निवासी डॉक्टर बळीचा बकरा

निवासी डॉक्टर बळीचा बकरा

सरकारी इस्पितळात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना एकापेक्षा अधिक वेळा रोग्यांच्या संबंधितांनी मारहाण केली. काही ठिकाणी छोट्या खाजगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनाही मारहाण झाली. रोग्याला योग्य उपचार न मिळणं, वेळेवर उपचार न मिळणं, उपचाराचा उपयोग न होऊन रोगी दगावणं या कारणांवरून चिडलेल्या लोकांनी डॉक्टरांना मारहाण केली.

निवासी डॉक्टरांनी संरक्षणाची मागणी केली. एकदा नव्हे तर अनेक वेळा. त्यांना संरक्षण मिळालं नाही. अऩेक ठिकाणी पोलिस किंवा रुग्णालयाचे रक्षक हजर होते पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. बरेच वेळा मारहाण करणाऱ्या लोकांची संख्या येवढी मोठी असते की एकटादुकटा रक्षक काही करू शकला नाही. बहुतेक रक्षकांच्या हातात कधी कधी साधा दंडुकाही नसतो, बंदुक वगैरे सोडाच.

निवासी डॉक्टर हे डॉक्टरीची परिक्षा पास झाल्यानंतर पुढल्या अभ्यासाच्या दरम्यान इस्पितळात काम करत असतात. इथे जर ते काम करत नसते तर ते बाहेर कुठंही डॉक्टरकी करू शकतात. मतलब असा की ते डॉक्टरकी करण्यासा लायक असतात.

निवासी डॉक्टरांच्या इतरही अनेक मागण्या आहेत. त्यांची रहाण्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट असते. अलिकडं अनेक डेअरी प्रकल्पामधे गुरंही एयर कंडिशंड स्थितीत रहातात पण या डॉक्टरांना अत्यंत आरोग्याला घातक परिस्थितीत रहावं लागतं. हे निवासी डॉक्टरच रोगाला बळी पडत असतात.

निवासी डॉक्टरांना मिळणारं वेतन, त्यांना उपलब्ध होणाऱ्या सोयी अतीशय वाईट असल्याचे अनेक अहवाल सरकारच्या दफ्तरी दाखल आहेत. सरकार त्यावर कारवाई करत नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत. थेट स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकारकडं गोळा होणारा महसूल देशाला ठीक ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदींच्या हिशोबात अगदी अपुरा असतो. शिक्षण आणि आरोग्य या अगदी मुळभूत अशा गोष्टींवर सरकारचा खर्च किती तरी कमी असतो. जगभरच्या देशांशी या बाबत तुलना करून पहावी.

निवासी डॉक्टरांच्या वाईट परिस्थितीला देशातील आरोग्य व्यवस्थाही कारणीभूत आहे.तळामधे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जनरल प्रॅक्टिशनर, नंतर अधिक वरच्या स्तरावरचे उपचार आणि नंतर सर्वात वरती अधीक टोकदार उपचार अशी व्यवस्था जगभर असते, भारतात असायला हवी. औषधं, तपासण्या, शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टींसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर असायला हवं. सरकार, खाजगी संस्था आणि डॉक्टर यांच्या एकात्मिक जोडणीतून ही व्यवस्था तयार व्हायला हवी. दुर्दैवानं भारतीय सरकार आणि समाजाला ही व्यवस्था उभी करता आली नाही. खेड्यापाड्यात साध्या सर्दी खोकल्यावरही उपचार होत नाहीत. मोठ्या शहरात साध्या सर्दीतापासाठीही रोगी केईएम, जेजे इत्यादी मोठ्या इस्पितळात जातात. भ्रष्टाचार या भारतीय रोगाचा प्रादुर्भाव आरोग्य व्यवस्थेतही झाला असल्यानं डॉक्टरी हा पैसे मिळवण्याचा धंदा करणारे डॉक्टरही फोफावले आहेत.

परिणाम असा की सामान्य माणूस असहाय्य आहे, वंचित आहे, चिडलेला आहे. तो वैतागतो आणि आतताई वागतो. त्यात कायदा न पाळण्याला प्रतिष्ठा लाभल्यानं गुन्हे करणाऱ्याला या देशात प्रोत्साहन असतं. बाहुबली, गुंड, नेते, सरकारी माणसं सर्रास गुन्हे करतात आणि त्यांना काहीही होत नाही. त्यामुळं एकूणातच कोणीही कोणाला मारहाण केली तरी त्याच्यावर कारवाई होत नाही.

न्यायालयाचं तर विचारूच नका.

समोर रोगी आला की डॉक्टराला क्षणभरात रोगाचं निदान करून उपचार सुरु करावे लागतात. त्यात गडबड झाली की डॉक्टरांना मारहाण. न्यायाधीश डॉक्टरांना झापतात, मारहाण करणाऱ्याना हात लावत नाहीत. न्यायाधिशासमोर खटला येतो तेव्हां न्यायाधीश  महिनोन महिने विचार करण्यात घालवतात. एकच कायदा, एकच पुरावा पण दोन न्यायाधीश एकमेकाविरोधात निर्णय देतात. पण न्यायाधिशाला कोणी ठोकत नाही. असला आपला समाज.वैद्यकीय व्यवसायात जितका भ्रष्टाचार आहे किमान तितकाच भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत आहे. भरपूर न्यायाधीश भरपूर भ्रष्ट असतात. पण न्यायालायचा अपमान या ढालीचा वापर करून न्यायव्यवस्थेनं आपली नालायकी आणि भ्रष्टाचार लपवतं. त्यावर जनता गप्प असते. जनता न्यायालयात घुसून न्यायाधिशांना मारत नाही.

निवासी डॉक्टरांना स्वतःचं संरक्षण करता येत नसेल, त्यांना स्वतःच्या जिवाची काळजी असेल तर त्यांनी नोकरी सोडावी असा अत्यंत गाढव आणि अतर्क्य निर्णय न्यायालय देतं. मग हे न्यायाधीश स्वतःच्या गाडीत पोलिस बसवून कां फिरतात? उज्वल निकम झेड सेक्युरिटीखाली पाच पन्नास पोलिस घेऊन कां फिरतात? चपलांनी मारहाण करणाऱ्या खासदारांच्या दिमतीला पोलिस कशाला असतात? मंत्री पोलिसी कवचात कां फिरतात? त्या सर्वांनी आपापली कामं सोडावीत आणि फूटपाथवर बसून भीक मागावी.

फडणवीस तीन वर्षांपूर्वी विरोधी पक्ष नेते होते. तेव्हांही निवासी डॉक्टरांचा संप झाला होता. तेव्हां त्यांनी काय भाषण केलं होतं? ते भाषण आणि आताचं मुख्यमंत्री म्हणून केलेलं भाषण जनतेनं एकत्रित ऐकावं. भंपकपणाचा कळस आहे. हे असले पुढारी. काँग्रेसवाले सरकारात होते तेव्हां त्यांनीही निवासी डॉक्टरांना वेठबिगारासारखं वागवलं आणि आता संघाचे स्वयंसेवक सरकारात  डॉक्टरांवर विधानसभेच्या सुरक्षित वातावरणात लाथा झाडत असतात.

देशाची आरोग्य व्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेत आहे. राजकीय पक्ष आणि त्यांची सरकारं परिस्थिती सुधारण्यासाठी पावलं उचलायला तयार नाहीत. परिस्थिती बिकट असल्यानं आणि फार दिवसांपासून घडत आल्यानं एका दिवसात ती सुधारणं शक्य नाही. कोणाही सरकारला पाच वर्षातही ती स्थिती सुधारता येणार नाही अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं पक्षबाजी विसरून सर्व पक्षांनी चार चांगल्या जाणकारांना गोळा करून पाच पंचवीस वर्षाचा कार्यक्रम आखायला हवा. परंतू प्रत्येक पक्षाला दर दोन वर्षानी होणाऱ्या निवडणुका जिंकायच्या असल्यानं दूरगामी विचार करायला वेळ नाही. जात आणि धर्माची समीकरणं जुळवण्यातच सारा वेळ जातो.

जनताही थोरच आहे. डॉक्टरांना शिव्या देणारी आणि मारहाण करायला निघणारी जनता स्वतः मात्र शिवाजी, आंबेडकर यांच्या पुतळ्यांसाठी जमीन आणि करोडो रुपये मिळवण्यात, त्यासाठी आंदोलनं करण्यात आपला वेळ खर्च करत असते. आपले नेते आपल्याला शेंड्या लावतात, भावनात्मक गोष्टीत गुंतवतात हे ही थोर जनता लक्षात घेत नाही. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यास स्वतःचा हातभार लावायला ही माणसं तयार नसतात, लाच आणि वशीले लावून आपापल्या पोरांचं भलं करण्यात ही जनता मग्न असते.

निवासी डॉक्टरांच्या रहात्या जागा घाण स्थितीत आजही आहेत. त्यांचं संरक्षण करण्यासाठी पोलिस पोचलेले नाहीत कारण ते व्हीआयपींच्या संरक्षणात मग्न आहेत. मंत्री, न्यायाधीश, सरकारी कर्मचारी सुशेगात आहेत. निवासी डॉक्टर कामावर पोचले आहेत. त्यांच्या हातून चूक घडली तर त्यांना ठोकण्यासाठी जनता जय्यत आहे.

किती थोर किचाट आहे.

।।

 

One thought on “निवासी डॉक्टर बळीचा बकरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *