ताराबाई मेढेकर

ताराबाई मेढेकर

औरंगाबादच्या ताराबाई मेढेकर गेल्या. मेढेकर गाडीचं एक चाक, अप्पा मेढेकर, काही दिवसांपाठीच निखळलं. ताराबाईंच्या निधनानं दुसरंही निखळलं.
जगात कोणाचंही काहीही बाकी न ठेवता ताराबाई गेल्या. सारं बेबाक करून गेल्या.
ताराबाईंचा संसार मोठा होता. दीर, नणंदा, मुलं सर्वांचे संसार उभे करण्यासाठी त्या कंबर कसून उभ्या होत्या. लग्नं, डोहाळे जेवणं, बारशी, शिक्षण, सणसोहळे, आजार पाजार, संकटं. प्रत्येक गोष्टीत त्या न बोलता, आनंदानं उभ्या असत. ही झाली त्यांच्या नात्यातली, सख्खी माणसं. अप्पासाहेबांमुळं, हैदराबाद स्वातंत्र्य  चळवळीमुळं तयार झालेली नाती वेगळीच. किती तरी माणसं. त्यांच्या त्यांच्या घरातले प्रश्न. जमेल तशी ताराबाई मदत करत असत.  
 कधी कशाचा गवगवा नाही. देवासमोर पूजा करतांना किंवा कसल्याशा पोथ्या वाचत असताना केवळ ओठ हलतांना दिसत, आवाज म्हणून नाही. एकीकडं कसलंसं स्त्रोत्र किंवा काही तरी पुटपुटणं आणि त्याच बरोबर घरातली कामं. केरवारा. कपडे वाळत घालणं. चहा टाकणं. भाजी चिरणं. मधेच कोणी काही विचारलं तर हातानं फक्त खुणावत, येवढं स्तोत्र संपलं, पोथी संपली की बोलेन, तोवर जरा थांबा. सारं आयुष्य त्यांनी अशा तऱ्हेनं कमीत कमी बोलत, कामं पार पाडत पार पाडलं.
हैदराबादच्या चळवळीत अप्पासाहेब मेढेकर कार्यकर्ते होते. अनंतराव भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, गांजवे, चारठाणकर, कौसडीकर, अशा कार्यकर्ते-नेते मंडळीच्या आसपास अप्पा मेढेकर होते. दिवस कठीण होते. भूमिगत कामं करावी लागत होती. उत्पन्न तर नव्हतं, घरची परिस्थिती कधीच चांगली नव्हती. अशा स्थितीत संसार नीट चालवणं म्हणजे दिव्यच होतं. रक्ताची नाती होतीच पण त्या बरोबर दररोज कार्यकर्त्यांचा, िमत्रांचा राबता असे. वेळी अवेळी कोणीही घरी टपकत असे. कधी एकटं, कधी सकुटुंबं. दररोजच हे घडत असे. आलेला कोणीही माणूस घरात उपाशी राहिला नाही. चारठाणकर, कहाळेकर महाराज, अनंतराव भालेराव अशी मोठी माणसं असोत की एकादा समवयस्क कौसडीकर असो, घरात पाऊल पडलं की गप्पा-कामांचा राडा सुरु होई. चहा, न्याहरी, जेवण आणि एकाद्या गरजूला चार पैसे किंवा एकादी वस्तू. हे सारं ताराबाई सांभाळत असत.
आता बसेस, रेलवेच्या सोयी झाल्या आहेत. पन्नास वर्षापूर्वी सोयी नव्हत्या. दूरवरून माणसं अवेळी पोचत. रात्री दरवाजा वाजे. ताराबाई उठत.  माणसं दूरवरून आलेली असत, कित्येत तासाच्या प्रवासानंतर. हॉटेलं नव्हती, घरून आणलेल्या दशम्याही संपलेल्या असत. ताराबाई प्रथम भाकरी आणि पिठलं टाकत असत. आलेलं माणूस जायला निघे तेव्हांही भाकरी नाही तर धपाटे बांधून देत असत.
महिन्याचं बजेट कसं सांभाळलं जाई? शिवाय मुलं, नणंदा, दीर यांचेही संसार. श्रीमंती नव्हती, पण कधी काही कमीही पडू दिलं नाही.
अप्पा मेढेकर कार्यकर्ते होते, अनुयायी होते. गोविंदभाई, अनंतराव, स्वामीजी, वैशंपायन, चारठाणकर अशा कोणाही ज्येष्ठ नेत्यानं सांगितलेलं काम पार पाडत असत. पूर्ण निष्ठा. आणि ताराबाईंची अप्पासाहेबांवर पूर्ण निष्ठा. हैदराबाद चळवळीचं राजकीय व इतर महत्व त्यांना एकादेवेळेस कळलं नसेल. त्या पुढारी नव्हत्या, इंटलेक्चुअल नव्हत्या. पण वर उल्लेख केलेले नेते आणि पती मेढेकर आणि सभोवतालचा कार्यकर्त्यांचा गोतावळा सुखात ठेवणं ही त्यांची निष्ठा होती. त्यांनी कधी हे बोलून दाखवलं नाही की लिहिलं नाही. पण ते दिसत होतं.
चळवळी उभ्या रहातात, यशस्वी होतात. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखे नेते आणि अप्पासाहेब मेढेकर यांच्यासारखे कार्यकर्ते यांच्यामुळे. ते खरंच. पण ही माणसंही उभी असतात, टिकतात  ती ताराबाईंसारख्या व्यक्तीमुळं. 
जशा ताराबाई तशाच अनंतराव भालेराव यांच्या पत्नी, सुशीलाबाई. सुशीलाबाई ताराबांइंपेक्षा वयानं मोठ्या. सेलूच्या माई चारठाणकर. त्या साधारणपणे सुशीलाबाईंयेवढ्याच. स्वभावात फरक होता, बोलण्यात फरक होता, व्यक्तीमत्वांना वेगवेगळे कंगोरे होते. पण कर्तृत्व सर्वांचंच सारखं. अत्यंत अभावाच्या परिस्थितीत, कष्टानं त्यांनी आपापले आणि आसपासच्या लोकांचे संसार उभे केले. चळवळींचे खांब झाल्या. ताराबाईंचे व्याही, पन्नालाल सुराणा. त्यांच्या पत्नी वीणाताई सुराणा. त्याही तशाच. पन्नालालजी आयुष्यभर सामाजिक कार्य करत राहिले आणि समाजवादी चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाची काळजी वीणाताई घेत राहिल्या.
सभोवताली जीवनाची रहाटी चालली असते आणि हिकडं या स्त्रिया खस्ता खात, कष्ट करत आणि तरीही आनंदानं आपले आणि समाजाचे संसार चालवत असतात.  त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांनाच या स्त्रिया माहित असतात. साहित्य, पत्रकारी, चित्रपट, माहिती पट, व्हिडियोपट या साधनांमधून अशी माणसं दिसायला हवीत. कधी कधी दिसतातही. पण अमळ कमीच. अनंतराव भालेराव यांनी लिहिलेल्या अग्रलेखातून, पुस्तकांतून त्यातली कित्येक व्यक्तीमत्व अजरामर झाली आहेत. 

ताराबाई गेल्या, त्यांच्यावर अग्रलेख लिहायला अनंतराव नाहीत. अनंतराव नाहीत, त्यांचा मराठवाडाही नाही.

One thought on “ताराबाई मेढेकर

  1. सुंदर आणि भावपूर्ण लेख आहे ! तारा बाई नात्याने माझ्या मामी , त्या मुळे लहान पणा पासून खूप सहवास मिळाला …अनेक आठवणी डोळ्या समोर येउन जातात।

    "मेढेकर गाडीचं एक चाक, अप्पा मेढेकर, काही दिवसांपाठीच निखळलं. ताराबाईंच्या निधनानं दुसरंही निखळलं" अगदी प्रत्येकाच्या मनातल अचूक लिहिलत …

    http://kulkarnyanchilekhani.blogspot.in/2014/10/blog-post.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *