पुस्तक. हिटलरपुढं शरणागतीचं अवघड फ्रेंच दुखणं

पुस्तक. हिटलरपुढं शरणागतीचं अवघड फ्रेंच दुखणं

देशांच्या, समाजांच्या काही खाचा अवघड असतात ज्यात पडायला देश तयार होत नाही. कारण त्या खाचेतल्या अंधारात खोलवर गेलं तर देशाचं लाज वाटावं असं वागणं प्रकाशमान होतं.

 २३ जुलै १९४५ ची दुपार.

मरणाच्या उकाड्यात पॅरिसमधल्या हाय कोर्टात मार्शल पेतां यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरु झाला. पेतां हे एकेकाळी फ्रान्सचे सरसेनानी होते, हीरो होते.

सामान्यपणे  आरोपीला पिंजऱ्यात उभं केलं जातं. या खटल्यात मात्र मार्शल पेतां यांना बसण्यासाठी मखमली उशीनं मढवलेलं सिंहासनासारखं आसन देण्यात आलं होतं. त्यांच्यासमोर मखमली उशीनं मढवलेलं एक टेबल ठेवण्यात आलं होतं. पेतां यांनी त्यांची टोपी काढून समोरच्या टेबलावर ठेवली होती.

आरोपपत्र वाचून दाखवलं गेलं तेव्हां पेतां डुलक्या घेत होते. एक तर उष्मा. त्यात पेतांचं वय. ८९. 

काहीसं वाहवत बडबड केल्यासारखं बोलत पेतां यांनी त्यांचा बचाव केला. ‘देशात एक प्रचंड आपत्ती निर्माण झाली होती. ती माझ्यामुळं निर्माण झाली नव्हती. तिच्यातून सुटका करण्यासाठी जनतेनं मला बोलावलं, मला विनंती केली. मी जनतेच्या इच्छेनुसार वागलो. यात माझी काहीही चूक नाही.’

 १९४० मधे हिटलरनं फ्रान्सवर हल्ला करून फ्रान्सचा पराजय केला. त्या वेळी पेतां यांनी फ्रान्सच्या वतीनं जर्मनीशी तह केला आणि शरणागती पत्करली, फ्रान्सची सूत्रं हिटलरच्या हातात सोपवली. तह आणि त्यानंतरचं सरकारचं सरकारचं-पेतांचं वागणं हा देशद्रोह होता असं खटल्याचं म्हणणं होतं.

१५ ऑगस्ट १९४५ ला ज्युरीनी १५ वि. १३ अशा बहुमतानं निकाल दिला. पेतां दोषी आहेत. त्यांना फाशी द्यावी. पण त्यांचं वय लक्षात घेता फाशी अमलात येऊ नये.

ब्रिटीश इतिहासकार  ज्युलियन जॅक्सन यानं या खटल्याचा कामकाजाचा तपशीलवार अभ्यास केला; पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास केला; पेतांच्या कारकीर्दीत काय काय घडलं याचा अभ्यास केला. या अभ्यासावर आधारित France on Trial: The Case of Marshal Pétain हे पुस्तक लिहिलं. 

पुस्तकाचं उपशीर्षक म्हणतं  १९४०-४४ मधील फ्रेंच अरिष्ट हे एका वृद्ध माणसाचं कर्तृत्व होतं की फ्रान्सचंच अपयश होतं हा प्रश्न अनुत्तरीत उरतो.

प्रस्तुत ४८० पानांच्या या पुस्तकात लेखक पेतां यांची कारकीर्द, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्यावरचे आरोप आणि त्यांचं समर्थन इत्यादींचा अभ्यास आणि विश्लेषण करतो.

लेखक विषयाचा तपशील मांडतो, तपशील आणि माहिती भरपूर, निष्कर्ष अगदी थोडक्यात मांडतो पण तेही प्रश्नचिन्हाच्या रुपानं. लेखक निर्णय वाचकांवर सोपवतो. 

 फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर जनरल डी गॉल लंडनमधे आश्रयाला गेले आणि तिथून त्यांनी जर्मनांशी मुकाबला करणाऱ्या भूमिगत फ्रेंचांना संघटित केलं. Simone Weil हा फ्रेंच तत्वज्ञ १९४२ साली फ्रान्समधून पळून गेला. फ्रेंच जनताच भ्याड आहे, तिच्या डांगीत हिंमत नाही असा आरोप सिमॉननं केला होता. पेतां हे भ्याड देशद्रोही आहेत असं दाखवणारी ही दोन उदाहरणं.

१९३९ च्या आसपास स्टालिन आणि हिटलर यांच्यात मैत्रीचा करार झाला होता. तेव्हां फ्रेंच कम्युनिष्टांना हिटलरची लढाई ही भांडवलशाहीविरोधातली लढाई वाटली होती, त्यांचा हिटलरला पाठिंबा होता. हे पेतां यांचं चुकलं नाही याचं उदाहरण.

लेखक ही दोन्ही उदाहरणं पुस्तकात नोंदतो.

आणखी एक. खटल्यात न्याय द्यायला बसलेले न्यायाधीश आणि ज्युरी, यातले बहुसंख्य पेतां यांचे समर्थक होते, पूर्वायुष्यात त्यांनी पेतां यांच्याशी इमानदारीच्या शपथा घेतल्या होत्या.  

उपशीर्षकामधे व्यक्त केलेली भावना लेखक अनेक उदाहरणांमधून सांगतो. पेतां यांनी तह केल्यानंतर रेडियोवरून फ्रेंच जनतेला उद्देशून भाषण केलं होतं. त्यात त्यांनी आपण फ्रान्सला त्रासातून वाचवण्यासाठी हा तह केला असं म्हटलं होतं. त्यांच्या या भाषणाला फ्रेंच जनतेनं भरघोस पाठिंबा दिला होता, या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं होतं हे लेखक नोंदवतो.

लेखकाचं म्हणणं आहे की पेतां यांचा निर्णय आणि १९४०-४४ या काळातलं त्यांचं वागणं हा फ्रेंच इतिहातला काळा काळ आहे. या काळेपणाची नेमकी कारणं सांगणं अवघड आहे,  तो परिभाषित करणं अवघड आहे. लेखक विचारतो की  पेतां यांनी शरणागती पत्करली यात देशद्रोह आहे की परिस्थिती वशात टिकून रहाण्याची रणनीती आहे? फ्रान्सचा काही भागच जर्मनीनं ताब्यात घेतला होता, फ्रेंच वसाहती फ्रेंचांच्याच ताब्यात होत्या, अल्जेरियात फ्रेंच राज्य होतं, तिथं फ्रेंच नौसेना आणि सैन्य शाबूत होतं. तिथं जाऊन पेतां यांना फ्रान्स देश नाही पण देशाचं प्रतिबिंब टिकवता आलं असतं. ते न जमणं हा रणनीतीतला पराभव मानायचा की देशद्रोह?  

पुस्तकाचा सारांश असा निघतो की फ्रेंच जनतेचं वर्तन गोंधळात टाकणारं असल्यानं फ्रान्सची शरणागती ही गोष्ट अंधुक रहाते.

लेखक या खटल्यानंतर अगदी आजच्या काळापर्यंत येतो. फ्रान्समधले ल पेन इत्यादी देशीवादी लोक अजूनही पेतां यांचं समर्थन करतांना दिसतात हे लेखक नोंदवतो.

थोडक्यात असं की पेतां यांची शरणागती योग्य होती की अयोग्य होती, ते वर्तन देशद्रोहाचं होतं की नाही, पेतां देशद्रोही होते की थोर देशभक्त होते हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत असं लेखकाचं म्हणणं आहे.

लेखकानं या आधी डी गॉल यांचं चरित्र लिहिलं आहे, फ्रेंच इतिहास हे लेखकाचं कुरण आहे.

प्रत्येक समाजात अशा अंधारखाचा असतात. प्रत्येक समाजाच्या इतिहासात काही घटना, काही कालखंड अवघड या सदरात मोडणारे असतात. त्या बद्दल बोलणं समाजाला अवघड जात असतं. 

अगदी सहजपणे आठवतो तो भारतातला फाळणीचा काळ. 

फाळणीतल्या घटना अत्यंत क्लेषकारक आहेत. फार माणसं मेली, मारली गेली. फाळणीला कोण जबाबदार होतं ही चर्चा अजुनही अनिर्णित राहिलेली आहे. ब्रिटीश की भारतीय? भारतातली फाळणीची जबाबदारी जाते गांधी-नेहरूंवर की जिना-सावरकरांवर? मुळात फाळणी झाली ते योग्यच झालं की अयोग्य झालं यावरही मतांतर आहे. फाळणी ही घटना इतकी गुंत्याची आहे आणि तिची मुळं काळात आणि समाजात इतकी खोलवर पसरलेली आहेत की ती घटना कधीही नीट पणे समजेल असं वाटत नाही.

पुस्तक फ्रेंच इतिहासातल्या अंधारखाचेत शिरलंय. अंधारखाचेतली जर्मन फ्रेंच तहाची घटना ही फ्रान्समधली एक दुखरी बाजू आहे. फ्रेंच माणसं तो विषय टाळायचं  म्हणतात. लेखक ब्रिटीश असल्यानं तटस्थपणे चौकशी करणं लेखकाला जमलंय.

France on Trial: The Case of Marshal Pétain

Julian Jackson

Allen Lane, pp. 445, £25

Comments are closed.