सिनेमा. शोक. Nauha.

सिनेमा. शोक. Nauha.

Nauha. यू ट्यूब. 

 २०२३च्या कॅनमधल्या La Cinef स्पर्धेत मुंबईच्या प्रथमेश खुराणा याची Nauha (शोक) ही फिल्म दाखवली गेली. ही स्पर्धा सिने शाळात शिकलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भरवली जाते. २०२३ च्या स्पर्धेत जगभरच्या ४७६ सिनेशाळांमधून २००० अर्ज आले होते. पैकी १६ स्पर्धक विद्यार्थ्यांच्या फिल्म्सची निवड करण्यात आली. त्यात प्रथमेश खुराणाची फिल्म होती.

प्रथमेश खुराणा दिल्लीतल्या व्हिसलिंग सिनेकला शाळेचे विद्यार्थी आहेत.

नौहा २८ मिनिटांची आहे.

छोटी फिल्म या प्रकाराचं वैशिष्ट्यंच असं की एकादा मुद्दा घेऊन ती फिल्म विकसित होते. पूर्ण लांबीची फीचर फिल्म जेवढा मोठा पट हाताळते त्या मानानं छोटी फिल्मचा आवाका कमी असतो. त्यामुळंच ती फिल्म अधिक परिणामकारक होऊ शकते.

एका मोठ्या शहरातल्या एक अंथरुणाला खिळलेला वृद्ध आहे. त्याचा मुलगा अमेरिकेत असतो. किसन नावाचा एक तरूण या वृद्धाची चोविस तास काळजी घेण्यासाठी नेमलेला आहे. किसन छोट्या गावातून आलाय. तिथं त्याला काम नाही, त्यानं पोटासाठी हे काम निवडलंय. 

वृद्धत्वात खाचखळगे असतात. माणसं चिडचिडी असतात, कटकट करतात, काहीच त्यांच्या मनासारखं होत नसतं. 

किशन पायावर पाणी घालतो. बाबूजी ओरडतो ‘पाणी फार गरम लागतंय.’ किसन पाण्यात विसाण घालतो. बाबूजी ओरडतो ‘पाणी फार थंड आहे.’ किसन पाण्याचं टेंपरेचर ठीक करतो. बाबूजी ओरडतो ‘किती जोरात करतोयस, जरा हळू कर’.

 आंघोपांघोळ, शीशू, जेवणखाण हे सारं किसनला करावं लागतं. त्यात त्याला आनंद असतो अशातला भाग नाही.  पण इलाजच नसतो. दुसरं चांगलं काम मिळालं असतं तर किसन खुष झाला असता.

शेवटी वृद्ध माणूस मरतो. वृद्ध माणसाचा मुलगा किसनचे आभार मानतो, त्याला पैसे देतो. किसनचा जॉब संपतो. किसन त्याच्या गावातल्या घराकडं परततो.

किसन काम करताना आनंदी नसतो. तरीही वृद्ध माणूस मेल्यावर तो केस कापतो.

फिल्म पहाण्यासारखी आहे, विषयाला साजेसा वेग या फिल्मला आहे. कॅमेरा हळुवारपणे सरकतो. वृद्धतेतला संथपणा चित्रीकरणात आणि संकलनात दिक्दर्शकानं सांभाळला आहे. एका घरात फिल्म घडते. जुन्या वळणाचं घर आहे. घरातल्या घरात जिना आहे.गज असलेल्या खिडक्या आहेत. पलंग आहे आणि मच्छरदाणी आहे. 

फिल्म घडते एका खोलीत आणि बाथरूममधे. रात्री किसन आणि त्याचा मित्र अंगणात शेकोटीसाठी जातात. याच अवकाशात दिक्दर्शक फिरतो. बाबूजी या नावानं पुकारल्या जाणाऱ्या वृद्धाचं पूर्वायुष्य दिक्दर्शक सांगत नाही. किसनच्या आयुष्याबद्दल अगदी थोडंसं शेवटल्या दीडेक मिनिटात दिक्दर्शक बोलतो. २८ मिनीटं हा काही कमी वेळ नाही, त्यात खूप गोष्टी दाखवता येतात. परंतू दिक्दर्शकानं (तोच पटकथा लेखकही आहे) स्वतःला काळ आणि अवकाश या दोन्ही बाबतीत स्वतःला बांधून ठेवलं आहे. त्यामुळंच चित्रपटाची संथ गतीही सांभाळता आली.

दिक्दर्शकाची एक मुलाखत प्रसिद्ध झालीय. त्यात दिक्दर्शक म्हणतो की अगदी लहानपणापासून त्याला मृत्यू या कल्पनेनं पछाडलं आहे. त्याच्या लहानपणीच त्याच्या आईचं निधन झालं. तेव्हां आपल्याला आपल्या आईची सेवा करता आली नाही हा सल त्याच्या मनामधे आहे. मृत्यूचं गूढ समजून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात त्यांनी केलाय, पण ते गूढ अजून उकललेलं नाही, त्यासाठी भविष्यात लेखकाला आणखी प्रयत्न (म्हणजे चित्रपट) करायचे आहेत.

एका दृश्यात किशन घरात आहे आणि खिडकीच्या बाहेरचं जग फोकस विरहीत आहे. भगभगीत असा प्रकाश आपल्या डोळ्यात भरतो. बहुदा ती वृद्ध माणसाच्या मुलाची कार आहे. दृश्य डोळ्याला त्रास देतं पण लक्षात रहातं.

एका दृश्यात वृद्ध तोंडाला लावलेला वेंटिलेटर फेकून देतो. किशनला अगदीच बळजोरी करून वेंटिलेटर तोंडावर बसवावा लागतो. ही झटापट एकाद्या माणसाला गळा दाबून मारतात तशी दिसते. माणसाला जगवण्याची खटपट, माणसाला मारण्याची खटपट, दोन्हीत सारखेपण.

अझर खाननं किशनची भूमिका केलीय. उदय चंद्र या ज्येष्ठ नटानं बाबूजीची भूमिका केलीय. परंतू चित्रपटाचा बाजच असा आहे की त्यात व्यक्तीला स्थान दिसत नाही. त्यामुळं नट म्हणून दोघंही लक्षात रहात नाहीत.

दोन्ही मुख्य पात्रांची व्यक्तिमत्व चितारण्यात पटकथालेखकाला रस नाहीये. 

बाबूजीचं मरण जवळ आलंय. तो आता संक्रमण काळात जगतोय. तसंच किशनचही दिसतंय. तोही खेड्यातून शहरात आलाय पण त्याचाही संक्रमण काळ आहे. वृद्द माणसाचं बरं वाईट झालं की किशन तिसऱ्या ठिकाणी जाणारेय. मेल्यानंतर बाबूजीचं काय होणार? म्हणजे आत्माबित्मा असेल तर तो कुठं जाणार? बाबूजी स्वर्गात जाणार की आणखी कुठं तरी? बाबूजी पुढल्या जन्मात जाणार असतील तर तो कोणता जन्म, कोणती योनी?

किशनचही तसंच आहे. त्यालाही पुढलं काही माहीत नाहीये.

बाबूजींचा मुलगा बाबूजींच्या घोट्याला एक गंडा बांधतो. तिथं हजर असलेला बट्टी नावाचा एक मुलगा त्याला विचारतो ‘तुम्ही तर नास्तिक आहात, मग हे काय करताय?’

मुलगा उत्तरतो ‘माझा विश्वास नाही, पण बाबूजींचा तर आहे ना, त्याना बरं वाटेल’ 

असे अगदीच मोजकेच संवाद चित्रपटात आहेत. बाकी चित्रपट मूकपट असल्यासारखा, म्हणजे एका अर्थानं ॲक्शनपट म्हणता येईल असा असल्यासारखा असल्यानं वरील संवाद चमकदार असला तरी मुद्दाम पेरल्यासारखा वाटतो.

चित्रपट दिक्दर्शक विद्यार्थी दशेत आहे असं चित्रपट पहाताना जाणवतं.

\\

Comments are closed.