रविवारचा लेख. पॅलेस्टिनी लोकांनी हा आत्मघातकी मार्ग कां पत्करला

रविवारचा लेख. पॅलेस्टिनी लोकांनी हा आत्मघातकी मार्ग कां पत्करला

सात ऑक्टोबरला गाझा पट्टीतून पाचेक हजार रॉकेटं निघाली आणि इसरायलमधे कोसळली. काही शेकडा पॅलेस्टिनी कमांडो पारंपरीक (अत्याधुनिक नसलेल्या) बंदुका घेऊन इस्रायलमधे घुसले. ते आल्यावर स्थानिक पोलीस आणि सैनिक जीव घेऊन पळत सुटले, लढले नाहीत. काही डझन सैनिक आणि इस्रायली नागरिकांना या कमांडोनी ओलिस ठेवलं. हँडग्रेनेड आणि आयईडी  ओलिसांच्या अंगावर लावलेले होते, याद राखा, कारवाई केली तर तुमची माणसं उडवून देऊ.

असं काही घडेल याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. 

इसरायलची मोसाद आणि शिन बेट ही इंटेलिजन्स यंत्रणा जगातली सर्वात कार्यक्षम आणि जय्यत मानली जाते. तिला या महाकाय घटनेचा पत्ता लागला नाही.

 माणसांच्या, वाहनांच्या, विमानांच्या, तोफगोळ्यांच्या हालचाली वेळीच लक्षात घेऊन रोखण्याची यंत्रणा इसरायलजवळ आहे. सॅटेलाईट, कॅमेरे, काय न् काय. ही यंत्रणा रॉकेटं रोखू शकली नाही, कमांडोना रोखू शकली नाही.

हादरलेल्या इसरायलनं दणादण गाझावर रॉकेटं सोडायला सुरवात केली. चोविस तासाच्या हिशोबानुसार सुमारे २०० इसरायली आणि सुमारे २५० पॅलेस्टिनी मारले गेले. आजवर माणसं मारण्याचा हिशोब  वेगळा होता. कारवाईत पन्नास पॅलेस्टिनी मेले तर फार तर पाच सात इसरायली मरत. आता मेलेल्यांची संख्या सारखीच झाल्यागत झालं.

इसरायल आता त्यांच्या जवळची सर्व संहारक शक्ती वापरून पॅलेस्टिन चिरडण्याचा प्रयत्न करेल.

चकीत झालेलं जग विचारतंय की पॅलेस्टिनजवळ इतकी शक्ती, इतकी रॉकेटं कुठून गोळा झाली? त्यांना कोणाचा पाठिंबा आहे. हेझबुल्ला, इराण यांचा पाठिंबा तर उघडच आहे.

साऱ्या जगानं इसरायलला सहानुभूती व्यक्त केली, पॅलेस्टीनचा निषेध केला.अमेरिका इसरायलला चुचकारतेय पण जरा दमानं घ्या, वाटाघाटी करा असं सुचवतेय. नेतान्याहू तयार दिसत नाहीयेत. ते चवताळले आहेत.अरब देशांनी पॅलेस्टाईनचा निषेध केला असला तरी त्यांच्या पत्रकांत इसरायलनं गेल्या सहा महिने ते तीन चार वर्षाच्या काळात केलेल्या वर्तनाबद्दल तक्रार आहे. 

 इसरायलला चिकटून असलेल्या लेबनॉन, सीरियात काय चाललंय ते अजून कळलेलं नाही. तिथं इराण आणि रशिया दबा धरून आहेत, त्यांची विमानं आणि शस्त्रं तिथं आहेत. त्यांचे काय उद्योग चालले आहेत या बाबतही कदाचित इसरायल, अमेरिकेची इंटेलिजन्स यंत्रणा अनभिज्ञ असेल. इसरायल पॅलेस्टीन संघर्षातला हा घटक अजून शांत आहे. सौदी अरेबिया, इजिप्त इत्यादी देशांतही चलबिचल आहे.

भडका उडालाय. इसरायल आता तुटून पडेल.इसरायल आणि पॅलेस्टीनला शांत करून  वाटाघाटींना बसवण्याचा प्रयत्नही सुरु होईल. पण यात गुंतलेले इतर देश पहाता हे युद्ध फार काळ चालेल असं वाटत नाही. ते थांबवावंच लागेल, नाही तर महायुद्ध घडेल.

दोन मुद्दे उरतात.

इसरायलच्या लष्करी ताकदीच्या तुलनेत आपण अगदीच लल्लू पंजू आहोत हे माहित असूनही, इसरायल भडकलं तर आपली राखरांगोळी करेल हे समजत असूनही, पॅलेस्टाईननं हे पाऊल कां उचललं?

दुसरा मुद्दा. इसरायलची अमेरिकेनं उभारून दिलेली सुरक्षा यंत्रणा फेल कां झाली?

एका घटनेची आठवण होते.

२०११ साली ट्युनिशियात तरुणांनी उठाव केला. हा उठाव इजिप्त, सीरिया इत्यादी अरब देशात पसरला. तिथली सरकारं उलथली गेली. या घटनाचक्राला अरब स्प्रिंग म्हणतात. या घटनेचा तसूभरही पत्ता अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला लागला नाही. ओबामा अध्यक्ष होते. त्यांनी यंत्रणेला फैलावर घेतलं. गवताच्या गंजीतली टाचणीही शोधणारे तुम्ही लोक, तुम्हाला हे कळलं कसं नाही, तुम्ही हे मला सांगितलं कसं नाही? ओबामानी विचारलं. अमेरिकेला राग यायचं कारण इजिप्त हे त्यांच्या ताटाखालचं राष्ट्र कोसळू पहात होतं.

अरब प्रदेशातली माणसं टेकीला आली होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आणि भ्रष्ट राज्यकर्ते लोकांना राक्षसी उपाय वापरून दडपत होते. लोकांची कमालाची कोंडी झाली होती. ही कोंडी ना अरब राज्यकर्त्यांना समजली ना अमेरिकेला. कारण राज्यकर्ते सत्तेत आंधळे झालेले होते, त्यांना माज आला होता, आपण काहीही करू शकतो असा विश्वास त्यांना वाटत होता. टेकीला आलेली माणसं काहीही करू शकतात हे त्यांना माहित नव्हतं.

बलाढ्य इजिप्शियन सरकार विकलांग झालं, कोसळलं.

तेच पॅलेस्टिनमधे घडलं.

गाझा आणि  वेस्ट बँकमधले पॅलेस्टिनी टेकीला आले होते. इसरायलनं त्यांना वेढा घातला होता. त्यांना लग्न करायचं असेल, एकादी मिरवणुक काढायची असेल, साध नाचायचं असेल तरी इसरायलच्या लष्कराची परवानगी लागे. एका गावातून दुसऱ्या गावात जायचं असेल; वेस्ट बँकमधून गाझात जायचं असेल तर गावाला वेढा घालून बसलेल्या इसरायलच्या सैनिकाची परवानगी मागावी लागे.

वेस्ट बँकमधे पॅलेस्टिनी गाव इसरायलचं सैन्य बळकावे. तिथं इसरायलची वस्ती केली जात असे. सर्व कायदे धुडकावून हा उद्योग होत असे. तयार झालेल्या इसरायलच्या वस्तीत तलावात पोहण्यासाठी पाणी असे आणि घालवून दिलेल्या पॅलेस्टिनी गावात प्यायला पाणी नसे.

दोन देश करा असं जग सांगत असताना इसरायल जागतीक लोकमत आणि ठराव धुडकावून पॅलेस्टिनींना कुटत होतं. पॅलेस्टिनी एकटे पडले होते. त्यांचे अरब दोस्त अमेरिकेच्या गटात गेले होते. ब्रदरहूड आणि हमास या अतिरेकी दहशतवाद्यांना या स्थितीत मुळं फुटली, या  संघटना वाढल्या. चर्चा, एकमेकाला समजून घेणं, प्रत्येकानं आपापले गुणदोष समजून घेण या गोष्टी  संपल्या. दोन्ही बाजूना हाणामारी येवढंच करणं बाकी राहिलं.

इसरायल आणि पॅलेस्टीन, दोन्ही देशांत अतिरेकी व माथेफिरू माणसंच नेतृत्वात पोचली.

या कोंडीतून पॅलेस्टिनी लोकांमधे एक घुसमट धुमसत होती.

गेल्याच आठवड्यात कतारमधे हमासच्या लोकांना एकत्र आणून कतारी मुत्सद्दी   सांगत होते की तुम्ही जरा दमानं घ्या, अतिरेकी उद्योग करू नका.

गेल्याच आठवड्यात नेतान्याहूना बायडन यांनी सांगितलं होतं की पॅलेस्टिनीना काही तरी सवलती द्या, त्यांच्या सुखासाठी काही तरी करा. 

या दोन घटना एकाच वेळी गेल्या आठवड्यात घडत होत्या. अमेरिकेत आणि कतारमधे. डिप्लोमॅट त्यात गुंतलेले होते.

सॅटेलाईट असो; गल्लीचा कोपरा असो; चहाची टपरी असो; भाजी मंडई असो; तिथल्या कॅमेऱ्यांना फक्त माणसं दिसत होती. पण या माणसांच्या मनात काय आहे हे दिसत नव्हतं. 

कतारमधे कतारी आणि हमासचे लोक भेटून काय बोलतात हे कॅमेऱ्यांना कळत नव्हतं.

शिवाय प्रचंड माज होता. 

करू दे त्यांना काहीही. आम्ही चेचून काढू. असा  विश्वास होता.

घुसमट होती. 

काय व्हायचं ते होऊ दे. पण प्रत्युत्तर द्यायचं असं पॅलेस्टिनींनी ठरवलं. 

सहा ते बारा महिने तयारी केली. ही तयारी मनाची होती. 

कॅमेऱ्यांना आणि कंप्यूटरला ती दिसली नाही.

बस.

।।

Comments are closed.