ट्रंप, क्लिंटन. बहुसंख्य जनतेला आपुलकी न वाटणारे उमेदवार

ट्रंप, क्लिंटन. बहुसंख्य जनतेला आपुलकी न वाटणारे उमेदवार

DONALD TRUMP
A Biography of the Mogul Turned Presidential Canidate.
BENJAMIN SOUTHERLAND.
||
A Woman In Charge:
The Life of Hillary Rodham Clinton
Carl Bernstein
।।।
२०१६ची अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. एक स्त्री पहिल्या प्रथम उमेदवार झाली आहे. १८६० सालच्या यादवीनंतर पुन्हा एकदा अमेरिका हा देश कोणासाठी आहे असा प्रश्न उफाळून आला आहे. सांस्कृतीक-सामाजिक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. लॅटिनो आणि काळे मिळून २०५० मधे अमेरिकेत बहुसंख्य होणार आहेत. तरीही त्याना अमेरिकेत स्थान आहे की नाही असा प्रश्न ऐरणीवर आहे. अमेरिकेत रुजलेली भांडवलशाही अर्थव्यवस्थेची मुल्यं पुन्हा गदगदा हलवली जात आहेत. देश ढवळून निघाला आहे.   डोनाल्ड ट्रंप आणि बर्नी सँडर्स हे पक्षांचे इच्छुक  प्रतिनिधीही जवळपास स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानं अमेरिकेतील पक्ष पद्धतीवरची चर्चा झडली आहे.
अमेरिकन राज्यव्यवस्थेत प्रेसिडेंट स्वतंत्रपणे निवडून येतो आणि संसद स्वतंत्रपणे तयार होते. देशाची धोरण सामान्यतः अमेरिकन अध्यक्ष ठरवतो परंतू ती धोरणं मान्य करणं, त्या धोरणावर आधारित प्रत्यक्ष कार्यक्रम मान्य करणं ही जबाबदारी संसदेवर असते. अध्यक्ष दिशा देतो, अमल करण्याची जबाबदारी संसदेवर असते. अध्यक्ष आणि संसद मिळून सरकार चालवतात. अध्यक्षानं स्वतः नेमलेलं मंत्रीमंडळ असतं. अर्थमंत्री, परदेश मंत्री, संरक्षण मंत्री वगैरे. हे मंत्री लोकांनी निवडलेले नसतात, त्यांची नेमणूक अध्यक्ष स्वतंत्रपणे, स्वतःच्या मर्जीनुसार करतो.  मंत्री आणि अध्यक्षांचे कार्यक्रम, धोरणात्मक निर्णय, अंदाजपत्रकं इत्यादी सगळ्या गोष्टी संसदेचं शिक्का मोर्तब झाल्यानंतरच अमलात येतात. ओबामा यांनी मांडलेलं देशाचं बजेट संसदेनं अमान्य केलं आणि देशाचा कारभार काही दिवस बंद झाला होता, सरकारी नोकरांचे पगारही बंद झाले होते. ओबामा यांना मिनतवारी करून, राजकीय कौशल्य वापरून बजेट कसं बसं पास करून घेतल्यानंतर सरकार काम करू लागलं. ओबामा केअर हा आरोग्य विम्याच्या कार्यक्रमही संसदेनं अडवून ठेवला.
 माध्यमं आणि जनतेनं  चारित्र्याची आणि कार्यक्षमतेची चिरफाड करून बुश यांना निवडून दिलं. बुश इराकवर आक्रमण करतील, हज्जारो माणसं मारतील, अब्जावधी डॉलरचा चुराडा करतील असं कोणाला वाटलं होतं? तो माणूस इतका हेकटपणा करेल असं कोणाला वाटलं होतं? संसद, न्याय व्यवस्था, जागरूक माध्यमं असूनही बुशनी जगाचं आणि अमेरिकेचं अपरिमित नुकसान केलं. एकाद्या अध्यक्ष किती धोकादायक असू शकतो याचं बुश हे उदाहरण आहे.
२०१६ च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप याची उमेदवारी जाहीर झालीय. जून १५ मधे आपली उमेदवारी जाहीर करतांना ट्रंप म्हणाले ‘मेक्सिकन सरकार बलात्कारी, गुन्हेगार, ड्रगचा व्यवहार करणाऱ्यांना  अमेरिकेत पाठवतं. आपण अध्यक्ष झालो तर मेक्सिको आणि अमेरिकेत शेकडो मैल लांबीची भिंत उभारू असं ट्रंप म्हणाले. अमेरिकेत रहाणाऱ्या बेकायदेशीर, कायदेशीर परदेशी लोकांना (मेक्सिकन, लॅटिनो) हाकलून देऊ असंही ते म्हणाले. मुसलमानांना या देशात घेतलं जाणार नाही असंही ते म्हणाले. पत्रकार घाणेरडे असतात, आपण माध्यमांवर बंदी घालू असंही ते म्हणाले. स्त्रियांना तर ते माणूस मानायलाही तयार नाहीत. बाप रे. त्यांची एकेक विधानं विचारात घेतली तर थरकाप उडतो. खुद्द त्यांच्याच पक्षातले अनेक नेते त्यांच्या विरोधात आहेत, त्यांना मतदान करणार नाही म्हणतात. तरीही  जनतेत त्यांना खूप पाठिंबा मिळतोय. ट्रंप हे एक कोडंच आहे.
सदरलँड यांची प्रस्तुत छोटी पुस्तिका डोनाल्ड ट्रंप यांच्या चरित्रावर बऱ्यापैकी प्रकाश टाकते. डोनाल्ड ट्रंप यांचे आजोबा जर्मन. ते अमेरिकेत आले. प्रामुख्यानं जुगार, वेश्याव्यवसाय, दारूसेवन यांना प्राधान्य देणारा हॉटेल व्यवसाय त्यांनी केला. कायद्यानं बडगा उभारल्यावर ते जर्मनीत परतले. तिथं कायद्यानं फटके घातल्यावर ते पुन्हा अमेरिकेत परतले. ट्रंप यांचे वडील बांधकाम, रियल एस्टेट व्यवसायात स्थिरावले. त्यांनी भरपूर संपत्ती मिळवली. त्यांनीही काही प्रमाणात गैरव्यवहार केले. डोनाल्ड ट्रंप वडिलांच्याच व्यवसायात शिरले. राजकारणी लोकांशी संपर्क ठेवून, कायदे आपल्या दिशेनं वाकवून, आक्षेपार्ह पद्धतीनं डोनाल्ड ट्रंप यांनी आपलं आर्थिक साम्राज्य उभं केलं. १९८८ पासूनच त्यांनी परिघावर राहून राजकीय मतं प्रदर्शित करायला सुरवात केली. १९९० मधे, २००० साली, २००१२ मधे ते निवडणुकीत उतरले. रिफॉर्म पक्ष नावाच्या पक्षाच्या वतीनं त्यांनी निवडणूक लढवली. रिपब्लिकन पक्षातले नाराज गट आणि अपक्ष लोकांचा त्यांना पाठिंबा होता. 
सदरलॅंड यांनी ट्रंप यांच्या आर्थिक उलाढालींचा धावता आढावा घेतला आहे. पुस्तिका छोटी ठेवण्यासाठी  ट्रंप यांच्या आक्षेपार्ह उद्योगांचे तपशील लेखकानं मांडले नाहीत. अलीकडंच ट्रंप यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाची चर्चा सुरु झाली आहे, एक खटलाही ट्रंप यांच्यावर गुदरण्यात आलेला आहे. नागरिकांनी रियल एस्टेट खरेदी करावी यासाठी दबाव कसा आणावा, त्यांना कशा शेंड्या लावाव्यात याचं शिक्षण विद्यापीठ देणार होतं.खूप पैसे विद्यार्थ्यांकडून उकळण्यात येणार होते. न्यू यॉर्कमधे, अटलांटा आणि व्हेगसमधे जमीन खरेदी करताना, जमिनीचा विकास करत असताना ट्रंप यांनी सरकारवर दबाव आणले, भ्रष्टाचार केले. या उद्योगांचे उल्लेख पुस्तिकेत आहेत, तपशील नाहीत. आजवर हे तपशील कोणी बाहेर काढलेले नाहीत. या तोंडाळ माणसाच्या नादी लागायला माध्यमं तयार नसावीत. परंतू आता प्रचार मोहिम सुरु झाल्यावर तपशील बाहेर येण्याची शक्यता आहे.
ट्रंप हा माणूस उथळ आहे. त्यांच्याजवळ कोणताही विचार नाही. त्यांचे पैसे मिळवणं दांडगाईचं, गैरव्यवहाराचं आहे.कौटुंबिक जीवनातही ते दांडगाई करतात या गोष्टी लेखकानं ठळकपणानं मांडल्या आहेत.
ट्रंप हा प्रसिद्धीलोलूप माणूस आहे, तो जे काही करतो ते केवळ प्रसिद्धीसाठी. अध्यक्ष होऊन अमेरिकेचं किंवा जगाचं भल करण्याचा विचार किंवा कार्यक्रम त्यांच्याजवळ नाही, ते केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अध्यक्ष होऊ पहात आहेत हा मुद्दा लेखकानं बऱ्याच तपशीलात मांडला आहे. दादागिरी, वरच्या पट्टीत सतत खोटं बोलून समोरच्या माणसाला हैराण करणं, साऱ्या जगाला कमी लेखणं ही ट्रंप यांची वैशिष्ट्यं लेखकानं या पुस्तकात टिपली आहेत.
सदरलँड यांची पुस्तिका वाचल्यानंतर या माणसाला मतदान करू नये असं नागरिकांना वाटू शकेल. ट्रंप यानी लिहिलेली आणि ट्रंप यांच्यावर लिहिलेली डझनभर पुस्तकं आता बाजारात आली आहेत.
डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन १९७५ पासून राजकारणात आहेत. पती बिल क्लिंटन अरकन्सास राज्याचे गव्हर्नर होते. त्यानंतर आठ वर्षं ते अमेरिकेचे अध्यक्ष होते. या काळात हिलरी पतीच्या कारभारात सक्रीय भाग घेत होत्या. २००१ साली स्वतः हिलरी न्यू यॉर्कमधून सेनेटर झाल्या. सेनेटच्या परदेश धोरण विभाग, संरक्षण विभाग, राष्ट्रीय सुरक्षा या विषयांशी संबंधित कमिट्यांवर त्या सक्रीय होत्या. या कामात त्या इराकमधे जाऊन आल्या. २००८ मधे त्यांनी बराक ओबामांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढवली. नंतर २००९ ते २०१३ त्या अमेरिकेच्या परदेशमंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) होत्या. अध्यक्षपदाची निवडणुक लढवण्यासाठी त्यानी ते पद सोडलं आणि २०१५ च्या जूनमधे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. कॉलेजात असल्यापासून त्या राजकारणात, निवडणूक मोहिमांत सक्रीय होत्या. 
हिलरी क्लिंटन यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचं आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचं चित्र कार्ल बर्नस्टिन यांनी प्रस्तुत पुस्तकात चितारलं आहे. बर्नस्टिन हे वुडवर्ड यांचे वॉशिंगटन पोस्टमधले सहकारी. दोघांनी मिळून वॉटरगेट प्रकरण उघडकीस आणलं. बर्नस्टीन व्हाईट हाऊसचे बातमीदार होते. त्या नात्यानं त्यांनी बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांना खूप जवळून पाहिलं आहे. सातेक वर्ष मेहनत करून, अडीचेकेशे मुलाखती घेऊन बर्नस्टिन यांनी हे पुस्तक उभं केलं आहे.
हिलरींचं बालपण त्रासाचं होतं. त्यांचे वडील चमत्कारिक होते. कुटुंबियांना जाम त्रास द्यायचे. हिलरींच्या आईनं मुलांना वाढवलं, संकटांवर मात करायला शिकवलं. हिलरींचे वडील रीपब्लिकन होते, कम्युनिष्ट विरोधी होते. साठीच्या उत्तरार्धातल्या अस्वस्थ काळात हिलरी वाढल्या. वियेतनाम युद्ध विरोध, वर्णद्वेशी प्रवृत्तींना विरोध, स्त्री स्वातंत्र्य, समलिंगी संबंधाना मान्यता हे त्या काळातले गाजलेले मुद्दे हिलरींच्या घडणीचा भाग झाले. 
हिलरी महत्वाकांक्षी आणि मेहनती होत्या. उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा तळात प्रत्यक्षात काम करण्याकडं त्यांचा कल होता. प्रश्नांचा अभ्यास त्या करीत आणि त्याच बरोबर मतदार संघात मतदान पत्रिका वाटणं, पोस्टर्स लावणं, मतदार याद्या दुरुस्त करणं अशी तळातली कामंही त्या करत. आपण कधी तरी देशाचे अध्यक्ष होणार अशी खूणगाठ त्यांनी बांधली होती.  अधिक हुशार, चलाख,  बिल क्लिंटन आधी अध्यक्ष झाल्यानं हिलरींचं अध्यक्ष होणं राहून गेलं. २००० मधे बिल यांची कारकीर्द संपल्यापासून हिलरी नेम धरून होत्या आणि २०१६ साली त्या मैदानात उतरल्या.
बर्नस्टिन यांचं चरित्र सरळधोपट आहे, जणू काही हिलरीना विचारून, त्यांनी सांगितल्याप्रमाणंच लिहिलंय असं वाटतं.   पती गव्हर्नर असताना आणि अध्यक्षपदाच्या आठ वर्षाच्या काळातलं हिलरींचं वागणं वादग्रस्त आहे. राष्ट्रपतीच्या पत्नीला  अधिकार नसतात. पण पत्नी असल्यानं प्रभाव मात्र पडू शकतो.    एलेनॉर रूझवेल्ट यांची  पती अध्यक्ष रूझवेल्ट यांच्या राज्यकारभारात फार ढवळाढवळ असे. हिलरींनी व्हाईट हाऊसमधे खूप दादागिरी केली. मंत्री, सल्लागार, अधिकारी इत्यादी लोकांना त्या फोन करून हुकूम सोडत. व्हाईट हाऊसमधील प्रवासी विभागातल्या जुन्या कर्मचाऱ्यांवर आरोप करून हिलरींनी त्यांना तडकाफडकी हाकलून दिलं. हिलरी आपल्या बगलबच्च्यांना, त्यांना पैसे देणाऱ्या लोकांना  प्रशासनात घुसवतात. निवडणुकीसाठी आणि आपलं राजकीय गाडं सुरळीत चालावं यासाठी नाना वाटांनी त्यांनी पैसे गोळा केले. या गष्टी बर्नस्टीन माहीत होत्या, पण या पुस्तकात आलेल्या नाहीत. परंतू या साऱ्या गोष्टी बर्नस्टिन यांचे सीनियर सहकारी  बॉब वुडवर्ड यांनी लिहिलेल्या  पुस्तकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. 
स्वतःचा खाजगी ईमेल अकाऊंट ठेवणं, त्याचा सर्वर न्यू यॉर्कमधल्या स्वतःच्या घरात ठेवणं, या अकाऊंटवरून देशाची कामं करणं अशा गंभीर आणि घातक गोष्टी हिलरी क्लिंटन यांनी केल्या आहेत. त्याची चौकशी चालू आहे. चौकशीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला तर हिलरींच्या निवडणुकीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
ट्रंप यांच्या तुलनेत हिलरींना राजकारणाचा, प्रशासनाचा अनुभव दांडगा आहे. विशेषतः परदेश नीतीबाबत त्या अधिक स्पष्ट आहेत. त्यांचं वर्णन ससाणा असं करण्यात येतं, त्या ओबामांसारख्या कबूतर नाहीत. देशांतर्गत राजकारणापेक्षा जगातलं अमेरिकेचं स्थान यावर त्यांचा भर रहाण्याची शक्यता आहे. त्या युद्धखोर आहेत असाही आरोप करायला जागा आहे. क्लिंटन घराणेशाही पुरे झाली असंही लोकांना वाटतंय.
दोन्ही उमेदवारांबाबत बहुसंख्य लोकाना आपुलकी कां वाटत नाही याचा काहीसा खुलासा वरील दोन पुस्तकांतून होतो.
।।

3 thoughts on “ट्रंप, क्लिंटन. बहुसंख्य जनतेला आपुलकी न वाटणारे उमेदवार

  1. एखादा अध्यक्ष धोकादायक ? लोकांनाही युद्ध हवेच असते . फक्त नेत्याच्या नावावर जबाबदारी टाकणे सोयीचे. अजून हिरोशिमाचे समर्थन करणारी माणसं (?) आहेत. माणसापेक्षा समुदाय धोकादायक !

  2. अमेरिका निवडणूकीबाबत जास्तीत जास्त लिहा… जेणेकरुन अपडेट मिळत राहतील.
    शैलेश पेटकर, सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *