इराकचं त्रिभाजन
आयसिस  या नावाच्या जिहादी संघटनेनं
मोसुल शहर ताब्यात घेऊन बगदादकडं आगेकूच चालवली आहे. आयसिस  म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. आयसिसला भूमध्य
सागराच्या काठावरच्या देशांचं इस्लामी राज्य तयार करायचं आहे. त्यात  इराक, सीरिया, इसराल, जॉर्डन, लेबेनॉन इत्यादी
देश येतील.
या सर्व देशात सध्या
इस्लामी राज्यंच आहेत. मग आणखी वेगळं इस्लामी राज्य म्हणजे काय? कुणास ठाऊक. आयसिसच्या
इस्लामी राज्यात फूटबॉल खेळायला परवानगी नसेल, धुम्रपान आणि मद्यपानाला परवानगी
नसेल,स्त्रिया काम करणार नाहीत आणि बुरख्यात 
असतील, नवरा,  भाऊ, बाप असा कोणी
तरी पुरुष नातेवाईक असेल तरंच तिनं बाहेर पडायचं.सिनेमा नाही, टीव्ही नाही, संगित
नाही.
आता हा कोणता इस्लाम? महंमदांच्या काळात
फूटबॉल हा खेळ नव्हता, सिनेमे नव्हते. तेव्हां या गोष्टी करायला कुराणात मनाई
असण्याचं कारण नाही. स्त्रियांनी बुरखा घालण्याबाबत कुराणात स्पष्ट निर्देश नाहीत.
खूप गोंधळाच्या तरतुदी आहेत. विशिष्ट वेळीच बुरखा घालावा, कायम घालू नये असंही एका
ठिकाणी म्हटलंय. स्त्रियानी काम करण्याचा प्रश्न महंमदांच्या काळात येत नव्हता.
सामान्यतः स्त्रिया घरकामंच करत होत्या. तेव्हां या साऱ्या  तरतुदी आयसिसचे अबु अल बगदादी यानीच घुसडलेल्या
दिसतात. नेमक्या अशाच तरतुदी मुल्ला उमर यांनी तालिबान स्थापन करताना, तालिबानचं
राज्य अफगाणिस्तानात सुरु करताना केल्या होत्या.
आयसिस ही संघटना आधी
सीरियात काम करत होती. अल कायदाचा एक गट म्हणून. गेल्या वर्षी अल कायदाचे अयमान
जवाहिरी यांनी अबू बगदादी यांना ते अती 
क्रूर आहेत असं म्हणून हाकलून लावलं. त्यामुळं बगदादी आता इराकमधे घुसले
आहेत.
तर असे हे अल बगदादी
इराकमधल्या शियाना मारत सुटले आहेत. बगदादी यांच्या संघटनेत  सुन्नी लोक आहेत. त्यांना आखातातल्या सुनी
देशांचा पाठिंबा आहे. इराकमधे शिया बहुसंख्य आहेत, त्यानंतर  सुनी आहेत आणि त्यानंतर कुर्दांचा नंबर लागतो.
शिया सुनी वैर जगजाहीर आहे. आणि कुर्दाना त्यांचा स्वतंत्र देश हवा आहे. सुनीना
जसा सुनी श्रीमंत देशांचा पाठिंबा आहे तसा इराकमधल्या शियाना इराणचा पाठिंबा आहे.
शिया बहुसंख्य असल्यानं आणि त्याना इराणचा पाठिंबा असल्यानं शियावर राज्य करणं
आयसिसला शक्य नाही. त्यामुळं यथावकाश आयसिस सुनी बहुसंख्य असलेल्या विभागाचा ताबा
घेऊन तिथ सुनीस्तान करतील. कुर्डस्तान वेगळं होईल आणि शियास्तान स्वतंत्र होईल.
 इराक नावाचा देश तरी कधी तयार झाला? पहिल्या
महायुद्धामधे ऑटोमन साम्राज्य मोडल्यावर फ्रेंच आणि ब्रिटीशांनी साम्राज्याचा ताबा
घेऊन देश तयार केले, नेशन स्टेट्स तयार केली. इराक, सीरिया इत्यादी. ऑटोमन
साम्राज्यातही शिया, सुनी, कुर्द अशा वस्त्या होत्या, एकत्र नांदत होत्या. शिया
सुनी मारामाऱ्या त्या काळात नव्हत्या. पण वैर मात्र होतं. संधी मिळाल्यावर दोन
समाज एकमेकांपासून वेगळे होताहेत.
आयसिसचा एक स्वतंत्र
इस्लाम दिसतो. म्हणजे सुनींचा. सुनी मंडळींमधेही अनेक गट आहेत, प्रत्येकाच्या
वर्तणुकीच्या आणि इस्लामच्या व्याख्या वेगळ्या आहेत. काही जण स्वतःला सलाफी
म्हणवतात. सलाफीच परंतू सौदी राज्यांना धार्जिणे असणारे स्वतःला वहाबी म्हणवतात.
सलाफीच परंतू इस्लामी क्रांती करण्याच्या कार्यप्रणालीत वेगळा विचार असणारे
स्वतःला मुस्लीम ब्रदरहूड म्हणवतात. सलाफी विचारांचे असूनही ओसामा बिन लादेनचा
इस्लाम वेगळा होता. महंमदांच्या काळातच जाणं या बद्दलही मतभेद आहेत. महंमदांचा काळ
गेल्यावर आता इस्लामी तत्वांचा अर्थ काळाच्या संदर्भात कसा लावायचा यावर सुनी आणि
शियामधे प्रचंड मतभेद आहेत. महंमदांच्याच काळात जाण्याचा आग्रह धरणारे इस्लामी एके
47 चा वापर करतात, सॅटेलाईट फोनचा वापर करतात, सर्व आधुनिक साधनं वापरतात. सौदीतले
वहाबी उंटावरून फिरत नाहीत, जेट विमानानं फिरतात.
पाकिस्तान, इराक,
सिरिया, इराण, लेबनॉन, नायजेरिया इत्यादी ठिकाणच्या जिहादींना हवंय तरी काय? तर्काधारे विचार
केला तर असं दिसतं की केवळ सत्ता हवीय आणि त्यासाठी ते इस्लामचा वापर करत आहेत.
इस्लामचे चक्रम, अतार्किक अर्थ लावत आहेत. त्याचा त्रास केवळ इस्लामीच नव्हे तर
साऱ्या जगाला होतोय. इस्लामचा असा अर्थ लावणं जगभरच्या इस्लामी नागरिकांना मंजूर
आहे काय? असा अर्थ त्यांनी लावू नये अस म्हणायचं तर इस्लामचा
काळाला अनुसरून योग्य अर्थ लावायला हवा. तो कोणी लावायचा? तसा अर्थ करायला
इस्लामच्या एस्टाब्लिशमेंटला परवानगी आहे काय?
फूटबॉल खेळणाऱ्यांना
आयसिस मारून टाकणार. आपल्या पेक्षा वेगळी जीवनशैली आणि उपासना पद्धती असलेल्याना
मारून टाकण्याचा अधिकार त्यांना भले त्यांच्या धर्मानं दिला असेल, इतरांनी तो कसा
मान्य करायचा? जगात इतर धर्म असणार, इतर जीवनशैली असणार,
त्याही तितक्याच पवित्र असणार, त्यांचा अधिकार 
त्या त्या लोकांना आहे ही गोष्ट आता आधुनीक जगानं मान्य केली आहे, भले ती
सहाव्या सातव्या आठव्या शतकातल्या कोणाला मान्य नसेल.
म्हणूनच जिहाद ही
कल्पना कालबाह्य ठरते. जिहाद आणि लोकशाही या दोन गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत.
इस्लामी धर्मियाना
अमळ शांतपणे विचार करायला हवा.इतरांनीही.
।।
निळू दामले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *