रविवारचा लेख चांद्रयान मोहिम

रविवारचा लेख चांद्रयान मोहिम

चांद्रयान ३ या मोहिमेच्या तहत २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर उतरलं. विक्रम, विक्रमला जोडलेली प्रग्यान ही गाडी, दोघंही चंद्रावर उतरले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरलं. या ध्रुवावर उतरलेलं हे पहिलंच यान होतं. अमेरिका, रशिया आणि चीनची यानं चंद्रावर उतरली आहेत, पण या ध्रुवावर नाही, कारण हा प्रदेश अजून माणसाला उमगलेला नाही. तिथलं हवामान, तिथली जमीन कशी आहे याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळं किती सुरक्षित पोचता येईल  त्याची कल्पना कोणालाच नव्हती.

विक्रम उतरलं. व्यवस्थित उतरलं. तिथल्या मुक्कामात एकदा त्या यानानं उडीही मारली.यान ४० सेमी उंच उडालं आणि ४० सेमी अंतर पार करून थांबलं. उडी महत्वाची होती कारण समजा यानाला पृथ्वीवर परतायचं असेल तर टेक ऑफ घेता यायला हवा होता. इंजिन सुरु करणं आणि जोर लावून उडणं या गोष्टी शक्य झाल्या. भविष्यातल्या मोहिमेत याचा उपयोग होईल.

चांद्रयान मोहिमेचं उद्दीष्ट मर्यादित होतं. चंद्रावर उतरून तिथलं हवामान, जमीन यांची माहिती मिळवणं, तिथं कोणती मूलद्रव्य सापडतात याचा तपास घेणं. त्यानुसार  उतरल्यावर विक्रमचे सौर ऊर्जा तयार करणारे पॅनेल उघडले, प्रग्यान  जमीनीवर उतरली, फिरली. 

हा उद्योग करण्यासाठी लागणारी ऊर्जा सूर्यापासून मिळणार होती. तिथंच एक गोम होती. चंद्रावर १४ पृथ्वीदिवसांचा दिवस आणि १४ पृथ्वीदिवसांची रात्र असते. सौरउर्जा १४ दिवस मिळणार असल्यानं तेवढ्यातच कामं उरकायची होती. त्याच वेळात बॅटऱ्या चार्ज होणार होत्या आणि चांद्ररात्र सुरु झाली की पॅनेल बंद होऊन यान झोपणार होतं.

१४ रात्री संपल्यानंतर पुन्हा सूर्य उगवेल तेव्हां विक्रम करू शकेल की नाही या बद्दल वैज्ञानिकांना शंका होती. कारण झोपलेलं आणि थंड पडलेलं यान सुरू होण्याबद्दल खात्री नव्हती. तसं सुरु व्हावं अशी अपेक्षा होती पण तशा तरतुदी यानाच्या तंत्रयंत्रात नव्हत्या.

४ सप्टेंबरला रात्र सुरु झाली. १४ रात्रींनंतर इसरोनं विक्रमला संदेश पाठवले, आज्ञा दिली. चल, जागा हो, काम सुरु कर. संदेश विक्रमला मिळाले की नाहीत ते कळायला मार्ग नाही, विक्रमकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

इसरोनं समजलं  की विक्रम आता चिरनिद्रा घेत आहे. भारताचा राजदूत म्हणून विक्रम आता चंद्रावर रहाणार.( राजदूत झोपा काढत असतात असं तर ही लोकं कबूल करत नाहीयेत?)

प्रग्यान वाहन चंद्रावर ३२८ फूट चाललं. सहा चाकांच्या प्रग्यानचा वेग दर सेकंदाला १ सेमी इतका होता. वाटेत खळगे होते. ते प्रग्याननं पार केले. खळगे फार खोल नव्हते. परंतू सामान्य खळगेही पार करता येतात हा अनुभव वैज्ञानिकांना उपयोगी ठरणार आहे.

प्रग्यानचे प्रोब जमीनीत १० सेमी खोलीपर्यंत पोचू शकले. त्या वेळी हवेचं तापमान ६० अंश सेल्शियस होतं आणि जमीनीच्या खाली ते -१० अंश सेल्शियस होतं. वैज्ञानिकांनी यातून काढलेला अर्थ असा की चंद्राची जमीन चांगली इन्शुलेटर आहे. वसतीला ही स्थिती उपकारक आहे.

जमीनीच्या पृष्ठभागावर विक्रमला ॲल्युमिनियम, कॅल्शियम, आयरन, क्रोमियम, टिटॅनियम, मँगेनीज, सिलिकॉन ही द्रव्यं सापडली. ऑक्सिजन आणि सल्फर ही दोन द्रव्यं सापडणं वैज्ञानिकांना महत्वाचं वाटतं. ऑक्सिजन जगायला उपयोगी पडेल आणि सल्फरमुळं शेती शक्य होईल. बर्फाच्या  रुपातलं पाणीही सापडलं. सल्फर चंद्रावर आहे याची कल्पना १९७० च्या दशकात वैज्ञानिकांना आली होती पण ते सल्फर स्फटिकाच्या रुपात अडकलेलं असेल असं वाटत होतं. ते मोकळ्या रुपात आहे हे प्रथम समजलं.

सल्फर ज्वालामुखीतून बाहेर येतं. यावरून चंद्राची घडण कशी झाली, आज चंद्र आतून कसा आहे हे कळायला मदत होणार आहे.

विक्रमनं काही कंपनांची नोंद केली. ही कंपनं चंद्रकंपाची आहेत की दुसऱ्या कशाची आहेत याचा अभ्यास आता वैज्ञानिक करत आहेत.

चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार ४४० किमी अंतरावर आहे. चांद्रयानाला चंद्रावर पोचायला ४० दिवस लागले. इसरोतली १६ हजार माणसं हा खटाटोप करत होती आणि यासाठी ६०० कोटी रुपये खर्च झाला.

चांद्रयानाची निर्मिती व एकूण मोहिमेला लागणारं तंत्रयंत्रज्ञान बहुतांशी भारतात तयार झालं आहे. भारतात अवकाश मोहिमेसाठी आवश्यक उद्योग उभे रहात आहेत. सध्या हा उद्योग किती मोठा आहे ते माहीत नाही पण २०४० पर्यंत तो ४० अब्ज डॉलरचा होईल असा अंदाज आहे. चांद्रयान मोहीम भारत सरकार चालवते, त्यातून अवकाश उद्योग हे क्षेत्रं विकसित होत आहे.

भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेतून जे काही पैसे उपलब्ध होतील त्यावर अवकाश मोहिमेची आखणी होते. चांद्रयानाला चंद्रावर पोचायला ४० दिवस लागले, हा वेळ कमी होऊ शकतो. जेवढा वेळ कमी लागेल तेवढे पैसेही कमी खर्च होतील. पण त्यासाठी चांद्रयानाचं वजन, त्यातली ऊर्जा कार्यक्षमता, यानासाठी वापरलेले धातू व यंत्रं यावर खर्च वाढला असता, वाढेल. 

सध्याच्या चांद्रयानातली उर्जा पॅनेल मर्यादित क्षमतेची आहेत. ती अधिक क्षमतेची असती तर चांद्ररात्र झाल्यानंतर ती झोपली नसती, ती अधिक काळ जागी ठेवता आली असती आणि अधिक काळ काम करू शकली असती. हे साधायचं म्हणजे यानाचं वजन वाढतं, ऊर्जा जास्त लागते वगैरे. म्हणजे खर्चाचं काम. आर्थिक मर्यादांमधेच आखणी केल्यामुळं या गोष्टी राहून गेल्या.

या मोहिमेतून खूप नवी माहिती आपल्याला आणि जगाला मिळणार आहे. भारतातल्या वैज्ञानिकांची क्षमता आणि ज्ञान  वाढायला मदत होईल. अर्थात हे सारं भारताच्या एकूण व्यापक अर्थव्यवस्थेच्या, एकूण सामाजिक व आर्थिक स्थितीच्या चौकटीतच घडणार आहे. भारतीय समाजाच्या इतर दूरगामी आणि तातडीच्या गरजा यांच्याशी तोल साधतच अवकाश क्षेत्राचा विकास करावा लागणार आहे.

।।

Comments are closed.