अवनती रोखणारा संपादक

अवनती रोखणारा संपादक

                              रॉबर्ट सिल्वर्स

कालचा सामान्य दिवस आणि वैशिष्ट्यहीन माणूस आज  प्रशस्तीपात्र ठरू लागणं ही  काळ उतरणीवर लागल्याची खूण असते. तथापि अशा काळातही काही माणसं थांबेठोकपणे उभी रहातात, संस्था उभ्या करतात, उतरणीवरही माणसाला शिखराकडं चालायला प्रवृत्त करतात. त्या पैकी एक माणूस म्हणजे रॉबर्ट सिल्वर्स. न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सचे संपादक. हा संपादक २० मार्च २०१७ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी वारला.

रॉबर्ट सिल्वर्स या संपादकानं १९६३ साली न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स हे पाक्षिक सुरु केलं, अवनती रोखून धरली. सिल्वर्स यांनी अमेरिकन संस्कृतीला एक नाममात्र वार्षिक वर्गणी भरून लिबरल आर्टसचं मुक्तद्वार शिक्षण देणारं कॉलेज न्यू यॉर्क रिव्हयू या पाक्षिकाच्या रुपात यार करून दिलं ( बार्बरा एप्सटिन यांच्या सोबत.)

लिबरल आर्टस ही कल्पना ग्रीक संस्कृतीत उदयाला आली. लॅटिन उगम असलेल्या लिबरल या शब्दाला माणसाला मुक्त करणारं शिक्षण असा अर्थ होता. त्या शिक्षणात व्याकरण, तर्क, अभिव्यक्ती या बरोबरच गणित, भूमिती आणि संगित हेही विषय असत. हे सारे विषय रिव्ह्यूनं वाचकांसमोर ठेवले.

मृत्यूच्या क्षणापर्यंत सिल्वर्स  रिव्ह्यूचे संपादक होते. मृत्यूच्या आधी त्यांनी संपादित केलेल्या अंकामधे आल्बेर कामूचं साहित्य,  लॅरी मॅकमुर्टी यांची १८८० च्या काळातली अमेरिकन कादंबरी, एडवर्ड ऑबिन यांच्या लॉस्ट फॉर वर्डस या कादंबरीचं परीक्षण, अहमद रशीद यांचा अफगाणिस्तानवरचा लेख आणि अनातोल लिवेन यांचा युक्रेनवरचा लेख अशी सामग्री आहे. रिव्ह्यूमधलं लेखन ऐसपैस असतं. विषयाच्या अल्याडपल्याडचं भरपूर लेखात येतं. लॉस्ट फॉर वर्ड या कादंबरीला मॅन बूकर बक्षिस मिळाल्याच्या निमित्तानं थाटलेल्या या लेखात बूकर पारितोषिकाचा इतिहास, बूकर पारितोषिक मिळालेले आणि न मिळालेले लेखक इत्यादी सारं येऊन जातं.

                                      बार्बरा एप्स्टिन आणि रॉबर्ट सिल्वर्स

१९६३ मधे न्यू यॉर्कमधून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांचा संप झाला, काही आठवडे पेपर गायब होते. त्या वेळी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या खटाटोपात बार्बरा एप्सटिन आणि रॉबर्ट सिल्वर्स यांनी रिव्ह्यू सुरु केलं. रिव्ह्यूचं संपादकपद घेण्याआधी सिल्वर्स पॅरिस रिव्ह्यू आणि हार्पर्स या साहित्यिक माध्यमांमधे सिल्वर्स सहसंपादक होते. सिल्वर्स दुसऱ्या महायुद्धात भाग घेण्यासाठी पॅरिसमधे मुक्कामी होते. युद्ध संपल्यावर अमेरिकन सरकारनं युद्धात भाग घेतलेल्या लोकांसाठी एक सवलत जाहीर केली. कुठल्याही कॉलेजात कितीही काळ कुठल्याही विषयावर अभ्यास करा, आर्थिक जबाबदारी सरकारची. सिल्वर्स खुष. त्यांनी साहित्य, इतिहास इत्यादी विषयांचा अभ्यास केला आणि उरलेल्या वेळात लिहायला सुरवात केली. संपादकपदाच्या काळात त्यांनी इलिझाबेथ हार्डविक यांचा समकालीन साहित्य परिक्षण या विषयावरचा घणाघाती लेख हार्पर्समधे प्रसिद्ध केला. त्या काळात न्यू यॉर्क टाईम्सच्या साहित्य पुरवणीत किती सुमार परिक्षण प्रसिद्ध होत असत, बंडल साहित्याचं कौतुक प्रसिद्ध होत असे इत्यादींचं तपशीलवार वर्णन त्या लेखात होतं. या लेखामुळ साहित्य-प्रकाशन जगात जाम खळबळ उडाली. वॉरन यांना प्रचंड मार पडला. हार्पर्सच्या संपादकानं व्यक्तिशः सारवासारव करणारी माफी मागितली पण सिल्वर्स हार्डविक यांच्या मागं खंबीरपणे उभे होते.  या एकाच दणक्यानं सिल्वर्स हा संपादक काय आहे ते अमेरिकेच्या मनात रुतलं. आणि याच मुळं एप्स्टिननी ठरवलं की रिव्ह्यूच्या संपादकपदी सिल्वर्सना घ्यायचं.

सिल्वर्स पक्के होते. आपण ऊच्चभ्रू साहित्य निर्माण करतो असं ते म्हणत असत. ऊच्चभ्रू याचा अर्थ बौद्दिक-वैचारिक क्षेत्रातले ऊच्चभ्रू. अमेरिकन संस्कृतीमधे साठीमधे एक मोठी खळबळ होती, वैचारिक गोंधळ सुरु झाला होता. देशभक्ती, धर्मप्रेम, संस्कृतीप्रेम, बाजारातला गवगवा या कसोटीवर प्रतिष्ठित ठरवल्या जात होत्या, निकृष्ट विचारांना  प्रतिष्ठा लाभू लागली होती. जगात फक्त अमेरिकाच आहे, बाकीचं जग जणू अस्तित्वातच नाही अशा एक भ्रम विद्याशाळा आणि माध्यमांनी तयार केला होता. अमेरिकेला या भ्रमातून बाहेर काढायचा चंग सिल्वर्सनी बांधला. फ्रेंच, ब्रिटीश संस्कृतीचं प्रेम असणाऱ्या  सिल्वर्स यांच्या विचारांचा उगम  ग्रीक इतिहासात होता.  त्यांना चीन, भारत, नायजेरिया, वियेतनाम, लंका इत्यादींबद्दलही कुतुहुल आणि जाण होती. सिल्वर्सना  पदार्थविज्ञान, अणुविज्ञान, जैवविज्ञान, इतिहास, तत्वज्ञान, ईशज्ञान, संगित, साहित्य, दृश्य कला, सिनेमा, नकाशाशास्त्र, पोर्नोग्राफी इत्यादी दुनियाभरच्या विषयात कुतुहूल होतं, उत्सूकता होती. या साऱ्या विषयातले जगातले जाणकार गोळा करावेत आणि त्यांना लिहितं करावं असं सिल्वर्सनी योजलं.

समजा चॉम्सकी आहेत किंवा फ्रीमन डायसन आहेत. त्यांच्या टपाल पेटीत एक मोठ्ठं पुडकं यायचं. त्यात चार पाच पुस्तकं आणि सिल्वर्स यांचं पत्र असायचं. ”  हा विषय, ही पुस्तकं. मला वाटतं की विषय आणि पुस्तकं महत्वाची आहेत. तुम्ही त्या विषयावर लिहू शकाल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? पहा प्रयत्न करून. तुम्ही इतक्या शब्दात लेख लिहावा त्यासाठी आम्ही इतके पैसे देऊ. समजा लेख लांबला. हरकत नाही. मी पाहून घेईन, छापेनही. वाट पहातो.”

लेखकाची निवड करतांनाही सिल्वर्स यांची एक मजा होती. समजा स्टिफन जे गुल्ड आहेत. ते जगाला माहित आहेत ते जीवशास्त्रज्ञ, विज्ञानाच्या इतिहासाचे जाणकार म्हणून, त्या विषयाचे नामांकित संशोधक, प्राध्यापक म्हणून. परंतू त्याना बेस बॉल या खेळात प्रचंड रस आणि जाण होती. सिल्वर्सनी गुल्डना बेस बॉल या विषयावर अनेक लेख लिहायला लावले.

विनंती आणि पुस्तकं पाठवून सिल्वर्स थांबत नसत. पाठोपाठ,  सिल्वर्स ओढत त्या सिगारचा वास असलेली प्रुफं लेखकांच्या टेबलावर पोचत. रिव्ह्यूचे लेखक नोबेल पारितोषिक विजेते, देशांचे पंतप्रधान, कुलगुरू, शास्त्रज्ञ इत्यादी असत, ते प्रवासात असत. प्रवासात ते ज्या देशात असतील, ज्या वाहनात असतील तिथं सिल्वर्सच्या तारा, ईमेल, पत्रं पोचत. लेखाबद्दलची मतं आणि सूचना त्यात असत. ख्रिस्तमसची किंवा कुठलीही पार्टी असे, लेखकाच्या हातात मद्याचा ग्लास असे अशा ठिकाणीही सिल्वर्स यांचं पत्र पोचत असे.

अशाच चिवित्र परिस्थितीत एका लेखकाला सिल्वर्सना फोन आला. फोनवर सिल्वर्स म्हणत होते ” …तुमच्या लेखात अमूक पानावर अमून नंबरच्या ओळीमधे एक अर्धविराम आहे. हा अर्धविराम गोंधळाचा आहे, त्यामुळं अर्थाला स्पष्टता येत नाही.त्या ठिकाणी पूर्ण विराम असावा असं मला वाटतं. विचार करा, तुमचं मत कळवा, लवकर, लेख थांबला आहे.”

रिव्ह्यू काढायचं ठरलं तेव्हां बाजाराच्या नियमानुसार लोकांनी सिल्वर्सना विचारलं की तुम्ही बाजाराचा-वाचकांचा सर्वे केलाय कां? वाचकांना काय हवं असतं याचा अभ्यास केलाय का?. सिल्वर्स-एप्स्टिननी ताडकन उत्तर दिलं ” वाचकांना काय हवंय हा मुद्दाच नाही. काय छापायचं हे आम्ही ठरवणार, लेखक कोण आहे हे आम्ही ठरवणार. जगातलं जे उत्तम आहे, जे महत्वाचं आहे, जे वैशिष्ट्यपूर्ण आहे, ज्याला विशेष कंगोरे आहेत ते आम्ही निवडणार, ते प्रसिद्ध करणार.”

                        सिल्वर्स आणि पुस्तकं

सिल्वर्सना संपादनापलिकडं आयुष्यच नसावं. ते सक्काळी सक्काली न्यू यॉर्कमधल्या रिव्ह्यूच्या अस्ताव्यस्त, जुनाट ऑफिसात पोचत. रिव्ह्यूला ते ‘ पेपर ‘ म्हणत. आमचा पेपर, आमच्या पेपरात लिहा, आमच्या पेपरात असं असं येतं असं ते बोलत. एकदा पेपरात पोचले की ते केव्हां बाहेर पडतील याचा नेम नसे. अनेक वेळा सबंध दिवस, सबंध रात्र आणि दुसरा अर्धा दिवस ते पेपरात असत. भरपूर पार्ट्यांमधे जात असत.   तिथंही लेखक हुडकण्याची, एकादा चमकदार माणूस दिसला तर त्याला लेखक कसा करता येईल,  याची खटपट, नेहमीच्या लेखकाबरोबर विषयाची चर्चा. सुट्टी बिट्टी हा प्रकारच नाही. ५४ वर्षं गुणिले ३६५ दिवस हा माणूस निव्वळ वाचत राहिला, संपादन करत राहिला. या संपादनाच्या व्यसनामुळंच कदाचित सिल्वर्सनी लग्न केलं नाही. पण   त्यांना मैत्रिणी होत्या, ते सहजीवर  उपभोगत होते. लग्न आणि सहजीवन या दोन गोष्टी स्वतंत्र असतात असं त्यांनी लिहिलं बिहिलेलं नाही पण त्यांच्या विचारात जरूर असावं कारण ते सार्त्र आणि सिमॉन द बुवा यांच्या  सहजीवनाचे  समकालीन होते.

साठीचा काळ साऱ्या जगातच प्रस्थापित उलथवणारा होता. सिल्वर्स त्या काळाचा प्रॉडक्ट होते. साहित्यातल्या प्रस्थापितावर त्यांनी हल्ले घडवले. रिव्ह्यूमधल्या लेखात नॉर्मन मेलरनी मेरी मॅकार्थीच्या ग्रुप या कादंबरीच्या चिंधड्या उडवल्या. एका लेखात इसाया बर्लिन यांनी नेबाकोवच्या साहित्याच्या चिंध्या केल्या. वियेतनाम युद्ध हा अमेरिकेच्या प्रेमाचा विषय असताना सिल्वर्सनी अमेरिकन सैन्य वियेतनाममधे किती क्रूर, अमानवी, अनैतिक पद्धतीनं वागत आहे यावर प्रकाश टाकला, तिथं बातमीदार पाठवले. सरकार आणि अमेरिकन जनतेला वियेतनाम युद्धप्रेमाचं भरतं असताना त्यांचा रोष पत्करून रिव्ह्यूनं अमेरिकेला सत्य दाखवलं. समाजाला हुकूमशहांचं प्रेम असतं. रिव्हूनं जगभरचे हुकूमशहा उघडे पाडले. वॉटर गेट ते ऑक्युपाय वॉल स्ट्रीट. सिल्वर्सनी अमेरिकन जनतेला सत्याला सामोरं जायला लावलं. मरणाच्या आधी गेलं वर्षभर अमेरिकन लोकशाही आणि डोनल्ड ट्रंप या विषयावर रिव्ह्यूनं लेखांचा धडाका लावला होता.

सिल्वर्स यांचा प्रत्येक अंक म्हणजे एक साहस असे. एकादा अंक संपला की हुश्श झालं असं त्यांच्या बाबतीत घडत नव्हतं, पुढच्या अनेक अंकांसाठी अनेक विषय आणि लेखक त्यांच्या डोक्यात असत. पण हा पंधरवडाभंगूर धबडगा चालला असतानाही सार्वकालिक साहित्याच्या संपादनावर त्यांचं लक्ष होतं. साठीतलं अमेरिकन साहित्य, हिडन हिस्टरीज ऑफ सायन्स, कंपनी दे केप्ट-रायटर्स ऑन अनफरेगेटेबल फ्रेंडशिप्स या पुस्तकाचे दोन खंड आणि अनेक अँथॉलॉजी त्यांनी संपादित केल्या.

संपादक जगाची दखल घेतो, संपादकांची दखल कोण घेणार?

                               रॉबर्ट सिल्वर्स

न्यू यॉर्क पब्लिक लायब्ररीनं न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स मधला सिल्वर्स (आणि एप्स्टिन ) यांचा लेखकांशी झालेला पत्रव्यवहार, प्रसिद्ध न झालेले लेख इत्यादी सामग्री विकत घेतली आहे. त्यात ऑलिवर सॅक्स, सोंटॅग, चॉम्सकी इत्यादींबरोबरचा पत्रसंवाद आहेत. तीनेक हजार फूट भरतील इतक्या लांबीचे कागद या सामग्रीत आहे. एक धनिक आणि त्याची फोटोग्राफर पत्नी यांनी रिव्ह्यूचा संग्रह करण्यासाठी आवश्यक विपुल धन उपलब्घ करून दिलं आहे. रिव्ह्यूला पन्नास वर्ष झाली तेव्हां मार्टिन स्कोर्सेसे या नामांकित दिद्गर्शकानं एक वृत्तपट प्रसारित केला.

२००६ साली बार्बरा एप्स्टिन यांचं निधन झालं. २० मार्च २०१७ रोजी रॉबर्ट सिल्वर्स वारले. ही माणसं हाडीमाशी भेटलेली माणसं तशी कमीच. जगभरचे काही  लाख वाचक (रिव्ह्यूचा खप १.५ लाख) या माणसांना दर पंधरा दिवसांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या रुपात भेटतात. टॅब्लॉईड आकाराच्या, इलस्ट्रेशन्स आणि व्यंगचित्रं असलेल्या या साप्ताहिकात वीसेक पानं भरून जगभरच्या विश्वशाळा आणि नामांकित प्रकाशन संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या पुस्तकांच्या जाहिराती असतात. या जाहिराती वाचूनही जगात काय घडतय याची कल्पना येते.

उत्तम साहित्य वाचणं ही एक मस्ती असते, ते एक ऐश्वर्य असतं. सांदीकोपऱ्यात बसून एकेक विषय पिंजत बसणारे व्यक्तीकिडे, विषय, पुस्तकं,  सिल्वर्सनी वाचकांसमोर ठेवली. ते सारं आता संग्रहीत रुपात नेटवर उपलब्ध आहे म्हणजे कायच्या कायच मजा आहे.

००

 

3 thoughts on “अवनती रोखणारा संपादक

  1. Enjoyed your article on Robert Silvers. It is so nice that you have introduced this towering personality in the the American literary field to Marathi language readers.
    I think it is a just a coincidence that Govind Talwalkar, another great editor of newspaper (Maharashtra Times) passed away around the same time. Looks like we are losing all the stalwarts of yesteryear.
    Thanks again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *