नटवरसिंग

नटवरसिंग

आत्मकथनांमधून सार्वजनिक संस्थांची प्रकृती समजायला मदत होते.
नटवर सिंग यांचं one life is not enough हे आत्मकथन प्रसिद्ध झालंय. नटवरसिंग पूर्वी परदेश मंत्री होते. इराकबरोबर तेलाच्या बदल्यात अन्न व्यवहार प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं. नंतर ते पक्षाच्याही बाहेर पडले. गेली काही वर्षं ते राजकीय विजनवासात आहेत.
आत्मकथन  प्रसिद्ध होणार असं कळल्यावर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी नटवरसिगांना जाऊन भेटल्या आणि प्रसिद्ध करू नका अशी विनंती केली असं म्हणतात. त्यांना सुगावा लागला होता की त्यांचे उल्लेख कथनात असणार. एकादं आत्मकथन संपादित होत असतं तेव्हां प्रकाशकाला आणि लेखकाला रहावत नाही. ते मित्रांकडं, पत्रकारांकडं काही गोष्टी पेरतात, ठरवून किंवा अनवधानानं. त्यानंतर समाजातली बडी मंडळी, कथन करणाऱ्या व्यक्तीच्या आसपासच्या  मंडळीना आपल्यावर काय आलंय याची उत्सूकता असते. सांगत्ये ऐका प्रसिद्ध होणार होतं तेव्हां हंसा वाडकरांना, प्रकाशकांना बड्यांचे फोन जात, माझ्यावर काही नाहीयेना असा प्रश्न विचारीत. आत्मकथन प्रसिद्ध झालं रे झालं की पाच सात हजार मंडळी ते विकत घेऊन प्रथम इंडेक्स पाहून आपले उल्लेख कुठं आणि कसे आहेत ते पहातात.
कथन गाजतय. त्यात नटवर सिंगांनी लिहिलेली त्यांची काही मतं आणि निरीक्षणं अशी आहेत. सोनिया गांधींना काँग्रेसमधे राणीसारखं वागवलं जातं, काँग्रेस पक्षाच नेतृत्व एकाद्या राजघराण्यासारखं असतं. सोिनयांचा काँग्रेसवरचा प्रभाव नेहरूंपेक्षाही जास्त आहे.सोनिया गांधींनी पंतप्रधानपद आतल्या आवाजामुळं नाकारलं नसून त्यांच्यावर राहुल गांधींचा दबाव होता, राजीव-इंदिराजीचे खून झाले त्याची पुनरावृत्ती होईल असं राहूलना वाटत होतं. सुरवातीला सोनिया बुजऱ्या, घाबरट आणि न्यूनगंडी होत्या; नंतर त्या महत्वाकांक्षी, हुकूमशहा आणि कठोर झाल्या. वरून त्या आपण कोणी तरी आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत पण आतून त्या अगदीच सामान्य आहेत, असुरक्षितता गंडानं पछाडलेल्या आहेत. 
नटवरसिंगांच्या कथनात लक्षात रहाणारा ठळक भाग म्हणजे ते म्हणे सोनिया गांधींच्या अगदी जवळच्या लोकांत होते. त्या पंतप्रधानपद घेणार नाहीत हे फक्त नटवरसिंग आणि मनमोहन सिंग यांनाच माहीत होतं. जयराम रमेश, अर्जुन सिंग, नरसिंह राव ही मंडळी सोनिया गांधींच्या मनातून उतरल्यावर नटवरसिंग यानी मध्यस्थी करून त्यांना वाचवलं होतं. पैकी अर्जुनसिंग, जयराम रमेश वाचले पण नरसिंह रावसंबंध सुधारले नाहीत. वगैरे.
कथन प्रसिद्ध झाल्यावर काँग्रेस पुढारी आणि सोनिया गांधी नटवरसिंगांवर तुटून पडल्या. खरं काय आहे ते मी आत्मचरित्र लिहीन त्यात उघड करीन असं सोनिया गांधी म्हणाल्या. माध्यमात सिंगांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या, पुस्तकावर मतं प्रसिद्ध झाली. ते साहजिक होतं. सत्तेत वावरलेली, श्रीमंत, गाजलेली, महत्वाची माणसं आत्मकथन करतात तेव्हां त्यातून त्या व्यक्तींचा कालपट उभा रहातो, समकालीन व्यक्तीबद्दलची मतं कळतात, लिहिणारी व्यक्ती काय आहे त्याचाही काही सुगावा त्यातून लागतो. कथनात काही चमत्कारीक, वादग्रस्त, स्फोटक विधानं असतील तर चर्चा होते आणि पुस्तकं खपतात. लेखक आणि प्रकाशकाला चार पैसे मिळतात. ब्रिटीश प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांच्या पत्नीचं कथन प्रसिद्ध झालं. त्यात खरं म्हणजे अगदीच सामान्य गोष्टी होत्या. परंतू एकदा चेरी ब्लेअर राणीकडं रहायला गेल्या तेव्हां त्या कुटुंब नियोजनाची साधनं बरोबर घ्यायला विसरल्या. त्यामुळं त्या दोन दिवसातल्या खटपटीअंती गरोदर राहिल्या असं त्यांनी लिहिलं. लोकांना हे धमाल विधान आवडलं, तेवढयासाठी लोकांनी कथन वाचलं पण त्यात लोकांना काही विशेष सापडलं नाही.
काही तरी सांगण्यासारखं असतं म्हणून माणसं स्वतःबद्दल लिहितात. कोणाची जुनी खदखद असते. कोणाचे पूर्वग्रह असतात. कोणी प्रांजल असतो. सनदी अधिकारी, राजकारणी लोक जेव्हां कामात असतात तेव्हां त्यांना मर्यादांचं पालन करावं लागतं, बोलता येत नाही. त्यामुळं निवृत्त झाल्यावर ती माणसं बोलतात. त्यांचं बोलणं त्यांच्या आठवणींवर आधारित असतं. परंतू या आठवणींना आधार कोठला असतो? सविस्तर टिपणं लिहिलेली असतात? की केवळ ते मनावर ठसलेले प्रसंग हाच आधार असतो? अगदी टिपणं असली तरीही ती शेवटी त्या माणसानं घेतलेल्या अनुभवांची टिपणं असतात. त्या वेळची माणसाची मनस्थिती, राग लोभ यावर ती टिपणं आधारलेली असतात. ती अनेक बाजूंपैकी  एक बाजू असते. त्यामुळं बहुतेक वेळा या आत्मकथनामधून त्या माणसाची बाजूच कळते, समतोल मत कळत नाही. घटना, माणसं यांच्या इतर बाजू कळल्यानंतरच वाचक सत्यापर्यंत जाऊ शकतो.
जयराम रमेश यांना आपण वाचवलं असं नटवर म्हणतात. जयराम रमेश यांची वेगळीच बाजू शक्य आहे. नटवरनी मध्यस्थी केली असं सोनियांच्या खिजगणतीतही नसेल.
मनमोहन सिंग यांचे माध्यम सचीव संजय बारू यांनी accidental prime minister हे आत्मकथन लिहिलंय. ते मनमोहन सिंगांचे जवळचे होते, कारण तसं त्यांचं कामच होतं. प्रधानमंत्र्याना माहिती देणं, मागितल्यास सल्ला देणं हे त्यांचं कामच होतं. मनमोहन सिंग आणि  सोिनया गांधी यांच्यातले संपर्क-विचार-संवाद यांच्यात त्यांचा काही एक वाटा होता. त्यांच्या कथनात नटवरसिंगांचे उल्लेख आढळत नाहीत. म्हणजे नटवर कोणी होते असं त्यांच्या कथनात दिसत नाही. नटवर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्या प्रकरणाचा उल्लेखही बारू यांच्या कथनात नाही. बारू लिहितात ‘ मनमोहन सिंग व्यक्तिगत पातळीवर जी नीतीमत्ता कसोशीनं पाळत ती आपल्या सहकारी मंत्र्यांच्या बाबतीत दुर्लक्षीत करत. स्वतःवर भ्रष्टाचाराचा डाग पडणार नाही असं वागत परंतू आपल्या मंत्र्यानी भानगडी केल्या तर त्यावर ते कारवाई करत नसत, त्यांचं त्यांनी पाहून घ्यावं, सोनिया गांधींनी व इतरांनी त्या बाबतीत काय वाट्टेल ते करावं असा त्यांचा खाक्या होता.’ हे लिहिणारे बारू त्या काळात गाजलेल्या नटवरसिंग प्रकरणाचा उल्लेख करत नाहीत.
प्रे. बुश यांचे उपराष्ट्रपती डिक चेनी यांचं in my time हे आत्मकथन नुकतंच प्रसिद्ध झालंय. तेही गाजतय. अकरा सप्टेंबर च्या घटनेनंतर अमेरिकन सरकार आणि राज्यव्यवहारात फार बदल घडले. ग्वांटानामो बे तुरुंग गाजला. तिथं संशयितांना फार अमानुष वागणूक दिली जाऊ लागली. दुसरं म्हणजे अमेरिकन लोकांची फोन, इंटरनेटवरची बोलणी-लिहिणी चोरून ऐकणं आणि नोंदणं सुरु झालं. या माहितीला मेटाडेटा म्हणजे आदिमाहिती म्हणतात. राज्यव्यवहारातल्या या दोन्ही गोष्टी मानवता, मानवी अधिकार, नागरी अधिकार, अमेरिकन घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य पायदळी तुडवणाऱ्या होत्या. हा उद्योग डिक चेनी यांनी केला असा आरोप होता. चेनींनी आपल्या आत्मकथनात ‘आपण केलं ते योग्यच केलं, कारण आपण तत्वाचं पालन करतो’ असं लिहिलं. नेमकं त्याच सुमारास बुश यांचं आत्मकथन प्रसिद्ध झालं. त्यामधे चेनी यांनी टिपलेल्या घटनांचा उल्लेखही काही ठिकाणी नाही, चेनी म्हणतात तसं घडलेलं नाही असं बुश लिहितात. मेटाडेटा गोळा करणं आपल्याला काही काळ थांबवावं लागलं याचं कारण आपल्यावर कायदा विभागाचा-न्याय विभागाचा दबाव होता आणि असं करणं अमेरिकन संसदीय परंपरेचा भंग करणारं ठरलं असतं असं बुश सुचवतात. राशोमान या अकिरा कुरोसेवा या जपानी दिग्दर्शकाच्या चित्रपटाची आठवण येते. एकच घटना पण माणसांना ती किती वेगळी दिसते याचं चित्रण या अद्भूत सिनेमात केलं आहे.
नटवर सिंगांच्या आत्मकथनातले उल्लेख काहीसे वरवरचे आहेत. त्या मानानं संजय बारू यांनी लिहिलेले अनुभव अधिक बांधीव आहेत, वाचकाला परिस्थिती कळू शकते इतके बरेपणानं लिहिलेले आहेत. मनरेगा कायदा कसा घडत गेला, त्याचं खरं श्रेय कोणाला होतं, राहुल गांधी यांना त्यांचं श्रेय देण्याची काँग्रेसी मंडळींची खटपट ही घटना बारू यांनी सविस्तर मांडली आहे. मनमोहन सिंगांकडं काय घडलं, पत्रकार परिषदांमधे काय घडलं, काँग्रेस पक्षामधे काय घडलं या गोष्टी त्यांनी दिलेल्या असल्यानं बारू यांचं म्हणणं बऱ्यापैकी समजतं. रॉबर्टस गेट्स या अमेरिकेच्या संरक्षण सचीवानं आत्मकथन केलं, त्यात त्यानं ओबामाचे उपराष्ट्रपती जो बायडन यांची धुलाई केली. ती धुलाई इतकी तपशीलवार होती की राष्ट्रपती भवनातून केवळ एक ओळीचं स्पष्टीकरण दिलं गेलं- लेखक म्हणतो तसं घडलेलं नाही.
लेखनाला एक बाज असतो. त्यातून लेखकाबद्दल काही गोष्टी समजतात. नटवर सिंग काहीही म्हणोत ते उठवळ आहेत, आपल्याला सत्तेतून हाकललं गेल्याची ठसठस त्यांच्या लिखाणात दिसते. संजय बारू यांचं लिखाण स्वतःभोवती नसून मनमोहन सिंग यांच्याबद्दलची ममता, काँग्रेस पक्षावरचा आणि घराणेशाहीचा राग यातून आकारलेलं आहे हे बारू यांच्या लिखाणावरून समजतं. 
काँग्रेसपक्ष घराणेशाहीनं किडलेला आहे, सोनिया गांधी महाराणीसारख्या आणि राहूल राजपुत्रासारखा वागतो, मनमोहन सिंग स्वच्छ आहेत, मनमोहन सिंग सोिनयांच्या ताटाखालचे मांजर आहेत या गोष्टी नटवरसिंग किंवा संजय बारू यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. त्या गोष्टी जनता दररोज अनुभवते आहे. सिद्ध झालेल्याच गोष्टी या कथनातून येतात. पण तरीही वाचक ही पुस्तकं वाचतो कारण त्या अनुभवांचा पोत, घडण, घटनाक्रम, तपशील वाचकाला वाचावासा वाटतो. आत्मकथनाच्या मर्यादा माहीत असूनही, आत्मकथन ही आत्मप्रौढी असते आणि ते स्वपक्षपाती असतं हे वाचकाला कळतं. आत्मकथनात गाळसाळ खूप असते आणि त्यात खोटेपणाही असतो हेही वाचकाला समजतं. तरीही वाचकाला, अभ्यास करणाऱ्या माणसाला आत्मकथनं वाचावीशी वाटतात कारण त्यातून वाचकाची समजूत तयार व्हायला मदत होते.
मनमोहन सिंग पंतप्रधान कार्यालयातल्या फायली सोनियांकडं पाठवत असत ही घटना बारूंच्या पुस्तकातून कळते. नारायणन नावाचा हेरगिरी खात्याचा अधिकारी पंतप्रधान कार्यालयात काम करतांना मंत्र्यांना कसं दटावतो, त्यांची गुप्तमाहिती आपल्याजवळ आहे असं सांगून ब्लॅकमेलिंग कसं करतो ही माहिती बारू यांच्या पुस्तकात आहे. आपल्या देशातलं सरकार अशा रीतीनं काम करतं? मंत्री हा घटनेची शपथ घेऊन काम करतो. मंत्री नसलेल्या लोकांवर ती घटनात्मक जबाबदारी नसते, त्यामुळं सरकारी कामकाजाची माहिती मंत्री पदाची शपथ न घेतलेल्या माणसाकडं जाणं ( सत्तेबाहेरच्या सत्ता केंद्राकडं जाणं. सोनिया गांधी, बाळ ठाकरे, मोहन भागवत इ. ) कितपत योग्य असे प्रश्न बारू-नटवरसिंग यांच्या आत्मकथनातून निर्माण होतात.
अमेरिकेमधे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी घटना आणि नागरिकांचे अधिकार जपण्यासाठी कमिट्या तयार केल्या आहेत. या कमिट्या सेना-पोलिस-न्यायव्यवस्था-गुप्तवार्ता संघटना यांच्या वागण्यावर लक्ष ठेवत असतात. न्यायव्यवस्थेचीही रचना नागरिकाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी करण्यात आलेली आहे. परंतू राज्यघटनेनंच राष्ट्रपतीलाही स्वतंत्रपणे अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती नागरी अधिकार पायदळी तुडवू शकतो. संसद, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रपती या तीन संस्थामधे एक तोल अमेरिकन राज्यघटनेनं निर्माण केला आहे. तसाच तोल भारतातही राज्यघटनेनं तयार केलेला आहे. हा तोल अमेरिकेत बुश यांनी डिक चेनींच्या आग्रह व अनुभवाचा फायदा घेऊन बिघडवला. तोल बिघडल्यावर काय घडू शकतं याचं दर्शन अमेरिकेच्या इराकमधल्या वर्तणुकीवरून लक्षात आलं. अब्जावधी डॉलर, अमेरिकी आणि इराकींचे हज्जारो जीव यांचा बळी गेला. तालिबान, अल कायदा आणि पाकिस्तानी तालीबान यांचा जन्म आणि विकास अमेरिकेनं बिघडवलेल्या तोलात दडलेला आहे. हा तोल बिघडण्याची प्रक्रिया बुश-गेट्स-चेनी आत्मकथनातून लक्षात येते. सोनिया गांधी किंवा आणखी कोणी बदनाम होत असतील तर त्याची चिंता नागरिकांना करण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस पक्षाचे वाभाडे निघणार असतील तर त्याची काळजी काँग्रेस पक्षानं घ्यावी, त्याची चिंता जनतेनं, माध्यमांनी करण्याची आवश्यकता नाही. अशा आत्मकथनातून समाजाचं नियंत्रण करणाऱ्या संस्थेची प्रकृती वाचकाला काही प्रमाणात कळते.  समाज नियंत्रण करणाऱ्या संस्थांची प्रकृती सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार वाचकानी आणि माध्यमांनी अशा आत्मकथनांच्या चर्चेमधून करायला हवा.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *