संकट काळ

संकट काळ

क्राऊन या मालिकेतला एपिसोड सुरू होतो तेव्हा ॲबरफॅन गावात शुक्रवार असतो, मुसळधार पाऊस पडत असतो. शाळा सुटणार असते, एक शिक्षक मुलांना पुस्तिका वाटतात, त्यातलं गाणं पाठ करा, उद्या ते सर्वांनी एकत्र गायचंय असं सांगतात. दोन तीन दृश्यं मधे जातात, मुलं शाळेत पोचतात. एक विद्यार्थी वात्रट असतो. हाॅलमधे जायच्या आधीच वर्गात तो ते गाणं म्हणतो. वर्ग हसतो. शिक्षक सांगतात की गाणं म्हणायला वेळ आहे, पाच मिनिटं आहेत.

वर्गाच्या खिडकीतून दूरवरचा डोंगर दिसत असतो. डोंगर म्हणजे कोळसा खाणीतून बाहेर आलेल्या मातीचा डोंगर. खिडकीतून डोंगर कोसळतांना दिसतो. शिक्षक मुलांना बाकाखाली जायला सांगतो.

खलास.

पुढल्या दृश्यात शाळा, गाव, ढिगाऱ्याखाली दिसतं. रात्र असते. माणसं ढिगारा उकरून प्रेतं बाहेर काढतांना दिसतात. 

१४४ माणसं मेली. त्यात ११० मुलं होती.

नाट्य सुरू होतं.

 पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन घटनास्थळी जातात. नागरीक संतप्त असतात. मातीचा ढीग २० फुटापेक्षा मोठा असू नये असा नियम असतांना ढीग १२० फुटापेक्षा जास्त होता. नागरीकांनी संभाव्य संकटाची कल्पना आणि तक्रार अनेक वेळा केली होती.

नॅशनल कोल बोर्ड म्हणतं की अभूतपूर्व पाऊस झाल्यानं माती ओली होऊन कोसळली. सबब दोष बोर्डाचा नाही. 

लंडनमधे कंझर्वेटिव पक्ष जबाबदारी  सत्ताधारी लेबर पक्षावर टाकतो. 

लेबर पक्ष पत्रक काढून सांगतो की डोंगर तयार होणं हे कृत्य कंझर्वेटिव पक्षाच्या कारकिर्दीत धडलं असल्यानं जबाबदारी त्यांची.

पंतप्रधान लंडनला परतले, राणी एलिझाबेथना  भेटले. राणीनं तडक त्या गावात जाऊन लोकांचं सांत्वन करावं, जेणेकरून सरकारवरचा राग थोडा पातळ आणि बोथट होईल. राणी गेल्या नाहीत.  धटनेच्या ठिकाणी जाणं, मदत करणं इत्यादी कामं सरकारची असतात, राणीनं शांत रहायचं असतं असं राणी म्हणाल्या.

डोंगर तर किती तरी दिवसांपासून उंच उंच होत होते. 

खापर फोडण्यासाठी डोकी  शोधली जाऊ लागली. 

सरकारतर्फे पत्रक निघालं की या कठीण प्रसंगी राणीनं त्या गावात जाऊन सांत्वन करायला हवं होतं, राणीचंच चुकलं.

घटनेला आठवडा उलटल्यावर राणीनी गावाला औपचारीक भेट दिली आणि कोरडं सांत्वन केलं.

परतल्यावर राणी एलिझाबेथ आणि पंतप्रधान विल्सन यांची भेट होते. राणीना वाईट वाटतं. त्यांना त्यांची चूक उमगते. कधीही न घडलेली गोष्ट घडते, राणीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात.

१९६६ साली घडलेली ही घटना आपण २०२० सालातल्या एप्रील महिन्यात नेटफ्लिक्सच्या क्राऊन मालिकेत पहात असतो तेव्हा युकेमधे कोविडनं हाहाकार माजवलेला असतो. फेब्रुवारीतच कोविडची  चाहूल लागली असतांना पंतप्रधान जाॅन्सन उठवळ वागतात, माणसं मेली तरी चालतील उद्योग बंद होता कामा नयेत असा विचार करून लाॅकडाऊनला त्यांनी विरोध केलेला असतो. कोविड पसरतो. खुद्द जाॅन्सननाच करोनाची लागण होऊन  वेंटिलेटरवर जावं लागलेलं असतं, युकेत हजारो मेलेले असतात, मृत्यू माघार घ्यायला तयार नसतो. 

विरोधी पक्ष जाॅन्सनना जबाबदार धरतात, जाॅन्सन हात झटकून चीनला जबाबदार धरतात. युकेमधली आरोग्य व्यवस्था कित्येक वर्षं कोसळलीय आणि त्याला कोण जबाबदार आहे यावर चर्चा चालते,  माणसं मरत रहातात.

सगळ्या जगभर कोविड संकटानं खळबळ उडवलीय. माध्यमं बावचळलीयत, काय आणि कसं व्यक्त व्हावं ते माध्यमांना कळेनासं झालंय.

क्राऊन या मालिकेनं संकट कसं हाताळता येऊ शकतं ते दाखवलंय.

धटना भयानक, ह्रदयाला पीळ पाडणारी असूनही फार हळुवार हाताळली आहे. द्रावक संगीत नाही. प्रेतं, ओक्साबोक्षी रडणं, आक्रोश, दाखवलेला नाही. लोकांची चीडही अगदी कमी वेळात दाखवलीय. 

मुख्य म्हणजे हा जबाबदार, तो जबाबदार, याला झोडा, त्याला फासावर चढवा असलं काहीही दाखवलेलं नाही. राजकारण तर दिसतंच होतं पण त्यावर भर अजिबातच नाही.

एपिसोडच्या शेवटाला राणी आणि पंतप्रधान यांच्यातली चकमक आहे. अत्यंत नाट्यमय भेटीत राणी प्रथम पंतप्रधानावर आरोप करतात की त्यांनीच राजकारण करून राणीची बदनामी केलीय. पंतप्रधान सांगतात की त्यांच्या विरोधात पत्रक निघालं हे खरं आहे पण हा उद्योग त्यांच्या दोन मंत्र्यांनी केलाय. मग राणी थोड्या नरमतात. आपण आयुष्यात कधी रडलो नाही, आपण कोरड्या आहोत हा आपला दोष आहे असं राणी कबूल करतात. पंतप्रधान सांगतात की तो दोष नाही, ती कमतरता आहे. राणी म्हणतात की आपल्या मनात काहीही असलं तरी राणीची भूमिका पार पाडताना संयम बाळगावा लागतो. पंतप्रधान विल्सनही कबूल करतात की लोकांसमोर आपली प्रतिमा टिकवण्यासाठी आपल्या वर्तनाला मुरड घालावी लागते. विल्सननी कधीही अंगमेहनतीचं काम केलेलं नसतं, सामान्य ब्रिटीशासारखे ते बियर पीत नसतात, ब्रॅंडी पीत असतात पण ते लपवून ठेवावं लागतं, त्यांना श्रीमंतांसारखंच चिरूट ओढायला आवडतं पण समाजवादी असल्यासारखं वाटायला हवं म्हणून ते पाईप ओढतात. पेपरात आपण ज्या माणसांना पहातो त्या माणसांचे किती अव्यक्त पैलू असतात पहा.

पंतप्रधान विल्सनना  त्यांची बायको  घरी उचकवते. झाल्या प्रकरणाचं खापर  विरोधी पक्षांवर फोडा अशी तीव्र कटकट ती विल्सनकडं करते. एकादा पुढारी एकादा  निर्णय कां घेतो किंवा कां घेत नाही याची पडद्यामागची ही हकीकत. तीही या एपिसोडमधे पटकन दाखवलीय.

एपिसोडमधे कोणालाही खलनायक, दोषी रंगवलेलं नाही. म्हटलं तर सर्वच दोषी, म्हटलं तर कोणीच नाही.

घटना काळी पांढरी, चूक बरोबर, पाप पुण्य, सरळ रेषेतली नसते. तिला खूप पैलू आणि पदर असतात. घटना हळुवारपणे मांडली तर वाचक, प्रेक्षक, शांतपणे, स्वतःचा विचार करू शकतात.

क्राऊनचा हा एपिसोड काळ्या पांढऱ्या रंगांच्या छटांमधे आहे, क्वचित ठिकाणी अन्य रंग असल्यानं दृश्य अगदी फिकट रंगात दिसतं. रंगीत चित्रपटापेक्षा ब्लॅक व्हाईट चित्रपट अधीक भेदक असतात असं मानणाऱ्यांचा एक वर्ग आहे. त्यांचं म्हणणं खरं आहे हे या एपिसोडमुळं कळतं.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *