कोणीही जिंको, लोकशाही पराभूत होतेय

कोणीही जिंको, लोकशाही पराभूत होतेय

आज सहा तारीख आणि शुक्रवार. अमेरिकेत तीन तारखेला मंगळवारी मतदान झालं. अजूनही पूर्ण निकाल आलेला नाही. १० कोटी लोकांनी मतदानाच्या दिवसाच्या आधीच मतं टाकली होती, पोस्टात किंवा मतपेटीत. ती मतं आता मोजली जात असल्यानं मोजणी रेंगाळत आहे.

सामान्यतः रिपब्लिकन माणसं मतदानाच्या दिवशी मतं टाकतात. डेमॉक्रॅट्स आधी मतदान करतात. यंदा कोरोनाचं संकट लक्षात घेऊन डेमॉक्रॅटिक पक्षानं आधी मतदान करण्यावर भर दिला होता. ती मतं आता मोजली जात असल्यानं कल डेमॉक्रॅट उमेदवाराची मतं वाढण्याकडं दिसतो. तो कल टिकला तर अगदी कमी फरकानं डेमॉक्रॅटिक उमेदवार जो बायडन प्रेसिडेंट होण्याची शक्यता आहे, पक्का निकाल यायला वेळ लागेल. 

एकूण नागरीक आणि एकूण मतदानाचा हिशोब मांडला तर  बायडन यांना ट्रंप यांच्या तुलनेत चाळीस लाखापेक्षा जास्त मतं मिळालेली दिसतात. गेल्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना तीस लाख मतं जास्त मिळाली होती. 

सुमारे २५ कोटी मतदारांमधे चाळीस लाख मतांचा फरक याचा अर्थ दोन टक्क्याच्या आसपास फरक येतो. याचा अर्थ दोन पक्ष किंवा दोन उमेदवार यांच्यातला फरक फार नाही, अमेरिका हा देश उभा विभागला आहे.

या विभागणीचा, एक अर्थ उमेदवारांची शैली आणि व्यक्तिमत्व यावरून लावता येतो. 

ट्रंप आक्रमक होते. त्यांची भाषा आकर्षक परंतू सभ्यतेला सोडून होती. त्यांची वक्तव्य सर्रास खोटी असत. ते मिनीटभरापूर्वी काय बोलले त्याचा संबंध त्यांच्या आताच्या वक्तव्याशी लागत नाही आणि पुढल्या मिनिटाला ते काय बोलतील त्याची खात्री देता येत नाही. आपण अमेरिकेचं भलं करून दाखवणारच, नव्हे आधीच दाखवलं आहे, नव्हे अमेरिकेच्या इतिहासात इतकी दैदीप्यमान कामगिरी कोणाही प्रेसिडेंटनं केली नाही असं ते खांदेठोकपणे सांगत होते.  तरीही त्यांना देश विभागण्यायेवढी मतं मिळाली आहेत.

बायडन मृदू आहेत. सांभाळून आणि सभ्यपणे वागले. त्यांच्या पक्षातले मतभेद, त्यांच्या कुटुंबातले तणाव त्यांनी लपवले नाहीत. अमेरिकेतले दोष आपल्याला माहित आहेत, ते दूर करावे लागतील, ते काम कठीण आहे, त्याला वेळ लागेल, आपल्या पक्षात अनेक मतं आहेत हे ते जाहीरपणे सांगत. व्यवहारी, सगळ्याना सांभाळून घेणारा, मध्यममार्गी माणूस अशी त्यांची प्रतिमा प्रचार मोहिमेत उघड झाली. तरीही जनतेनं त्यांना निसटतंच बहुमत दिलं.

प्रचाराची पट्टी, प्रचाराची तीव्रता, मजकुराचा मारा इतका करायचा की माणसाची विचारशक्ती थिजावी, हे या व अलिकडल्या निवडणुक प्रचार मोहिमेचं वैशिष्ट्यं दिसतंय. 

हे झालं व्यक्ती म्हणून पडलेल्या प्रभावाबाबत.

कार्यक्रमाबाबत बोलायचं तर डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात आणि अमलबजावणीत, सिद्धांत आणि वास्तव यामधे, खूपच फटी आणि अंतर होतं.

अमेरिकेत रोजगाराची डळमळीत स्थिती आणि सामाजिक तणाव हे दोन प्रश्न ऐरणीवर आले होते. 

रोजगार ही समस्या अर्थव्यवस्था गतीमान होण्याशी संबंधित आहे. अमेरिका किती वस्तू-प्रक्रिया तयार करते, किती विकते, त्यातून किती फायदा मिळतो हा एक घटक. म्हणजे निर्यात. अमेरिका किती वस्तूंचा वापर करते त्यासाठी किती खर्च करते, म्हणजे आयात. बहुतांशी या दोन्ही गोष्टी जागतीक व्यापाराशी संबंधीत. जगातल्या वस्तू आपल्याकडं कमी याव्यात आणि आपल्या वस्तू जगात जास्तीत जास्त खपल्या जाव्यात असं एक ढोबळ धोरण असावं लागतं. परंतू जगातल्या प्रत्येक देशाचंही तेच धोरण असल्यानं जग आणि अमेरिका यात तणाव असतात.

सामान्यतः वरील व्यापारातले खेचताण सांभाळणारा, त्यातला तोल  सांभाळणारा माणूस, विचार रोजगार निर्माण करण्यात यशस्वी होतो. डेमॉक्रॅटिक पक्षानं तो तोल सांभाळला होता, पण त्या नादात काही क्षेत्रातला (पोलाद, कार इत्यादी) रोजगार कमी झाला होता आणि तो रोजगार इतर क्षेत्रात भरून निघायचा होता पण त्याला वेळ लागत होता. ज्याचा रोजगार जातो तो पंचवीस वर्षं थांबायला तयार नसतो, तो नाराज होतो. हा नाराज नागरीक ताबडतोब रोजगार देतो या ट्रंप यांच्या आश्वासनानं सुखावला. तुमचा रोजगार काढून घेणाऱ्या दुष्ट चीनचा मी बंदोबस्त करतो अशी नाट्यमय घोषणा ट्रंप यांनी केली. ट्रंप यांना मतं मिळाली.

अर्थव्यवस्थेचा एक घटक वित्त व्यवस्थापन असतो. बाजारावर नियंत्रण ठेवून, कर बसवून पैसे गोळा करायचे आणि ते समाजाच्या सुखावर खर्च करायची अशी एक सामान्यतः डाव्या वळणाची म्हटली जाणारी व्यवस्था असते. अमेरिकेत ती सामान्यतः डेमॉक्रॅट्समधे आढळते.

सरकारनं बाजाराच्या भानगडीत पडायचं नाही, नियंत्रणं वगैरे आणायची नाहीत, उद्योगांनी हवे तेवढे पैसे मिळवावेत त्या पैशाला फारसा हात लावायचा नाही, कर कमी करायचे आणि नंतर खाजगी अर्थव्यवहाराच्या हातात देश सोपवायचा, सरकारनं त्यात पडायचं नाही या व्यवस्थेला सामान्यतः बाजारवादी, भांडवलशाही व्यवस्था म्हणतात. रिपब्लिकन पक्ष ती व्यवस्था मानतो.

अमेरिकेत डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही सत्ता ये जा करत राहिल्या आहेत. क्लिन्टन, बुश, ओबामा, ट्रंप अशी अलट पालट होत राहिली आहे. तरीही प्रत्येक राजवटीत अर्थव्यवस्थेत दोष निर्माण होत राहिले. म्हणजे वरील कोणत्याही छापाच्या व्यवस्थेमुळं अमेरिकेत रोजगार बुडाला किवा भरपूर निर्माण झाला असं झालेलं नाही. याचं कारण वरील  वैचारीक चौकटीबाहेरचे अनेक घटक काळाच्या ओघात तयार झालेले आहेत, जे घटक सैद्धांतिकांनी विचारात घेतले नाहीत.  

तेव्हां रोजगाराच्या बाबतीत डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांकडं पुरतेपणानं लागू पडेल असं गणित नाही.

निवडणुक प्रचाराच्या दरम्यान ते उघड झालं.

सामाजिक तणावाबाबत बोलायचं तर डेमॉक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यात खूप मोठी वैचारिक दरी आहे. रिपब्लिकन पक्षाचे समर्थक निर्णायक संख्येनं गोरे सनातनी ख्रिस्ती आहेत. ते काळे, बाहेरचे, मुसलमान इत्यादी लोकांना मुळातच कमी लेखतात, त्यांच्या बाबत गोऱ्या ख्रिस्ती लोकांच्यात दुरावा आहे. हा दुरावा अमेरिकेच्या जन्मापासून आहे. 

अमेरिकेतले काळे, लॅटिनो, आशियाई, आफ्रिकी, मुसलमान, ज्यू इत्यादी लोकांना रिपब्लिकन समाजात स्थान नसल्यानं ते स्वाभाविकपणे डेमॉक्रॅटिक पक्षात गेले. त्यांची संख्या आणि प्रभाव जसजसा वाढत गेला तसतसा डेमॉक्रॅटिक पक्षाचा प्रभाव वाढत गेला.

आज सामाजिक दरी शिल्लक आहे, समाजात रिपब्लिकन समाजिक विचार मांडणारी मंडळी खूपच आहेत हे वेळोवेळी लक्षात आलं आहे. काळ्यावर होणारा अन्याय, दंगली, हे त्याचं ठळक उदाहरण आहे.

आर्थिक आणि सामाजिक दोन्ही बाबतीत अमेरिकेत दुफळी आहे, ती वाढलीय की कमी झालीय ते सांगता येत नाही पण ती अजूनही ठळकपणे शिल्लक आहे हे या निवडणुकीतून सिद्ध झालंय. म्हणूनच दोन्ही पक्षातल्या मतामधे जेमतेम दोन टक्क्यांचा फरक आहे.

अमेरिकन समाजात विचारांची घुसळण चाललेली आहे. ही घुसळण वैचारिकता, सभ्यपणा, मानवता, अभ्यास या घटकांवर होत राहिली तर त्यातून अमेरिकन समाज अधीक चांगला होईल. निवडणुकीच्या राजकारणात ते घटक मागे पडतात आणि पूर्वग्रह, खोटेपणा आणि कर्कश्शपणा याला अधिक वाव मिळतो. अमेरिकेचा घोळ असा आहे की तिथं चार वर्षातला एक वर्षाचा काळ राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारात जातो. त्यानंतर दोन वर्षानी होणाऱ्या काँग्रेसच्या निवडणुकीत पुन्हा धुरळा उडू लागतो. म्हणजे चार वर्षातली दोन वर्षं अशा कर्कश्श, दूषित, खोटेपणावर आधारलेल्या प्रचारात जातात आणि त्यामुळं विचारानं वागायची संधी आक्रसते.

यातून वाट कशी काढायची हे अमेरिकन समाजानं ठरवायचं आहे.

हे दोष कमी अधिक प्रमाणात सर्वच लोकशाही देशात वाढत गेलेले दिसतात. जसा देश तसा वेष, जसा देश तशी भाषा आणि संस्कृती. त्यानुसार देशातल्या दोषांचं रूप बदलतं आणि त्यातून निघणाऱ्या वाटाही बदलतात. सर्वच लोकशाही देशांना या निमित्तानं आपापल्या अंगणात काय चाललंय याकडं लक्ष द्यायला हवं.

बायडन येवोत की ट्रंप, लोकशाही निष्प्रभ आणि डळमळीत होतेय. बायडन जिंकोत की ट्रंप, लोकशाही पराभूत होतेय.

।। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *