दिनानाथ बात्रा या एका शाळेच्या हेड मास्तरना 1999 साली सत्तेत आलेल्या
भाजपनं इतिहास पुनर्लेखनाच्या कामी नेमलं. पाठ्य पुस्तकाचं पुनर्लेखन ही त्यांची
जबाबदारी. त्यांनी पाठ्यपुस्तकातून जात आणि गोमांसभक्षणाचे उल्लेख वगळले. इतरही
अनेकानेक बदल केले. त्यातला एक बदल म्हणजे प्राचीन भारतात विमानं आणि अणुबाँब
होते.
बात्रा यांना हव्या असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त सगळ्या गोष्टी वगळणं आणि
त्या गोष्टी कुठंच प्रसिद्ध होता कामा नयेत अशी मोहीम त्यांनी सुरू केली. त्या
मोहिमेचा एक भाग म्हणून वेंडी रॉजर यांचं The Hindus. An Alternative
History या
पुस्तकावर बंदी घालायची मागणी केली, प्रकाशक पेंग्वीन यांच्यावर खटला भरला.
पेंग्वीननं या पुस्तकाच्या भारतातल्या प्रतींचा लगदा करायला मान्यता दिली.
पेंग्वीननं पळ काढला.
बात्रा यांचं म्हणणं काय होतं? ” 
पुस्तकात युवकांचे आयकॉन स्वामी विवेकानंद यांची बदनामी आहे. लेखिकेनं
लिहिलं आहे की ‘ जेव्हा विवेकानंदांना विचारलं की त्यांना काय खायचं आहे तर ते
म्हणाले गोमांस ‘.
विवेकानंदांचं हे विधान असंख्य ठिकाणी भारतात असंख्य लेखकांनी कोट केलं
आहे, विवेकानंदांच्या प्रसिद्ध साहित्यातही ते आहे. परंतू बात्रा आणि त्यांच्या
पाठी उभ्या असलेल्या राजकीय संघटनेला ते सोयीचं नाही म्हणून पुस्तकाचा लगदा.
रामायण अनेकांनी, अनेक काळांत लिहिलं आहे हा जगानं मान्य केलेला, भारतात
असंख्य लोकांनी असंख्य वेळा मांडलेला विचार हिंदूंची मनं दुखावतो हाही पुस्तकावर
बंदी घालण्याचा मुद्दा होता.
भाजप-हिंदुत्व परिवार रस्ते बांधणार असेल, वीज आणि पाणी देणार असेल,
रोजगार निर्माण करणार असेल तर ते चांगलं आहे. पण इतिहास, साहित्य, धर्मविषयक- संस्कृतीविषयक
गोष्टी अशा रीतीनं भरडणार असेल तर ते योग्य नाही. आंबेडकरांच्या सर्व पुस्तकांचा
लगदा करावा लागेल. ते घातक आहे.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *