कराचीतला राडा

कराचीतला राडा

कराची वरवर कां होईना आता थंड झाली आहे.

कराचीतले (सिंध राज्य) पोलिस आणि पाकिस्तान सरकारचं निमलष्कर रेंजर्स यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. तो आता थंडावला आहे.

केंद्रातलं सरकार विरुद्ध राज्यातलं सरकार यांच्यातला संघर्ष असं कराचीच्या धमालीचं रूप आहे.

केंद्रात इम्रान खान यांच्या तहरीके इन्साफ पाकिस्तान या पक्षाचं सहा पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. सिंध मधलं राज्य सरकार पीपल्स पार्टीचे मुराद अली शहा यांच्यासह इतर पाच विरोधी पक्षांचं सरकार आहे. केंद्रातलं सरकार आणि सिंध मधलं सरकार यांच्यात सतत राजकीय संघर्ष असतो. केंद्र सरकारला सिंधमधलं सरकार पाडायचंय आणि सिंधमधल्या सरकारला केंद्रातलं सरकार पाडायचंय.

सिंध सरकारनं केंद्र सरकारच्या आघाडीच्या विरोधात आंदोलन चालवलय. त्या आंदोलनातहत एक मोठी सभा सिंध सरकारमधल्या पक्षांनी घेतली. त्या सभेत कॅप्टन सफदर यांनी भाषण केलं. हे कॅप्टन सफदर म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या देश सोडून पळून गेलेल्या नवाज शरीफ यांचे जावई. नवाज शरीफ यांची मुस्लीम लीग ही पार्टी राज्य सरकारातल्या आघाडीचा सदस्य आहे.सफदर यांचं भाषण देशद्रोही आहे असं केंद्र सरकारनं ठरवलं आणि सफदर यांना अटक करायचा आदेश दिला.

राज्यातली कायदा व सुव्यवस्था राज्यातल्या पोलिसांच्या हाती असते. सिंधच्या कमीशनरना केंद्र सरकारनं अटक करायला सांगितलं. पण सिंधचा कमीशनर सिंध सरकारचा माणूस. तो आपल्याच सरकारातल्या माणसाला कसा पकडणार? त्यानं नकार दिला.

केंद्र सरकारनं आपल्या अखत्यारीतल्या निमलष्करी दलाला, रेंजर्सला, आदेश दिला की त्यांनी पकडण्याची कारवाई करावी. कराचीतले रेंजर्स मैदानात उतरले. त्यांनी सिंधच्या कमीशनरला किडनॅप केलं, त्याच्यावर दबाव आणला. त्यानं अटक करायला नकार दिला. किडनॅपची हकीकत कळल्यावर सिंध सरकारातले पोलीस रजेवर गेले, त्यांनी संप केला.

रेंजर्स वि. राज्य सरकारचे पोलिस.

 सिंधचे मुख्य मंत्री मुराद अलीनी बैठक घेतली. त्या बैठकीला संपावर गेलेले पोलिस अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभय दिलं.

आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष उभा राहिला. शेवटी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांनी अटकेचा आदेश मागे घेतला आणि झाल्या प्रकाराची चौकशी जाहीर केली. 

प्रकरण थंडावलं.

शुद्ध राजकारण. राजकीय पक्षांचं सत्तेचं भांडण आणि त्यासाठी   सरकारी यंत्रणेचा वापर. केंद्र सरकार केंद्र सरकारचे सुरक्षा दल वापरतं, राज्य सरकार आपलं पोलिस दल वापरतं. मुशर्रफही हेच करत होते, त्याना कराचीतले लोकं त्रास देऊ लागले की ते कराचीत सैनिक घुसवत असत.

पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशातल्या राज्यघटना १९३५ सालच्या ब्रिटीश राज्यघटनेवर आधारलेल्या आहेत. त्या राज्यघटनेत केंद्र आणि राज्य सरकारं अशी अधिकारांची वाटणी आहे, दोन्ही घटकांना अधिकार आणि कर्तव्य वाटून दिली आहेत. देशाच्या सीमांचं रक्षण केंद्रीय सुरक्षा संघटनांकडं सोपवण्यात आलं आणि राज्यातली सुरक्षा राज्यातल्या पोलिसावर सोपवण्यात आली. एकूणात केंद्र प्रबळ ठेवण्यात आलं होतं, कारण भारत हा देश अनेक संस्थानं आणि राज्यांचा मिळून बनलेला होता. राज्यं आपणहून भारतात   सामिल व्हायला तयार नव्हती, त्यांना घाईघाईत जबरदस्ती करून एकत्र करण्यात आलं होतं. ही स्थिती अखंड भारतात होती, फाळणीनंतरच्या भारतात होती आणि फाळणीनंतरच्या पाकिस्तानातही होती.

भारत आणि पाकिस्तानातली एक गंमत अशी की तिथली राज्यं या स्वतंत्र संस्कृतीही असतात. भारतात जसं माणूस आधी मराठी, गुजराती, बंगाली वगैरे असतो आणि नंतर जमल्यास भारतीय असतो. तसंच पाकिस्तानातही असतं. तिथं माणसं आधी सिंधी, बलुच, पठाण, पंजाबी असतात आणि जमल्यास सोयीनुसार ती पाकिस्तानी होतात.

जगभर साम्राज्यातून बाहेर पडून समाज स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले, नेशन स्टेट म्हणून अस्तित्वात आले तेव्हां त्यांचं मुख्य सूत्र समान संस्कृती हे होतं. भारत आणि पाकिस्तान अशी विभागणी मागण्यात आली ती मुस्लीम आणि हिंदू या दोन स्वतंत्र संस्कृती असल्यामुळं. पाकिस्तानची निर्मिती मुस्लीम या संस्कृतीच्या आधारे झाली असली तरीही बांगला देश हा मुस्लीम समूह पाकिस्तानातून फुटून बांगला देश झाला तो बांगला भाषिक संस्कृतीमुळंच.

हिंदू आणि मुस्लीम या दोन बृहत संस्कृतीच्या आधारे देश तयार झाले असले तरी त्या संस्कृतीच्या पोटात प्रादेशिक आणि भाषिक संस्कृती स्वतंत्रपणे होत्याच. तर त्या संस्कृती एकत्र रहाव्यात,  पुन्हा देश फुटू नये यासाठी   राज्यघटनेनं केंद्राला अधिक बळ दिलं. पण ते बळ सामंजस्यानं, राज्यांशी समजुतीनं वागून वापरावं असा संकेत होता.

  स्वातंत्र्यानंतर देशाला पाकिस्तानी अशी नवी ओळख निर्माण करणं पाकिस्तानला जमलं नाही, स्वतंत्र ओळखींची एक आघाडी अशाच रीतीनं पाकिस्तान विकसित होत गेला.

धर्म, भाषिक, प्रादेशिक संस्कृतीच्या पलीकडंही एक मानवी संस्कृती आहे असा विचार करणारे नेते पाकिस्तानात झाले नाहीत.(खरं म्हणजे असा मानवी संस्कृतीचा विचार ही एकूणच जगाची आजची गरज आहे.)

राजकारणात स्वार्थी सत्तांधळे राजकीय पक्ष आणि पुढारी निर्माण होत गेले, त्यांनी पक्षाचा आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतंत्र संस्कृतींचा वापर केला, त्या संस्कृतीतून एक नवा समाज घडवण्याऐवजी त्या संस्कृती अधिक बळकट करून त्यांचा वापर आपल्या स्वार्थासाठी केला. 

बलुच लोकांचे स्वतंत्र प्रश्न आहेत, बलुच प्रांत मोठा आहे, मागास आहे, तिथली संसाधनं पाकिस्तान वापरतं पण बलुचीस्तानचा विकास होत नाही. बलुच लोकांचं हे जुनं दुखणं आहे. बलुच माणसं मुळात पाकिस्तानातच रहायला तयार नव्हती, जिनांनी शेंडी लावून त्याना पाकिस्तानात खेचलं.

तेच सिंध्यांचं. सिंधमधे मधे मधे स्वतंत्र सिंध देशाची मागणी उफाळून येत असते. 

पठाणांना पंजाबी वर्चस्व नकोय.

कराचीमधे पोलिसांनी उठाव केला याला एक कारण सिंधी अस्मिता हेही आहे. इमरान खान पठाण आहेत, आणि मुराद अली सिंधी आहेत.

पाकिस्तानसमोर फार बिकट आणि चिवट आर्थिक प्रश्न जन्मापासून उभे आहेत. ते सुटायचे असतील तर पाकिस्तानमधे अंतर्गत शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे. धर्मांधता आणि सांस्कृतीक वैविध्य या दोन मुद्यावर अशांतता निर्माण होत असते, पाकिस्तानची शक्ती त्यात खर्च होत असते.

परिपक्व आणि दूरगामी विचार करणारं नेतृत्व पाकिस्तानला लाभलं असतं तर वरील दोन मुद्दे आटोक्यात ठेवून पाकिस्तानची प्रगती त्या नेतृत्वाला साधता आली असती. परंतू उत्तरोत्तर सत्तांधळं, अर्थअडाणी, भ्रष्ट नेतृत्व पाकिस्तानला लाभत गेलं, पाकिस्तानची धूळधाण वाढत गेली. 

कराचीत झालेला गोंधळ वरील लोच्याचा एक परिणाम आहे. असे गोंधळ पाकिस्तानात वरचेवर उद्भवत असतात. पण शेवटी किती ताणून धरायचं याचा काही एक हिशोब सत्ताधारी करतात. आघाड्यांचं राजकारण करून सत्ता टिकवण्याची खटपट चालते. कोणता पक्ष कोणाबरोबर आघाडी करेल ते सांगता येत नसतं.  

 सर्व पक्ष एकमेकांचे शत्रू असतात आणि मित्रही असतात. सर्व पक्ष आणि आघाड्यांचा हेतू सत्ता हाच असल्यानं शेवटी पक्ष आणि आघाड्या सांभाळून घेतात. तोडपाणी करतात. प्रकरण निवळतं. 

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *