सिनेमा. ऑस्करसाठी मल्याळी २०१८

सिनेमा. ऑस्करसाठी मल्याळी २०१८

येत्या म्हणजे २०२४ च्या ऑस्करसाठी 2018. Every One is a Hero ही मल्याळी फिल्म निवडण्यात आलीय.  

‘२०१८’ मधे केरळातल्या एका गावाची गोष्ट आहे. एक कुठलंही असावं असं एक गाव असतं. माणसं आपापल्या अस्तित्वासाठी धडपडत असतात. माणसंच ती. त्यांची सुखदुःख, त्यांचे ताणतणाव, त्यांची भांडणं असं सारं काही जसं कुठंही असावं तसं गावात असतं. पूर येतो. अन्यथा लडखडणारी माणसं घट्ट पाय रोवून उभी रहातात, आपापले स्वार्थ आणि हेवेदावे विसरून पुराला तोंड देतात.अनूप नावाचा एक फौजी माणसं मारली जातात त्यानं व्यथित होऊन गावात परतलेला असतो, तो हे गाव टिकवण्यासाठी प्राण देतो.

चित्रपटातली दृश्य देखणी आहेत, भव्य आहेत, प्रभावी आहेत. चित्रपट बराच वेळ काळोखातच घडतो. काळोख दाखवणं फार कष्टाचं असतं. अगदी कमी प्रकाशातल्या दृश्यांमधे तपशील कमी दिसतात पण त्यामुळंच प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीला जास्त वाव मिळतो. भावना अधिक तीव्र करणं काळोखात जमतं. दिक्दर्शक आणि छायाचित्रकारानं कथानक खूप परिणामकारक केलंय.

चित्रपटाचं एक तंत्र असत. एका पाठोपाठ एक माणसं, पात्रं सोडत जायचं. नंतर त्यांना एकाद्या घटनेत गोवून एकत्र करायचं. अर्धा भाग पात्रं पेरायची, उरलेल्या भागात ती पात्रं गोळा करून त्यातून कथाभाग संघटित करायचा. या तंत्राची  एक अडचण अशी की पात्रं सोडत जाण्यात वेळ जातो, तो भाग काहीसा कंटाळवाणा होतो. उत्तरार्धात थरार असेल, नाट्य असेल, तर पु्र्वार्धातला कंटाळा माणसं आनंदानं स्वीकारतात. ‘२०१८’ बाबतही तसंच झालंय. चित्रपटाचा सुरवातीचा अर्धा भाग गाव आणि त्यातल्या माणसांचं चित्रण करतो. अर्ध्यानंतर पूर येतो आणि चित्रपट वेग घेतो. आपल्याला माहीत झालेली माणसं वेगळ्या रूपात आपल्याला दिसतात.  

Jude Anthany Jospeh यानं चित्रपटाचं दिक्दर्शन केलंय. २०१८ हा त्याचा चौथा चित्रपट. जुड अभिनेताही आहे, त्यानं वीसपेक्षा अधिक चित्रपटात अभिनय केलाय. जूड पटकथा लिहितो, प्रस्तुत चित्रपटाची पटकथा लिहिण्यातही त्याचा इतरांबरोबर सहभाग आहे. जुडला केरळ चित्रपट महोत्सवात बक्षिसं मिळाली आहेत. जुड काहीसा सार्वजनिक कार्यकर्ता आहे. केरळमधे प्रत्येक माणूस सार्वजनिक कार्यकर्ता असतो असं म्हणतात.

तसं म्हटलं तर  फार्म्युला चित्रपट आहे. पण तो सत्य घटनांवर आधारित असल्यानं त्याला एक वेगळं वलय आहे.चित्रपटात अनूपचं, नायकाचं, काम करणारा टोविनो केरळातल्या पुरात सापडला होता, ते संकट त्यानं अनुभवलं होतं. त्यामुळंच त्याचा अभिनय प्रभावी झाला असणार.  

चित्रपटाची भव्यता, अभिनय आणि थरार यामुळं ऑस्करमधे हा चित्रपट गाजेल हे नक्की. ऑस्कर स्पर्धेत इतर कोणते चित्रपट आहेत यावर निर्णय अवलंबून असतो. अधिक सरस चित्रपट स्पर्धेत आला तर काय होईल ते सांगता येत नाही.

गेल्या वर्षी भारतात सुमारे १५०० चित्रपट झाले. त्यातल्या ४५ चित्रपटांचा ऑस्करसाठी विचार करण्यात आला. त्यातले २० चित्रपट विचार करण्यासाठी निवडले गेले आणि त्यातून २०१८ ची निवड भारत सरकारनं केली. ऑस्करमधे उत्कृष्ट परदेशी चित्रपट या बक्षिसाठी चित्रपटाचा निर्माता खाजगी पातळीवरही प्रवेश करू शकतो. ३०० युरो प्रवेश फी असते. सरकारही चित्रपट पाठवू शकतं. ऑस्कर स्पर्धेत खर्च फार असतो. ज्यूरी, मतदार, पत्रकार यांना खास आमंत्रण देऊन विशेष शो करून चित्रपट दाखवावा लागतो. पार्ट्या द्यावा लागतात. अगदी सहज १५ ते २० कोटी रुपये खर्च होतो. येवढा खर्च निर्मात्याला पेलवत नाही. त्यामुळं सरकारी वाटेनं जाणं निर्माते पत्करतात.

चित्रपटाचा दर्जा हा ऑस्कर बक्षिसाचा अर्थातच मुख्य मुद्दा असतो. त्यात मानवी नात्यांची गोष्ट आहे काय, त्यात एकादा मोठा संघर्ष आहे काय, त्यात एकादी सामाजीक-राजकीय समस्या मांडलीय काय याचाही विचार होतो. परंतू त्या सोबत इतरही घटकांचा विचार अलीकडं ज्युरी करताना दिसतात. चित्रपट किती लोकप्रीय झाला ही एक कसोटी असते. म्हणजे तो किती लोकांनी पाहिला, समीक्षकांनी त्या बद्दल काय काय म्हटलय, कॅन-व्हेनिस-बर्लिन इत्यादी महोत्सवात तो लोकांनी कसा स्विकारला हेही मुद्दे विचारात घेतले जातात.

२०१८ हा चित्रपट भारतात आणि युके-अमेरिकेत खूप पाहिला गेलाय. असं म्हणतात की तीनेक कोटी रुपयांत तयार केलेल्या या चित्रपटानं तीसेक कोटीपेक्षा जास्त पैसा थेटरात कमावलेला आहे. अलिकडं ओटीटी फलाटाची सोय झाल्यानं आणि चित्रपट एलेक्ट्रॉनिकली जगात कुठंही दाखवण्याची सोय झाल्यानं चित्रपट व्यवसाय मुळापासून बदललाय. एकेकाळी फिल्मच्या प्रती काढून त्या जगभर फिरवाव्या लागत. हा फार खर्चाचा मामला होता. आता तुम्ही तुमच्या गावात बसून जगातल्या कुठल्याही थेटराला थेटर मागेल तेवढेच शो पाठवू शकता. सबटायटलची सोय झाल्यामुळंही चित्रपट जगात कुठंही पाहिला जातो. आपण जसे इंग्रजी चित्रपट सबटायटलमुळं पाहू शकतो तसे २०१८, कंतारा इत्यादी चित्रपट जगातली भारतीय नसलेली माणसंही पहातात.

चित्रपट व्यवसायाला मिळालेलया या वळणामुळं दक्षिणी चित्रपट आता देशभर पाहिले जातात. उत्तम चित्रण, उत्तम दृश्य आणि ध्वनी इफेक्ट यामुळं दक्षिणेतले चित्रपट आता सर्व भारतभर पाहिले जातात. त्यामुळं त्या चित्रपटाच्या निर्मात्याना चार पैसे मिळतात, ते ऑस्करमधे चित्रपट पाठवण्याची चैन काही प्रमाणात करू शकतात. 

भारत सरकारनं २०१८ ची प्रवेशिका ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ऑस्करला पाठवली. ऑस्कर प्रकरण जूनमधेच सुरु होतं. कॅन इत्यादी महोत्सवात स्पर्धक चित्रपट पाठवतात, त्यावर मीडियात चर्चा सुरु होते. असं करत करत ऑस्करचा दिवस उजाडतो. ऑक्टोबरमधे सुरवात करणं शर्यत सुरु झाल्यावर बऱ्याच वेळानं धावपटूनं पळायला सुरवात करण्यासारखं असतं.

असो.

भारताला अजून उत्कृष्ट चित्रपटाचं बक्षिस मिळालेलं नाही.  

 चित्रपटातल्या काही घटकांसाठी भारतीयाना ऑस्कर मिळाली आहेत. १९८३ साली भानू अथैया यांना त्यानी गांधी या चित्रपटासाठी  कपडेपट या वर्गात  ऑस्कर मिळालं. नंतर २००३ साली स्लमडॉग मिलियोनर या चित्रपटासाठी पुकुट्टी, गुलजार आणि ए आर रहमान यांना साउंड मिक्सिंग, गाणं आणि संगीत या वर्गातली ऑस्करं मिळाली. २०२३ साली आरआरआर या चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला गीत या वर्गातलं ऑस्कर मिळालं. त्याच वर्षी एलेफंट व्हिस्पर्स या माहिती पटाला ऑस्कर मिळालं.  

भारत सरकार कितपत प्रयत्न करेल ते सांगता येत नाही, पण २०१८ चे निर्माते मात्र घडपड करणार आहेत.

२०१८ चित्रपटाबाबत लोकांच्या अपेक्षा आहेत. पाहुया काय होतं.

।।

Comments are closed.