२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

२०१८ नोबेल अर्थशास्त्र बक्षीस. पारंपरीक लेबलं उचकटली.

आर्थिक विकास आणि ज्ञान निर्मिती; पर्यावरण प्रदुषण आणि आर्थिक धोरण; या दोन एकमेकांशी संबंधित नसलेल्या पण महत्वाच्या विषयावर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या दोन अर्थशास्त्रींना २०१८ सालचं नोबेल पारितोषिक मिळालंय.
पॉल रोमर यांनी १९८६ आणि १९९० मधे प्रकाशित केलेल्या प्रबंधांचा विचार नोबेल समितीनं केला. प्रबंधांत त्यांनी ज्ञान निर्मिती आणि आर्थिक विकास यातील संबंधांचं विवेचन केलं आहे. रोमर हार्वर्डमधे प्रोफेसर होते आणि सध्या न्यू यॉर्क विश्वशाळेत संशोधन करतात. काही काळ ते विश्व बँकेचे आर्थिक सल्लागारही होते.
विल्यम नॉर्डहॉस येल विश्वशाळेत अर्थशास्त्र शिकवतात. १९७० च्या दशकात त्यांनी आर्थिक विकास आणि पर्यावरणाचं प्रदुषण यातील संबंधांचा अभ्यास करायला सुरवात केली. १९९० च्या दशकात त्यांनी प्रदूषण कसं कमी करता येईल याचे उपाय मांडले. त्यांनी सांगितलेले उपाय जगानं स्वीकारले. आता त्यांच्या प्रबंधाला नोबेल मिळालं आहे.
रोमर यांच्या म्हणण्याचा थोडक्यात सारांश अशा रीतीनं मांडता येईल. विश्वशाळेत किंवा प्रयोगशाळांत ज्ञान निर्मिती होते. त्या ज्ञानातून उत्पादनं तयार होतात, ती विकली जातात, आर्थिक विकास होतो. ज्ञान निर्मिती प्रयोगशाळेत किंवा विश्वशाळेत झाली तरी त्याचा फायदा मात्र तिथल्या नव्हे तर बाहेरच्या लोकांना होतो. प्रयोगशाळा, विश्वशाळा श्रीमंत होत नाहीत, श्रीमंत होतात ते त्या ज्ञानाचा उपयोग करून घेणारी माणसं आणि संस्था. सरकारं, सरकारी धोरणं ज्ञान आणि समृद्धी यांना जोडतात. आवश्यक ते कायदे करणं, उत्पादनाला आणि ज्ञानाच्या प्रसाराला मदत आणि प्रोत्साहन देणं, ज्ञान निर्मात्याचे अधिकार मान्य करून -इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स – ते जतन करणं इत्यादी गोष्टी सरकारं करतात म्हणूनच त्या त्या देशांचा-समाजाचा विकास होतो.
नॉर्डहॉस यांच्या अभ्यासाचा सारांश अशा रीतीनं मांडता येईल. उद्योग आणि मानवी खटपटीतून कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडतो. कार्बनच्या वाढीमुळं पर्यावरणाचं प्रदुषण होतं. वाढत्या प्रदुषणामुळं तपमान वाढतं. वाढत्या तपमानामुळं आर्थक विकास मंदावतो. या साखळीचा अभ्यास करून नॉर्डहॉस यांनी १९७० च्या दशकात कार्बन कर सुचवला. हवेत एक टन कार्बन सोडणाऱ्यांवर सहा डॉलर कर. नंतर कालमानानुसार तो कर त्यांनी वाढवत नेला.
रोमर आणि नॉर्डहॉस दोघांच्या मांडणीत एक सूत्र समान आहे. ते म्हणजे आर्थिक विकास साधायचा असेल तर सरकारला अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करावा लागेल.
पेट्रोल-तेलाचं उदाहरण घेऊ. उद्योगी माणूस तंत्रज्ञान, यंत्रं, माणसं यात पैसे गुंतवतो; जमिनीतून तेल काढून शुद्ध करतो. नंतर ते तेल जगभर किफायतशीर भावात विकून पैसे मिळवतो. मुक्त अर्थव्यवस्थेत किती तेल काढायचं, त्याचा भाव किती ठेवायचा इत्यादी गोष्टी ठरवण्याचं स्वातंत्र्य उद्योगीला असतं. पण तेलाचे साठे मर्यादित असल्यानं कधी तरी तेल संपणार आहे. तेलाचा हव्यासी व बेसुमार वापर झाल्यानं बेसुमार कार्बन डाय ऑक्साईड हवेत सोडला जातो, त्यातून तपमान वाढ, पूर, दुष्काळ, रोगराई इत्यादी संकटं निर्माण होतात. अशा प्रकारे पुढल्या पिढ्यांचं जगणंच नष्ट केलं जातं. नॉर्डहॉस म्हणतात की तेलाच्या, कोळशाच्या उत्पादनावर व वापरावर सरकारनं मर्यादा घलायला हव्यात. तसंच हवेत कार्बन डाय ऑक्साईड सोडला तर कर भरा अशी तरतुद सरकारनं केली पाहिजे.
ज्ञाननिर्मितीबाबत रोमर म्हणतात की संस्थेमधून ज्ञान निर्मिती झाल्यावर त्यातून भरपूर पैसा मिळू लागल्यावर ज्ञानाचा वापर करणारे नव्या ज्ञानाचा विचार करत नाहीत. ट्रांझिस्टर उत्पादनातून फायदा मिळतो तोवर ट्रांझिस्टर पलिकडं कशातही पैसे गुंतवायला उद्योगपती तयार होत नाहीत. रसायनाचा एकादा मॉलिक्यूल एकाद्या औषधातून भरपूर पैसे देतोय म्हटल्यावर नवे मॉलिक्यूल शोधायला उद्योगी लोक मदत करत नाहीत. थोडक्यात असं की नफ्याचा एक तोल समाजात निर्माण झाल्यावर समाजाच्या हितासाठी नवं ज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न उद्योगी, निवेशक, बाजार, करत नाहीत. दुनिया कॅन्सरपाठी किंवा एड्सपाठी पळत सुटते कारण त्या रोगांच्या भयानं पछाडलेला समाज त्या औषधांसाठी जिवाचं रान करतो. डायरिया, मलेरिया इत्यादी रोगांचं उच्चायन करण्यावर पैसे गुंतवायला बाजार तयार नसतो कारण त्यातून पैसे मिळण्याची शक्यता कमी असते कारण ते रोग पैसेवाल्या देशांत होत नाहीत.
समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार नवनव्या ज्ञान निर्मितीत आणि प्रसारात सरकारांनी लक्ष घातलं पाहिजे तरच समाजाचा विकास होईल असं रोमर म्हणतात. नाही तर समाजातला एक विभाग विकसित होत राहील आणि मोठा विभाग विकासापासून वंचित राहील आणि एकूणातला समाजाचा विकासही खुंटेल.
रोमर आणि नॉर्डहॉस यांनी त्यांच्या त्यांच्या कसोट्या लावून देशोदेशींचा अभ्यास मांडला. त्यांच्या कसोट्या प्रत्येक देशाला लागू पडतात असं नाही. सरकारांनी हस्तक्षेप केलेल्या देशात प्रदुषण वाढलं आणि विकास झाला नाही अशी उदाहरणं आहेत. सरकारनं हस्क्षेप न केलेल्या समाजांचा विकास झाल्याचीही उदाहरणं आहेत. गणितात जशी समीकरणं जुळतात तशी समीकरण आर्थिक विचारांच्या बाबतीत जुळतातच असं नाही. परंतू दोघांनी मांडलेल्या सिद्धांतांचा उपयोग होतो हे मात्र खरं.
नॉर्डहॉस यांनी केलेल्या अभ्यासाचा उपयोग पर्यावरण संरक्षण करणारे क्योटो, पॅरिस करार करताना झाला. औद्योगीक युग सुरु झालं ती संदर्भ रेषा मानून त्या वेळी असलेल्या तपमानापेक्षा फक्त १.५ अंश सेल्सियस पर्यंत तपमान थांबवावं असं जगानं ठरवलं ते नॉर्डहॉस यांच्या संशोधनामुळं. कार्बन कर ही कल्पनाही त्यांच्यामुळंच जगात रूढ झाली. कार्बन करामुळं एकीकडं तेलाचा वापर मर्यादित होईल आणि अधिक झाडं लागून पर्यावरण शुद्ध व्हायला मदत होईल.
समाजामधे निर्माण होणारा पैसा सरकारनं नव्या व उपयुक्त ज्ञानाच्या निर्मितीकडं वळवावा असं रोमर सांगतात. इलॉन मस्क मंगळावर माणसं नेण्याच्या पर्यटनावर अब्ज गुणिले अब्ज डॉलर गुंतवू मागत आहेत. कार चालवण्यासाठी विजेचा वापर करणं हे तंत्रज्ञान जुनंच आहे तरीही त्यात मस्क अब्ज गुणिले अब्ज डॉलर घालताहेत. इथेनॉलचा वापर करणारं इंजिन तयार करण्याकडं त्यांचं लक्ष नाही कारण विजेची कार तयार करण्याचा उद्योग आयताच हाताशी आहे. भरड धान्याच्या बीजात सुधारणा करून ती धान्य प्रथिनंही निर्माण करतील या संशोधनावर पैसा खर्च झाला तर नव्वद टक्के मानवी समाजाचं कल्याण होणार आहे. बाजारातले लोक त्यावर पैसा गुंतवत नाहीत कारण भरड धान्य गरीब माणसं खात असल्यानं त्यांच्याकडून फार पैसे मिळण्याची शक्यता नाही. ही कोंडी सरकारनं फोडायला हवी. निकडीच्या आणि विकासाला गती देणाऱ्या ज्ञान आणि संशोधनाकडं पैसा वळेल अशा रीतीनं सरकारनं कायदे आणि कर प्रणाल्या बनवायला हव्यात असं रोमर सुचवत आहेत.
रोमर आणि नॉर्डहॉस हे आर्थशास्त्री आहेत. लेबलं न लावता त्यांनी त्यांचे विचार मांडले आहे. जगभर पसरलेले मठ आणि माठ त्या दोघांच्या विचारांना डावे, बाजारविरोधी अशी लेबलं लावू शकतील. अलिकडं राजकारण आणि राजकारणाच्या उथळ नादाला लागलेली जनता माळेतले डावे, उजवे, धार्मिक, सेक्युलर इत्यादी मणी ओढण्यात मश्गूल असते. ज्यांच्या हाती अशी रेडीमेड माळ नाही किंवा ज्यांना मणी ओढण्यापेक्षा स्वतंत्र विचार करावासा वाटतो त्यांना रोमर आणि नॉर्डहॉस यांचं संशोधन विचार प्रवृत्त करेल.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *