पटेल यांना अलाबामातल्या मॅडिसन शहरात पोलिसांनी दुखापत केली.

पटेल यांना अलाबामातल्या मॅडिसन शहरात पोलिसांनी दुखापत केली.

गुजरातमधील पिंज या गावचे श्री पटेल. इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता येत नाही. त्यांचा मुलगा अमेरिकेतील अलाबामा राज्यातल्या मॅडिसन या गावात रहातो. मॅडिसन या तीस चाळीस हजार लोकवस्तीच्या गावात सुमारे एक हजार भारतीय रहातात. अमेरिकन नसलेले इतरही लोक या गावात रहातात. पटेलांचा मुलगा अमेरिकेत शिकतोय, नोकरी करतोय. त्याला दीड वर्षाचं मूल आहे. मूल सांभाळण्यासाठी पटेल मॅडिसनमधे गेले, त्यांची पत्नी गुजरातेतच राहिली.
एके सकाळी सहा वाजता पटेल हिंडायला बाहेर पडले. पटेल रस्त्याच्या कडेला असलेल्या पायवाटेनं फिरत होते. ते पाहून आसपासच्या घरातल्या एका रहिवाशानं पोलिसांना फोन केला- कोणी तरी व्यक्ती रस्त्यावर फिरतेय, इकडे तिकडे डोकावतेय. दोन पोलिसांनी त्यांना हटकलं. पोलिसांनी पटेलाना हटकून तुम्ही कोण, सकाळी बाहेर कां फिरताय, इत्यादी प्रश्न विचारले. चौकशी केली.भाषेचा घोटाळा.  पटेलाना इंग्रजी येत नाही. पोलिस काय बोलत आहेत ते पटेलांना  समजलं नाही.  पटेल काय बोलत आहेत ते पोलिसाना समजलं नाही. प्रत्येक माणूस दहशतवादीच असतो या समजुतीनं बहुदा पोलिसांनी पटेलना जमिनीवर पाडलं. धसमुसळेपणानं. पटेलांना दुखापत झाली, त्यांचं अर्धांग लुळं पडलं. 
ओरड झाली. सरकारनं दखल घेतली. पोलिसांचं वर्तन अतिरेकी होतं असं मान्य करून पोलिसांना पोलिसांनीच अटक केली आणि त्यांच्यावर अतीवर्तनाचा गुन्हा ठेवला. सरकारनं पटेलांच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं मान्य केलं आणि पटेलांची क्षमा मागितली. पटेलांच्या मुलानं पोलिस खात्यावर   खटला गुदरला. मानवी अधिकाराचं उल्लंघन झाल्याचे खटले चालवणारे एक वकील पटेलांच्या वतीनं कोर्टात उभे राहिले.
पोलिसांनी कां हटकलं?
हे असं अमेरिकेत कां घडतं?
अमेरिकेत (न्यू यॉर्क, शिकागो इत्यादी महाशहरं वगळली तर) सामान्यतः माणसं रस्त्यानं पायी फिरतांना दिसत नाही. अगदी पलीकडल्या गल्लीतल्या माणसाला भेटायचं असेल, खरेदीला किंवा कशाला शेजारच्याच गल्लीत जायचं असेल तरीही  माणसं कारनं जातात. शहरांची रचना तशी झाली आहे. बहुतेक ठिकाणी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसते. बसेस नसतात, रेलवे नसते.   पाहुणा अमेरिकन शहरात गेला तर त्याच्या यजनामाला, कुटुंबातल्या माणसाला पाहुण्याची येजा स्वतःच्या गाडीनं करावी लागते. भारतात असतात तशा टॅक्स्या अमेरिकेत नसतात. मुद्दाम फोन करून टॅक्सी मागवावी लागते.  
कोणाला चालायचं असेल, धावायचं असेल, व्यायाम करण्यासाठी, तर बहुतेक वेळा माणसं जिममधे जातात किंवा खेळाच्या मैदानात जातात.
थोडक्यात असं की माणसं रस्त्यावर दिसत नाही, ती घरात-इमारतीत बंद असतात.
विद्यापीठांची शहरं  अपवाद असतात. बोस्टन, कोलंबस, प्रिन्सटन इत्यादी. तिथं विद्यार्थी, शिक्षक इत्यादी मंडळी दिवसाच्या कोणत्याही प्रहरी धावत असतात, फिरत असतात, रस्त्याच्या कोपऱ्यावर लॅपटॉपवर वाचन करत असतात. चोविस तास माणसं रस्त्यावर असतात.
मॅडिसन म्हणजे न्यू यॉर्क नव्हे की कोलंबस नव्हते. त्यामुळं रस्त्यावर काळोखात, भल्या पहाटे कोणी फिरतांना दिसलं की तिथले रहिवासी अस्वस्थ होतात.अमेरिकन समाज आणि समाजव्यवस्था इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. 
२००९ सालातली मेसॅच्युसेट्स (केंब्रीज-अमेरिका) मधली घटना. तिथल्या हारवर्ड विद्यापीठातले प्रोफेसर हेन्री लुई गेट्स आपल्या घरी परतले. दरवाजा उघडायचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू दरवाजा उघडेना. त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह दरवाजाशी झटापट केली. घरा समोरच्या घरातल्या  नागरिकांनी फोन करून पोलिसांना सांगितलं की दोन माणसं घरफोडीचा प्रयत्न करत आहेत. 
नागरिकांना प्रोफेसर गेट्स पाठमोरे दिसत होते. शिवाय नागरीक आणि प्रोफेसर यांच्यात बरंच अंतर होतं. त्यामुळं नागरीक प्रोफेसरांना ओळखू शकला नाही. आणखीही एक गोष्ट. अमेरिकेत शेजारी एकमेकाला न ओळखण्याची शक्यता असते. शेजारी एकमेकाला भेटत नाहीत. शेजारच्या घरातून धूर आला तर पोलिसांना कळवतात. माणूस आजारी असेल तर हॉस्पिटलला कळवतात. व्यक्तीशः धावून जात नाहीत. नेहमीच असं घडतं असं नाही, परंतू तसं घडण्याची शक्यता मात्र असते. समजा काही कारणासाठी शेजाऱ्याला भेटायची आवश्यकता निर्माण झाली तर माणूस फोन करतो, अपॉइंटमेंट घेतो. बेधडक कोणी कोणाकडं जात नाही. .
तर मुद्दा असा की समोरच्या घराच्या दाराशी खटपट करणारा माणूस संशयास्पद आहे, कदाचित दरोडेखोर असेल असं समजून नागरिकानं   पोलिसांना फोन केला. पोलिस पोचले. पोचल्या पोचल्या प्रथम प्रोफेसरांना  भिंतीवर दाबून त्यांचे हात मागे बांधले आणि प्रश्न विचारायला सुरवात केली. अघ्यक्षांना हे अनपेक्षित होतं. ते आपण प्रोफेसर आहोत वगैरे सांगू लागले, चिडले होते. पोलिसी खाकी खाक्या.  प्रोफेसरांना  धोपटलं, पकडलं, कोठडीत घातलं. पोलिस कोठडीत पोचल्यानंतर ते कोण आहेत ते कळलं, त्यांची सुटका झाली. परंतू त्या खटाटोपात पोलिसांशी झटापट केली, सरकारी कामात अडथळा आणला असंही एक कलम लावून टाकलं.
प्रोफेसर काळे होते. पोलिस गोरे होते. झालं. बोंब झाली. प्रोफेसरांना मारहाण झाली ती ते काळे असल्यामुळं असं माध्यमांनी लिहिलं.
पटेल आणि प्रोफेसर, दोघेही काळे. काळे म्हणूनच त्याना मारलं, त्यांच्याशी धक्काबुक्की केली? पटेलांच्या, प्रोफेसरांच्या जागी गोरा माणूस असता तर पोलिस तसं वागले असते? या प्रश्नांना होय किवा नाही अशी उत्तरं देणं कठीण आहे. अनेक गोऱ्या माणसांच्या डोक्यात वर्णद्वेष असतो हे खरं आहे. पण अनेकांच्या डोक्यात वर्णद्वेष नसतो हेही खरं आहे.
 क्रॅश नावाचा एक सिनेमा पाच वर्षांपूर्वी निघाला होता. त्याला ऑस्कर मिळालं होतं. सिनेमात अनेक घटना एकत्र गुंफल्या होत्या. 
त्यातल्या दोन घटनांपेकी एक अशी. 
एका घटनेत एक श्रीमंत काळा, आफ्रिकन अमेरिकन, आपल्या पत्नीसह एका पॉश एसयुव्हीमधून जात असताना पोलिस त्याला हटकतात. नेहमीच्या पद्धतीनुसार दोघांचीही झडती घेतात.  पत्नीची झडती घेताना पत्नीला वाटतं की तो पोलिस तिच्या गुप्तांगाला मुद्दाम स्पर्श करतोय. ती चिडते. भांडाभांड करते. पोलिस असं वागत असताना नवरा मात्र काही करत नाही याचा राग तिला येतो. नवरा सांगतो की ते पोलिसांचं नेहमीचंच काम आहे, तिला उगाचच भास झाला. पत्नी म्हणते की तो पोलिस गोरा होता,  वर्णद्वेषी असल्यानं तसं वागत होता. नवरा म्हणाला की अनेक गोरे वर्णद्वेषी असतात हे खरं पण प्रत्येक पोलीस वर्णद्वेषी असतो असं मानणं वस्तुस्थितीला धरून नाही.  पत्नी इतकी एक्साईट झालेली असते की नवरा बुळ्या आहे वगैरे आरोप करते, अमेरिकन परंपरेनुसार अगदी काडीमोडाच्या थराला प्रकरण जातं.
दुसरी घटना अशी.
वरील घटनेतील पत्नी. आपल्या गाडीतून चालली असताना तिच्या गाडीला गाडीला अपघात होतो. गाडी उलटी होते. पेट्रोल बाहेर सांडतं. गाडीला आग लागते.  ती गाडीत अडकते. पोलिसांची गाडी येते. जमिनीवर पालथा पडून, हात पुढं करून तिला  सांगतो की हात धर आणि मी तुला बाहेर खेचतो. ती पोलिसाकडं बघते. आपल्या गुप्तांगाला हात लावणाराच  झडती घेणाराच पोलिस तिला दिसतो. ती चमकते. क्षणभर विचार करते की हात पुढं करायचा की नाही. पण क्षणभरच. हात पुढे करते. पोलिस स्वतःचा जीव घोक्यात घालून तिला वाचवतो.
पोलिस किंवा कोणाही माणसाचं वर्तन पाहून त्या माणसाच्या हेतूबद्दल निर्णय घेणं कठीण असतं हे खरं. असंख्य शक्यता असतात. त्या पैकी एकादी शक्यता वर्णद्वेष किंवा एकादा पूर्वग्रह असू शकते. याच क्रॅश सिनेमात एक इराणी दुकानदार असतो. एका गिऱ्हाईकाशी या इराणी माणसाची हुज्जत घडते. गिऱ्हाईक गोरं असतं. ते चिडून म्हणतं-तुम्ही अरब असेच असता.
दुकानदार जाम चिडतो. म्हणतो की मला अरब म्हणू नको मी इराणी आहे. 
अरब आणि इराणी या दोन भिन्न संस्कृती आहेत. इराण्यांची भाषा पर्शियन आणि अरबांची अरेबिक. दोन्ही भाषा समृद्ध. दोन्ही माणसांना आपल्या भाषा आणि संस्कृतीबद्दल प्रचंड अभिमान आणि दुसऱ्याच्या संस्कृती आणि भाषेबद्दल राग.
  गिऱ्हाईकाला अरब आणि इराणी यांच्यातला फरक माहित नव्हता.
अकरा सप्टेंबरला अमेरिकेतले जुळे मनोरे कोसळल्यावर अमेरिकेत मुसलमान आणि अरब विरोधाची लाट उसळली. एकदा अमेरिकन लोकांनी एका शिखाला या लाटेत ठार मारलं. दाढी म्हणजे मुसलमान येवढंच त्यांना समजतं. त्याना  शिख हे मुसलमान किंवा अरब नसतात हे माहित नव्हतं. अनेक अमेरिकन, युरोपियांना ते कळत नाही. शिवाजी महाराजांनी दाढी ठेवलेली होती. मुंबईत बाबरी मशीद पडल्यावर हिंदू मुसलमान दंगल झाली तेव्हां हिंदू लोकांना दाढ्या काढाव्या लागल्या. शिवाजी महाराजांचे अभिमानी लोक दाढीवाल्याना रस्त्यात थांबवत, तो हिंदू आहे की मुसलमान याची खात्री करून घेत आणि नंतर पुढली कारवाई.
आपल्याला माहीत नसलेलं, आपल्याला परिचित नसलेलं संशयास्पद मानण्याची सवय माणसाला असतो. जो आपला नाही तो आपला शत्रू असा विचार माणसं करतात.  
अमेरिकेत माणसं रस्त्यावर हिंडताना दिसत नाहीत, रात्री अपरात्री रस्त्यावर असत नाहीत ही अमेरिकेतल्या काही गावांची सवय. मुंबई, कैरो, अमदाबाद, लखनऊ, आदिस अबाबा, केनया इत्यादी ठिकाणी माणसं दिवसाच्या कुठल्याही प्रहरी रस्त्यावर काही तरी करत असतात. त्याना तशा वागण्याची सवय असते. तिथली माणसं अमेरिकेत पोचली की गोची.
मँचेस्टरमधल्या हिंदू लोकांनी गणेशोत्सव केला. एका बंद हॉलमधे.  लोच्या झाला तो विसर्जनाच्या वेळी. वाजत गाजत मिरवणुकीनं गणपती विसर्जनाला न्यायला मंडळी बाहेर पडल्यावर मँचेस्टरमधले ब्रिटीश वैतागले. हे त्यांच्या सवयीचं नाही. त्यांनी पोलिसांकडं तक्रार केली. माणसांची संख्या फार होती, माणसं माहितीतली होती. जमा झालेल्या लोकांत डॉक्टर्स होते, विद्यापीठातले प्रोफेसर होते  म्हणून पोलिसांनी अटक बिटक केली नाही. नाही तर मोठाच झोल झाला असता.
सौदीत, बहारीनमधे, कैरोत स्त्रिया तंग कपडे घालून फिरत नाहीत.  चेहरा, मगनटं, पावलं सोडता बाकीचं अंग स्त्री झाकूनघेते. ही तिथली जगण्याची पद्धत. तिथं पश्चिमी मुलगी घट्ट, अगदीच तोकडी चड्डी घालून रस्त्यावर फिरू लागली तर काय होईल?
सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं याचे नियम प्रत्येक समाज आपापल्या पद्धतीनं ठरवतो. धर्म, परंपरा, संस्कृती, हवामान इत्यादी घटकांनुसार ते ठरतं. अलिकडच्या काळात ते वर्तन कायद्यानं ठरतं. म्हणजे कार उजव्या बाजूनं जावी की डावी या नियमाला धर्म-संस्कृतीचा अधार नाही, ती एक नव्यानं शोधलेली सोय आहे. बाईक चालवतांना डोक्यावर हेलमेट घालावं हा नियम धर्मानं, संस्कृतीनं सांगितलेला नाही.
माणूस स्वतःच्या समाजात-स्वतःच्या भूगोलात असतो तेव्हां अडचण नसते.  गणेशभक्त मँचेस्टरमधे गेला की वांधा येतो. शाकाहारी माणूस मांसाहारी लोकांच्या वस्तीत गेला की वांधा होतो. गोंगाटाची सवय असलेला माणूस गोंगाटी समाजात गेला की वांधा होतो. इथून पुढल्या काळात धर्म, भाषा, वंश, परंपरा इत्यादी बाबतीत भिन्नता असलेली माणसं एकत्र येऊ घातली आहेत.  अपरिचित आणि परकं ते संशयास्पद हे सूत्र चालणं कठीण आहे.
मॅडिसनमधे ज्या भाषा बोलल्या जातात त्यांचा परिचय मॅडिसनमधल्या पोलिसांना, सरकारी कर्मचाऱ्यांना झालेला असता तर पटेलांवर झालेला अत्याचार टळला असता.  प्रत्येक माणुस गुन्हेगारच असतो आणि शारीरीक जबरदस्ती हीच नागरिकांना वागवण्याची पद्धत या गोष्टी सोडून नव्या रीतीनं पोलिस वागले तर बरं. सर्व माणसं सारखीच असतात, सर्व माणसाना त्यांचा रंग, वंश, भाषा, धर्म इत्यादी काहीही असलं तरी सारखेच मानवी अधिकार आहेत याची खूणगाठ इथून पुढं घालावी लागेल.
  पोलिस, सरकार लोकांची माहिती गोळा करत असतं. दहशतवाद, हिंसा टाळण्यासाठी. सार्वजनिक ठिकाणी गोळा झालेल्या माणसांची माहिती तिथल्या पोलिसांना नसते. त्यामुळं अनेक वेळा लोकांना हटकावं लागतं. घटना घडल्यानंतर  कोणी तक्रार केली, खबर मिळाली, तर त्या वेळी पोलिसांना घाई गर्दीत माणसांना चाचपावं लागतं, हटकावं लागतं. त्याला इलाज नाही. पोलिस  चौकशी करतात, समाजावर बारकाईनं लक्ष ठेवतात म्हणूनच समाज सुखानं जगतो. तेव्हां हटकणं, चौकशी करणं टाळता येत नाही. पण ते करत असताना अनेक जुनी सूत्रं बाजूला ठेवणं आवश्यक. त्यातलं एक महत्वाचं सूत्र- अपरिचित, परकं ते संशयास्पद. 
गेल्याच वर्षी दिल्लीत मणीपुरी मुलांना दिल्लीच्या नागरिकांना धोपटून काढलं होतं. 
अपरिचिताला शत्रू मानण्याची सवय दूर सारायला हवी. सारं जग लहान होत असताना, माणसं कुठूनही कुठेही जाऊन स्थिरावताना तर ते फारच आवश्यक आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *