इसरायल पॅलेस्टीन संघर्षाची पाळंमुळं आणि पानंफांद्या.

इसरायल पॅलेस्टीन संघर्षाची पाळंमुळं आणि पानंफांद्या.

सहा ऑक्टोबरपर्यंत गाझामधून १७ हजार पॅलेस्टिनी इसरायलमधे येत होते. दररोज.कामधंदा करण्यासाठी.

सात ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेनं इसरायलवर हल्ला केला. रॉकेटं सोडली, सैनिक इसरायलमधे घुसवले. साताठशे माणसं मारली, दोनतीनशे माणसं ओलीस ठेवली.

आठ ऑक्टोबरपासून इसरायलनं आपलं पायदळ आणि रणगाडा दळ गाझात घुसवून गाझा जमीनदोस्त करायला सुरवात केली.

नऊ ऑक्टोबरपासून गाझामधल्या माणसांना इसरायल प्रवेश बंद करेल. गाझाची पूर्ण नाकेबंदी होईल.बाहेरून कोणतीही मदत गाझात पोचणं इसरायल अशक्य करेल. सोळाव्या, सतराव्या शतकात किल्ल्याला वेढा घालून किल्ल्यातल्या माणसांना उपाशी मारण्याची एक लढाईची पद्धत होती.  ती पद्धत इसरायल अवलंबेल.गाझाची उपासमार होईल.

 २००५ साली गाझाचा कारभार इसरायलनं स्थानिक पॅलेस्टिनी लोकांकडं सोपवला. गाझात काही गट शांततेनं जगू पहाणारे होते, काही गट अतिरेकी होते. इसरायलचं अस्तित्व संपवणं हे अशक्य ध्येय ठेवून काम करणारा अतिरेकी गट म्हणजे हमास. हमासनं गाझाचा ताबा घेतला.

राजकारण अतिरेक्यांच्या हाती राहील अशी व्यवस्था थेट १९९३ पासून सुरु झालीय. १९९३ साली पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी आणि इसरायल यांच्यात ऑस्लो करार झाला. पॅलेस्टाईनला स्वयंशासनाचे अधिकार दिले गेले. स्वयंशासन पण सार्वभौमत्व नाही. इसरायलच्या देखरेखीखाली पॅलेस्टाईननं कारभार करायचा. नंतर यथावकाश  इसरायल आणि पॅलेस्टाईन हे दोन सार्वभौम देश अस्तित्वात येणार होते.

ऑस्लो करार करण्यात पॅलेस्टाईनच्या बाजूनं यासर अराफात यांच्या सोबत  हन्नान अश्रावी या नेमस्त शिक्षणतज्ञ नेत्या होत्या. खरं म्हणजे करार होऊ शकला तो अश्रावी यांच्या सहभागामुळे. अश्रावी इंग्रजी साहित्य, तौलनिक साहित्य या विषयाच्या अमेरिकेतल्या व्हर्जिनिया विद्यापीठाच्या  पीएचडी होत्या.  त्या पॅलेस्टिनी आहेत; पॅलेस्टिन हा सार्वभौम देश तयार झाला पाहिजे या मताच्या आहेत;  लोकशाहीवादी आहेत, शांततावादी आहेत; त्यांना गांधी शांतता पारितोषिकानं गौरवण्यात आलं आहे. पॅलेस्टिनी लोकांचे मानवी अधिकार इसरायल पायदळी तुडवतं या विरोधात त्यांनी अनेक वेळा शांततामय आंदोलनं केली आहेत. पॅलेस्टाईन हा सुशिक्षितांचा लोकशाहीवादी देश व्हावा अशी त्यांची इच्छा आणि खटपट होती.

ऑस्लो करार झाला आणि अमेरिकेनं अश्रावी यांना दूर ठेवलं. ऑस्लो करारानंतर गाझामधे  झालेल्या  सरकारात अश्रावी मंत्री होत्या.गाझा सरकार  भ्रष्टाचारानं व्यापलं.  शिक्षण, आरोग्य यांच्याकडं सरकारनं दुर्लक्ष केलं. भाषणं करून अश्रावी सरकारच्या वर्तणुकीवर टीका करत. सरकारनं त्यांना काम करणं अशक्य केलं, त्या सरकारातून बाहेर पडल्या. अमेरिका, इसरायल यांनी पॅलेस्टाईनबरोबरच्या संवादातून अश्रावी यांना वगळलं. अश्रावींकडं सत्ता नसल्यानं गाझातली जनताही त्यांच्यापासून दूर गेली. गाझातलं राजकीय नेतृत्व हळूहळू अतिरेक्यांच्या ताब्यात गेलं. अश्रावी अस्ताला गेल्या. नेमस्तपण, शांतताप्रेम आणि लोकशाही या गोष्टीही अस्ताला गेल्या. गाझाचा ताबा हमासनं घेतला. हमास ही मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेची हिंसाशाखा.

 एकीकडं पॅलेस्टाईनमधे अश्रावी निष्प्रभ झाल्या. दुसरीकडं इसरायलमधे हळूहळू समावेशक, लोकशाहीवादी, समंजस माणसं निष्प्रभ केली गेली.  विचार करणाऱ्या,  समंजस माणसांना दूर सारून अतिरेकी कडव्या धार्मिकांना अमेरिकेनं मदत केली. लोकशाही, राज्यघटना गुंडाळून अतिरेकी धोरणांचा गजर करणाऱ्या भ्रष्ट  नेतान्याहू या माणसाच्या हाती सत्ता सोपवण्यात आली. 

हमास आणि नेतान्याहू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

गाझा आणि वेस्ट बँकेतल्या पॅलेस्टिनींची संख्या आहे ५० लाख. इसरायलमधे १८ लाख नागरीक अरब,मुसलमान, बेदुईन, पॅलेस्टिनी म्हणजे ज्यू नसलेले आहेत. इसरायलमधल्या ज्यूंची संख्या आहे ७२ लाख. म्हणजे ज्यू ७२ लाख आणि ज्यू नसलेले ६८ लाख असं पॅलेस्टाईन-इसरायलचं स्वरूप आहे. इसरायलमधल्या १८  लाख अरब नागरिकाना आता नागरी अधिकारही नाकारण्याची खेळी नेतान्याहू करत आहेत.

आता ७२ लाख वि. ६८ लाख असा संघर्ष उभा राहिलाय.

७२ लाख अधिक  ६८ लाख माणसं गेली ७५ वर्षं एकमेकाच्या सहवासात आहेत. त्यांच्यात अनेक विषयावर तीव्र मतभेद आहेत. तरीही ते जुलमाच्या रामरामाची देवघेव करत एकत्र आहेत.दुरावा आहे, राग आहे, संघर्ष आहे, तरीही अजून एकत्र आहेत.

मुद्दा असा की दुरावा नष्ट करून दोन्ही समाजांना शांततेनं कसं नांदता येईल.

इसरायलच्या निर्मितीपासूनच इसरायलचं अस्तित्वच नको असं म्हणणारे पॅलेस्टिनी होते आणि पॅलेस्टिनींचं अस्तित्वच नष्ट करू पहाणारे ज्यू होते.

आता इसरायल हे वास्तव आहे. हे वास्तव पुसता येणार नाही. पण पॅलेस्टिनी समाज हेही वास्तव आहे, तेही पुसता येणार नाही. इसरायल तयार झालं;  गेली ७५ वर्षं प्रचंड रक्तपात आणि विध्वंस झाला. पण दोन समाजांचं सहअस्तित्व काही घडत नाहीये.

इसरायल संपणार नाही आणि पॅलेस्टिनीही संपणार नाहीयेत.

हमासनं केलेल्या हल्ल्यामुळं इसरायलला आणि जगाला कळलंय की इसरायल सुरक्षित नाही.कितीही शस्त्रं वापरली, कितीही ताजी टेक्नॉलॉजी वापरली तरी पॅलेस्टिनी हिंसा करू शकतात. इसरायलनं केलेला प्रतिहल्ला आणि कोंडी यामुळं पॅलेस्टिनीनाही कळायला हवं की इसरायलशी पंगा घेऊन त्यांचं भलं होणार नाहीये. 

नो इसरायल हे खरं नाही.नो पॅलेस्टाईन हेही खरं नाही. 

इसरायल आणि पॅलेस्टिनी समाज या कळसुत्री बाहुल्या आहेत. नाचवणारे वेगळे आहेत. बाहुल्यांना नाचवणाऱ्यांनी  मिळून नेमस्त, लोकशाहावादी, समंजस लोकांना दूर केलंय, नेतान्याहू आणि हमास यांच्या हाती नेतृत्व राहील अशी व्यवस्था केलीय.

इसरायल हे एक वास्तव आहे. या वास्तवातूनच वाट काढायला हवी हे शहाणपण पॅलेस्टिनी,अरब लोकांकडं दिसत नाही.  

इसरायल नव्या वस्त्या करून पॅलेस्टिनीना हाकलत रहाणार, अल अक्सा मशीदीत धांदल करणार, वातावरण कायम अशांत ठेवणार, त्यामुळं  अरब जगात शहाणपणा उमलणार नाही.

गाझाचं कायमस्वरुपी नुकसान होणार.

इसरायल कायम असुरक्षित रहाणार.

 हे सारं जगाला समजतंय. फक्त इसरायलची जनता आणि पॅलेस्टाईनच्या जनतेला समजत नाहीये.

शहाणपण कोणाला, कधी सुचणारे?

।।

Comments are closed.