मंडेलांच्या सोबत २६ वर्षे तुरुंगावास भोगलेला संयमी लढवय्या

मंडेलांच्या सोबत २६ वर्षे तुरुंगावास भोगलेला संयमी लढवय्या

दक्षिण आफ्रिकेतले स्वातंत्र्य सैनिक अहमद कथ्राडा परवाच्या २८ मार्चला वयाच्या ८७ व्या वर्षी वारले. नेल्सन  मंडेला यांच्यासोबत ते २६ वर्षं तुरुंगात होते. द.आफ्रिकेमधे कथ्राडा यांना नेल्सन मंडेला यांच्या बरोबरीचं स्थान आहे.

१९४८ साली नॅशनल पार्टीनं दक्षिण आफ्रिकेमधे वंशद्वेषाचं धोरण अवलंबलं, काळ्यांना स्वातंत्र्य आणि अधिकार नाकारणारे वर्णद्वेषी कायदे केले. सरकारच्या वंशद्वेषी धोरणाविरोधात नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस स्थापन करून लढा सुरु केला. त्या लढ्यात अहमद कथ्राडा मंडेला यांच्यासोबत होते.

एका अगदी साध्या तंबूमधे त्यांचं शव दफनापूर्वी ठेवण्यात आलं होतं. कोणताही झगमगाट नव्हता. अनेक मंत्री, न्यायाधीश इत्यादी मंडळी त्यांना शेवटला सलाम करायला पोचले. कोणाचंही स्वागत वगैरे होत नव्हतं. माणसं येत होती. रांगेत उभं राहून कथ्राडा यांच्या शवपेटीवर फुलं ठेवून पुढं सरकत होती. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झुमा  अंत्य दर्शनाला किंवा प्रेतयात्रेला हजर राहिले नाहीत.

जमलेली माणसं छोटछोटी भाषणं करत होती. कथ्राडा यांचा गौरव करत असताना ही माणसं वर्तमान सरकारवर टीका करत होती. मंडेला आणि कथ्राडा ज्या ध्येयासाठी झगडले ती ध्येयं आफ्रिकेत फलद्रुप होत नाहीयेत, देशात गरिबांचं कल्याण होत नाहीये, देशात भ्रष्टाचार माजलाय असं ही माणसं म्हणत होती. झुमा  मंत्रीमंडळातले अर्थमंत्री श्री गोवर्धन यांनीही अध्यक्ष झुमा यांच्यावर टीका केली. जमलेली माणसं म्हणत होती की आता गोवर्धन यांचा बळी जाणार.

जमलेल्या माणसांच्या भावनाना एक पार्श्वभूमी आहे. गेली चारेक वर्षं कथ्राडा सतत झुमा यांच्या भ्रष्टाचारावर टीका करत होते. झुमा यांनी राजीनामा दिला पाहिजे असं कथ्राडा म्हणत होते. झुमा यांनी आपल्या गावाकडल्या घराच्या सजावटीसाठी आणि विस्तारासाठी खूप सरकारी पैसा वापरला असा ठपका कोर्टानं ठेवला, झुमा यांनी ते पैसे सरकारला परत करावे असा निकाल दिला. १९९९ साली झालेल्या शस्त्र खरेदीत   झुमा यांनी पैसे खाल्ले असं आणखी एका कोर्टात सिद्ध झालं.  झुमा म्हणत राहिले की आरोप खोटे आहेत, त्यांनी भ्रष्टाचार केला नाही.

कथ्राडा भारतीय होते. एका परीनं ते काळे नव्हते. द.आफ्रिकेतली भारतीय माणसं तुलनेनं सुखात असत. परंतू कथ्राडा काळ्यांच्या बरोबरीनं वंशद्वेषविरोधी चळवळीत उतरले. काळ्यांना मिळणारी असमानतेची वागणू कथ्राडा यांना मंजूर नव्हती याला दोन कारणं होती. एक कारण अर्थातच मानवी स्वातंत्र्य हे होतं. दुसरं कारण होतं कथ्राडा यांची कम्युनिष्ट विचार सरणी. काळ्यांचं शोषण करणारी माणसं गोरी होती पण त्यापेक्षाही ती जमीनदार आणि मालक होती. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेताना  काळ्यांना जमिनीची मालकी मिळाली पाहिजे, गोऱ्यांच्या हातात एकवटलेली साधनं काढून घेऊन ती काळ्यामधे (गरीबांमधे) वाटली पाहिजेत असा कथ्राडा यांचा आग्रह होता.

शांततेच्या वाटेनं लढा पुढं सरकत नाही असं पाहिल्यावर आफ्रिकन नॅशनल काँग्रेसनं सशस्त्र लढा सुरु केला. बाँब तयार करणं, बाँबचा वापर करणं याचं प्रशिक्षण कथ्राडा देत असत. पण एक नियम होता. बाँब अशा ठिकाणी पेरला जावा जिथं निष्पाप माणसांचा बळी जाणार नाही. कचेऱ्या, बँका, रेलवे मार्ग इत्यादी उडवण्यावर भर होता. कधी कधी अपघात होत असत, कार्यकर्ते शिस्त मोडून अयोग्य स्फोट करत असत आणि त्यात निष्पाप माणसंही मरत असत. ते टाळण्याचा प्रयत्न कथ्राडा करत, परंतू असे अपघात होतात म्हणून त्यांनी सशस्त्र चळवळ मागे घेतली नाही. अगदी मरेपर्यंत ते म्हणत होते की त्यांना आणि मंडेला यांना हिंसक चळवळ चालवण्याबद्दल कधीही पश्चात्ताप वाटला नाही.

कथ्राडा यांना सुरवातीला कित्येक महिने एकांतवासात ठेवण्यात आलं. पुस्तकं-वर्तमानपत्रं दिली जात नसत, कोणालाही भेटायची परवानगी नव्हती. कोठडीचा दरवाजा उघडून फक्त अन्नाचं ताट आणि पोलिस येत असत. पोलिसाचं एकच मागणं असे, चळवळीची माहिती द्या, सहकारी कोण होते व काय करत होते याची माहिती द्या. कथ्राडा बधले नाहीत.

काही वर्षं तुरुंगात गेल्यावर कथ्राडा (मंडेला, सिसुलू व इतर अनेक) यांच्यावर खटला उभा राहिला. कथ्राडा यांनी कोर्टात घेतलेली भूमिका अशी. { आम्ही गुन्हा केलेला नाही. आमचा लढा स्वातंत्र्यासाठी आहे, राजकीय आहे. आम्ही जे काही करत आलो आहोत त्या बद्दल आम्हाला मुळीच खंत वाटत नाही. आम्हाला दया नकोय आणि क्षमाही नकोय. आम्ही मरणाला सामोरं जायला तयार आहोत.} आजन्म करावास आणि नंतर देहांताची शिक्षा देण्यात आली होती.

चळवळीच्या काळातच बार्बरा होगन या कार्यकर्तीशी कथ्राडा यांचा परिचय झाला, परिचयाचं रूपांतर परिणयात झालं. बार्बरा गोऱ्या होत्या. बार्बरा ख्रिस्ती आणि कथ्राडा मुस्लीम.  त्या काळात काळा-गोरा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला होता. लढ्याला गोऱ्यांच्या विरोधाची झालर असल्यानं सर्वसाधारण काळ्यांच्या मनामधे गोऱ्यांबद्दल आकस असे. बार्बरा यांच्याशी लग्न करायचं की नाही याबद्दल कथ्राडा यांनी त्यांचे नेते सिसुलू यांना सल्ला विचारला. कथ्राडा सिसुलूना वडिलांसारखं मानत असत. सिसुलूंनी कथ्राडा यांना आम्ही तुमच्यापाठी उभे राहू असं सांगितलं.

मंडेलांची चळवळ साऱ्या जगाला समजली आणि मान्य झाली. नॅशनल पार्टीच्या सरकावर साऱ्या जगातून दबाव आला की मंडेलांना तुरुंगातून मुक्त करावं. मंडेला, कथ्राडा इत्यादी नेते तुरुंबाहेर आले आणि सरकारनं १९९४ मधे निवडणुका घेतल्या. गोऱ्यांची नॅशनल पार्टी आणि मंडेला यांची आफ्रिकन नॅशनल पार्टी मैदानात उतरले. एफ डी क्लर्क हे गोऱ्यांच्या पक्षाचे प्रमुख होते. निवडणुकीत एएनसीला ६२ टक्के मतं मिळाली आणि नॅशनल पार्टीला २० टक्के मतं मिळाली. मंडेला यांनी नॅशनल पार्टीसोबत सरकार तयार केलं. गोरे कसेही असले तरी दक्षिण आफ्रिकेचे नागरीकच असल्यानं मागलं विसरून एकत्रित सरकार स्थापन झालं पाहिजे असं मंडेला म्हणाले आणि त्यांच्या पक्षानं त्यांचं म्हणणं मान्य केलं.

 गोऱ्या आफ्रिकानेर माणसांच्या सोबत संयुक्त सरकार. नॅशनल पार्टी हा विरोधी पक्ष ठरला असूनही मंडेलांनी त्याच्या सोबत सरकार तयार केलं. मंडेलांचा लढा वांशिक अन्यायाविरोधात होता. एक अन्याय दूर करण्यासाठी दुसरा अन्याय करणं अशी मंडेलांची भूमिका नव्हती. गोऱ्यांनी काळ्यांना वंचित ठेवलं म्हणून काळ्यांनी गोऱ्यांना वंचित ठेवावं अशी मंडेलांची भूमिका नव्हती.

नेल्सन मंडेला अध्यक्ष झाले. कथ्राडाही लोकसभेचे सदस्य झाले.  कथ्राडा यांनी मंत्री व्हायला नकार दिला. ते नेल्सन मंडेला यांचे सहकारी सल्लागार झाले. पाचेक वर्षं मंडेला यांच्याबरोबर काम केल्यानंतर कथ्राडा यांनी सल्लागारपदावरून आणि पक्षीय व्यापातून दूर व्हायचा निर्णय घेतला.  त्यांच्या मते त्यांचा लढा संपलेला नव्हता. देशातली ९० टक्के संपत्ती १० टक्के लोकांच्या हाती असणं त्यांना अन्यायकारक वाटत होतं.  कसणाऱ्याला जमीन मिळाली पाहिजे, संपत्तीचं आणि जमिनीचं न्याय्य वाटप झालं पाहिजे अशी कथ्राडा यांची भूमिका होती. ही भूमिका मांडत रहायचं स्वातंत्र्य कथ्राडा यांना हवं होतं.

कथ्राडा यांचा पॅलेस्टिन लढ्याला पाठिंबा होता. इस्रायल हा देश पॅलेस्टिनी जनतेचं स्वातंत्र्य हिरावून घेतो याला कथ्राडा यांचा विरोध होता.  पॅलेस्टिनी माणसं हिंसक कारवाया करत असूनही कथ्राडा यांचा पॅलेस्टिनी लढ्याला पाठिबा होता. कथ्राडा म्हणत ” पॅलेस्टिनी लोकांचा लढा  न्यायासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आहे. त्यामुळं त्या लढ्याला माझा निःसंदिग्घ पाठिंबा आहे. लढा हिंसक ठेवावा की अहिंसक ठेवावा याचा निर्णय पॅलेस्टिनी लोकांनी घ्यायचा आहे. कोणी कोणत्या रीतीनं लढा द्यावा हे मी कोणाला सांगणार नाही, त्यांनी परिस्थितीनुसार त्यांना योग्य तो निर्णय घ्यायचा. आम्हीही परिस्थितीनुसार हिंसक लढाई केलीच होती ज्या बद्दल आम्हाला कधीही पश्चात्ताप नव्हता आणि नाही.”

पॅलेस्टिन लढ्याला पाठिंबा दिला म्हणून कथ्राडा यांच्यावर ते सेमेटिकद्वेष्टे आणि ज्यू विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. कथ्राडा यांची भूमिका स्पष्ट होती. ते म्हणत ” मी ज्यू विरोधी नाही. मी इस्रायल विरोधी आहे. दक्षिण आफ्रेकेमधेही आम्ही गोऱ्यांच्या विरोधात नव्हतो. आम्ही गोऱ्यांनी म्हणजे एका गटानं केलेल्या शोषण व अन्याया विरोधात होतो. म्हणूनच आम्ही समजुतीनं वागत गोऱ्यांच्या बरोबरीनं सरकारही स्थापन केलं. गोरी माणसंही शेवटी आमच्याच देशाची नागरीक होती. शोषक नागरीक आणि शोषित नागरीक असा आमचा लढा होता.”

वैचारिक स्पष्टता कथ्राडा यांच्या व्यक्तिमत्वातून दिसत असे. तो शांत असत. ते कधी रागवत नसत. नकारात्मक भावनेमुळं माणसाचं नुकसान होतं असं ते मानत. यू ट्यूबवर त्यांच्या मुलाखती दिसतात. त्यांचा शांतपणा, विचार करून संथपणे बोलणं श्रोत्याला हेलावतं, अंतर्मुख करतं.

।।

 

3 thoughts on “मंडेलांच्या सोबत २६ वर्षे तुरुंगावास भोगलेला संयमी लढवय्या

  1. I stayed South Africa for 17 years and I knew this MAN, his gracious life and achievements. Though celebrity, he was very simple. Never involve any disgusting issues, kept life normal.
    Never manage to meet him but understands lots about him. Nice article.

  2. I stayed South Africa for 17 years and I knew this MAN, his gracious life and achievements. Though celebrity, he was very simple. Never involve any disgusting issues, kept life normal.
    Never manage to meet him but understands lots about him. Nice article.

  3. आदरणीय सर
    नमस्कार
    कथरांडांचे काम नव्याने कळ ले
    आपली शोधक नजर महत्वाची
    मी आवर्जून वाचतो,धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *