बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

बाँब, रॉकेटांच्या सहवासात लढायांचं वृत्तांकन करणारी महिला पत्रकार

मेरी कोल्विन सीरियातल्या धुमश्चक्रीच्या बातम्या देताना २०१२ साली मृत्यूमुखी पडल्या. बाबा अमर या गावामधे तीनेकशे स्त्रिया आणि मुलं सीरियन सरकारनं अडकवून ठेवली होती, बाँब वर्षाव करून त्यांना असद यांच्या सैनिकांनी मारलं. मेरी कोल्विन यांनी त्या घटनेचा वृत्तांत प्रसिद्ध केल्यावर सीरियन सरकार खवळलं. ड्रोनचा वापर करून सरकारनं त्यांचा पत्ता मिळवला, त्या घरावर अर्धा तास अनेक रॉकेट्सचा मारा करून घर आणि मेरी कोल्विनला खलास केलं.
मेरी कोल्विननी लिबिया, इराक, कोसोवो, चेचन्या, पॅलेस्टाईन, सिएरा लिओने, इथियोपिया, लंका इत्यादी देशातल्या युद्धांवर वृत्तांत लिहिले. लंकेत ईलम आणि लंका सरकार यांच्यातल्या संघर्षावर वृत्तांत करत असताना लंका सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, हातबाँब फेकला. त्यात मेरी जबर जखमी झाल्या, एक डोळा गेला. अनेक महिने उपचार घेतल्यानंतर कोल्विन पुन्हा युद्धावर लिहिण्यासाठी जेरुसलेमला रवाना झाल्या. १९८५ ते २०१५ अशी तीसेक वर्षं मेरी कोल्विन जगभर फिरून युद्धांवर वृत्तांत लिहिले.
लिंडसे हिलसम यांनी एक्स्ट्रेमस या चरित्रात्मक पुस्तकात मेरी कोल्विन यांच्या पत्रकारी जीवनाचं चित्र रेखाटलं आहे. हिलसम काही काळ कोल्विन यांच्या सहकारी होत्या, त्यांनीही युद्धांचं वृत्तांकन केलं होतं. सीरियामधल्या कोल्विन यांच्या वृत्तांकनावर पॉल कोनरॉय यांनी अंडर दी वायर हे पुस्तक लिहिलंय. कोल्विन यांच्या वार्तापत्रांचं संकलन ऑन दी फ्रंड लाईन या पुस्तकातही वाचायला मिळतं.
कोल्विन यांची एक स्वतंत्र शैली होती. प्रथम पुरुषी ( पुरुषी अस कां म्हणायचं?) एक वचनी शैलीत त्या लिहीत. परंतू त्यातलं त्यांचं मी पण व्यक्तीगत नव्हतं. त्यांच्यातली मी परिस्थिताच्या कचाट्यात सापडलेल्या व्यक्तीशी एकरूप झालेली असे. अन्याय होत असलेली माणसं हा त्यांच्या पत्रकारीचा केंद्रबिंदू होता. रशियाची पाशवी सत्ता चेचेन्यातल्या लोकांना चिरडत होती. लंकेत सैन्य तामिळाना चिरडत होतं. सीरियात असहाय्य नागरीकांना कोंडी करून मारलं जात होतं. गोळ्या, बाँब, रॉकेटं यांचा बळी ठरलेली तिथली माणसं आणि त्यांचं जीवघेणं जगणं हा कोल्विन यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. अपार त्रास सोसणाऱ्या माणसांशी कोल्विन एकरूप होत.
कोल्विन तीन वेळा गद्दाफीना भेटल्या. पहिल्याच भेटीत गद्दाफी कोल्विनच्या शेजारी बसले, त्यांनी कोल्विनच्या मांडीवर हात ठेवला. दुसऱ्या वेळी समोर बसले आणि कोल्विनच्या गुडघ्यावर हात ठेवला. पहिल्या भेटीत गद्दाफीनी अतीच जवळीक दाखवली. पुन्हा भेटूया म्हणाले. दुसरी भेट सहा सात तास चालली. गद्दाफी अनेक विषयांवर बोलले. त्यानंतरच्या भेटीच्या वेळी गद्दाफी यांच्या घरावर अमेरिकन विमानांनी बाँबफेक केली. कोल्विनना ते कळल्यावर त्यांनी गद्दाफींच्या ऑफिसला फोन केला. गद्दाफींचा फोन नंबर कोल्विन यांच्याकडं नव्हता. ऑफिसनं कोल्विनना गद्दाफीशी जोडून दिलं नाही. कोल्विननी फोन केला होता गद्दाफींची बाँबिगवरची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. परंतू नंतर गद्दाफी एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले की एका अमेरिकन महिलेनं त्यांना बाँबिंगची कल्पना देवून जागं करण्याचा प्रयत्न केला होता. तसं काहीही घडलेलं नव्हतं, कोल्विनच्या फोनचा गद्दाफी गैरवापर करत होते.
गद्दाफींच्या मुलाखतीनंतर कोल्विन जगप्रसिद्ध झाल्या.
कोल्विन अराफत यांना पाच पन्नास वेळा भेटल्या. अराफत गुंगारा देत. कोल्विन त्यांचा पाठलाग करत. एकदा कोल्विन अराफतना भेटायला ट्युनिसमधे गेल्या होत्या. मुलाखतीची वाट पहात असताना त्यांना कळलं की अराफत अचानक चीनमधे गेलेत. अराफत यांच्या व्यक्तीगत स्टाफमधे कोल्विननी दोस्त केले होते. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावर कोल्विन दुसऱ्या विमानानं चीनमधे गेल्या. त्या चीनमधे पोचल्या आणि अराफत त्यांची बैठक संपवून मोरोक्कोत गेले. कोल्विन पाठोपाठ मोरोक्कोत आणि नंतर ट्युनिसमधे. प्रत्येक वेळी त्या त्या देशांचे व्हिसे मिळवणं, विमानं पकडणं. थेट जेम्स बाँडचा सिनेमा.
मोठमोठ्या नेत्यांना बोलतं करण्याचं कसब कोल्विन यांच्याकडं होतं. त्या नेत्यांना अवघड प्रश्नही विचारत. कोल्विन पक्षपाती नाहीत, थरारासाठी बातम्या गोळा करत नाहीत हे पटल्यामुळं नेते त्यांच्याशी बोलत.
नेत्यांच्या राजकीय जीवनापलिकडं जाऊन त्या नेत्यांचं व्यक्तिमत्व रेखाटत. त्यांची अराफत यांच्या पत्नीशी, सुहा, जिव्हाळ्याची मैत्री होती. सुहा या एकीकडं पॅलेस्टाईनच्या अध्यक्षाच्या पत्नी होत्या, घातपाती अल फताच्या अध्यक्षाच्या पत्नी होत्या. दुसरीकडं त्या अराफत नावाच्या एका पुरुषाची पत्नी होत्या, एक गृहिणी, एक आई होत्या. सुहा यांना एक सुखाचं जीवन जगायचं होतं, फॅशन्स करायच्या होत्या, दागिने घालायचे होते. अराफत आणि सुहा यांच्यात तणाव असत. सुहा आपली सुखंदुःखं कोल्विन यांच्याशी शेअर करत असे. एकदा अराफतचीच माणसं कोल्विनना मारायला निघाली असताना सुहा यांनी मारेकऱ्यांना पळवून लावलं.
नेत्यांशी असणारे व्यक्तिगत संबंध कोल्विननी वृ्तांत लिहिताना आड येऊ दिले नाहीत.
इराक-इराण यांच्यात युद्ध चालू असताना तिथं जायला कोणीही धजावत नव्हतं. एका दुभाषीला घेऊन कोल्विन आघाडीवर पोचल्या. दोन स्त्रिया तिथं काय करत आहेत ते इराकी सैनिकांना कळेना. त्यांनी कोल्विनवर गोळीबार सुरु केला. इराकी कां गोळीबार करत आहेत ते इराणी सैनिकांना कळेना. त्यांनीही गोळीबार केला. बरेच दिवस थंड झालेलं युद्ध पुन्हा सुरु झालं. पळत पळत कोल्विन मागं फिरून गोळीबाराच्या परिघाबाहेर पोचल्या.
कोल्विन यांचा बगदादमधे हॉटेलात मुक्काम होता. प्रत्यक्ष लढाई चालली होती बसरा या शहरात. पोलिस आणि सैन्याला गुंगारा देऊन कोल्विन एका खाजगी कारनं बसरामधे पोचल्या, तिथली लढाई पाहिली.बगदादमधे पोलिस आणि लष्कर हैराण होतं. कोल्विन कशा आणि कुठं गेल्या त्याचा शोध मंडळी घेत होती. कोल्विननी बसरा लढाईच्या बातम्या दिल्यावर इराकी सरकार नाराज झालं, कोल्विनना त्यांनी घालवून दिलं.

कोल्विनना पत्रकार व्हायचंच होतं. येल विश्वशाळेत त्यांनी पत्रकारीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. जॉन हर्सी त्यांचे शिक्षक होते. अभ्यासक्रमात कोल्विननी वियेतनामवर एबीसी या वाहिनीसाठी हिलरी ब्राऊन यांनी केलेल्या वृत्तपटांचा विशेष अभ्यास केला. पॉलिटिक्स ऑफ जर्नालिझम हा विषय कोल्विननी अभ्यासासाठी निवडला होता.
पत्रकारी शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. परिक्षेसाठी कोल्विननी मेक्सिकोमधे घेतलेल्या अनुभवाचा वृत्तांत लिहिला. ” आम्ही (बसमधून) उतरलो. दमलो होतो. गच्चगर्दीत. बस म्हणजे जनावरांची गाडी होती, कोंबड्या आणि माणसं कोंबली होती, त्यांचा वासात बुडालो होतो…”
पत्रकार प्राध्यापक जॉन हर्सी यांनी लेखाच्या मार्जिनमधे आणि टोकाला टिप्पणी लिहिली. ” overpacked phrasing tortuous.. अती वापरानं गुळगुळीत झालेले शब्द मला आवडत नाहीत. मला वास्तव, खडखडीत वास्तव मांडलेलं आवडतं. तुझ्या लिखाणात माणसं, व्यक्तिमत्वं चित्रीत होत नाहीत. तथापी घटनास्थळं मात्र छान दिसतात. ”
जॉन हर्सी म्हणजे कोण?
हिरोशिमावर बाँब पडल्यानंतर एक वर्षानं हर्सी हिरोशिमात गेले. अणुबाँबनं लाखो माणसं मेली. काही माणसं वाचली. वाचलेल्या ४० माणसांच्या मुलाखती हर्सी यांनी घेतल्या आणि त्या पैकी सहा मुलाखतीवर लेख लिहिला. बाँब पडला त्या वेळी ही माणसं काय करत होती, त्यांच्या भोवती काय घडलं ते या माणसांनी सांगितलं. ती निवेदनं हर्सीनी मांडली. भावनांचा कल्लोळ नाही. सरळ अनुभव.
न्यू यॉर्करनं या लेखाचा एक स्वतंत्र अंक प्रसिद्ध केला. हातोहात तो संपला, त्या अंकाचं पुनर्मुद्रण करावं लागलं, छापून छापून न्यू यॉर्करवाले थकले, छापणं बंद केलं तरी लोक अंकाची मागणी करत होते. आईनस्टाईनना तो अंक हवा होता, मिळाला नाही. शेवटी न्यू यॉर्करनं आपल्याकडली राखीव प्रत त्यांना पाठवली. पुढं या लेखाचं पुस्तक प्रसिद्ध झालं. पुस्तकाचं शीर्षक होतं हिरोशिमा.
हिरोशिमा या पुस्तकानं एक स्वतंत्र शैली निर्माण केली, हर्सी शैली असं या शैलीचं वर्णन केलं जातं. हिरोशिमामधे अणुबाँबचे बळी झालेल्या लोकांच्या जगण्या मरण्याचे बारीक सारीक तपशील आहेत. माहिती हा पत्रकारीचा मुख्य मुद्दा. ती माहिती लेखात आहे पण कथा कादंबरीची साहित्यीक शैली आहे. कोरडी माहिती नाही, पात्रं आहेत, एक कथन आहे. कथनात सत्य आहे.
पत्रकारीमधे बाजू घेणं टाळलं जातं, समतोल लिहायचा प्रयत्न असतो. हर्सीनी तोल सांभाळला नाही, भीषण घटनेतलं सत्य सांगितलं. अणुबाँब दुर्घटनेची जबाबदारी कोणाची, दोष कुणाचा इत्यादी घटनेची चर्चा त्या लेखात नाही. माणसांवर झालेला परिणाम त्यानी चितारला. सहा माणसांच्या कथा त्यांनी एकत्र गुंफल्या, बाँब पडण्याच्या घटनेभोवती.
हर्सी म्हणतात- फिक्शन लिहिणाऱ्यानं नवनिर्मिती करायची असते, कल्पना करायची असते. पत्रकारानं कल्पनेनं लिहायचं नाही.
हर्सी म्हणत पत्रकार हा सुतार असतो, कारागीर असतो. कलाकार नसतो. झाड असतं, लाकूड असतं. सुतार लाकूड कापतो, त्याचे तुकडे करतो, तासतो, त्यातून तो सुरेख वस्तू तयार करतो. सत्य, घटना, माहिती. आपापल्या जागी या गोष्टी असतात.ते सारं एकत्र करायचं, तासायचं, जुळवायचं. तेच पत्रकाराचं कसब.
हर्सी सांगत की लिहीत रहावं. लिहिता लिहिताच पत्रकार शिकतो. तेच त्याचं प्रशिक्षण. त्यातच त्याला पत्रकारीचे सिद्धांत कळतात.
हर्सींनी घालून दिलेले धडे कोल्विननी आपल्या वृत्तांतात गिरवले. त्यांच्या युद्धावरच्या वृत्तांतात माणसं, त्यांचं जगणं, त्यांची जगण्याची घालमेल प्रकट झाली.
कोल्विन यांचं व्यक्तिगत जीवन खूप तणावाचं होतं. त्यांची लग्न वादळी ठरली. त्यांचे गर्भपात झाले. त्यांना अनेक शरीरमित्र होते. त्या प्रचंड दारू पीत. त्यांना वजन कमी ठेवायचं वेड होतं. त्यामुळं त्या कमी खात, भूक लागू नये म्हणून दररोज चाळीसपेक्षा जास्त सिगरेटी फुंकत. दारू पितांना खात नसत, रिकाम्या पोटी दारू पीत. पार्ट्या हा त्यांचा आवडता छंद होता. तिथं खावं लागे. पार्टी संपल्यावर त्या ओकारी करून अन्न पोटाबाहेर टाकत, वजन कमी करण्यासाठी. या वागण्याचे खूप शारीरीक दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले.
युद्धाच्या ठिकाणी पोचण्याआधी काही मिनिटंपर्यंत त्या दारू पिऊन धुंद असत. रात्री दोन तीन वाजेपर्यंत दारू प्याल्या तरी सकाळी उठून त्या कामाला लागत. नाना प्रकारचे शारीरीक आणि मानसीक तणाव असूनही त्या लिहिण्यासाठी खूप फिरत, कष्ट घेत. जमिनीवर, ओंडक्यावर, उघड्या आकाशाखाली त्या झोपत तेव्हां सभोवताली बाँब पडत असत, रॉकेटं कोसळत असत. कोसोवो, लंका, चेचन्या या ठिकाणी त्या अनेक तास, अनेक दिवस दगडाधोंड्यात, पर्वतात, पावसात आणि बर्फात पायी फिरल्या.
कोल्विनसारखी युद्ध पत्रकारी अपदवादानंच वाचायला मिळते.
।।
In Extremis: The Life of War Correspondent Marie Colvin. 
Lindsey Hilsum.
।।

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *