धर्मातून बाहेर पडण्याची सोय

धर्मातून बाहेर पडण्याची सोय

” आपल्या ब्लॉगवरची २४ डिसेंबर २०१४ ची ‘धर्माचा दरवाजा’ नावाची post वाचली. मला एक प्रश्न बरीच वर्षे सतावतो आहे. जर एखाद्या माणसाला कुठल्याच धर्माचे label नको असेल, तर अशी काय सोय आहे की तो माणूस त्याला जन्माने मिळालेल्या धर्मातून बाहेर पडेल आणि त्यासाठी त्याला दुसरा कोणताही धर्म स्वीकारायला लागणार नाही…?? उदाहरणार्थ: हिंदू कुटुंबात जन्मलेला माणूस हिंदू असतो. त्याला स्वत: विचार करता यायला लागला आणि तो मनाने संपूर्ण नास्तिक झाला. तर अशा वेळी त्याला धर्मात राहून धर्म न पाळणे असा पर्याय असतोच, परंतु जर त्याला हिंदू धर्म सोडायचा असेल तर कायदेशीर प्रक्रिया काही अस्तित्वात आहे का? मला ह्याचे उत्तर जाणून घेण्यात रस आहे.”
खरं म्हणजे कोणीही माणूस कुठल्याही धर्माच्या बाहेर पडू शकतो. एकाद्या धर्मात माणूस असतो तो केवळ त्याचा जन्म विशिष्ट धर्म मानणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्मल्यामुळं आणि नंतर बालपणात आईबाप व सभोवतालचा समाज यानं तो धर्मात रहावा याची व्यवस्था केल्यानं. धर्म ही गोष्ट एका परीनं लादली गेलेली असते, एका परीनं ऐच्छिक असते. त्यामुळं माणूस केव्हांही धर्माच्या बाहेर पडू शकतो. एकाद्या संस्थेचं सदस्य असणं, एकाद्या देशाचा नागरीक असणं इत्यादी गोष्टी काही कायदेशीर तरतुदीनं होतात, काही अटी मान्य केल्यावर होतात. तसं धर्माच्या बाबतीत नाही.
धर्मातून धर्माबाहेर पडण्याची अडचण तेव्हांच येते जेव्हां धर्मात रहाण्याच्या फायद्याला मुकावं लागतं किंवा धर्म सोडला तर समाजानं लादलेल्या शिक्षेमुळं. ख्रिस्ती धर्मात राहिलात तर ख्रिस्ती देव तुम्हाला स्वर्गात जाऊ देतो. ख्रिस्ती देवाचा स्वर्ग. ख्रिस्ती देवाचं ऐकलं नाहीत तर तुमचं अकल्याण होतं, नर्कातही जावं लागतं. ही अडचण.   स्वर्ग आणि नर्कावर विश्वास असणारी माणसं तो धर्म सोडून जाणार नाहीत. दुसरा एकादा धर्म स्वर्गाची खात्री देत असेल तर त्या धर्मात जायला ख्रिस्ती माणूस मोकळा असतो. अनेक ख्रिस्ती धर्म बदलतातही.  दुसऱ्या धर्माची खात्री नसेल,  ख्रिस्ती धर्म सोडला तरी देवाचं आपल्यावर लक्ष राहील आणि तो आपलं काही बरं वाईट करेल अशी एक सूप्त भिती मनात राहिल्यानं   ख्रिस्ती माणूस  धर्म सोडायला तयार होत नाही. सॅम हॅरिस, रिचर्ड डॉकिन्स इत्यादी कित्येक म्हणजे कित्येक माणसं ख्रिस्ती धर्म आरामात सोडून गेली आहेत, सुखानं जगत आहेत. त्याना नर्क-स्वर्गाची भीती नाही.
इस्लाममधली पंचाईत अधिक गडद आहे. इस्लामी समाजात वावरणाऱ्यानं इस्लाम सोडला तर तो नरकात जातोच पण याच जन्मात त्याला त्रास असतो. शरीयानुसार त्याला ठार मारलं जाऊ शकतं.  थेट नरकातच प्रवेश.  त्याला कोणत्याही स्मशानात पुरु देत नाहीत, त्याला वाळीत टाकतात. प्रेत सडत राहिलं तर सर्वांचीच पंचाईत.  इस्लामचा देव हा एकच देव आणि महंमद हा त्याचा शेवटला प्रेषित असं म्हटलंत की मामला संपला. इतर देव, इतर धर्म, इतर प्रेषित वगैरेंना मान्यताच नाही. धर्म सोडण्याची वाटच इस्लामनं बंद केली आहे. अरबस्तानात एकच धर्म शिल्लक राहिला पाहिजे अशी महंमदांची मागणी होती. त्यावरून काय ते समजा.  यात एक बारीकसा घोळ आहे. पूर्णपणे इस्लामी समाजात, म्हणजे समजा सौदी अरेबियात किंवा इजिप्तमधे मुसलमान रहात असेल तर धर्म बदल म्हणजे मरण असतं. परंतू जो समाज इस्लामी नाही, भारत-अमेरिका-फ्रान्स-युके इ.- अशा ठिकाणी मात्र मरणाची शिक्षा नाही. अर्थात तशी शिक्षा देता येत नाही कारण त्या देशांचे स्वतंत्र कायदे आहेत, तिथं तथाकथित इस्लामी कायदा चालत नाही. त्यातही आणखी एक छोटीशी गोची आहेच. भारतात सैयदना यांच्या पंथातल्या लोकांनी सैयदनांची आज्ञा पाळली नाही तर सैयदनांचे लोक त्या माणासाला वाळीत टाकतात, त्यांचं प्रेत पुरु देत नाहीत. खरं म्हणजे भारत सरकारनं सैदयदनांचं हे वर्तन बेकायदेशीर ठरवलं पाहिजे, सैयदनांचं न ऐकणाऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना भारतीय कायद्यात बांधलं पाहिजे. असो.
हिंदू धर्माची गोष्ट वेगळी आहे. तो धर्मही आहे आणि नाहीही.   हिंदूंचे देव तुम्ही मानले तरी चालतं, नाही मानलेत तरी चालतं. बरं देव मानण्यातही बरेच घोळ आहेत. प्रार्थना, देवाला काही देणं, पूजा, मूर्तीची पूजा इत्यादी गोष्टी नाही केल्यात तरी चालतं आणि चोविस तास तेच करत राहिलात तरी चालतं. दिवसभर घंटा बडवत राहिलात, माळ जपत राहिलात, नामस्मरण करत राहिलात तरी चालतं, मनातल्या मनात ते सारं केलंत तरी चालतं आणि ते नाही केलंत तरी चालतं.  देव नाही मानलात तरी चालतं.  थोडक्यात तुम्ही कसंही वागा, हिंदू धर्म तुम्हाला सोडत नाही. 
पाप आणि पुण्य हिंदू धर्मातही आहेत. स्वर्ग आणि नरकही आहे. पाप आणि पुण्य देवाच्या वतीनं कोणी तरी सांगतो आणि ते तुम्हाला ऐकावं लागतं. पण ते न ऐकलं तरी चालतं. सामान्यतः हिंदू धर्माच्या सांगण्यानुसार तुम्ही वागला नाहीत तर तुम्हाला कोणी मारत नाही. तसे उद्योग करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जे कोणी तो उद्योग करतात ते गुंड आहेत असं म्हणता येईल.  आज अमूकच देवाची पुजा करा, अमूक खा, तमूक खाऊ नका, तमूक पिऊ नका, वाढ दिवस अशाच रीतीनं साजरा करा, अमुकच कपडे वापरा इत्यादी सांगणारे आणि त्याची दादागिरी करणारे लोक व संघटना आहेत. या संघटनेची माणसं वेगळा विचार करणाऱ्यांना मारून टाकतात.  अशी माणसं चार पाच हजार वर्षात वेळोवेळी होऊन गेली आहेत. शैव वैष्णव मारामाऱ्या झाल्या, जैन विरूद्ध इतर अशाही मारामाऱ्या झाल्या.  परंतू सामान्यतः वरील दादागिरीचं वर्तन हा हिंदू समाजात नियम नाही, तो अपवाद आहे, कधी कधी उबळ आल्यागत समाज तसा वागतो आणि कालांतरानं पुन्हा सामान्य होतो. 
आणखी एक. धर्माची व्याख्या कर्तव्य अशीही आहे. राजाचा धर्म, बापाचा धर्म, पतीचा धर्म, विंचवाचा धर्म अशाही धर्माच्या व्याख्या केल्या जातात.
 भारतीय माणूस, हिंदू माणूस हा धर्म मानतो की नाही अशी शंका यावी असंच त्याचं वर्तन पूर्वापारपासून दिसतंय. देवानं समानता सांगितली माणूस जातीच्या नावावर विषमता आणि अन्याय करतो. प्राणीमात्रही आपल्या जगण्याचे भाग आहेत असं देव सांगतो आणि भारतीय माणसं नागरिकांना छळतात, त्याना मारतात. भारतातली माणसं खून करतात, बलात्कार करतात, बँका लुटतात, दरोडे घालतात, नशापाणी करतात, कायदे मोडतात, त्या वेळी त्याना देव दिसत नाही, आठवत नाही. काय मजा आहे पहा. भारतात देवळाचे कळस माणसं चोरून नेतात, कळसाचं सोनं वितळवतात, ते विकतात. कळस चोरतांना चोराला देवाचा ना धाक असतो ना आठवण. चोरलेल्या मूर्त्यांचे व्यापार करणारे समाजातले प्रतिष्ठित लोक त्या चोरीच्या पैशावर नवी मंदिरं बाधतात, देवाला पुन्हा दागिने अर्पण करतात. कधी कधी वाटतं की भारतीय हिंदू माणसा इतका नास्तिक माणूस जगात नाही. राजकीय पक्षाचे पुढारी खून मारामाऱ्या करतात, लुटालूट करतात आणि सगळे एकामागाएक देवालयात जाऊन देवाच्या पाया पडतात, देवाला सांगतात की आपल्याला निवडून दे, मंत्री कर. देव काय करतो? माहीत नाही. पण सगळी माणसं निवडून येऊन आळीपाळीनं लुटालूट करतात, अनैतिक वर्तन करतात.
तेव्हां हिंदू माणसाला धर्म सोडायला काहीच त्रास नाही.
  धर्माच्या नावानंच राज्य चालत होतं तेव्हां धर्म ही गोष्ट जगण्याची एक अट होती. पंधराव्या शतकापासून राज्याचं रूप बदलत गेलं, धर्म ही गोष्ट सावकाशीनं खाजगी होत गेली, ती जगण्याची एकमेव अट राहिली नाही. युरोपात आणि नंतर अमेरिकेत.   हा बदल सामान्यः इस्लामेतर समाजांतच घडला. इस्लाम आजही धर्माच्या मर्यादा, धर्मापलिकडं जग असतं हे सत्य समजून घेण्याच्या स्थितीत नाही.  
 धर्मात असणं आणि नसणं या गोष्टी आधुनिक जगात अगदीच व्यक्तीगत आवडी निवडीची गोष्ट आहे. ती जगण्याची पूर्वअट नाही, असू नये. तुम्ही पिझ्झा खाता की बिरयाणी की उकडीचे मोदक यावरून तुमच्या जगण्याचे अधिकार आता ठरत नाहीत. तुमची भाषा कोणती आहे, तुम्ही कोणाच्या पोटी जन्मलात, तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करता की ढोल बडवून प्रार्थना करता यावर तुमच्या जगण्याचे अधिकार आता ठरत नाहीत. माणसानं कसं जगावं, सार्वजनिक जीवनात कसं वागावं याचे जवळपास साऱ्या मानवजातीला लागू होतील असे नियम आता तयार झाले आहेत. जगा, जगू द्या हा आता जगाचा नियम आहे. संघर्ष-तणाव जरूर निर्माण होतात. बहुदा ते आर्थिक हितसंबंध, संस्कृती यातून उद्वभवतात. माणसांनी एकत्र बसून ते सुटतात, त्यासाठी देवाला किंवा देवाच्या वतीनं कोणालाही पाचारण करण्याची आवश्यकता नाही.
तेव्हां  देव आणि धर्मापासून माणूस आता मुक्त आहे. 
तरीही धर्म शिल्लक रहातोय. माणसाच्या काही आदिम गरजा आणि काही आधुनिक गरजांसाठी माणसाला धर्म लागतोच. न सुटलेली कोडी देवाच्या पारड्यात टाकून माणूस मोकळा झाला होता.अजूनही न सुटलेली अनंत कोडी आहेत. विज्ञानाचा प्रसार झाला, माहिती आणि पुरावे मिळाले. परंतू सर्वच गोष्टींचे निर्णय विज्ञानाच्या आधारे घेता येत नाहीत. माणसाचं वागणं आजही समजायला कठीण असतं. या साऱ्या गोष्टी माणसाला अस्वस्थ करतात.  आजही शिकले सवरलेले, अगदी डझनभर विज्ञानाच्या पीएचड्या मिळवलेले न सुटलेली कोडी देवाच्या पारड्यात टाकतात. तसंच देशोदेशात पसरलेल्या लोकांचे तंटे अजूनही सुटत नाहीयेत. कायदे, राष्ट्रप्रमुख इत्यादींचं म्हणणं ऐकायला माणसं तयार नाहीयेत. दणकावून हाणामाऱ्या करत आहेत,निष्पाप स्त्रिया आणि मुलांचे बळी घेतले जात आहेत.ही अस्वस्थता देवाच्या खुंटीवर टांगावं असं अनेकांना आजही वाटतं. देवाची खुंटी सोडलेले लोकही खूप म्हणजे खूप आहेत.
तेव्हां न सुटलेली कोडी आणि माणसांचं आपसात न पटणं या दोन गोष्टींसाठी अजून बराच काळ लोक देवाची आठवण काढणार आहेत. म्हणजे कुठल्या तरी स्वरूपात देव आणि धर्माला जपणार आहेत. 
त्यातही गंमत आहे. अनेक म्हणजे फारच अनेक माणसं आता उपासना न करता धर्म पाळतात. इंग्रजीत त्याना नॉन प्रॅक्टिसिंग धार्मिक असं म्हणतात. ते चर्च, मशीद, देवळात जात नाहीत. ते देवाला साकडं घालत नाहीत, देवाला लाच देत नाहीत, देवाची प्रार्थना करत नाहीत. तरीही देव असायला हरकत नाही असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या दैनंदिन जगण्यात देवानं ढवळाढवळ करू नये असा एकतरफी करार ते करून टाकतात, देवाला न विचारता. 
  एकेकाळी उद्योग नव्हते, औद्योगीक उत्पादनं नव्हती, बाजार नव्हता, माणसं पंचक्रोशीत जगत होती. आता जग बदललंय. माणसाच्या जीवनात अनंत नव्या वस्तू, नव्या प्रक्रिया, नव्या संस्था आल्या आहेत. या वस्तू, प्रक्रिया, संस्था चालवण्याचे नियम गेल्या पाच पन्नास वर्षात तयार झाले आहेत. ते नियम तयार करताना माणसानं देवाधर्माला विचारलेलं नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवायला हवीत हा नियम आपण तयार केला कारण कार, शहरं आणि रस्ते या गोष्टी आताशा तयार झाल्या आहेत. त्या बाबत देवाला काहीही माहित नव्हतं, आपण आपल्या माहितीनुसार  नियम केले. असे असंख्य नियम माणसानं तयार केले आहेत. थोडक्यात असं की आता माणसाचं नियंत्रण बाजार, उद्योग, उत्पादन इत्यादी गोष्टी करू लागल्या आहेत. एकेकाळी फक्त देव होता, नंतर राजा आला. आता देवही नाही, राजाही नाही, लोकांनी तयार केलेली विधीमंडळं आहेत, बँका आहेत, विमा कंपन्या आहेत, उत्पादक कंपन्या आहेत, विज्ञान आहे, विद्यापीठं आहेत, शाळा आहेत. ही सारी मंडळी आता माणसाचं जगणं ठरवत आहेत.  म्हणजे माणसाचं जीवन नियंत्रित करणाऱ्या धर्माला आता स्पर्धक निर्माण झाले आहेत. देवाला आता बँक चालवणारे, विमा कंपनीवाले, उत्पादन करणारे, वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक, लोक प्रतिनिधी इत्यादींच्या बरोबर बसावं लागतंय. देव एकट्यानं आता काही सांगू शकत नाही, घडवू शकत नाही. या अर्थानं आता माणसानं आधुनिक जीवनात देवाला आणि धर्माला नियंत्रित केलं आहे.
  बिनधास्त देवाला धर्माला सुट्टी द्या. काहीही बिघडत नाही. तो तुमचा अधिकार आहे.  कोणतीही चांगली गोष्ट करा हे सांगण्यासाठी देवाची आणि धर्माची अजिबात म्हणजे अजिबात आवश्यकता नाही. देव नावाची एक कल्पना ही तुमच्या मित्रासारखी आहे असं माना. हा मित्र काय सांगतो ते योग्य वाटल्यास ऐकावं, अयोग्य वाटल्यास त्याला  चुप बस असं सांगावं. देव, धर्म, दोन्ही आपल्या म्हणण्याप्रमाणं वागतील असं पहावं. देव आणि धर्म यांच्या वतीनं कोणी काही सांगत असेल तर ते ऐकण्याचं बंधन मानू नये, त्यानं घाबरून जाऊ नये. देव जर आपला मित्र असेल तर तो नक्कीच आपल्याला नरकाची भीती घालणार नाही. देव जर आपला मित्र असेल तर इतर कोणावरही अत्याचार करायला सांगणार नाही, बलात्कार करायला सांगणार नाही, कोणाची घरं जाळायला सांगणार नाही, कोणा गर्भवतीची पोटं फाडायला सांगणार नाही, कोणावरही तलवार चालवायला सांगणार नाही.
 मोकळे व्हा.  मोकळा श्वास घ्या. कित्येक हजार वर्षात इतका मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली नव्हती.

।। 

One thought on “धर्मातून बाहेर पडण्याची सोय

  1. खूप उशिरा वाचला हा लेख. आधी माझ्या स्वतःच्या आणि मग इतरांच्या डोक्यातले गुंते सुटायला मदत होईल असे वाटते.

    धन्यवाद – श्याम पाठक पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *