स्वयंपाक घरातला आर्किटेक्ट

स्वयंपाक घरातला आर्किटेक्ट

         रविवारची सकाळ. दारावरची घंटी वाजचे आणि शेजारचे जोशी दारात उभे. लांबलचक
दाढी. डोक्यावर केस नाहीत. गळ्यात गमछा. हातात वाडगा.
         “दामले. हे घ्या.”
         सुहास जोशी आर्किटेक्ट आहेत. स्वच्छंदी. जे आवडेल ते करतात. त्यात तुडुंब
आनंद मिळवतात. मुंबईतल्या पृथ्वी थेटरमधे एक कॅफे आहे. तिथं जवळ जवळ दररोज
संध्याकाळी जाऊन बासरी वाजवत बसतात. तबला आणि तंबोऱ्याची साथ त्यांचं आय पॅड करतं.
कधी खांद्यावरच्या पिशवीतून पॅड काढतील आणि समोरच्या माणसाचं स्केच काढतील. आणि
रविवारी किवा कधीही सकाळी किवा संध्याकाळी स्वयंपाकघरात घुसून एकादा पदार्थ करतील.
हा पदार्थ कोणता असेल हे त्यांनाही माहित नसतं. पदार्थ घडतो. घरात त्यांची पत्नी,
मुली आपापल्या उद्योगात रहातात, त्या मधे पडत
नाहीत. जोशींनी केलेले पदार्थ खातात. कौतुकानं आनंद व्यक्त करतात. त्या वेळी घरात
इतर पाहुणे असतील तर ते किवा आम्ही शेजारीही ते पदार्थ खातो.
         तर वाडगा समोर करून म्हणाले की खाऊन पहा.
         आंबा पोहे.
         मी जरा सावधपणानं एक चमचा खाल्ला. बरा लागला. मग दुसरा चमचा घेतला. चांगला
लागला. मी तिसरा. तो मस्तच लागला. मी पोहे फस्त केले. जोशी ओरडले “ अहो घरातल्या इतर लोकांनाही खायला द्या. ”
         “
पोहे हे सर्वात सोपं आणि उत्तम खाणं. छान भिजवून ठेवले की झालं.
पाण्यात घालून उपसायचे, रोवळीत ठेवायचे. छान लुसलुशीत होतात.
मग स्वयंपाक घरात आसपास पहायचं. जे काही असेल ते घालायचं. आज घरात आंबा होता.
बारीक चिरला. घातला.”
         त्यांची पत्नी मागून डोकावून गेली. त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा कौतुकाचा
आणि थोडासा सुहास काहीही करेल, मी लक्ष देत नाही असा भाव.
         “
दामले. मी आमच्या लहानपणी शिकलो. तक्रार करायची नाही. जे असेल त्यात
भागवायचं, आनंद मानायचा. पुण्यात आमचं कुटुंब मोठं. वडिलांचा
तुटपुंजा पगार. पण आमच्या आईची शिकवण होती. आमच्या घरात बंब पेटत असे. आंघोळी होई
पर्यंत वडील बंबाचा झारा हलवत आतले निखारे तेवत ठेवत असत. त्या वेळी मी हळूच कांदे
आणि बटाटे बंबाखाली ठेवलेल्या घमेल्यात टाकत असे. वरून पडलेल्या गरम राखेत बटाटे,
कांदे छान भाजले  जात.
भाजलेला कांदा एकदम गोड आणि मधूर होतो. बटाटाही. आमची न्याहरी त्यावर होत असे.”
         हा बटाटा जोशींना त्यांच्या आयुष्यात फार वेळा कामी आलाय. कारण प्रत्येक
घरात बटाटा असतोच. जोशी एकदा त्यांच्या क्लायंटच्या घरी गेले होते. क्लायंट डायमंड
मर्चंट होता. श्रीमंत. घरची मुलं कालवा करत होती, महाराजाच्या
अंगावर ओरडत होती, दररोज तो ठरावीकच गोष्टी करून खायला घालतो
म्हणून. जोशी सरसावले. महाराजाला बाजूला सारलं. एका टोपलीत बटाटे दिसले. पटकन
शिजवून घेतले. सालं काढली. एक नळी बाजूला पडली होती. नळी बटाट्यात खुपसून
बटाट्याला भोकं पाडली. लसूण मिळाली. आलं मिळालं. मिरची मिळाली. पुदिना मिळाला.
जोशींनी ते एकत्र केलं. वाटलं. त्याचा लगदा केला. बटाट्यांच्या भोकात भरला. बटाटे
मायक्रोवेवमधे टाकून भाजले. घरातली पोरं जाम खुष झाली. जोशींना ते सारं आयत्यावेळी
सुचलं होतं.
“ आपण लोक फार
जुन्यात अडकून बसतो. स्वयंपाक घरातल्या स्त्रिया-मुलींनीच केला पाहिजे. घरच्या
कर्त्या पुरुषांनी स्वयंपाक करू नये. अमूकच प्रकारचे पदार्थ केले पाहिजेत. अरे असं
बंधन कशाला पाळायचं. आमच्याकडं पिठलं करायची पद्धत. घरात कोणी पाहुणे आले की पटकन
भात टाकायचा, पिठलं करायचं. मीही घरी कोणी आलं की तेच करतो.
फक्त फरक असा की माझं पिठलं वेगळं असतं. मी फ्रीजमधे डोकावतो. एकादंच वांगं उरलेलं
असतं. दोन तीन भेंड्या उरल्या असतात. फ्रीजच्या कोपऱ्यात चार दोन तोंडली बापुडवाणी
पडलेली असतात. कारण एक वांगं, तीन भेंड्या आणि चार तोंडली
यांचं काय करायचं ते म्हणे समजत नाही. मी त्या गोष्टी उचलतो. चिरून पिठात मिसळतो.
फोडणी देतो. शिजवतो, परततो. झालं पिठलं. उत्तम लागतं.”
         एक दिवस एकादशीचा होता. जोशींच्या घरात एकादशी वगैरे पाळत
नाहीत.खाण्याच्या हिशोबात केव्हांही काहीही खावं असा त्यांच्या घरचा खाक्या. पण
खिचडी खायची एक नामी संधी असं पोराबाळांचं मत. जोशी सरसावले. आदल्या दिवशी रात्री
त्यांनी साबूदाणा भिजवून ठेवला होता. चार दिवसांपूर्वी घराच चिकन आणलेलं होतं.
जोशींनी चिकनचे शिजवलेले तुकडे घेतले. ते बारीक केले. त्याला मीठ आणि मिरपूड लावून,
थोडंसं दही लावून थोडावेळ तसंच ठेवलं. भिजवलेला साबूदाणा घेतला.
तुपाची जिऱ्याची फोडणी केली. त्यात साबूदाणा घातला. त्यातच दाण्याचं कूट घातलं.
येव्हाना चिकन बऱ्यापैकी मुरलं होतं. साबुदाण्यात मिसळलं. मग परतणं. झालं साबूदाणा
िचकन किंवा चिकन साबूदाणा. घरच्या लोकांनी दणादण रट्टावलं.
         “
चिकन अमूक प्रकारचंच असलं पाहिजे असं थोडंचं आहे. किंवा
साबुदाण्याची खिचडी अमूक प्रकारेच झाली पािहजे असं थोडंच आहे. जिऱ्याचीच फोडणी कां
द्यायची. युरोपात चिकन खातात, पण साबूदाणा नसतो. त्यामुळं
फ्रेंच लोक चिकन खिचडी करत नाहीत. त्यांच्या हातात साबूदाण सापडला तर ते केव्हांच
चिकन खिचडी करून मोकळे होतील. ते मात्र आम्ही मिटक्या मारत भरमसाठ पैसे देऊन खाऊ.”
जोशी कांदा चिरतांना किंवा सूप करण्यासाठी भाज्या चिरतांना सांगतात.
         सूप हे जोशींचं आवडतं प्रकरण. कारण ते कोणालाही कसंही करता येतं.
करणाऱ्याचं व्यक्तिमत्व त्या सुपात उतरतं. जोशी ओट्याकडं पहातात. तिथं काय भाज्या
आहेत ते पहातात. नंतर फ्रीज उघडतात. तिथं भाज्या असतात. जोशी स्वतः आवडीनं भाज्या
खरेदी करायला जातात. तेव्हां मिळतील त्या सर्व प्रकारच्या भाज्या घेऊन येतात.
फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर, भोपळी िमरची, पापडी, कोबी,
जी काही भाजी बाजारात असेल ती. जोशी या भाज्या चिरतात. बारीक करतात.
मग मिक्सरमधे एकदा गिरकावून थोड्याशा बारीक करतात. मग त्या शिजवतात. चवीसाठी आलं,
लसूण, पुदिना घालतात. नंतर कधी कधी मिरपूड
वापरतात, तिखटपणा आणण्यासाठी. दुधी भोपळा शिजवून वापरायचा.
तो तब्येतीला उत्तम आणि सुपात छान मिसळतो. भरड सूप.एकदम पाणीपाणी नाही आणि एकदम
घट्टही नाही. दोन वाडगे सूप प्यालं की पोट भरतं.
         जसा बटाटा. तसंच अंडं. कसंही वापरता येतं. जोशी एक अंडीभात करतात. म्हणजे
काय तर पातेलं घ्यायचं. त्यात अंडी फेटून घालायची. आमलेट किंवा बुर्जी करतात तशी
ती फ्राय करायची. नंतर तांदूळ घ्यायचा. तो त्या फ्राय अंड्यात घालायचा. परतायचा.
मग पाणी घालून नेहमीसारखा भात शिजवायचा. झाला अंडी भात. आणखीही काही गोष्टी. अंडी
उकडायची. नंतर ती पुदिना, आलं लसूण यांच्यासह एकत्र मळायची.
काकडी-गाजर वगैरे शिजवून बारीक करून तेही या मळलेल्या अंड्यात मिसळायचं. हातानंच
मळून त्याचा लगदा करायचा. लगदा ब्रेडच्या स्लाईसमधे घालायचा. झालं सँडविच. ते
ग्रिल करायचं.
         “
घरात अंडी असावीत. उकडलेली आणि न उकडलेली. घरात बटाटा असावा.
उकडलेला किंवा कसाही. उकडलेला बटाटा खूप दिवस टिकतो. साल काढलं की वापरायला सज्ज.
अंडी आणि बटाटे यांच्यापासून काय वाट्टेल त्या डिशेस बनवता येतात. ” जोशींचा सल्ला.
         पोहे आणि नाना प्रकारच्या भाज्या. नाना प्रकारच्या भाज्या आणि भात यांचं
मिश्रण. नाना भाज्या आणि सुपं. चिकनचे तर अनंत प्रकार. चिकनमधेही भाज्या आणि डाळी.
तेल न वापरता पदार्थ. मसाले तर नाहीतच. पण समजा मिसळण्याच्या डब्यातले मसाले
वापरायचे असतील तर तेही.
         जोशी सामान्यतः रात्री उशीरा घरी परततात. पत्नीला उठवत नाहीत. स्वयंपाक
घरात जातात. फ्रीजमधे किंवा टेबलावर जे काही करून ठेवलेलं असतं ते पहातात. भात.
भाजी. सूप. आमटी. कोशिंबिर. जे काही असेल जेवढं केवढं असेल ते मोठ्या बोलमधे
घालतात. एकत्र करून खातात. कधी कधी पत्नी गाढ झोपली असेल तर सारं काही एकत्र करून
मिक्सरमधे भरडून घेतात. साधारणपणे एक लीटर आकाराचा मग भरेल इतकं मटेरियल तयार
होतं. उत्तम चव लागते. बरं सर्व तत्वं त्यात असतात. आणि टीव्हीसमोर बसून चमच्यानं
खाता येतं.
         “
घरात जे असेल ते जसं असेल तसं घेऊन वाट्टेल ते पदार्थ तयार करता
येतात. फक्त प्रयोग करायची तयारी हवी. पिढ्यान पिढ्या जे काही खायला शिकवलंय तेच
करायचं असा हट्ट असेल तर मात्र खरं नाही.”

         ।।
पूर्व प्रसिद्धी दिवाळी अंक – पासवर्ड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *