पुस्तक वेस्ट बँकमधलं वास्तव

पुस्तक वेस्ट बँकमधलं वास्तव

A DAY

IN THE LIFE OF ABED SALAMA

NATHAN THRALL

Metropolitan Books

Pages 272

||

गाझातल्या हमासनं इसरायलवर हल्ला केला. खूप इसरायली मारले. चवताळलेल्या इसरायलनं गाझावर हल्ला केला. खूप पॅलेस्टिनी मारले. 

पॅलेस्टिनी आणि इसरायल यांच्यातलं भांडण १९४८ पासून सुरु होतं. पॅलेस्टाईन या विभागात इसरायल हा देश स्थापन झाला, जगभरातले ज्यू तिथं आले. ही स्थापना सामोपचारानं घडली नाही. इसरायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात वितुष्ट निर्माण झालं.

१९४८ पासून ते थेट २०२३ पर्यंत इसरायली लोकांनी स्थानिक पॅलेस्टिनींना बेघर करत जमीन बळकावली. आज ८५ टक्के जमीन इसरायलनं बळकावली आहे. पॅलेस्टिनीनी प्रतिकार केला. १९६० साली नकाबा झाला. १९८५ मधे आणि २००० साली इंतिफादा झाला. १९९३ साली ऑस्लो करार झाला, १९९५ साली ऑस्लो कराराचा दुसरा अध्याय झाला. वितुष्ट संपलं नाही. इसरायलचा विस्तार संपला नाही. हिंसक वितुष्ट अजूनही शिल्लक आहे.

या घटना आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, पॅलेस्टाईन या देशांचे नेते आणि कराराची कलमं वाचण्यात येतात. हे सारं अगदी वरच्या राजकीय पातळीवर घडत असतं. पण जमिनीवर काय घडत असतं ते आपल्याला माहित नसतं.

नेथन थ्रेल या पत्रकारानं प्रस्तुत पुस्तकात २०१२ साली जेरुसलमेच्या पूर्वभागात म्हणजे वेस्ट बँक या विभागात

घडलेल्या एका अपघाताचा वृत्तांत हे निमित्त साधून पॅलेस्टिनी समाज आणि इसरायली ज्यू समाज यातील संबंधांचं जिवंत चित्रण घडवलं आहे.

दाहियाते सलाम या वस्तीतून (नेबरहुड) एक स्कूल बस मुलांना घेऊन सहलीसाठी निघाली. प्रचंड पाऊस होता. दहाबारा फुटापलिकडचं काही दिसत नव्हतं. रस्ता अत्यंत चिंचोळा होता, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत ते कळत नव्हतं. समोरून १८ चाकांचा तीस टनी ट्रक आला, बसवर आदळला. बस फेकली गेली, बसला आग लागली. आगीत शिक्षिका आणि मुलं जळून मेली.

मेलेल्या मुलांत अबेद सलामचा मुलगा मिलाद होता. पुस्तकात अबेद, त्याचं कुटुंब, त्याचा पूर्ण कुनबा याचा इतिहास लेखक मांडतो.

अपघाताच्या ठिकाणी अनपेक्षीरीत्या पोचलेली डॉक्टर हुदा दाहबुर. तिची कहाणी.

अपघाताला कारण असलेली २५ फूट उंचीची भिंत बांधणारा डॅनी तिरझा हा ज्यू आणि त्याच्या दोन पिढ्या लेखक रंगवतो.

प्रेतांची विल्हेवाट लावणाऱ्या झाक या संघटनेचा डुबी वेस्सेनस्टर्न आपल्याला पुस्तकात भेटतो.

इसरायली सुरक्षा व्यवस्थेतला सार आणि पॅलेस्टिनी पोलिसांमधला इब्राहीम आपल्याला पुस्तकात भेटतो.

बसचा ड्रायव्हर, ट्रकचा ड्रायव्हर आपल्याला भेटतात.

सुमारे पन्नास माणसं, त्यांची कुटुंबं;  त्यांचा १९१० च्या सुमाराला सुरु होणारा इतिहास लेखक आपल्यासमोर ठेवतो.

ही माणसं, त्यांच्यातले आपसातले हेवेदावे, त्यांच्या विशाल कुटुंबांची घडणं, त्यांची लग्न आणि काडीमोड, त्यांची मुलं, त्यांची गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार आणि राजकारण. शे सव्वाशे वर्षाचा काळाचा पट आणि त्यावरची माणसं कादंबरी सारखी पुस्तकात सापडतात,

अबेदचे पणजोबा या गावातले. इसरायल स्थापन होण्याच्या आधी दहा एक वर्षं ज्यूंनी त्यांना हाकललं. म्हणजे गावातच राहिले पण गावातच त्यांना या ठिकाणहून त्या ठिकाणी घालवण्यात आलं. त्यांची जमीन जप्त केली. त्यांची घरं पाडली. असं करत करत अबेद आता प्रस्तुत गावात आहे. हाकललेले लोक दाटीवाटीनं या वस्तीत रहातात. या वस्तीच्या भोवती एक भिंत बांधलीय. मधे एक रस्ता. त्या पलिकडं प्रचंड भिंत, त्या भिंतीपलीकडं इसरायली सेटलर्सनी वसवलेलं गाव.

अबेदला गावाच्या बाहेर जायचं तर इसरायली लष्कराची परवानगी लागते.घरचं कोणी आजारी पडलं तर अबेद रोग्याला जेरूसलेममधल्या अद्यावत हॉस्पीटलमधे नेऊ शकत नाही. अबेद जेरूसलेममधे प्रवेशच करू शकत नाही. तो रामाल्या या पॅलेस्टिनी गावातल्याच हॉस्पीटलमधे जाऊ शकतो. तेच शाळेबाबत, तेच प्रत्येक बाबतीत.

पलीकडल्या जेरुसलेममधे घरांमधे स्विमिंग पूल आहेत. दाहियाते सलाममधल्या लोकांना दुरवरच्या एका झऱ्यावर जाऊन पाणी भरावं लागतं. तेही वाटेतल्या लष्करी चेकनाक्यावरच्या सैनिकांची परवानगी घेऊन.

जेरूसलेमच्या पूर्वेला, पूर्वजेरूसलेमच्या आसपास पॅलेस्टिनी वस्त्या, गावं आहेत. दर वर्षी लष्कर या वस्त्यातल्या माणसांना हाकलून देतं. त्या जागी ज्यूंची वस्ती उभारतं. ज्यू वस्तीला प्रचंड भिंत असते, लष्करी चौक्या असतात. 

पॅलेस्टिनी गावातली माणसं वैतागतात. कोर्टात जातात, पेपरात लिहितात, टीव्हीवर कहाण्या सांगतात. उपयोग होत नाही. मग दगडफेक करतात, बाटलीत पेट्रोल भरून केलेले गावठी बाँब इसरायली लष्करी गाड्यांवर फेकतात. इसरायलचे सैनिक वस्तीत घुसतात, गोळीबार करतात. मग वस्तीतली कोणी तरी बाई, कोणी तरी तरूण, संधी साधून जेरूसलेम किंवा हैफात पोचतो, अंगावर बाँब घेऊन इसरायली माणसांसह मरतो.

पुस्तकात अशा कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतात.

हुदा मुळातली हैफा या शहरातली. १९४७ साली तिचं कुटुंब बेघर झालं, लेबनॉनमधे गेले. तिथून ते सीरियात गेलं. सीरियातल्या निर्वासित छावणीत हुदा वाढली, तिथून दमास्कसच्या मेडिकल कॉलेजात जाऊन डॉक्टर झाली. तिथून ती ट्युनिशियात गेली. तिथून पुढलं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात गेली. तिथून ती रोमानियात गेली. तिथून आपल्या देशाच्या आणि पूर्वजांच्या ओढीनं पॅलेस्टाईनमधे युएनच्या नोकरीत दाखल झाली. तिचा हा सर्व प्रवास अराफत, पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी, पॅलेस्टाईनमधल्या लढाया, ऑस्लो करार इत्यादीसह झाला. पॅलेस्टाईनमधे परतल्यावर परिस्थिती बिकट झाली होती. 

इसरायलनं पॅलेस्टिनी लोकांनी ग्रीन कार्ड, भगवं कार्ड, ब्ल्यू कार्ड देऊन त्यांची विभागणी केली होती. हुदासारखे वरिष्ठ वर्गातले लोक ब्ल्यू कार्डवाले होते, त्यांना जेरुसलेममधे मुक्तपणानं ये जा करता येत असे. बाकीच्यांनी आपल्या वस्तीच्या बाहेर पडायचं नाही.

खुद्द हुदाच्या मुलांनाही शिक्षणाचा त्रास सहन करावा लागला. चांगल्या शाळा जेरुसलेममधे. तिथं पॅलेस्टिनीना प्रवेश नाही. पॅलेस्टिनी प्रदेशातल्या शाळा वाईट आणि भ्रष्टाचारनं व्यापलेल्या. मुलं हताश-निराशाग्रस्त-व्यसनी झाली. हुदाचा एक मुलगा अनेक वेळा इसरायली पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडला.

एकूण स्थिती अशी की फक्त भ्रष्ट आणि इसरायल सरकारच्या मेहेरबानीवर जगणारे सोडले तर प्रत्येक पॅलेस्टिनी वंचित होता, इसरायलविरोधी होती, संधी मिळेल तेव्हां जमेल त्या रीतीनं इसरायलशी सामना करणारा होता.

पुस्तकाची एक पत्रकारी-साहित्यिक शैली आहे. एकाद दोन नावं सोडली तर माणसांची नावंही त्यांनी बदललेली नाहीत. २०१२ साली घडलेली घटना हा गाभा आणि  त्या घटनेशी संबंध आलेल्या माणसांच्या कहाण्या अशी पुस्तकाची रचना आहे. घटना आणि माणसं मुळातच नाट्यमय आणि थरारक आहेत. नाट्य आणि थरार कोरडेपणानं लेखकानं पुस्तकात मांडला आहे, भावना चिकटवून अधिक नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न लेखकानं केलेला नाही.

पॅलेस्टाईनमधल्या माणसांभोवती पुस्तक फिरत असल्यानं त्यांची बाजू पुस्तकात येते. इसरायलची बाजू काय आहे, ज्यू लोक कसे आहेत आणि जसेकसे आहेत तसे ते कां झाले ही बाजू पुस्तकात नाही. त्या अर्थानं पुस्तक एकतरफी आहे.

पॅलेस्टिनी समाज समजायला या पुस्तकानं मदत होते.

लेखक पत्रकार आहेत. २०१० पासून जेरुसलेममधे मुक्काम ठोकून आहेत. इसरायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातले संबंध हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. न्यू यॉर्क टाईम्स, गार्डियन, लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स, न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स या पेपरात ते लिहीत असतात.

।।

Comments are closed.