सिनेमा. पाठलाग शैली चित्रपटात आणणारा दिक्दर्शक, फ्रीडकिन.

सिनेमा. पाठलाग शैली चित्रपटात आणणारा दिक्दर्शक, फ्रीडकिन.

फ्रेंच कनेक्शन या ऑस्कर विजेत्या दिक्दर्शकाचा, विल्यम फ्रीडकिन यांचा, ७ ऑगस्टला मृत्यू झाला. फ्रीडकिन स्वतःला व्यावसायिक दिक्दर्शक-निर्माते मानत. मृत्यूपूर्वी काही दिवसच आधी त्यांनी The Caine Mutiny Court-Martial हा चित्रपट पूर्ण केला होता. त्या वेळी, म्हणजे मरणाच्या वेळी त्यांचं वय होतं ८७. 

फ्रीडकिन यांनी २० फीचर फिल्म्स आणि ७ डॉक्युमेंटरी केल्या. त्यांनी टीव्हीसाठी ६ मालिका आणि ४ फिल्म्स केल्या. ऑपेरा या नाट्य प्रकारात त्यांना रस होता, त्यांनी ११ ऑपेरा केले.

फ्रीडकिन प्रसिद्ध झाले ते त्यांच्या फ्रेंच कनेक्शन या चित्रपटामुळं. १९७१ साली या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट ऑस्कर मिळालं. 

फ्रेंच कनेक्शनच्या सुरवातीच्याच दृश्यात एक खून होतो. तो खून संपतो न संपतो तोच पोलीस अधिकारी एका संशयिताचा पाठलाग करतांना दिसतो. दीर्घ पाठलाग. न्यू यॉर्कच्या रस्त्यावरून. रस्ता,इमारत, निर्जन जागा असं करत करत पोलिस संशयिताला पकडतो.

पात्रांची ओळख करून देण्याची ही फ्रीडकिन यांची पद्धत. चित्रपटात पुढं काय दिसणार आहे याची कल्पना पहिल्या काही सेकंदातच येते. 

नंतर चित्रपटात एक लांबलचक पाठलाग आहे. रस्त्याच्या वरच्या बाजूला ट्रेन जात असते आणि रस्त्यावरून एक कार त्या ट्रेनचा पाठलाग करत असते. ट्रेन पुढल्या स्टेशनात पोचण्याच्या आधी कारनं पोचावं आणि ट्रेन थांबल्यावर त्यातल्या गुन्हेगाराला ताब्यात घ्यावं अशी पोलिसांची योजना.

कार कायच्या काय वेगानं जाते. वाटेत ट्रकवर आदळते. वाटेतले कचऱ्याचे ढीग उडवते.सिग्नल लाल झालेला असतो. न जुमानता कार पुढं जाते. एक वयस्क स्त्री मुलाला बाबागाडीतून घेऊन जात असते. त्या स्त्रीला कार कसंबसं चुकवते, त्या खटाटोपात कशाकशाला धक्के मारते.

काही मिनिटांचा हा कार पाठलाग अशा रीतीनं पहिल्यांदाच दाखवला गेला, त्यानंतर पाठलागांची फॅशन झाली. आज बोर्न या नायकानं केलेले थरारक दाखवले जातात. प्रत्येक बोर्नपटात एकापेक्षा अधिक पाठलाग असतात. या थरारांची सुरवात फ्रीडकिननं केली होती.

पाठलाग बारकाईनं पाहिल्यावर न्यू यॉर्कच्या रस्त्यावरची नेहमीची रहदारी दिसते. ती खरी रहदारी आहे. स्टुडियोत रस्ता आणि रेलवे रस्ता तयार करून ही दृश्यं चित्रीत केलेली नाहीत. 

फ्रीडकिनचा अस्सलपणाचा आग्रह असे. सामान्यपणे रस्त्यावर दृश्य चित्रीत करायचं असेल तर वाहतूक थांबवली जाते, एक्स्ट्रा नटांचा वाटसरू म्हणून वापर केला जातो आणि एकूण स्थिती नियंत्रणात ठेवून चित्रीकरण उरकलं जातं. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाते. दृश्यात दिसणारी गर्दीही कृत्रीमच असते. पण फ्रीडकिननी न्यू यॉर्कमधली वाहतूक नेहमीसारखीच ठेवून चित्रीकरण केलं. अनेक कॅमेरे लावून तुकडे तुकडे चित्रीत केले, नंतर ते तुकडे एकत्र जोडून दृश्याला वेग आणून दिला. पण या खटाटोपात त्यांनी कायदे मोडले, अत्यंत धोकादायक अशा रीतीनं ते वागले. अपघात होण्याची शक्यता होती. त्यांचं दैव थोर की त्यांनी या चित्रीकरणात केलेली धाडसं, स्टंट्स, सुखरूप पार पडले. लाल सिग्नल धुडकावून चित्रीकरण केल्याबद्दल त्यांच्यावर न्यू यॉर्कचे पोलिस खटला भरू शकले असते. 

फ्रीडकिनच्या अस्सलपणाच्या आग्रहामुळं चित्रपटाचा खर्च खूप वाढत असे. एका चित्रपटात दृश्य असं होतं. ट्रक एका मोडकळीला आलेल्या लाकडी पुलावरून जात असतो. पुलाखाली नदीला पूर आलेला असतो. फ्रीडकिननी नदी, पूल इत्यादी गोष्टी अगदी खऱ्या वाटाव्या अशा तयार केल्या. पडद्यावर जसे धोके दिसायला हवेत, जो थरार दिसायला हवा होतो तो नव्वद टक्के प्रत्यक्षात फ्रीडकिननी तयार केला होता. चित्रीकरणाच्या वेळी एक नट खरोखरच नदीच्या प्रवाहात कोसळला आणि ट्रक खरोखरच हिंदकळत होता.

फ्रेंच कनेक्शनची कथा अशी. फ्रान्समधून हेरॉईन अमेरिकेत स्मगल होणार असतं. दोन अमेरिकन पोलिस अधिकाऱ्यांना ती बातमी मिळते. ते तपास सुरु करतात. अडथळे येतात. थरारक पद्धतीनं पोलिस हेरॉईन पकडतात. त्या खटाटोपात गुन्हेगार आणि त्यांना मदत करणारे सापडतात,तुरुंगात रवाना होतात. पण मुख्य गुन्हेगार मात्र पळून जातो.

फ्रेंच कनेक्शनला १९७१ साली ऑस्कर मिळालं. १९७२ साली पहिल्या गॉडफादरला ऑस्कर मिळालं. १९७४ साली दुसऱ्या गॉडफादरला ऑस्कर मिळालं. म्हणजे फ्रेंच कनेक्शन हा गॉडफादरच्या आधीचा चित्रपट ठरतो. 

  माफियाला राजकीय संरक्षण असतं, राजकीय पक्षाचे पुढारी त्यात गुंतलेले असतात, राजकीय पुढारी आणि सरकारी यंत्रणा यांची हात मिळवणी असते या गोष्टींचे बारकावे गॉडफादर दाखवतो.  माफियामधे एक फॅमिली नावाची कल्पना असते. फॅमिलीचा प्रमुख, डॉन कॉर्लिओन, कुटुंब (व्यक्तिगत आणि धंद्यातलं) कसं बांधून ठेवतो याचं खूप बारकाईचं चित्रण गॉडफादरमधे आहे. व्यक्तिचित्रं फार बारकाईनं कोपोलानं उभी केलीत. गुन्हेपटांची एक स्वतंत्र शैलीच गॉडफादरनं तयार केली. 

फ्रेंच कनेक्शनमधे गॉडफादरची शैली नाही पण पोलिस आणि गुन्हेगारी यातल्या संबंधांची थरारक सुरवात फ्रेंच कनेक्शननं केलीय. 

गुन्हेपटातला हिंसेचा थरार बोनी अँड क्लाईडनं प्रथम दाखवला. चित्रपट कलेला त्या चित्रपटानं एक नवं वळण दिलं. त्या शैलीतला पुढला एक टप्पा फ्रेंच कनेक्शननं सुरु केला. पाठलाग हे त्या टप्प्याचं वैशिष्ट्यं. गॉडफादर पाठलागाच्या पाठी लागला नाही, गॉडफादरनं व्यक्तीचित्रं रंगवली, व्यक्तींचे कंगोरे आणि व्यक्तीव्यक्तीमधल्या संबंधांतले बारकावे दाखवले.

फ्रेंच कनेक्शननं फ्रीडकिनना प्रसिद्ध जगात खूप उंचावर नेऊन ठेवलं. ऑस्कर मिळालं की त्या उंचीवर टिकून रहाणं, अधिक उंचीवर जाणं अशी खटपट दिक्दर्शक करतात. साहजिक आहे. फ्रीडकिननी एक्झॉर्सिस्ट हा भयपट निर्माण करून प्रतिष्ठा टिकवायचा प्रयत्न केला. एक्झॉर्सिस्ट हा चित्रपट गाजला, भयपटाची एक शैली त्यातून निर्माण झाली. पण फ्रीडकिन त्यातून पुढे जाऊ शकले नाहीत. प्रतिष्ठित नसलेल्या जगाकडं ते वळले. अल पचिनोला घेऊन त्यांनी क्रुझिंग हा चित्रपट केला. चित्रपट चांगला होता पण फ्रेंच कनेक्शनची सर चित्रपटाला आली नाही.

अमेरिकेत व्यावसायिक दिक्दर्शकांची एक मोठ्ठी परंपरा आहे. चित्रपट हा एक व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय म्हणूनच पार पाडताना जे काही करावं लागतं ते ते व्यावसायिक दिक्दर्शक करतात. रिकामं रहायचं नाही, कारण रिकामं रहाणं परवडत नाही. चांगलं कथानक सापडलं नाही तरी चालेल,मिळेल ते कथानक घेऊन सिनेमा करायचा. कलात्मकता इत्यादींची चैन ते दिक्दर्शक करत नसतात. त्या परंपरेतले उतार वयात अगदी शेवटल्या दिवसापर्यंत चित्रपट करत होते.

माणूस व्यवसायिक असतो पण त्याच्यात एक कसब निश्चितपणे असतंच. त्यामुळं त्याच्या हातून चांगले चित्रपटही होतातच. फ्रेंच कनेक्शन हा फ्रीडकिन यांचा चांगला चित्रपट. अमेरिकन चित्रपट इतिहासात फ्रेंच कनेक्शनची एक महत्वाचा चित्रपट म्हणून नोंद झाली आहे, ती सार्थ आहे.

।।

Comments are closed.