सिनेमा. एडवर्ड स्नोडेनवरचा माहितीपट

सिनेमा. एडवर्ड स्नोडेनवरचा माहितीपट

सिनेमा. सिटिझन फोर

सरकारची कुलंगडी बाहेर काढणं म्हणजे देशद्रोह.

लॉरा पॉइट्रसला निनावी निरोप आला, भेटायचंय. पॉईट्रस सामाजिक प्रश्नांवर माहितीपट करतात.

निरोप देणाऱ्यानं आपलं नाव वा ठावठिकाणा सांगितला नाही.

 मेसेजेस यायला लागले. मेसेज एनक्रिप्टेड असत. वाचता येत नसत. निरोप पाठवणारा आपण कोण आहे ते सांगत नसे, फोनवर स्वतः बोलायला तयार नसे. 

एके दिवशी तो माणूस फोनवर बोलला. नाव सांगितलं नाही. ‘तू माझ्यावर फिल्म करावीस असं मला वाटतं.  सरकार  नागरिकांवर बेकायदा पाळत ठेवतं याला तू विरोध करतेस. त्यामुळं मला वाटलं की मी जे उद्योग करतो त्यावर तूच चांगला माहितीपट करू शकशील. सरकार नागरिकांची माहिती बेकायदेशीररीत्या कशी गोळा करतं ते मी आतापर्यंत गुप्तपणे सांगत होतो, आता मी प्रकट व्हायचं ठरवलंय. हा माझा व्यक्तिगत प्रश्न नाही, सार्वजनिक हितासाठीच मी प्रकट होतोय.’

भेटीची जागा न्यू यॉर्क ठरली. पॉईट्रस न्यू यॉर्कला पोचली. तिथं तिला त्या माणसानं सांगितलं की न्यू यॉर्क सुरक्षीत नाही, हाँगकाँगमधे भेटावं. त्या माणसानं हाँगकाँगमधल्या एका हॉटेलचा पत्ता सांगितलं. 

पॉइट्रसनं गार्डियनचे पत्रकार ग्रीनवाल्ड यांना सोबत घेतलं आणि ती हाँगकाँमधे ठरलेल्या हॉटेलच्या खोलीमधे पोचली.

फोनमधल्या आवाजावरून भेटणारा माणूस प्रौढ असेल अशी पॉइट्र्सची समजूत झाली होती. प्रत्यक्षात तो माणूस २९ वर्षाचा तरूण निघाला.

पॉइट्र्सनं कॅमेरा सेट केला. ग्रीनवाल्ड प्रश्न विचारणार आणि तो माणूस उत्तरं देणार.

 ‘माझं नाव एडवर्ड स्नोडेन. मी अमेरिकन आहे.मी अमेरिकेतल्या एनएसए या संघटनेत काम करत होतो, विशेष अधिकारी होतो. माझं वय आहे २९. माहितीचं संकलन-संस्करण करणं हे माझं काम. अत्यंत गुप्त आणि क्लासिफाईड माहिती मी हाताळत असल्यानं मला सुरक्षा एजन्सीत कुठंही प्रवेश करण्याचा खास परवाना माझ्याकडं असतो.’

माहितीपटाचं विशेष ऑस्कर मिळालेल्या सिटिझनफोर या माहितीपटाची सुरवात ही अशी झाली. 

पॉइट्रस माहितीपट करते. कारण तिची मतं असतात, ती मतं तिला चित्रपटातून मांडायची असतात. फीचरपटात पात्रं आणि भूमिकांच्या आडून मतं येतात. तिथं म्हटलं तर पळवाटा असतात. माहितीपट म्हणजे थेट मामला. आजपडदा नसतो, रोखठोक.’

पॉइट्रसची टीम आहे. तिला आर्थिक रसद पुरवणारे लोक आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य, पत्रकारी स्वातंत्र्य या विषयावर काम करणाऱ्यांना रसद पुरवणारी खूप माणसं आणि संस्था अमेरिकेत, युरोपात आहेत. ते लोक सरकारला घाबरत नाहीत, चिकाटीनं आपले विचार पसरवत असतात.

  अमेरिकेनं  इराकवर आक्रमण केलं.  सडकेवरचं वास्तव काय आहे ते तपासलं पाहिजे असं पॉइट्रसला वाटलं. तिनं माहितीपट केला. इराकमधे फिरून तिथल्या लोकांशी बोलून. अमेरिकन सरकार, सीआयए, एफबीआय या मंडळींनी खूप त्रास दिला. अमेरिकेबाहेर पडताना, अमेरिकेत परतताना तिला छळलं, अनेकदा अटक करून कोठडीत डांबून ठेवलं. ही बाई बधली नाही. तिच्यावर देशद्रोहाचाही आरोप झाला. ती हटली नाही.

तिची ही कीर्ती माहित असल्यानंच स्नोडेननं तिला मदतीला बोलावलं.

सिटिझनफोरचं सुरवातीचं दृश्य. कार बोगद्यातून निघालीय. छतावरची दिव्यांची रांग कंप्यूटवरच्या कोडसारखी मागं मागं जातेय. काळोख आहे. केव्हां बोगदा संपणार? एक स्त्री निवेदन करतेय. हा पॉइट्रसचा आवाज. अशूभसूचक असं वातावरण. 

पुढलं दृश्य. एका हॉटेलातली खोली. गादीवर बसलेला स्नोडन, त्याच्या मांडीवर लॅपटॉप. समोर बसलेला पत्रकार स्नोडेनची मुलाखत घेतोय.

चित्रपटभर स्नोडेन बोलत असतो. कधी लाँग शॉट. कधी स्नोडेन जवळून दिसतो. त्याची खुरटलेली दाढीही दिसते. कधी त्याच्या चेहऱ्यावरची चिंता दिसते. त्याच्या घरच्या लोकांना अमेरिकन सरकारनं छळलंय. त्यानं भरलेले भाड्याचे चेक बँकेनं नाकारलेत, त्याच्या घरच्या लोकांना रस्त्यावर जाण्याची पाळी आलीय. त्याची गर्लफ्रेंड आहे. तिला पोलिस सतत प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.

‘अमेरिकन सरकार अमेरिकेतल्या आणि जगातल्या करोडो नागरिकांची खाजगी माहिती चोरतंय.’ स्नोडेन सांगतो. माहिती चोरी कशी होती याची सांगोपांग माहिती स्नोडनजवळ आहे. ‘ॲमेझॉन, ॲपल, गुगल, इत्यादी सर्च इंजिनवर माणसं प्रश्न विचारतात, माहिती विचारतात. अव्वाच्या सव्वा माहिती,डेटा, या कंपन्यांकडं गोळा होतो. ही माहिती अमेरिका आणि युकेची सरकारं चोरतात. अमेरिका,  युके यांनी माहिती पळवण्याचे सॉफ्टवेअर तयार केलेत. माणसानं केलेला प्रत्येक फोन आणि त्यानं त्याच्या कंप्यूटवरवर लिहिलेला प्रत्येक शब्द पळवायची सोय या सॉफ्टवेअरमधे आहे. करोडो करोडो नागरिकांचं जगणंच अमेरिकन सरकारनं पळवलेलं आहे. त्या आधारे विरोधकांवर सरकार लक्ष ठेवतंय. इतकंच नव्हे तर अँजेला मर्केल या जर्मन चॅन्सेलरचा फोनही त्यांनी हॅक केलाय…’

पॉईट्रस स्टँडवर कॅमेरा ठेवून मुलाखत घेते. माहितीपटात अनेक वेळा कॅमेरा खांद्यावर ठेवून चित्रीकरण करतात. त्यामुळं घटना घडतेय, घडवली जात नाहीये असं भासतं. पॉइट्रस तसं करत नाही. स्टँडवर नीट बसवलेला कॅमेरा आणि लाईट्स यामुळं फीचरपटासारखं दृश्य दिसतं. दृश्यं हॉटेलच्या खोलीत असतात, स्टुडियोत नसतात. स्नोडेन गादीवर पाय पसरून बसलेला दिसतो. एकदा तो डोक्यावरून पांघरूण घेतो आणि पांघरुणात लॅपटॉपवर काही तरी लिहितो. पासवर्ड कोणाला कळू नये यासाठी ही खबरदारी. 

स्नोडेन पॉइट्रसला, गार्डियनला, वॉशिंग्टन पोस्टला, न्यू यॉर्क टाईम्सला, झायटुंगला माहिती देतो ते त्याचे लॅपटॉप वेगळे असतात, तो मजकूर एनक्रिप्ट करून पाठवतो, त्याचे पासवर्डही असे असतात की जे सरकारला कळत नाहीत.

‘मी माहिती गुप्तपणे पुरवतो कारण तसं केलं नाही तर अमेरिकन सरकार माझी माहिती अडवेल, पळवेल, ती विकृत करेल. माझा गुप्ततेवर विश्वास नाही म्हणून तर अमेरिकन सरकारची गुप्त पळवापळवी मी उघड करतोय. पण ती उघड करताना मला अशा विचित्र पद्दतीनं पाठवावी लागतेय. मला हे काम उघडपणे व्हायला हवंय. हे काम हज्जारो जागरूक नागरिकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. हा काही माझा व्यक्तिगत लढा नाही. हा स्वातंत्र्याचा लढा आहे. मला माहितेय की माझ्या जिवाला धोका आहे.पण तरीही पारदर्शकतेसाठी मला तो धोका पत्करायचाय.’

स्नोडेन कॅमेऱ्यासमोर सांगतो. हे सांगताना दृश्य जवळून घेतलेलं असल्यानं ते कुठल्या गावात घेतलंय ते कळत नाही. एकदा एका दृश्यात दूरवर बर्लिनमधला टीव्ही प्रक्षेपण टॉवर दिसतो. हं. म्हणजे मंडळी बर्लीनमधे आहेत तर.

मधे मधे पडद्यावर काळोख येतो. काही सेकंदानंतर काही माहिती बारीक अक्षरात झळकते. ती काही काळ थांबते. माहिती सावकाश वाचून झाली तरी पडद्यावर शिल्लक. काहीच होत नाही. आवाज नाही. काळ्या पडद्यावर पांढरी अक्षरं.

पॉईट्रस आपल्याला दम खायला वेळ देते, विचार करायला फुरसत देते.

मधेच हाँगकाँग, बर्लीन (रशियाही?) दृश्यं दिसतात. स्नोडेनची दोन दृश्य एकमेकाला एकदम चिकटवण्याऐवजी मधे ही दृश्य येतात. आपल्याला वेळ मिळतो. शहरंही बरंच बोलतात.

एडवर्ड स्नोडेन अमेरिकेतल्या उत्तर कॅरोलायनातला. अमेरिकेनं त्याच्यावर देशहिताला बाधक माहिती प्रसिद्ध करणं या आरोपाखाली खटले भरलेत. स्नोडेननं आता रशियात आश्रय घेतलाय, तो रशियाचा नागरीक झालाय. तिथं त्यानं दोन मुलांना जन्म दिलाय.

लॉला पॉइट्रस बॉस्टनमधली. तिनं चित्रपट निर्मितीचं शिक्षण घेतलंय. तिनं केलेले माहितीपट असे – Exact Fantasy (1995), Flag Wars (2003), Oh Say Can You See… (2003), My Country, My Country (2006),The Oath (2010),Citizenfour (2014), Risk (2016), The Year of the Everlasting Storm (2021), Terror Contagion (2021), All the Beauty and the Bloodshed (2022).

सिटिझनफोरला २०१५ साली ऑस्कर मिळालं होतं आणि ऑल दी ब्युटी अँड दी ब्लडशेडला पुन्हा २०२३ साली ऑस्कर मिळालंय.

।।

Comments are closed.