पालघर घटना. नव्या कंडीला वाव.

पालघर घटना. नव्या कंडीला वाव.

पालघरला जमावानं तीन माणसांना ठार केलं.  

घटना घडून काही तासही उलटले नाहीत आणि सोशल मीडियात पोस्टींचा पूर आला. 

भगव्या कपड्यातली माणसं साधू होती,  मुस्लीम जिहादींनी त्याना मारलं. 

मारणारी माणसं हिंदू होती, भाजपची होती, ते गाव भाजपचं होतं आणि भाजपचा सरपंच होता. 

पोलीस घटनेच्या ठिकाणी हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.

  पाकिस्तानी लोकांचा हा कट आहे, काश्मिरात रचण्यात आला, तबलिगी त्यात सामिल होते. महाराष्ट्र सरकार त्यात सामिल कारण पोलिसानं बघ्याची भूमिका घेतली.

 भाजपच्या लोकांनी महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी ही घटना घडवून आणली.  प्रत्येक कटावर विश्वास असणारी माणसं आपापला तर्क लढवत होते.

महाराष्ट्र सरकारची कारवाई, चौकशी याचा निकाल कधी तरी लागेल. त्यातून सरकार काही तरी म्हणेल.  तरीही आणखी बारा पंधरा वर्षांनी माणसं या विषयावर बोलतील तेव्हां पाकिस्तानचा किंवा भाजपचा हा कट कसा होता यावर रसभरीत चर्चा करतील आणि सांगोवांगी मिळालेली माहिती टेबलावर मूठ आपटत आणि गळ्याची शपथ घेत सांगतील. सरकार आणि पोलीस आणि न्यायालयं राजकीय असतात, विश्वास ठेवण्याच्या लायकीची नसतात असं दोन्ही बाजूंची माणसं सांगतील. सरकार काहीही म्हणो, कोर्टं काहीही म्हणोत, माणसं कारस्थानांच्या विचारांना चिकटून रहातील. 

पालघरची घटना म्हणजे अकरा सप्टेंबरची घटना नव्हे की केनेडींचा खून नव्हे की डायनाचा अपघात नव्हे.तशी ती लहानशीच घटना. परंतू एकादी घटना घडली की त्यातून अफवा कशा पसरतात आणि त्यांची परिणती कटाच्या शक्यतेत कशी होऊ शकते याचं एक ताजं उदाहरण म्हणून पालघरच्या घटनेचा उल्लेख आला.

करोना व्हायरस नैसर्गिक नाही, तो चीननं प्रयोग शाळेत तयार केला आणि जगामधे सोडला, कारण चीनला जगाचा बाजार मोडून आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं असं लोकं म्हणतात. भारतीय म्हणतात की भारताला त्रास देण्यासाठीच हा व्हायरस चीननं भारतात पाठवला. वैज्ञानिक काहीही म्हणोत, यातल्या खऱ्या खोट्याची शहानिशा कधीच होऊ शकत नसल्यानं चीनचं कारस्थान या सिद्धांताला वाव मिळतो.

अँडी थॉमस या लेखकानं कट, कारस्थान, कॉन्स्पिरसी या गोष्टींचा अभ्यास ” Conspiracies. The Facts//The Theories//The Evidence. या पुस्तकात मांडला आहे. 

पुस्तकात अकरा सप्टेंबरच्या घटनेवर एक संपूर्ण धडा आहे.ओसामा बिन लादेननं न्यू यॉर्कचे मनोरे उडवले ही अमेरिकेची अधिकृत भूमिका आहे. या घटनेला दहा वर्षं झाल्यानंतर जगभर आणि अमेरिकेत लोकांना या घटनेच्या खरेखोटेपणाबद्दल विचारणा करण्यात आली. साठेक टक्के लोकांनी सरकार म्हणतंय ते खरं नाही, सरकारचा वृत्तांत खरा नाही असं मत व्यक्त केलं. आजही अमेरिकन सरकार लपवाछपवी करतं, खरं सांगत नाही, असं फार लोकांना वाटतं.

मनोरे अमेरिकेच्या सीआयएनं उडवले, अमेरिकेल्या ज्यू लॉबीनं उडवले, मनोरे तिसऱ्याच कोणी तरी उडवले असं सांगणारी पुस्तकं लिहिली गेली. 

अनेक पुस्तकांमधे अमेरिकेनं दिलेल्या पुराव्यांमधल्या विसंगती मांडली गेली. मनोरे उडवल्या उडवल्या लगेच चोविस तासात ओसामा बिन लादेननं कट रचला होता असं अमेरिकन सरकारनं सांगितलं. चोविस तासात पुरावे कसे काय मिळाले? विमानातल्या प्रवाशांची   नातेवाईकांशी झालेली  फोनवरची संभाषणं सरकारनं पुरावे म्हणून जगासमोर ठेवले. विमानं ३८ ते ४० हजार फुटावर उडत होती. आठ हजार फुटांच्या वर फोनचे सिग्नल्स पोचत नव्हते, ते सिग्नल्स वापरून कॉल करण्याची यंत्रणा त्या वेळी विमानांमधे नव्हती. मग फोन कसे झाले? एका कॉलमधे एक मुलगा आईला फोन करून म्हणतो की मी मार्क बिंगहॅम बोलतोय. कोणता मुलगा आपल्या आईशी बोलताना आपलं आडनाव सांगेल? 

विमानात एक मे डे स्विच असतो. तो दाबला की लगेच ट्राफिक कंट्रोलला संदेश पोचतो. एकाही वैमानिकानं हा स्विच कां दाबला नाही?  फ्लाईट ७७ च्या ब्लॅक बॉक्समधली नोंद सांगते की कॉकपीटचा दरवाजा उघडला गेला नव्हता, कोणीही कॉकपीटमधे गेलं नव्हतं. हवाई व्यवस्था प्रत्येक विमानाच्या हालचाली नोंदू शकत असताना नेमकी हीच विमानं कशी गायब झाली.  

कारस्थान सिद्धांतवाले म्हणतात की तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे आवाज वापरून बनवाबनवी करण्यात आलीय. कोणी तरी रिमोट कंट्रोल तंत्राचा वापर करून विमानांचा ताबा मिळवला. ड्रोन वापरून विमानांची दिशाभूल करण्यात आली इत्यादी शक्यता कारस्थान सिद्धांतवाले मांडतात.

ट्विन टॉवर पडले हे खरं. पण ते कोणी पाडले आणि कसे पाडले या बाबत सुसंगत असे पुरावे समोर येत नसल्यानं कारस्थान सिद्धांताला वाव मिळतो.

कारस्थानाचे सिद्धांत कल्पिणाऱ्या माणसांची मनं, विचार करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींचं विश्लेषण लेखकानं या पुस्तकात केलं आहे.

लेखकानं सांगितलेली काही ठळक कारणं अशी.

अधिकृत माहिती देणाऱ्या संस्था, सरकारं, व्यक्ती इत्यादींवर लोकांचा विश्वास उडालेला असतो. त्यामुळं अधिकृत माहिती चुकीची असते, मुद्दाम पसरवण्यात आलेली आहे असं लोकाना वाटतं. 

सोशल मिडियातून प्रचंड माहिती पसरते. या माहितीला आधार नसतो, अभ्यास नसतो, बरेच वेळा ती टाईमपास असते, रिकामटेकड्यांचा तो उद्योग असतो. अशा माहितीमुळं कारस्थान सिद्धांताला वाव मिळतो.

कारस्थान असल्याचं मांडणाऱ्या माणसांमधे एक पराभूत  भावना असते, तिच्यापोटी जगात ठामपणे मांडल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल संशय निर्माण केला जातो.

काही माणसं एकूणातच संशयी असतात, त्यांचा जगातल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नसतो.

काही  माणसांची सारासार विवेकशक्ती क्षीण असते, त्याना विवेकी निर्णय घेता येत नाहीत, विश्लेषण करता येत नाही. आपलंच म्हणणं खरं, जगात त्याच्या पलीकडं काही असत नाही असं त्याना ठामपणानं वाटत असतं. त्यामुळं जगाला मान्य झालेल्या गोष्टी नाकारण्याकडं त्यांचा कल असतो.

  कटांच्या विचाराला वाव मिळतो कारण घटनांच्या संदर्भात मांडले गेलेले पुरावे गोंधळाचे असतात, निर्णायक नसतात, त्या पुराव्यामधे खूप विसंगती आणि फटी असतात.  

कारस्थानं नाकारली गेली की कारस्थानवाले अधिक चवताळतात,  ज्या अर्थी इतका  जोरजोरात इन्कार केला जातोय त्या अर्थी त्यांचं म्हणणं नक्कीच खोटं आहे असं कारस्थानवाले सांगतात.

लेखक म्हणतो  की कारस्थानाचे सिद्धांत तपासून पाहिले पाहिजेत, ते फोल असतील तर तेही तपासलं पाहिजे, अधिकृत गोष्टीना विरोध करणाऱ्या सर्वच गोष्टी सरसकट धुडकावून लावता कामा नयेत. अफवा, कंड्या, मिथकं, कारस्थानं इत्यादी गोष्टींपासून बचाव करायचा असेल तर लोकांनी विविध ठिकाणांहून ज्ञान गोळा केलं पाहिजे, विश्वास ठेवता येईल अशी माहिती तपासली पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, सोशल मिडियावर अवलंबून राहिलं तर कठीण आहे असं लेखकाचं मत आहे.

कारस्थान सिद्धांत काही वेळा राजकीय हेतूनं पसरवले जातात. अलिकडची फेक न्यूज आणि ट्रोल निर्माण केले जातात. अमेरिकेत डोनल्ड ट्रंप यांनी काळे, आफ्रिकन, मुसलमान, ज्यू, परदेशी माणसं यांना बदनाम करण्यासाठी फेक न्यूजचा वापर केल्याचं दिसतं. ओबामा ख्रिस्ती नाहीत, ओबामांचा जन्म इंडोनेशियात झाला आहे असं ट्रंप आजही सतत सांगत असतात. इतक्या ठासून आणि वारंवार ते सांगतात की खूप माणसांना ते खरंही वाटतं. 

पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख नाही.

अँडी थॉमस हे एक ब्रिटीश अभ्यासक आहेत. कारस्थान सिद्धांत हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. अलौकीक, साधारण अनुभवात नसलेल्या गोष्टी, मागल्या जन्मातल्या आठवणी, पृथ्वीपलीकडून येणारे रेडियो   संदेश इत्यादी गोष्टींचा अभ्यास ते करतात. या विषयावरचं The Truth Agenda हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. 

)(

Conspiracies

The Facts//The Theories//The Evidence.

Author:Andy Thomas

)(

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *