सिनेमा. बस्टर कीटनची धमाल हसवणूक.  

सिनेमा. बस्टर कीटनची धमाल हसवणूक.  

यू ट्यूबवर दी जनरल नावाचा एक चित्रपट आहे. चित्रपट १९२६ सालातला आहे. मूकपट. बस्टर कीटन दिक्दर्शक. 

एकाच वाक्यात सांगता येईल. हसता हसता मुरकुंडी वळते.

 चित्रपट निव्वळ विनोदी आहे?

जॉनी ग्रे नावाचा एक इंजिनियर आहे. इंजिनियर म्हणजे इंजीन चालवणारा माणूस. तो जनरल नावाचं इंजिन चालवतो. जनरलवर त्याचं प्रेम आहे.

अमेरिकेतली यादवी सुरु होते. दक्षिण विरुद्ध संघराज्य अशी लढाई. जॉनी जॉर्जिया या दक्षिणेतल्या राज्यातला.  सैन्यात भरती होऊन लढायला जाणं हे कर्तव्य आणि फॅशन होते. जो न जाईल त्याच्याकडं लोक तिरस्कारानं पहात. जॉनी भरतीसाठी जातो. पण भरती अधिकारी त्याला सैन्यात घेत नाहीत कारण त्याची इंजिनियर म्हणून अधिक आवश्यकता असते. जॉनी नाना खटपटी करून भरती होण्याचा प्रयत्न करतो. जमत नाही.

जॉनीची मैत्रिण तिचे वडील जखमी झाल्याचं कळतं म्हणून उत्तरेत जायला निघते. गाडीला जनरल हे इंजीन असतं आणि जॉनी चालक. वाटेत संघराज्याचे हेर गाडीचा ताबा घेतात. गाडीचा वापर करून वाटेतले पूल उडवायचे असा त्यांचा डाव असतो. पूल उडवले की दक्षिणेचं सैन्य उत्तरेकडं सरकू शकणार नाही अशी रणनीती असते.

इथे खरा चित्रपट सुरु होतो.

जॉनी इंजीन चालवत असतो आणि संघराज्याची दोन इंजिनं आणि युद्ध सामग्रीनं भरलेले डबे जॉनीचा पाठलाग करत असतात.

चित्रपटभर पाठलाग पहायला मिळतो.

पाठलाग करणाऱ्या गाडीच्या वाटेत जॉनी आणि त्याची मैत्रिण सतत अडथळे आणतात. स्वतंत्रपणे जॉनीच्या गाडीलाही सरकतांना नाना अडचणी येतात. संघराज्याची गाडी, संकटं; जॉनीची गाडी, संकटं.

 शेवटी जॉनी त्याच्या गावात परततो, सैन्याला सांगतो की उत्तरेकडून हल्ला होणार आहे. सैन्य तयार होतं, लढायला निघतं. इंजियनरला सैन्यात लेफ्टनंट पदावर नेमणूक मिळते.चित्रपट संपतो.

युद्धपट. मामला गंभीर. संघराज्य विरुद्ध दक्षिणेतली राज्य असा ऐतिहासिक गंभीर मामला. पाठलागातली प्रत्येक घटना गंभीर. पण  चित्रपट प्रत्येक सेकंदाला आपल्याला हसवतो.

जॉनी म्हणजे बस्टर कीटन आपल्याला हसवतो.

एका ठिकाणी इंजिनातलं इंधन संपतं. जॉनी इंजिन थांबवतो. रेलवेच्या कडेला असलेल्या लाकडी कुंपणावरची लाकडं काढून इंजिनात फेकतो. लाकूड इंजिनात पडत नाही, पलीकडं पडतं. जॉनी पुन्हा ओंडका फेकतो. आता तो अलिकडं पडतो. दोन तीन ओंडके इंजिनात पडतात. आपल्याला हायसं वाटतं. पण नंतर एक ओंडका आधीच्या ओंडक्यांवर आदळतो आणि सर्वच्या सर्व ओंडके खाली पडतात.

जॉनी इंजिनाच्या भट्टीत लाकडं ढकलतो. लाकडं कमी पडतात. मैत्रिणीला सिगरेटचं एक थोटुक मिळतं. जॉनी ते भट्टीत टाकतो.

लढाईला निघालेले सैनिक आणि त्यांच्यामधे त्यांचामधे त्यांचा अधिकारी. एकदा इंजिनात भरायचं पाणी त्या अधिकाऱ्याच्या अंगावर पडतं. तो ओला होतो. रागावतो, मला ओलं कां केलंत असं विचारतो.

जॉनीच्या कंबरेची तलवार. जोरात खेचतो तर मूठ हातात येते. मूठ आणि तलवारीचं पातं यांच्यात कधीच जमत नाही.एकदा समोरून शत्रूपक्षाचा सैनिक गोळीबार करत असतो. जॉनीच्या पक्षाची तोफ चालत नाही, गोळीबार चालूच रहातो. मोठ्या त्वेषानं बंदुकीला उत्तर देण्यासाठी जॉनी तलवार काढायचा प्रयत्न करतो. आता मूठ आणि पातं एकदम बाहेर पडतात पण बाहेर पडल्यावर पातं तलवारीपासून वेगळं होतं आणि शत्रूपक्षाच्या सैनिकाला मारतं.

जॉनी धांदरट आहे. काही तरी करायला निघतो, तिसरंच काही तरी होतं. सतत चुका होत रहातात. पण शेवटी त्याचं ध्येय साध्य करतोच.

बस्टर कीटनचा चेहरा कोरा करकरीत असतो. दुःख, राग, आनंद, व्यथा, आपलेपणा, प्रेम या छटा दाखवण्यासाठी तो डोळे गरगरवत नाही, हातवारे करत नाही, हालचाल किंवा चेहरा यात काही तीव्र हलवाहलव करत नाही. मुद्राभिनय जवळ जवळ नाहीच.

कीटन वयाच्या पाचव्या सातव्या वर्षापासूनच बहुढंगी करमणुकीचे कार्यक्रम करत असे.गोष्टी सांगायच्या, नाच करायचे, वाद्य वाजवायची, उड्या मारायच्या, नकला करायच्या, गाणी गायची.सारं एका कार्यक्रमात असे. बहुरंगी करमणुकीत विनोद तर हवाच. विनोदी उद्योग केला की बस्टर हसायचा. लगोलग त्याचे वडील (तेही नट होते) त्याला झापायचे. सांगायचे ‘चेहरा, चेहरा. चेहरा निश्चल ठेव. चेहऱ्यावर काही दिसता कामा नये.’ 

हसायचं लोकांनी, नटानं नव्हे.

मूकपटात शब्द नसतात. केवळ अभिनयातूनच भावना व्यक्त करायच्या असतात. त्यामुळं तीव्र, बटबटीत हालचाली आवश्यक असतं असं काहीना वाटतं. बस्टर कीटनला तसं वाटत नाही. नरसिंह रावांसारखा मख्ख चेहरा बाळगून तो अभिनय करतो.  

मूकपटाच्या काळात सिनेतंत्र अगदीच प्राथमिक अवस्थेत होतं.एक अत्यंत अवजड कॅमेरा घेऊन काम करावं लागे. कॅमेरा, निसर्ग आणि नटनट्या. ध्वनी नाही. या मर्यादेत काम करण्याच्या नादात चित्रपटाची व्याख्या तयार झाली.चित्रपट म्हणजे दिसणं. दिसणं म्हणजे केवळ दिसणं. शुद्ध चित्रपटात ध्वनी, बोलणं, संवाद, शब्द याला वाव नाही. त्यामुळं दिक्दर्शकाचं लक्ष पूर्णपणे दिसण्याकडं असे. निसर्ग आणि नट. दोन्ही स्वच्छ दिसलं पाहिजे. त्यासाठी जे लागेल ते करा, त्यातच काय ती कलाकुसर करा. कृत्रीमतेला वाव नाही. 

  चित्रपट म्हणजे  हालचाल, ॲक्शन. निसर्ग, माणूस, ॲक्शन.  

बस्टर कीटन वरील व्याख्येवर आधारलेला शुद्ध चित्रपट करत राहिले. शब्द आले, बोलपट झाले. कीटननं बोलपट करून पाहिले, ते जमले नाहीत, कीटन त्यात रमले नाहीत. 

चित्रपट म्हणजे करमणुक. कीटन आशयाच्या भानगडीत पडला नाही.

  सत्यजित रे यांनी एका लेखात म्हटलंय ‘ आताच्या काळात चित्रपट त्याचं दृश्यमूल्य हरवून बसलाय. चित्रपटातून कला, निरलसता कमी होतेय, चित्रपट म्हणजे धंदा आणि तंत्रज्ञानाचं अवडंबर होत चाललंय.अशा वेळी चित्रपटातले सर्जनशील दिक्दर्शक आपली बॅटरी चार्ज करण्यासाठी कीटन, चॅप्लीन पहातात, मूकपट पहातात. जसं संगीतकार आपली बॅटरी चार्ज करण्यासाठी लोकसंगीताकडं वळतात; तिथं शुद्ध, निर्भेळ संगीत असतं. पिकासोही त्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी ‘निग्रो’ (निग्रो हा शब्द त्या काळात अपशब्द मानला गेला नव्हता, निग्रो म्हणजे आफ्रिकन असं मानलं जात असे) शिल्पाकडं जात असे.’

काळ पुढं सरकला. अमेरिकेत चित्रपट व्यावसायीक झाला. स्टुडियो पद्दत आली मेट्रो गोल्डविन मेयर सारख्या कंपन्या आल्या.भरमसाठ पैसा ही चित्रपट व्यवसायाची मुख्य कसोटी झाली. कीटन मागं पडला. कीटनला एमजीएमनं पगारी दिक्दर्शक केलं. चित्रपट कलेतलं हो की ठो माहित नसलेले निर्माते आणि मालक कीटनला हुकूम देऊ लागले. कीटन संपला. दारू पिऊन पिऊन मेला.

कीटन तसा कधीच मरत नसतो. कीटनचे सिनेमे कधीच मरत नसतात.१९६० साली बस्टर कीटनला त्यानं केलेल्या कामगिरीबद्दल जीवन गौरव ऑस्कर देऊन गौरवण्यात आलं.

कीटनच्या चित्रपटांवर आता त्याची मालकी राहिलेली नाही. ते चित्रपट आता अख्ख्या मानवजातीचे झालेत. म्हणूनच त्यांच्या नीटनेटक्या केलेल्या आवृत्या यू ट्यूबवर कोणालाही पहाता येतात.  

।।

Comments are closed.