49+1.पन्नास खून. फ्रीलान्स दहशतवाद

49+1.पन्नास खून. फ्रीलान्स दहशतवाद

ओरलँडो हत्याकांड.
पल्स गे बार. इथं समलिंगी माणसं जमत.
१२ जून २०१६.
मध्य रात्र उलटून गेलेली, दोन वाजण्याचा सुमार. ओमार अमीन   बारमधे पोचला. पोचल्यावर त्यानं ९११ या इमर्जन्सी नंबरवर पोलिसांना फोन केला. 
  “या, पहा पल्स बारमधे काय चाललंय.” 
फोनवर मतीननं स्वतःचं नाव स्पष्टपणे सांगितलं आणि पल्स बारचा नेमका पत्ताही दिला.
  फोन बंद केला आणि त्यानं आपल्या जवळची असॉल्ट रायफल आणि पिस्तूल वापरून गोळीबाराला सुरवात केली. समोर दिसेल त्याच्यावर मतीन गोळ्या चालवत होता. एका क्षणी समोरची सगळी माणसं गारद झाल्याचं पाहून त्यानं विकट हास्यही केलं. मेल्याचं सोंग केलेल्या एका जखमी माणसानं या हास्याची गोष्ट पोलिसांना सांगितली. नंतर कित्येक रात्री ते हास्य या तरुणाच्या स्वप्नात येत असे आणि घामाघूम होऊन तो उठत असे.
 मतीम जागोजाग हिंडून लोकांना मारत होता. कोणी बाथरूममधे लपले होते, कोणी किचनमधे. यथावकाश पोलीस पोचले. पोलीस आणि मतीन यांच्यात लढाई झाली. शेवटी पहाटे पाचच्या सुमारास मतीन पोलिसांच्या गोळीला बळी पडला. 
गोळीबार करण्याच्या आधी त्यानं फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.”खरे मुस्लीम कधीही पश्चिमी लोकांचं गलिच्छ वागणं सहन करणार नाहीत. .. तुम्ही आमच्या लोकांवर हवाई हल्ले करून निष्पाप मुलं आणि स्त्रियांना मारलं आहे, आता इस्लामी स्टेटच्या सूडाची चव घ्या. पुढल्या काही दिवसात तुम्ही इस्लामी स्टेटचे अमेरिकेवरचे हल्ले पहाल.”
हत्याकांडाच्या आधी काही दिवस मतीन, त्याचा पिता आणि मुलगा   मायामी समुद्रकिनाऱ्यावर बसले असताना समोर एक एक गे पुरुषांचं जोडपं चुंबन घेत होतं. मतीन चिडला. वडिलांना म्हणाला “माझ्या मुलाला असलं घाणेरडं दृश्य पहावं लागतंय. या गे लोकांना खतम केलं पाहिजे.”
दोन वेळा २९ वर्षीय मतीनकडं एफबीआयचं लक्ष गेलं होतं. एकदा त्यानं इस्लामी स्टेटबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. दुसऱ्यांदा त्यानं फ्लोरिडातून सीरियात गेलेल्या एका माणसाबद्दल बोलला होता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हां त्याना काही आढळलं नाही.
मतीन हा सिद्दीक मतीन या अफगाण इमिग्रंटचा मुलगा. फ्लोरिडात शिकला, वाढला, नोकरी करत होता. पदवी घेतल्यानंतर त्यानं सुरक्षा रक्षकाचं प्रशिक्षण घेतलं, एका कंपनीत सेक्युरिटा गार्डची नोकरी करत होता. त्याच्याकडं शस्त्रं बाळगायचा परवाना होता. हत्याकांड घडण्याच्या आधी काही दिवस त्यानं बंदूक आणि पिस्तूल विकत घेतलं होतं. मतीनला शस्त्राचं आकर्षण होतं. कधी तरी आपण पोलिस व्हायचं असं त्याचं स्वप्न होतं. न्यू यॉर्क पोलिसचा शर्ट घातलेले फोटो त्यानं फेसबुकवर टाकले होते. 
मतीनचा धर्माकडं ओढा नव्हता. घरातलं वातावरण खास धार्मिक नव्हतं. तो कधीमधी मशिदीत जात असे. मशिदीचा इमाम म्हणतो की मतीन अबोल होता, त्यानं कधी धर्मवगैरे गोष्टीवर चर्चा केली नव्हती. मोकळा वेळ मतीन  व्यायाम करण्यात खर्च करी. त्याचे वडील अफगाण राजकारणावर बोलत असत. त्यांचा तालिबानकडं ओढा होता. 
मतीनची पहिली पत्नी सितोरा युसुफी. तिचं म्हणणं की मतीन रोगट वृत्तीचा होता. कित्येक वेळा त्यानं सितोराला झोडपलं होतं. घरी परते, कपड्यांना नीट इस्त्री झालेली नाही अशी तक्रार करून तो सितोराला मारे.   सितोराच्या कुटुंबियांनी सितोराला मतीनपासून वाचवलं, घरी नेलं, सोडवलं.   मतीननं दुसरं लग्न केलं. तिलाही तो मारत असे. तीही मतीनला सोडून गेली. तिच्यापासून मतीनला एक मुलगा होता.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांना मतीनचा इस्लामी स्टेटशी संबंध असल्याचं आढळून आलं नाही. पल्स बारच्या हत्याकांडाची जबाबदारी इस्लामी स्टेटनं घेतली नाही. इस्लामी स्टेटला   मतीन कोण आहे ते माहितही नसणार. परस्पर मतीननं स्वतःला इस्लामी स्टेटचा जिहादी  मानून परस्पर कारवाई करून टाकली होती.
१६ जून २०१६. 
इंग्लंड. बर्स्टहॉल गावातली लायब्ररी.
या विभागातल्या मजूर पक्षाच्या खासदार जो कॉक्स यांचा कार्यक्रम या ठिकाणी होता. सोबत जो यांचे पती केन्नीही होते. 
अचानक समोरून मध्यम वयाचा टॉमी मायर आला. चाकू वापरून  कॉक्सना भोसकलं. पती मधे पडले, टॉमी मायरला दूर करण्याचा प्रयत्न केला. टॉमीनं त्यांनाही भोसकलं. टॉमी शांतपणे समोरच्या एका सँडविच बारमधे गेला. गोंधळ उडाला. लोकांनी टोमीला पकडलं, पोलिसांच्या हवाली केलं. टॉमी पळाला नाही.
भोसकताना टॉमीनं घोषणा केल्या ” Britain first”.
कोर्टात उभं केल्यानंतर मॅजिस्ट्रेटनं टॉमीला नाव विचारलं. पत्ता विचारला. टॉमीनं पत्ता सांगितला नाही. नाव सांगितलं ” देशद्रोही मुर्दाबाद, स्वतंत्र ब्रीटन – death to traitors, freedom for Britain”
ब्रीटनमधे सध्या युरोपियन युनियनमधे रहायचं की नाही या प्रश्नावर वादळ चाललं आहे. या प्रश्नावर  जनमत अजमावलं जाणार आहे. कॉक्स  युरोपियन युनियनमधे रहाण्याच्या बाजूच्या होत्या,  हिरीरीनं प्रचार करत होत्या. 
युरोपियन युनियनमधून ब्रीटननं बाहेर पडावं असं म्हणणाऱ्या यूके इंडिपेंडंट पार्टी या पक्षानं नेमक्या त्याच दिवशी एक पोस्टर मोहिम सुरु केली होती. ब्रीटनमभर त्यांनी पोस्टरं डकवली होती. पोस्टवरवर सीरियन निर्वासितांच्या लोंढ्याचं चित्र होतं, शीर्षक होतं “breaking point”. आता कळस झालाय असं या पक्षाचं म्हणणं होतं.
टॉमीचं मानसिक आरोग्य बिघडलेलं होतं. त्याच्यावर उपचार चालले होते. तो बेकार होता. एकटा पडलेला होता. त्याला मित्र उरलेले नव्हते. तो नवनाझी साहित्य वाचत असे, गोरेवर्णवर्चस्व चळवळीचे (white supremacist) वेबसाईट तो पहात असे, त्या चळवळीची पुस्तकं तो वाचत असे.
मतीननं इस्लामी दहशतवादाची भाषा वापरली. पश्चिमी संस्कृती आणि समलैंगिक संबंधांना इस्लामचा, इस्लामी जनतेचा विरोध आहे. तत्वतः वरील गोष्टी इस्लामविरोधी आणि पाप आहेत असं त्यांना वाटतं. ती आपला विरोध जाहीरपणे व्यक्त करत नाहीत, गप्प रहातात. इस्लामी स्टेटची माणसं विरोध व्यक्त करत नाहीत, गैरइस्लामी लोकांना मारायलाच निघतात.  मतीननं इस्लामी स्टेट या संघटनेच्या आदेशावरून हत्याकांड केलेलं नाही. तरीही ते दहशतवादी कृत्यं मानायला हवं. ते एका माथेफिरूचं कृत्य आहे असं मानू नये. संघटनेच्या आदेशावरून नव्हे व्यक्तिगत ऊर्मीनं त्यानं हत्याकांड केलं. आदेश दहशतवादी संघटनेचा नाही, प्रेरणा इस्लामी दहशतवादाची. या प्रकाराला फ्री लान्स इस्लामी दहशतवाद असं नाव देता येईल.  
  टॉमी मायर नवनाझी आणि वंशद्वेष्टा होता. संघटनेचं काम करून नव्हे तर वाचन करून तो वंशद्वेष्या, नाझीवादी झाला होता.  फ्री लान्स नवनाझी.
   हिंसावादी संघटनेशी संबंध नसलेली माणसंही स्वतंत्रपणे  खून करू लागलीत ही चिंता वाटण्यासारखी गोष्ट आहे.
हा नवाच प्रकार म्हणायला हवा. 
असं कां घडतंय?
एकूण वातावरण हिंसेनं भारलेलं दिसतंय. हिंसा करण्यासाठी, खून करण्यासाठी, आत्मघाती स्फोट करण्यासाठी आता एकाद्या संघटनेत प्रशिक्षण घ्यायची आवश्यकता नाही. एकाद्या पुढाऱ्याचा आदेश घेण्याची आवश्यकता आता नाहीये. दहशतवादी-धार्मिक संघटना आणि राजकीय पक्षांनी सारं वातावरण हिंसेनं भारून टाकलंय. त्यामुळं बंदूक, तलवार, सुरा मिळवून आपल्याला नको असलेल्या माणसांना मारुन टाकणं सहज झालं आहे. सोपं झालं आहे. आपल्याला नकोसे विचार कोणते आहेत ते माणसं आता वातावरणातल्या प्रचारातून आणि माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतून ठरवतात.   नकोशी माणसं कोण आहेत तेही माध्यमं सतत सांगत असतात. बस कुठल्या तरी क्षणी शस्त्र उचलायचं. दुसऱ्याला मारणं, संपत्ती नष्ट करणं ही गोष्ट चुकीची नाही उलट ती चांगलीच आहेत ते एक पुण्यकारक कर्तव्यच आहे असं लोकाना वाटू लागलंय.
माध्यमं अलिकडं सर्व गोष्टी थरारक करण्याच्या नादात असतात. जगातल्या घटनांची सांगोपांग माहिती देत नाहीत, विषयाची सर्व अंगं मांडत नाहीत. पर्सपेक्टिव मांडत नाहीत. अपुरी, असंतुलित माहिती देतात. राजकीय पक्ष, कॉर्पोरेशन्स, दहशतवादी संघटना माध्यमातील   या दोषांचा वापर करतात. ती मंडळी बेजबाबदार, असंतुलित, अपुरी आणि खोटी माहिती माध्यमात पेरतात. वातावरणात पूर्वग्रह, द्वेष तयार होतात.  दुसऱ्याचा जगण्याचा अधिकार काढून घेणं, दुसऱ्याला मारणं, संस्था-संपत्ती   उध्वस्थ करणं ही गोष्ट लोकांना अगदी साधी आणि सोपी वाटते. अमूक माणसाला फटके मारा, तमूक संघटना नष्ट करा, तमूकांना फाशी द्या, असं माणसं अलीकडं सहजपणे बोलून जातात. वेगळा विचार, वेगळा पक्ष, वेगळी संघटना हे आता गुन्हे मानले जाऊ लागले आहेत. दुसरे पक्ष, दुसरे विचार समूळ नष्ट झाले पाहिजेत असं माणसं सर्रास बोलतात.
  फेसबुक पहा. एकादा सिनेमा आवडला नाही असं कुणी म्हणालं तर लगोलग त्या माणसाचे तीन तेरा वाजवायच्या गोष्टी सुरु होतात. आम्हाला आवडलेला सिनेमा सर्वांना आवडलाच पाहिजे. आम्हाला मान्य असलेला पक्ष आणि पुढारी सर्वांना मान्य असायलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टीची भक्तीच केली पाहिजे. विनोद आणि थट्टा होता कामा नये. असं आता माणसं म्हणू लागली आहेत. काही वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवर अत्यंत घाण, असभ्य मजकूर सर्रास प्रसिद्ध केला जातो. राजकीय पक्ष अशा असभ्य आणि हिंसक वागण्याला प्रोत्साहन देत असतात.
ओरलँडो अमेरिकेत आहे. अमेरिकेतलं वातावरण काय आहे ते डोनाल्ड ट्रंप याच्या आचरट वक्तव्यावरून कळतंय. दहशतवाद या चिंताजनक घटनेवर त्याचं उत्तर आहे सरसकट मुसलमानांना अमेरिकेबाहेर घालवून देणं. तसा विचार करणारी खूप माणसं अमेरिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला दहशतवादाची समस्या ही इस्लामी समस्या नाही असं पोलिटिकली करेक्ट बोललं जातं. दहशतवाद हा इस्लाममधल्या अंगभूत दोषांचा परिणाम आहे हे वास्तव समजून घ्यायला ते तयार नाहीत. दोन टोकं झालीत.मतीन आणि बर्नाडिनोतला सय्यद फारूक गैरइस्लामीना मारून टाकतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून ३८ ठिकाणी गोरे अतिरेकी मशीदीत किंवा गुरुद्वारात घुसून इस्लामी माणसांना (शिख मुस्लीमच आहेत असं वाटणारे अमेरिकन खूप) मारून टाकतात.
आज एकविसाव्या शतकात गरीबी आणि विषमता हे जटील प्रश्न झाले आहेत. ते आर्थिक प्रश्ण सोडवायला निघालं की धर्म या संघटनेतले आणि विचारातले दोष आणि त्रुटी आड येतात. मुस्लीम द्वेष हे एक टोक.  राजकीय फायद्यासाठी इस्लामी समाजाच्या वागण्याकडं बोटचेपेपणानं पहाणारं दुसरं टोक.  टोकाची विभागणी होते. मामला  गुंत्याचा आहे.  गुंता विचारपूर्वक सोडवायला हवा, त्यासाठी वेळ जायला हवा. तसं न होता चुकटीसरखी माणसांना मारून, देशाबाहेर घालवून प्रश्न सुटेल असं राजकीय पक्ष आणि माध्यमं मानतात. 
सत्ता आणि माध्यमं या दोन्ही क्षेत्रांनी आत्मपरिक्षण करायला हवं.
 ।।

4 thoughts on “49+1.पन्नास खून. फ्रीलान्स दहशतवाद

  1. >>हिंसावादी संघटनेशी संबंध नसलेली माणसंही स्वतंत्रपणे खून करू लागलीत ही चिंता वाटण्यासारखी गोष्ट आहे.

    Very good analysis.

  2. economic factors, material condition of existence are affecting thinking process of Human's and vested interests aggrevate the situation! individual rights and collective good are constantly in conflict in present and 'Psychological stress ' is the result. Article effectively relects on challanges before liberals and progressive people

  3. Very well said ! People are in search of good and hungry for it. Unfortunately "we" as a society fail to deliver. Ultimately political class and media are part of it. Can not have it till we enlighten ourselves from inside.We must keep on speaking rational, scientific
    and positive.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *