पुस्तक.   हिटलरची तळी उचलून धरणारे पेपर सम्राट .

पुस्तक.   हिटलरची तळी उचलून धरणारे पेपर सम्राट .

The Newspaper Axis: Six Press Barons Who Enabled Hitler 

शीर्षकातच पुस्तकाचा विषय आहे. ब्रीटन आणि अमेरिकेतले हिटलरला समर्थ करणारे सहा पेपर सम्राट.

हिटरलचा उदय झाला तेव्हांपासून ब्रीटन आणि अमेरिकेतल्या बलाढ्य आणि अमेरिकन नागरिकांचं मत तयार करणाऱ्या सहा मालकांनी हिटलरचं कौतुक केलं. त्याच्यामुळं जर्मनीचा विकास झाला, जर्मनी श्रीमंत झाला असं या पेपरांनी वाचकांना सांगितलं.उदयापासूनच हिटलरनं ज्यूंना कसं वाईट वागवलं, कम्युनिष्ट व इतर कामगार-गरीबांची बाजू घेणाऱ्यांना कसं वागवलं आणि लोकशाही कशी खतम केली या बाबी या मालकांनी दुर्लक्षिल्या. पहिल्या महायुद्धानंतर व्हर्साय करारात जर्मनीवर अन्याय झाला, जर्मनीचं आर्थिक खच्चीकरण दोस्त देशांनी केलं तरीही  जर्मनी हिटलरमुळं कसा उभा राहिला याची वर्णनं वरील पेपरांनी केली.

ते सहा पेपर होती ब्रीटनमधले डेली मेल आणि डेली एक्सप्रेस; अमेरिकेतले न्यू यॉर्क डेली न्यूज, वॉशिंग्टन टाईम्स हेराल्ड आणि शिकागो ट्रिब्यून.

परिणामी दुसरं महायुद्ध सुरु झालं तेव्हां हे पेपर हिटलरच्या मागं उभे राहिले. ब्रीटनमधले पेपर सांगत की ब्रिटीश जनतेनं जर्मनीची साथ दिली पाहिजे, हिटलरच्या युरोपवरच्या आक्रमणाला पाठिंबा दिला पाहिजे, जर्मनीशी युद्ध करता कामा नये, ब्रीटननं दुसऱ्या महायुद्धात तटस्थ राहिलं पाहिजे. अशीच भूमिका अमेरिकेतल्या पेपर मालकांनी घेतली. 

चर्चिलनं पेपर मालकांना गप्प केलं, जनतेला सोबत घेतलं आणि युद्धात उडी घेतली. तेव्हां अमेरिकेतले पेपर ब्रिटीश-चर्चिल यांच्या विरोधात लिहू लागले. अमेरिकेनं तटस्थ राहिलं पाहिजे असं पेपर सांगू लागले, साठ टक्के जनता तटस्थतेच्या बाजूनं उभी राहिली. पर्ल हार्बरवर जपाननं हल्ला केल्यावर नाईलाजानं अमेरिकेला युद्धात पडावं लागलं. तेव्हां हे पेपर सांगू लागले की जपानशी युद्ध करावं, जर्मनीशी युद्ध करू नये.

ब्रीटन हा साम्राज्यवादी देश आहे, तो मेला तर आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही, ब्रीटनला मदत करू नये असं अमेरिकन पेपर लिहीत. चर्चिलनं रुझवेल्टची समजूत घालून शस्त्र सामग्री पाठवायला भाग पाडलं तेव्हांही पेपरांनी नाखुषीनं ते मान्य केलं. पण त्यातही खोच होतीच. शस्त्र पाठवून मोकळं व्हावं, लढाईमधे आपले सैनिक मरता कामा नयेत असं पेपर म्हणत.

अमेरिका फर्स्ट. अमेरिकेचं हित महत्वाचं; लोकशाही, स्वातंत्र्य तेल लावत गेलं असं जनमत पेपरांनी तयार केलं होतं.

पेपरांनी केलेल्या प्रचाराला बळी न पडता खुबीनं जनतेला बरोबर घेऊन चर्चिल आणि रूझवेल्ट युद्धात पडले, म्हणूनच हिटलरचा पराजय झाला.

ही कहाणी लेखिकेनं तपशीलासह या पुस्तकात मांडली आहे.

याच पुस्तकात डोरोथी थॉम्सन (१८९३-१९६१) या पत्रकार महिलेनं केलेल्या कामगिरीचा सविस्तर संदर्भ आहे. जगातली आद्य धाडसी फिरस्ती पत्रकार असा या महिलेचं वर्णन करता येईल. मूळ अमेरिकन. पत्रकारी करण्यासाठी ऑस्ट्रियात, वियेन्नात गेली. तिथून युरोपभर फिरून अमेरिकन पेपरात वार्तापत्रं लिहीत असे. या भटकंतीत ती जर्मनीत गेली, राहिली. जर्मन शिकली, जर्मनीच्या मातीत मळली. हा काळ १९२८-२९ चा. हिटलर लोकप्रिय होऊ लागला होता. 

थॉम्सन हिटलरला भेटल्या. त्यांना हिटलर अगदी सामान्य, वाचाळ,कणा नसलेला माणूस वाटला. धड उत्तरं देत नसे. 

थॉम्सननी विचारलं ‘तुम्ही सत्तेवर आल्यावर सामान्य बहुजनांसाठी काय करणार आहात?’

हिटलर फेफरं आल्यासारखा थरथरू लागला. टेबलावर मुठी आपटत बोलू लागला. ‘मी सत्तेवर आल्यावर राज्यघटना बरखास्त करेन.मी हुकूमशाही स्थापन करेन. प्रत्येक स्तरावर लोकांवर जबाबदाऱ्या टाकल्या जातील, लोकांनी शिस्त पाळून त्या जबाबदाऱ्या-आदेश पाळायचे’

या मुलाखतीवर आधारित एक पुस्तिका थॉम्सननं लिहिली. पुस्तिकेचं शीर्षक होतं ‘मी हिटलरला पाहिलं’.

हिटलरची खप्पामर्जी झाली. १९३४ साली थॉम्सन म्युनिखमधे पोचली तेव्हां  ‘ तुमचं इथे असणं जर्मन देशाला अहितकारक असल्यानं तुमच्या सुरक्षेची हमी सरकार देऊ शकत नाही, सबब चालते व्हा.’ असं त्यांना सांगण्यात आलं. जर्मनीतला कोणीही पत्रकार हिटलवर टीका करत नसे. थॉम्सन निघाली तेव्हां पत्रकारांनी रेलवे स्टेशनवर गर्दी करून तिला निरोप दिला.

हिटलरनं पोलंडवर हल्ला केला. थॉम्सननं वार्तापत्रात लिहिलं की हिटलर मोठं युद्ध करणार आहे. युद्ध सुरु झाल्यावर थॉम्सन युरोपमधे हिंडली. लंडनवर बाँबिंग झालं तेव्हां थॉम्सन लंडनमधे होती. विन्सटन चर्चिलची मुलाखत थॉम्सननं प्रसिद्ध केली.

ब्रिटीश आणि अमेरिकन जनता हिटलरच्या प्रेमात होती. हिटलर साऱ्या जगाचा आर्थिक विकास करणार आहे असं हिटलरच्या तैनाती पत्रकारांनी जगभर सांगितलं. हिटलरच्या पत्रकारांचे लेख जसेच्या तसे ब्रिटीश-अमेरिकन पेपर छापत, एकेका लेखाला त्या काळात हजार पंधराशे डॉलर मानधन देत. आजच्या हिशोबात लाखो रुपये होतील. हिटलर सांगतोय त्यापेक्षा वेगळी स्थिती आहे असं सांगणारे थॉम्सनचे लेख छापायला पेपर तयार नसत. तिला लिहू नको म्हणून सांगत. तिची वार्तापत्रं छापण्यावाचून गत्यंतरही नव्हतं कारण तिलाही साठ सत्तर लाख वाचक होते. पेपर तिचा लेख छापत आणि तिच्यावर गलिच्छ टीका करत. ‘थॉम्सन मासिक पाळी पेपरात ओततेय’ अशा शब्दात टीका होत असे.

  थॉम्सन रेडियोवर कार्यक्रम करत असे. चाळीस पन्नास लाख नागरीक तिचे कार्यक्रम ऐकत.

ती स्त्रियांसाठी कॉलम लिहीत असे. स्त्रियांनी जग समजून घेण्यासाठी आपल्या नवऱ्यावर अवलंबून राहू नये, स्वतंत्रपणे विचार करावा, मतं तयार करावीत असं तिचं म्हणणं होतं. तिचे स्त्रियांसाठी लिहिलेले लेख गाजत असत. पण अमेरिका ब्रीटनमधले मोठे पेपर तिचं छापत नसत, छापलं तर तिच्यावर घाण टीका करत.

स्वतःच्या सुखात रमलेल्या ब्रिटीश आणि अमेरिकन लोकांना लढायचं नव्हतं. त्यांचा थॉम्सनवर राग होता. टीका करणारी, घाण टीका करणारी पत्रं तिच्या घरी, ती लिहीत असलेल्या पेपरात नागरीक पाठवत. ती पत्र गोळा करून तिच्याकडं पोचवण्यासाठी अनेक ट्रक योजावे लागत.

Herschel Grynszpan या तरुणाचं प्रकरण थॉम्सननं लावून धरलं. हर्शल ज्यू होता. त्याच्या आईवडिलांना हिटलरनं मारलं. पोरका हर्शल पोलंडमधून बाहेर पडला. ऑस्ट्रिया, फ्रान्स असा भटकला. कोणी त्याला थारा, नागरीकत्व द्यायला तयार नव्हतं. त्यानं एका जर्मन अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या. त्याच्यावर खटला झाला. कोणी त्याच्या मदतीला यायला तयार नाही. थॉम्सननं हर्शलची केस पेपरात, रेडियोवर मांडली. ब्रिटीश, अमेरिकन जनता कशी मुर्दाड झालीय याचं चित्रण केलं.

 थॉम्सन ज्यू राष्ट्र निर्माण करण्याच्या विरोधात होती. इस्रायलची निर्मिती करून पॅलेस्टिनींवर ज्यू-इसरायल अत्याचार करणार आहे (जर्मनीनं ज्यूंवर केले तसेच) असं थॉम्सन लिहीत होती.

रूझवेल्ट आणि चर्चिलना युद्धात पडायला थॉम्सननी प्रवृत्त केलं. टाईम साप्ताहिकानं त्यांच्या कामगिरीची दखल घेतली, त्यांच्यावर कव्हर स्टोरी केली. 

आपल्याशी सहमत असणाऱ्यांसाठी, त्यांच्या बाजून लिहिण्यात गंमत नाही. आपल्या विरोधात असणाऱ्यांशी चार हात करून त्यांना बदलायला लावणं, लाटेच्या विरोधात पोहणं यातच खरी मजा आहे, खरी पत्रकारी आहे, असं थॉम्सनचं म्हणणं होतं.

प्रस्तुत पुस्तक सध्या अमेरिकेत गाजतंय.  त्या काळातली परिस्थिती अमेरिकेत उद्भवलीय. अमेरिका फर्स्ट, जग तेल लावत गेलं, काळे-परदेशी-मुसलमान अमेरिकेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत असं अमेरिकन जनता म्हणतेय, अमेरिकेतले पेपर आणि फॉक्स सारखे चॅनेल म्हणत आहेत आणि हिटलरच्याच भाषेत ट्रंप बोलत आहेत.

लेखिका कॅलिफोर्निया विद्यापीठात अमेरिकेचा इतिहास शिकवतात. प्रस्तुत पुस्तक हे त्यांचं ताजं (२०२२) पुस्तक. 

।। 

The Newspaper Axis: Six Press Barons Who Enabled Hitler 

Kathryn Olmsted.

Comments are closed.