सिनेमा ट्रंबो या पटकथालेखकाची गळेचेपी

सिनेमा ट्रंबो या पटकथालेखकाची गळेचेपी

 डाल्टन  ट्रंबो ही २०१५ सालची पोलिटिकल अमेरिकन फिल्म.  

डाल्टन ट्रंबो (Trumbo) हा एक अमेरिकन पटकथालेखक होता. त्यानं ४० पटकथा लिहिल्या. काही ग्रेट होत्या. काही साधारण गल्लाभरू होत्या. कायम आनंदस्मरणात राहील अशी रोमन हॉलिडे ही फिल्म ट्रंबोनं लिहिली होती. दुसऱ्याच्या नावानं ती कथा लिहिली गेली आणि त्या दुसऱ्याच्याच नावानं तिला ऑस्कर मिळालं. कारण कम्युनिष्ट असल्याच्या आरोपावरून  सरकारनं त्याच्यावर चित्रपट लिहायला बंदी घातली होती. नंतर त्याच्या ब्रेव वन, स्पार्टाकस आणि एक्झोडस या पटकथांवरचे सिनेमे गाजले.

ट्रंबोवर बहिष्कार असताना कर्क डग्लस या त्या काळातल्या स्टारनं ट्रंबोला आपल्या चित्रपटाची कथा लिहायला सांगितलं. अमेरिकन सरकार आणि धनिक त्याच्यावर रागावले, त्याला धमक्या आल्या. त्यानं धमक्या जुमानल्या नाहीत. उघडपणे त्यानं चित्रपटाचा पटकथालेख ट्रंबो आहे अशी जाहिरात केली. डग्लससारखा मातबर माणूस ट्रंबोच्या बाजूनं मैदानात उतरल्यावर वातावरण बदललं.

ट्रंबोचा स्पार्टाकस हा  सिनेमा प्रेसिडेंट केनेडींनी पाहिला. जाहीरपणे पाहिला आणि त्याची स्तुतीही केली.

आता वातावरण बदललं. ट्रंबोचा ऑस्कर देऊन गौरव करण्यात आला. 

प्रस्तुत फिल्म त्याच्या आयुष्यातल्या संकटकाळातली आहे. 

१९३५ पासून अमेरिकेत कम्युनिझमवरचा राग, द्वेष उफाळून आला. मंदीचा काळ होता. बेकारी होती. कामगार संप करत. कम्युनिष्ट पार्टीचा उदय झाला. मालक मंडळींना ते सहन झालं नाही. कम्युनिष्ट लोक रशिया धार्जिणे असतात, त्यांना रशियातून हुकूम येतात असा प्रचार झाला. समाजाच्या कुठल्याही क्षेत्रात कम्युनिष्ट सापडला की त्याला वाळीत टाकायचं, देशद्रोहाच्या कायद्याखाली त्याला तुरुंगात पाठवायचं सत्र सुरु झालं.  कम्युनिष्ट  शोधून काढणारी एक कमीटीही संसदेनं केली होती. ती कमीटी शोधाशोध करून लोकांवर कम्युनिष्ट असल्याचे आरोप ठेऊन काँग्रेसमधे चौकशी करून त्यांना देशद्रोही ठरवलं. 

 सेन्सॉर बोर्डानं चित्रपटात कामगारांची बाजू येता कामा नये. चित्रपटात शोषण हा शब्द येता कामा नये अशा अटी घातल्या. तसं काहीही दाखवणारे कम्युनिष्ट ठरवून त्यांना शिक्षा होऊ लागल्या. त्यात भानगडीत ट्रोंबोला ११ महिन्याचा तुरुंगवास झाला. त्याला घर सोडावं लागलं. वस्तीतल्या लोकांनी त्याच्या घराच्या भिंतीवर देशद्रोही असे शब्द चितारले. बाहेर आल्यावरही त्याला लिहायला बंदी होती. टोपण नावानं तो लिहीत होता. बेकायदेशीर रीत्या लिहून घेताना त्याच्या कथा कवडीमोल झाल्या. जगण्यासाठी त्याला आठवड्याला एक अशी कथा अशा वेगानं त्यानं कथा लिहिल्या. साहजीक कित्येक कथा निव्वळ पाडलेल्या होत्या, अगदीच भरड होत्या.

अमेरिकेत हिटलरप्रेम, कम्युनिष्ट द्वेष, अमेरिका फर्स्ट, जगापासून फटकून रहाणं, अमेरिका हा स्पेशल देश आहे त्याला कुठलेही नियम लागू नाहीत अशी विचारसरणी या काळात जोरात होती. त्याचा परिणाम कला क्षेत्राला कसा सोसावा लागला याचं चित्रण या चित्रपटात आहे.

काँग्रेस (संसद)  आणि तिथल्या कमीटीचं कामकाज चित्रपटात दिसतं. कमीटीचा चेयरमन ट्रंबोना सांगतो की चित्रपटात काय असावं आणि काय नाही ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. हजर संसद सदस्य टाळ्या वाजवतात आणि ट्रंबोची हुर्ये करतात.

सत्तेत परिवर्तन करणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार नाहीये कां? अमेरिकन राज्यघटनेनं विचारांचं स्वातंत्र्य दिलंय ते संसद नाकारतेय कां? असे प्रश्न ट्रंबो कमीटीमोर विचारतात. कमीटी त्यांचं ऐकून घेत नाही. ट्रंबोला शिक्षा सुनावते.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जातं. सर्वोच्च न्यायालयही संसदेचं म्हणणं मान्य करतं, वेगळा विचार मानणं हा देशद्रोह आहे असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागतो. 

चित्रपट ट्रंबो व त्याचं कुटुंब या भोवती फिरतो.  दिवसाचे अठरा तास कथा पाडत रहायचं, वेगवेगळ्या नावानं. या उद्योगांत मुलांचं लहानपण हरवतं. मित्रत्वानं वागणारा ट्रंबो हडेलहप्पी करू लागतो. घरात मुलीचा वाढदिवस साजरा होत असताना तिकडं ट्रंबोचं लक्षही जात नाही.

या घटनात तणाव आणि नाट्य आहे. 

ट्रंबो बाथटबमधे असतो. टबवर एक लाकडी टेबल, त्यावर टाईपरायटर. टेबलावर व्हिस्कीचा ग्लास. एका हातात सिगार. झोपेतले आणि कमोडवरचे क्षण सोडले तर ट्रंबो दिवसाचा प्रत्येक क्षण लिहीत असतो.

त्याची पत्नी त्याला आठवण करून देते की आज त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे. तो पत्नीच्या अंगावर ओरडतो आणि म्हणतो मी लिहितोय ते दिसत नाही काय?

मुलीला डेटवर जायचं असतं, तरुण मित्राला भेटायला जायचं असतं. ट्रंबोचं तिकडं लक्ष नाही. 

ट्रंबोची उलटतपासणी चाललेली असते. सेनेटर विचारतो की तू कम्युनिष्ट आहेस काय. ट्रंबो त्याला विचारतो कम्यूनिष्ट असणं हा गुन्हा आहे काय?

सेनेटर म्हणतो हो की नाही ते सांग.

ट्रंबो त्याला म्हणतो की मी कम्युनिष्ट आहे की नाही हा मुद्दाच येत नाही, कम्युनिष्ट पक्षाला या देशात मान्यता आहे, तो एक मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे असं असताना त्या पक्षाचा सदस्य असणं हा गुन्हा ठरतो काय?

ट्रंबो कम्युनिष्ट असतो म्हणजे काय? तर चित्रपट व्यवसायातले कामगार त्यांच्या मागण्यांसाठी संप करत असताना ट्रंबो त्यांना पाठिंबा देत असतो. 

अमेरिकेत जगातल्या इतर देशांच्या तुलनेत खूपच जास्त राजकीय चित्रपट झालेत. कारण अमेरिकेच्या जेमतेम दोन अडीचशे वर्षाच्या इतिहासात खूपच नाट्यमय घटना घडल्या. ब्रिटीशांचं जोखड फेकून देणं, सिविल वॉर, प्रचंड आर्थिक मंदी, दोन महायुद्धं, वियेतनाम-इराक-अफगाणिस्तान आक्रमणं, निक्सन, ट्रंप, वांषिक दंगली. या घटनांनी अमेरिका तळामुळापासून हादरली.  या घटनांचे पडसाद चित्रपटात पडणं स्वाभाविक होतं आणि तसंच घडलं.  

 या चित्रपटातल्या ट्रंबोच्या भूमिकेसाठी ब्रायन क्रँन्स्टनला ऑस्करचं नामांकन मिळालं होतं.  

चित्रपट २०१५ सालचा आहे. ट्रंप निवडणुकीचं वातावरण तापवत होते.  अमेरिका फर्स्ट, परक्यांचा द्वेष, विरोधकांची बाजू मांडणारे देशद्रोही, ट्रंपची बाजू मांडणारे कितीही खोटं बोलत असले तरी देशप्रेमी असं वातावरण ट्रंप तयार करत होते. त्या काळात झालेला हा चित्रपट आहे. 

 सध्या गाजत असलेली ओपनहायमर ही फिल्म पहाताना ट्रंबोची आठवण होते.

।।

Comments are closed.