ओपनहायमरची क्षमा कधी मागणार?

 ओपनहायमरची क्षमा कधी मागणार?

  ओपनहायमर  चित्रपट जगभर सिनेमाघरात प्रदर्शीत झाला. लक्षावधी लोकांनी तो लगोलग पाहिला. 

जे रॉबर्ट ओपनहायमर १९०४ साली न्यू यॉर्कमधे सधन घरात जन्मले, ते जन्मानं ज्यू होते. त्यांनी सुरवातीला केमेस्ट्री या विषयाचं  शिक्षण हार्वर्डमधे घेतलं. पण तो विषय त्यांचा नव्हताच. केंब्रीज आणि नंतर गॉटिंजनमधे त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स या फीजिक्सच्या ज्ञानशाखेतलं शिक्षण घेतलं. १९३६ साली ते बर्कले युनिव्हर्सिटीत पदार्थविज्ञान शाखेचे प्रोफेसर झाले. पदार्थविज्ञानातले ऊच्च कोटीचे अभ्यासक आणि प्राध्यापक असा त्यांचा नावलौकिक होता.

ओपन हायमर शाळेत गेले, कॉलेजात गेले,पीएचडी झाले, बर्कलेत प्राध्यापक झाले. हा काळ साधारणपणे १९२० ते १९३६.  जर्मनी पहिल्या महायुद्धात हरली होती; त्या पराजयाचं भांडवल करून हिटलरचा उदय झाला होता. व्यथित झालेल्या जर्मनीला हिटलरनं पटवलं की नालायक ज्यू जमात, कम्युनिष्ट, लोकशाहीवादी विचार यांच्यामुळं जर्मनीच्या नशीबी दुःख आलं.हिटलरनं जर्मनीचं आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं, जर्मन राष्ट्रवाद मांडला, ज्यूंचं हत्याकांड केलं आणि दुसऱ्या महायुद्धाची तयारी केली.

या काळातल्या अमेरिकेतल्या दोन प्रमुख घटना म्हणजे लाखो ज्यूंचं अमेरिकेत स्थलांतर आणि मंदी.मंदीच्या काळात बेकारी वाढली, सर्वसामान्य अमेरिकन भरडून निघाले. अमेरिकन श्रमीक कम्युनिष्ट-समाजवादी विचारांनी प्रभावित होऊन संप करू लागले. मालक, पेपरवाले या संपांच्या आणि आंदोलनांच्या विरोधात होते. हिटलरही कम्युनिष्ट-समाजवाद्यांच्या विरोधात असल्यानं अमेरिकन पेपरवाले आणि श्रीमंत लोक हिटलरच्या प्रेमात पडले.पेपरांनी कम्युनिष्ट म्हणजे देशद्रोही, कम्युनिष्टांना रशियातून आज्ञा येतात असं पसरवलं. 

ओपनहायमर यांचा वेळ वर्गात, युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात आणि प्रयोगशाळांत खर्च होत होता. ते ज्या बुद्धीवंतांच्या वातावरणात वावरत तिथं हिटलरप्रेम मंजूर नव्हतं. हिटलरचा फॅसिझम त्यांना मान्य नव्हता. या वातावरणाचा प्रभाव ओपनहायमर यांच्यावर होता. ओपनहायमर यांची पहिली पत्नी कम्युनिष्ट होती. पण ओपनहायमर कम्युनिष्ट नव्हते, ते पक्षाचे सदस्य झाले नव्हते, पक्षाच्या कार्यक्रमात ते भाग घेत नव्हते. हिटलवरचा राग येवढंच त्यांच्या कम्युनिष्ट वातावरणात वावरण्याचं मुख्य कारण होतं. अमेरिकेतल्या बुद्धीजीवी वर्गात, विद्वानांत ज्यू माणसं फार होती, आईनस्टीनही ज्यू होते. त्यामुळं हिटलरवरचा राग समजण्यासारखा आहे.  

 याच काळात घडलेले ओपनहायमर  १९४२ साली  लॉस अलमॉसमधे ॲटम बाँब तयार करण्याच्या मॅनहॅटन प्रकल्पात सामील झाले, त्या प्रकल्पाचे संचालक झाले. यथावकाश १९४५मधे ॲटम बाँबची चाचणी झाली.  

 अणुस्फोटाची ताकद काय होती ते  ओपनहायमर जाणत होतेच. पण ज्ञान असणं वेगळं आणि त्याचा परिणाम पहाणं वेगळं.हिरोशिमा आणि नागासाकी उध्वस्थ झाल्यावर ओपनहायमर हादरले. आपलं दुःख ते उघडपणे बोलू लागले. अमेरिकेला युद्धाची आणि विनाशाची चटक लागली होती, आता अमेरिकेला सूपर बाँब तयार करायचा होता. ओपनहायमरनी सूपर बाँबच्या प्रकल्पात सामिल व्हायला नकार दिला.

इथे अमेरिकेचा पापड वाकडा झाला. प्रचंड मनुष्यहानीबद्दल दुःख होणं आणि बाँब शर्यत होता कामा नये असं ओपनहायमरसारख्या वैज्ञानिकांनी म्हणणं युद्धखोर अमेरिकन राजकीय एस्टाब्लिशमेंटला झोंबलं.

अमेरिकेनं ओपनहायमर यांची चौकशी आरंभली. अत्यंत घृणास्पद प्रकारे त्यांच्यावर दबाव आणला, त्यांना बदनाम केलं. अमेरिकेतल्या अणुसंशोधनातून त्यांना हाकललं.  

अमेरिकेनं ओपन हायमरना कसं वागवलं हा ओपनहायमर या चित्रपटाचा गाभा आहे. ओपनहायमर यांना काय सोसावं लागलं असेल याची कल्पना चित्रपट पहाताना येते.

अणु संशोधनातून हाकलल्यापासून म्हणजे १९५४ पासून १९६७ साली मरेपर्यंत ओपनहायमर अत्यंत हताश, मोडलेल्या मानसिक अवस्थेत जगले, फार त्रास सहन केला. फार धुम्रपान हे त्यांच्या कॅन्सरचं कारण असलं तरी सहन करावे लागलेले देशद्रोहाचे आरोप आणि अवहेलना यांनी त्यांचा रोग बळावला असं म्हणता येईल.

ओपनहायमर यांच्यावर आपण अन्याय केला हे अमेरिकेनं अधिकृतरीत्या मान्य करावं, त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांचा अधिकृत गौरव करावा अशी मोहीम त्यांचे चरित्र लेखक मार्टिन शेरविन आणि के बर्ड यांनी हाती घेतली. दोघांनी लिहिलेलं American Prometheus: The Triumph and Tragedy of J Robert Oppenheimer हे चरित्र २००५ साली प्रसिद्ध झालं. चित्रपट या पुस्तकाचंच रुपांतर आहे

राजकारण विचित्र असतं. लोकसभा सदस्यांना निवडून येण्याची चिंता असते, त्यांना तत्व वगैरे गोष्टी कळत नसतात. एका लिबरल माणसाची क्षमा मागितली तर अजूनही कम्युनिझम-समाजवाद ही शिवी मानणारे आपले मतदार खवळतील अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळं काँग्रेस, सेनेटर उत्साही नसतात. उपाय एकच. अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात ओपनहायमरची क्षमा मागायची.

लेखक जोडीनं अध्यक्ष बुश यांच्याकडं आग्रह धरला की अमेरिकेनं ओपनहायमर यांची क्षमा मागावी.

एका मरून गेलेल्या माणसाला अणुप्रकल्पातून हाकलण्याचा निर्णय मागं घेऊन काय उपयोग?  मेलेला माणूस पुन्हा अणु प्रकल्पात येऊ शकणार नव्हता असं मत प्रेसिडेंटच्या कायदा सल्लागारांनी दिलं. पण तो केवळ तांत्रीक भाग होता. रिपब्लिकन पक्षामधे कम्युनिष्टविरोध, डावेपणाला विरोध, मुरलेला आहे हे मुख्य कारण असावं.

बुश गेल्यानंतर ओबामा हे डेमॉक्रॅट अध्यक्ष झाल्यावर क्षमा मागण्याची विनंती त्याना करण्यात आली. त्यांनीही दाद दिली नाही. लेखकजोडी ऊर्जा खात्याला (अणु हा त्यांच्या अखत्यारीतला विषय) समजावत राहिली. सेनेटर आणि काँग्रेसमनना गाठून  क्षमाप्रार्थनेच्या पत्रावर त्यांच्या सह्या घेण्याची मोहीम लेखकांनी सुरु केली. कोणी दाद दिली नाही. ट्रंप अध्यक्ष झाल्यावर तर प्रश्नच नव्हता. ट्रंप तर कट्टर समाजवाद विरोधक. लेखकांनी पाठपुरावा सुरु ठेवला.  जो बायडन अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या मोहिमेला जोर आला. अनेक सेनेटर निवेदनावर सह्या करायला तयार झाले.

लेखक जोडीपैकी मार्टिन शेरविन वारले पण के बर्ड यांनी चिकाटी सोडली नाही.जो बायडन प्रेसिडेंट झाल्यावर त्यांनी श्रीम ग्रॅनहोम यांना ऊर्जा मंत्री म्हणून नेमलं. सेनेटर्सच्या गोळा झालेल्या सह्या घेऊन बर्ड त्यांच्याकडं पोचले. त्यांना बर्ड यांचं म्हणणं पटलं. त्यांनी जाहीरपणे मंत्री म्हणून अमेरिकेची चूक झाली, अमेरिकेनं ओपनहायमर यांच्यावर अन्याय झाला असं २०२२ साली मान्य केलं. 

प्रेसिडेंटशी बोलल्याशिवाय मंत्री अशी घोषणा करणं शक्य नाही. त्यामुळं आता शेवटली पायरी शिल्लक आहे. बायडन ओपनहायमरची क्षमा मागतील असं दिसतंय. 

कंप्यूटरला जन्म देणाऱ्या ॲलन टुरिंग या ब्रिटीश गणितीनं ब्रिटीश सरकारनं केलेल्या छळाला कंटाळून १९५४ साली आत्महत्या केली होती. ब्रीटन हिटलरची विमानं आणि रॉकेटं हेरून पाडू शकला याचं कारण टुरिंगनी सिद्ध केलेली टेहळणी व्यवस्था. ब्रीटनला वाचवणारा हा गणिती समलिंगी होता. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे असं ख्रिस्ती लोकांना वाटत होतं, आजही वाटतं. म्हणूनच समलिंगी असणं हा कायद्यानं गुन्हा ठरवण्यात आला होता. ब्रिटीश सरकारनं नाना घातक औषधं देऊन टुरिंगला ‘बरं करण्याचा’ प्रयत्न केला होता, फार छळ केला. कंटाळून टुरिंगनं आत्महत्या केली होती. 

२०१३ साली राणी एलिझाबेथनी टुरिंगची क्षमा मागितली. आपल्या सरकारनं चूक केली हे मान्य केलं.

जो बायडन केव्हां ओपनहायमरची क्षमा मागताहेत ते पहायचं.

।।

Comments are closed.