनं स्टंट करणाऱ्या व्यासयायिक लोकांकडून गोळा केली आणि आवश्यक दृश्यं घडवून आणली. नॉर्मल परिस्थितीत या गोष्टी त्यानं स्टुडियोत घडवून आणल्या असत्या. कोविडमुळं लॉकडाऊन असल्यानं सॅवेजनं लंडनमधल्या आपल्या घरात बसून लंडनमधल्याच इतर घरात बसलेल्या अभिनेत्यांकडून त्यानं अभिनय करून घेतला आणि नॉर्मल पद्धतीनं न जाता त्यानं झूमवर, लॅपटॉपवर संकलन केलं.

 खर्च म्हणाल तर अगदीच मामुली, एकादी पार्टी करण्यासाठी येईल तेवढाच.

एक थरारपट सेलफोन आणि लॅपटॉपच्या सहाय्यानं केलेला. 

तो गाजतोय. करोडो लोक तो पहाताहेत, भरपूर पैसेही त्यांना  मिळालेयत.  

ही आयडिया सॅवेजला कशी सुचली?

सॅवेज त्याच्या नव्या घरात रहायला गेला असताना त्याला पोटमाळ्यावर विचित्र आवाज आले. भयपट करणारा असल्यानं सॅवेजला वाटलं की एक चालतंबोलतं प्रेत पोटमाळ्यावर असेल. तशी कल्पना करून तो नाट्यमय हालताली व कॉमेंटरी करत पोटमाळ्यावर गेला. ते क्लिप त्यानं मित्राना पाठवलं. ते क्लिप वायरल झालं. त्यातून त्याला वाटलं की अशी एकादी फिल्म करता येईल. आणि होस्ट तयार झाली.  

कोविड नसता, क्वारंटाईन नसतं तर कोण करणार होतं हा उपद्व्याप. अगदी बेसिक अॅप आणि फोन इत्यादी वापरूनही एक चांगला चित्रपट करता येतो हे होस्टनं दाखवून दिलं. मोठे कॅमेरे, भरपूर लाईट्स, साऊंड इफेक्ट्स इत्यादी स्टुडियोत वापरून हा चित्रपट अधिक परिणामकारक जरूर करता आला असता. तितका परिणाम जरी साधता आला नसला तरीही लोकांना छोट्या पडद्यावर एक बऱ्यापैकी प्रभावी भयपट दाखवणं मात्र दिग्दर्शकाला जमलं आहे. 

कमी पैशात फिल्म करण्याचं एक नवं दालन या चित्रपटानं उघडलं आहे.

चित्रपट सुरु झाले तेव्हां कॅमेरे अगदीच प्राथमिक होते, संकलन करण्याची सोय नव्हती. काळाच्या ओघात कॅमेरे कायच्या कायच पुढारले. स्पेशल इफेक्ट निर्माण करणारी अॅप्स आणि उपकरणं तयार झाली. कागदावर किंवा कंप्यूटरच्या स्क्रीनवर माणसाचं चित्र काढायचं आणि त्याच्यावर इतके संस्कार करायचे की ते चित्र चित्र न रहाता खराखुरा माणूसच दिसू लागतो. हे तंत्र आता विकसित होतय. भविष्यात नटनट्या न घेताच चित्रपट तयार केले जातील. स्थळं, ठिकाणंही पूर्ण काल्पनिक असतात, कंप्यूटरमधे तयार केली जातात.

सेल फोन आणि डेस्क टॉपवर उपलब्ध असणारे सॉफ्टवेअर यांनी आता चित्रपट निर्मिती शंभर चौरसफुटात आणून ठेवलीय.

होस्ट हा चित्रपट त्या नव्या स्थितीचं प्रवेशद्वार आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *