वंशद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर

वंशद्वेषाचा प्रश्न हाताळणाऱ्या सिनेमाला ऑस्कर

कारचा गोरा ड्रायव्हर आणि काळा मालक यांच्यातलं घट्ट होत गेलेलं मैत्रीचं नाट्य दाखवणारा ग्रीन बुक यंदा सर्वोत्तम ऑस्कर चित्रपट ठरला.  सहायक अभिनेता (माहेरशाला अली) आणि पटकथेचीही ऑस्कर चित्रपटाला मिळाली. 

१९६० च्या दशकातलं कथानक आहे. डोनल्ड शर्ली हा काळा नामांकित संगीतकार अमेरिकेत वर्णद्वेषासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांचा दौरा काढतो, त्यासाठी टोनी लिप या गोऱ्या माणसाला ड्रायव्हर कम सहाय्यक म्हणून पगारी नोकर म्हणून ठेवतो. शर्ली एका प्रतिष्ठित सुस्थित काळ्या घरात वाढलेला भरपूर शिकलेला आणि अत्यंत ऊच्चवर्णीय गोऱ्या संस्कृती व शिष्टाचारात वाढलेला माणूस असतो. टोनी हा एका श्रमजीवी घरात वाढलेला टग्या असतो. हॉटेलात मस्ती करणाऱ्यांना बदडून बाहेर फेकणं हे त्याचं मुख्य काम असतं. टोनी वर्णद्वेषी वातावरणात, गोऱ्याचं श्रेष्ठत्व मानणाऱ्या समाजात वाढलेला एक अशिष्ट माणूस असतो. आपापले दुरावे घेऊन दोघे एकत्र येतात आणि सिनेमा व दौरा संपत असताना एकमेकांबद्दल प्रेम-आपुलकी बाळगणारे होतात.

माहेरशाला अली (संगितकार ) आणि विगो मार्टेनसेन (ड्रायव्हर) दोघांच्या भूमिका प्रभावी आणि निर्दोष आहेत. चित्रपट कधी संपतो ते कळत नाही इतका प्रभावी आहे. चित्रपट आपल्याला आवडतो. चित्रपटात जागोजागी काळ्यांची हलाखी आणि त्याना दिलेली अन्याय्य वागणूक दिसते, पदोपदी गोरे काळ्यांचा कसा अपमान करतात ते दिसतं. १९६० साली अमेरिका कशी होती याचा अंदाज चित्रपट पहाताना येतो. त्या बरोबरच दोन्ही व्यक्तिमत्व खुलत जातात आणि वर्णद्वेषावर भाष्य करणारा चित्रपट पहात आहोत असं न जाणवता एक रोमॅंटिक सिनेमा पाहिलाय असं वाटत आपण बाहेर पडतो.

 चित्रपट अमेरिकेत आणि कॅनडात भरपूर चालला, चित्रपटानं उत्तम धंदा केला. परंतू अमेरिकन लोकांच्या प्रतिक्रिया खूप तीव्र होत्या. कोणाला हा चित्रपट गोऱ्यांचा अपमान करणारा वाटला, कोणाला काळ्यांचा अपमान करणारा वाटला, कोणाला वर्णद्वेषाचा प्रश्ण अनुत्तरीत ठेवलाय असं वाटलं, कोणाला तो भरड उपदेश वाटला. सिनेमातली दोन्ही पात्रं खरोखरच अस्तित्वात होती आणि २०१३ साली दोन्ही पात्रं चार पाच महिन्यांच्या अंतरानं निवर्तली. त्यामुळं अनेकांना ती माणसं माहित आहेत. तर त्या लोकांपैकी काहीना वाटलं की पात्रांवर अन्याय झालाय, खोट्या गोष्टी चित्रपात घुसडल्यात.

अमेरिकन नसलेले प्रेक्षक एका सांस्कृतीक अंतरावरून सिनेमा पहातात. अमेरिकन प्रेक्षकांनी सिनेमा अमेरिकन दृष्टीकोनातून पाहिला. जाम वाद झाले. सिनेमा ऑस्करच्या लायकीचाच नाही असं अनेकांनी तीव्रपणे, उंच आवाजात सांगितलं.

अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे. नाना रंगांचे, नाना वंशाचे, नाना संस्कृतीचे लोक या देशात बाहेरून स्थलांतरित झाले. बहुतेक सगळी माणसं नशीब काढायला, आपापल्या देशातल्या संकटांपासून मुक्त व्हायला धाडस करत या देशात पोचले. तडजोड करत ही माणसं एकमेकांसोबत राहिली.एकाच देशात जरी राहिली तरी एकरूप झाली नाहीत. आपापले श्रेष्ठत्वाचे गंड माणसांनी जपले. युरोपियन ख्रिस्ती गोरे श्रेष्ठ. त्या नंतर हिस्पॅनिक, त्या नंतर आशियन, त्यानंतर चिनी, त्यानंतर आफ्रिकी, त्यानंतर ज्यू आणि सर्वात शेवटी काळे.शेती करण्यासाठी लोकांना मजूर हवे होते. युरोपीयन गोऱ्यांनी आफ्रिकन काळे गुलाम म्हणून आणले. काळे म्हणजे देवानं शाप दिलेली पापी माणसं असं गोऱ्यांनी ठरवलं.  

आपापले पूर्वग्रह, द्वेष, दुरावे, जपत आजही अमेरिकन समाज जगतो. काळाच्या ओघात पूर्वग्रह आणि दुरावे काल्पनिक आहेत असं सिद्ध झाल्यानंतर काही माणसं त्या पूर्वग्रहापासून दूर जाऊन माणूस हीच एक ओळख मानू लागली. साधारणपणे या सुधारणेला पुरोगामी, लिबरल सुधारणा असं म्हणतात. 

परंतू पूर्वग्रह, द्वेष अजूनही शिल्लक आहेत. साहित्य, चित्रपट, कला, पत्रकारी या माध्यमातून माणसांमाणसांमधीर मानल्या गेलेल्या समजुतींची समस्या हाताळली गेली.

 काळे-गोरे संबंध हा विषय अमेरिकेत फार वादाचा, कातर, विषय आहे. अमेरिका हा गोऱ्या युरोपीय लोकांनी वसवलेला देश. वसवतांना त्यांना आफ्रिकेतून काळे गुलाम मजूर म्हणून आणले. ख्रिस्ती लोकांना म्हणे त्यांच्या धर्मातच सांगितलंय की देवानं शाप दिलेली माणसं म्हणजे काळी माणसं. त्यामुळं आजही खूप माणसांना काळे ही माणसं म्हणून मंजूर नाहीत, ती नुसती कामासाठी वापरली जाणारी मजुरं असतात असं त्यांना वाटतं. याच मुद्द्यावरून एकेकाळी अमेरिकेत अंतर्गत युद्ध झालं होतं. आज वर्णश्रेष्ठत्वाच्या खुळ्या कल्पना न मानणारी खूप माणसं अमेरिकेत आहेत आणि आतल्या आत गोरे ख्रिस्ती श्रेष्ठ आणि इतर लोकं काळ्यांच्या नंतर उतरत्या क्रमानं कनिष्ठ असं मानणारेही खूप लोक आहेत.

त्यामुळंच काळे गोरे असा विषय कविता, कादंबरी, नाटक, सिनेमा यात आला की बोंब उठते.

‘ ग्रीन बुक ‘ ला ऑस्कर मिळालं आणि मागोमाग न्यू यॉर्कमधे डॅडी नावाचं नाटक गाजावाजा करत मंचावर आलं. त्यात फ्रँकलिन (काळा कलाकार) आणि आंद्रे (गोरा श्रीमंत ) यांच्यातल्या संबंधांचं चित्रण आहे. फ्रँकलिन हा एक अत्यंत सुदृढ बांध्याचा माणूस आहे. गोरा  आंद्रे काळ्या फ्रँकलिनच्या  थरारक सुदृढ शरीरावर प्रेम करतो, त्याच्या  चॉकलेटसम मुलायम पोटऱ्या आणि सुडौल ढुंगण चाटतो.  नाटक लोकप्रीय झालंय.

 जेरेमी हॅरिस या तिशीत प्रवेश करत असलेल्या आफ्रिकन माणसानं हे नाटक लिहिलंय.त्यानं नाटक शाळेत शेवटच्या वर्षाचं  शिक्षण घेत असतानाच हॅरिसनं स्लेव प्ले हे नाटक लिहिलं, ते गाजलं, पाठोपाठ डॅडी. हॅरिसनं शेक्सपियरचा अभ्यास केलाय. त्याचं म्हणणं असं ” शेक्सपियर हा लोकप्रिय नाटककार होता. त्याला माहित होतं की आपल्याला ज्या बद्दल लाज वाटायला हवी अशा गोष्टींपासून लोक पळून जातात.काळे आणि वर्णद्वेषाचा विषय निघाला की लोकं म्हणतात की ते सारं पूर्वी होतं, आता तसं उरलेल नाहीये. माणसं वास्तवापासून पळून जायचा प्रयत्न करतात. मी त्यांना वास्तव पहायला लावतो.”  

दोन्ही नाटकं चर्चेत आहेत, गाजत आहेत, काळे गोरे सर्व लोकं ती नाटकं पहात आहेत. हॅरीस फॅशनच्या जगातही आहे. डिझायनर लोकं नाना प्रकारचे कपडे त्याला घालायला लावतात आणि त्या कपड्यांची विक्री करतात.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *