२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै. हलवून टाकणारा, कालवाकालव करणारा चित्रपट

२२ जुलै.
नेटफ्लिक्सवर १० ऑक्टोबरला प्रकाशित झालेली २२ जुलै पहात असताना मनात येतं की यंदाच्या ऑस्करमधे या फिल्मचा नंबर लागू शकेल. नॉर्वेमधे दहशताद्यानं एक इमारत उडवली आणि एका बेटावर शिबिरासाठी जमलेल्या ६९ मुलांना ठार मारलं असा विषय चित्रपटाच्या केंद्रात आहे. विषयामधे प्रचंड नाट्य आहे, थरार आहे आणि त्याला प्रचंड दृश्य मूल्य आहे. थरार आणि नाट्य हे दोन घटक चित्रपट मर्यादेत ठेवतो आणि माणसं, माणसांतले संबंध, माणसातल्या विकृती, माणाची लढाऊ वृत्ती, माणसाचं शहाणपण आणि मूर्खपणा इत्यादी पैलू दाखवतो.
दोन चित्रपटांची आठवण होते. स्पॉटलाईट या चित्रपटामधे चर्चमधील विकृतीचं दर्शन होतं. चर्चचे पुरोहित कसं लैंगिक शोषण करतात आणि चर्च ते कसं लपवून ठेवतं हे बोस्टन ग्लोब या दैनिकानं शोधून काढलं आणि जगासमोर मांडलं. लैंगिक शोषण हा थरार आणि नाट्यमय भाग चित्रपटात दिसतच नाही, शोधक पत्रकारी दिसते. चर्च, शिक्षण संस्था, पोलिस, सरकार, माध्यम यातली माणसं आणि त्यांंचं वर्तन चित्रपटात दिसतं. दुसरा चित्रपट पोस्ट. निक्सन या प्रेसिडेंटाची दादागिरी हा या चित्रपटाचा विषय. त्यातलं राजकीय नाट्य दूर ठेवून चित्रपट वॉशिंगटन पोस्ट हे दैनिक हा विषय कसा हाताळतं ते दाखवतो, त्यात गुंतलेली माणसं, त्यांचं व्यक्तिगत जीवन दाखवतो. स्पॉटलाईटला २०१६ साली उत्तम चित्रपटाचं ऑस्कर मिळालं आणि पोस्टला २०१७ साली ऑस्कर नामांकन मिळालं होतं.
२२ जुलै २०११ रोजी अँडर्स ब्रायविक या माणसानं ऑस्लो या शहरात पंतप्रधानाच्या कार्यालयासमोर बाँब स्फोट केला. नंतर दूरवरच्या एका बेटावर एका युवक शिबिरासाठी गोळा झालेल्या मुलांवर गोळीबार केला. ब्रायविक पकडला गेला, त्याच्यावर खटला झाला. तो आता जन्मभराची एकांतकोठडीची शिक्षा भोगतो आहे.
विजर हा तरुण मुलगा बेटावरच्या गोळीबारात जखमी होतो. अनेक शस्त्रक्रिया करून त्याच्या अंगातल्या गोळ्या काढल्या जातात. पण काही गोळ्यांचे तुकडे मेंदूत अडकून रहातात. ते काढता येत नाहीत अशी स्थिती असते. ते जर मेंदूकडं आणखी सरकरले तर तो जगणार नाही असं डॉक्टर सांगतात. मेंदूतले गोळीचे तुकडे घेऊन अपार त्रास सहन करत विजर कॉलेजात शिकतोय.
ब्रायविकनं ठरवून, विचारपूर्वक स्फोट आणि गोळीबार केला. निष्पाप माणसाना मारलं तरच आपल्या मागण्यांकडं लोकांचं लक्ष जाईल असं त्याचं म्हणणं होतं. मेलेली मुलं निष्पाप होती असं म्हणणंच त्याला मंजूर नव्हतं. नॉर्वेतलं पुरोगामी, उदारमतवादी, लोकशाहीवादी सरकार अन्याय करतं आणि त्या अन्याय करणाऱ्यांचीच ही मुलं असल्यानं त्यांना मारण्यात काही गैर नाही असं त्याचं म्हणणं. विजर या मुलाची आई उदारमतवादी पक्षाची आहे आणि ती एका शहराची मेयर आहे.
आपला देश ख्रिस्ती आहे, आपली संस्कृती युरोपियन आहे, मध्य पूर्वेतल्या अरब संस्कृतीचे मुस्लीम लोक आपल्या देशात येऊन रहातात आणि आपली संस्कृती नष्ट होते असं ब्रायविकचं म्हणणं होतं. नाईट्स ऑफ टेंपलार नावाची सांस्कृती संघटनाही त्याच मताची, त्यामुळं ब्रायविक त्या संघटनेचा सदस्य झाला. दहशतवादी पद्धतीनं नॉर्वेमधलं सरकार उलथवून लावायचं आणि युरोपीय ख्रिस्ती सरकार स्थापन करायचं असा त्या संघटनेचा इरादा. याच विचाराची अनेक माणसं आणि संघटना जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांतही आहेत, संख्येनं वाढत आहेत. सीरिया आणि मध्यपूर्व देशातून युरोपात जाणाऱ्या स्थलांतरीतांची पार्श्वकथा या चित्रपटाला आहे.
ब्रायविकला आपल्या कृत्याचा अभिमान आहे. तो मरायला उत्सूक आहे. कोर्टातली आपली जबानी ब्रायविक प्रचारासाठी वापरतो. हिटलर पद्धतीनं हात नव्वद अंश कोनात उचलून तो गोल फिरतो आणि कोर्टात हजर असणाऱ्यांना आणि टीव्हीतून ते दृश्य पहाणाऱ्यांना आपलं वेगळेपण दाखवतो. कोर्टात, तुरुंगात, सर्वत्र तो अत्यंत शांतपणे बोलतो, कुठंही एक्साईट होत नाही.
ब्रायविकची भूमिका उत्तम वठली आहे. आवाज आणि चेहऱ्याच्याव स्नायूंवरचं नटाचं नियंत्रण विलक्षण आहे.
ब्रायविकचा वकील गायर लिपस्टर. तो स्वतः लोकशाहीवादी आहे आणि ब्रायविकच्या विचारांचा कट्टर विरोधक आहे. पण प्रत्येक आरोपीला बचाव करण्याचा अधिकार आहे हे मान्य असल्यानं तो वकीलपत्र घेतो. लिप्सटड प्रोफेशन आहे. आरोपीची मुलाखत घेताना, कन्सलटेशन करत असताना लिपस्टडचा चेहरा निर्विकार पण अभ्यासपूर्ण शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याची प्रत्येक हालचाल आणि चेहऱ्यावरचे हावभाव फार नियंत्रित असतात. चेहऱ्याच्या स्नायूंवरचं असं नियंत्रण फार कठीण असतं, त्यात खूप मेहनत आणि सराव गुंतलेला असतो. नसिरुद्दीन शहाची आठवण येते.
चित्रपट आणि विषयाची हाताळणी फार संयमाची आहे. अंशतः ही हातळणी दिद्गर्शकाची आहे, अंशतः ती नॉर्वेजियन समाजाची आहे. निष्पाप मुलांची क्रूर आणि विकृत हत्या हा विषय फार स्फोटक आणि हळवा आहे. परंतू कोर्टात, सार्वजनिक ठिकाणी माणसं चढ्या आवाजात बोलत नाहीत, भाषणं ठोकत नाहीत. वकीलही अॅडवोकेट उज्ज्वल निकम इत्यादींसारखी फिल्मी भाषणं करत नाहीत. शांतपणे मुद्दे मांडतात. देश हादरलेला असतो. पंतप्रधान मंत्रीमंडळाची बैठक घेतात. शांतपणे चौकशीचा निर्णय घेतात आणि आपल्या अपयशाची कबूली देतात. पत्रकार परिषद सारा देश पहात असतो. तरीही तोल जाऊ न देता, आवाज न चढता, ड्रामा न करता पंतप्रधान थोडक्यात बोलतात. हिंसेला लोकशाहीनंच उत्तर देऊ असं म्हणतात.
देखणेपण हे या चित्रपटाचं वैशिष्ट्यं आहे. नॉर्वेतली कडक बर्फाळ थंडी, थंडीच्या काळातलं निसर्गाचं भीषण आणि एकटेपणा निर्माण करणारं रूप चित्रपटभर प्रेक्षकाला दिसतं. ऑस्लोमधल्या इमारतीसमोरच्या स्फोटाचं चित्रण अकरा सप्टेंबरच्या न्यू यॉर्कमधल्या स्फोटाची आठवण करून देतं. पण काही मोजक्या दृश्यातच दिग्दर्शक आवरतं घेतो, त्यातली भीषणता फार काळ लांबवत दाखवत नाही.
आरोपी ब्रायविक, त्याचा वकील गायर लिपस्टड आणि विजर या तीन भूमिका प्रेक्षकाला पछाडतात. ब्रायविकचा थंड क्रूरपणा आणि वकील लिपस्टड यांचा निर्विकार वकील पहाताना त्रास होतो. ब्रायविकला आजन्म एकांत कोठडी दिली जाते. कागदावर आरोपीची सही घेण्याचा उपचार पाडण्यासाठी वकील त्याला भेटतात. शेवटी आरोपी आभार मानताना हात पुढं करतो. वकील शेक हँड करत नाही. बाहेर पडताना वकील ब्रायविकला सांगतो की तू हरलास. माझी मुलं, मुलांची मुलं तुला हरवणार आहेत.
विजर कोर्टात साक्ष द्यायला जातो. त्याच्या मनात असतं की आरोपीच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा करून टाकावा. पण तो तसं करत नाही. अश्रू आवरून तो साक्ष देतो. साक्षीच्या शेवटी तो आरोपीकडं पाहून तुकटपणे म्हणतो ” मी आनंदात आहे. माझ्याबरोबर माझ्या मित्रमैत्रिणी आहेत, माझे आईवडील आहेत, माझं गाव आहे, सगळा देश आहे. आम्ही सारे सुखात आहोत. तू मात्र तुरुंगात एकटा असशील. तुझ्याबरोबर कोणीही नसेल…”
आरोपीच्या बाजूनं साक्ष द्यायला त्याची आईही तयार झालेली नसते.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *