आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स मानवी समाजाचा नाश घडवून आणेल असं पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणाले आहेत.  कॉन्वर्सेशन नावाच्या एका नियतकालिकात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. माणसानं यंत्राला बुद्दीमत्ता दिल्याचा हा परिणाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 
यंत्रं म्हणजे काय होतं? एकमेकांत गुंतवलेली दातेरी चक्रं. आसाभोवती फिरणारी चाकं. पुढं मागं किंवा गोलाकार फिरणारे दट्ट्ये. हातानं नाही तर विजेवर चालवलेली यंत्रं. एकादं यंत्रं सूत कातत असे.एकादं यंत्रं कापड विणत.एकादं यंत्रं चाक फिरवत असे. एकादं यंत्रं भोकं पाडत असे. एकादं यंत्रं वस्तू जुळवत असे किंवा कापत असे. आपण ठरवून दिलेली कामं यंत्रं पार पाडत असे. हातानं चालवलं जाणारं, हाताला दूर न सारणारं ते उपकरण असे. विजेवर चालणारी यंत्रं सुरू झाली, गिरण्या सुरू झाल्या. थोरो इत्यादी मंडळी जोरात म्हणू लागली की  यंत्रं माणसाला गुलाम करणार आहेत, माणसाचे हात निकामी करणार आहेत, मानवी संस्कृतीचा नाश करणार आहेत. 
तसं झालं नाही. यंत्रं मानवी जीवनाचा घटक झाली, यंत्रांनी माणसाच्या जगण्यात सुख आणलं.
अलन टुरिंग या माणसानं शून्य आणि एक या दोन चित्रांचा वापर करून कंप्यूटर ( 1950) तयार केला. यंत्राकडून कामं करून घेण्याला एक वेगळी दिशा दिली. त्यातूनच पुढं कंप्यूटरला देणारी आज्ञावली, सॉफ्टवेअर तयार झालं. एकाद्या प्रश्नाचं उत्तर पावलापावलानं देण्याचं अलगोरिदम तयार झालं. या दोन्हीचा उपयोग करून कंप्यूटर वेगानं माहितीचं विश्लेषण करू लागला. विश्लेषण करून उत्तरं सांगू लागला.  विश्लेषण आणि उत्तरं, निष्कर्ष ही कामं माणसाचा मेंदू करत असे. मेंदूचं हे काम कंप्यूटर करू लागला म्हणजेच कंप्यूटरला बुद्धीमत्ता आली मानलं जाऊ लागलं. 
डीप ब्ल्यू या नावाच्या कंप्युटरनं कास्पारोव या बुद्दीबळ पटूला खेळात हरवलं.झालं.   माणसाच्या मेंदूला डीप ब्ल्यू हरवू शकत असेल तर तोच डीप ब्ल्यू  माणूस नष्ट करणारी शस्त्रास्त्रं निर्माण करून अख्खी मानव जातच नष्ट करेल असं  लोकं म्हणू लागले. 
 आज ड्रोन  विमानं इराक, पाकिस्तान, इराणमधे शत्रू हुडकतात, नष्ट करतात. गुगलची ड्रायव्हरविना चालणारी कार अमेरिकेत फिरू लागली आहे. माणूस  जे जे काम करतो ते ते काम करणारे रोबो तयार झाले आहेत. याचा अर्थ असा घेतला जातो की ते रोबो, ती गूगल कार, तो ड्रोन स्वतः स्वतंत्रपणे विचार करता, एक स्वतंत्र विचार करणारे प्राणी होतात. उद्या माणसाच्या मेंदुला पर्याय, मेंदूसारखाच मेंदू यंत्राच्या रुपात माणूस तयार करेल आणि हा मेंदु पुढं घात करेल अशी भीती लोकांना वाटतेय.
ही भीती कितपत खरी आहे?
स्टीफन हॉकिंग याना मोटर न्युरॉन रोग झाला आहे.  त्यांच्या शरीराची हालचाल करण्याची क्षमता  नष्ट झाली आहे. त्यांचा मेंदू शाबूत आहे. ते विचार करू शकतात,हालचाल  करू शकत नाहीत, यंत्रं  आणि उपकरणं त्यांना चालवतात, हलवतात. ते विचार व्यक्त करू शकतात कारण त्यांच्यासाठी एक भाषक व्यवहार करणारा कंप्यूटर तयार करण्यात आला आहे. कंप्यूटरच्या पडद्यावर शब्द उमटतात. हॉकिंगना ते दिसतात. त्यातला योग्य शब्द ते निवडतात. निवडलेल्या शब्दांतून त्यांच्या विचारांची दिशा कंप्यूटरच्या लक्षात आलेली आहे. भाषेत उपलब्घ असलेल्या लाखो शब्दांतून कंप्यूटरनं हॉकिंग यांच्या विचाराना उपयुक्त ठरेल असे शब्द बाजूला काढले आहेत. त्यांच्यापासून कंप्यूटरमधला सॉफ्टवेअर  वाक्य तयार करतो.     वर उल्लेख केलेला लेख त्यांनी अशाच पद्धतीनं लिहिलेला आहे.
एक प्रश्न असा निर्माण होतो की हॉकिंग यांचं मन लिहिणारा कंप्यूटर त्यांना नष्ट करून टाका असा आदेश एकाद्या नाशक यंत्राला देऊ शकेल काय?
सोलोमोनॉफ या ब्रिटीश वैज्ञानिकानं 1967 मधे एक संशोधनपर निबंध लिहिला. त्यात त्यानी कल्पना केली की एकादा कंप्यूटर आज्ञा  ऐकताना चूक करेल, त्यानं दिलेल्या आज्ञा करप्ट होऊन भलतंच काही तरी करून बसतील. त्यातून मानवसमाजाचा विनाश होईल. जी गोष्ट चुकीनं, नकळत, अहेतुक होऊ शकते तीच गोष्ट ठरवूनही होऊ शकते अशी शक्यता सोलोमोनॉफ यांनी व्यक्त केल्यानंतर कृत्रीम बुद्धीमत्तेबद्दल भीतीचं वातावरण तयार व्हायला सुरवात झाली.
हॉकिंग यांची भीती निराधार आहे असं अभ्यासपूर्वक सांगणारा विचारवंतांचा एक मोठा वर्ग आहे. कुर्झवेल, सर्ल इत्यादी अनेक मंडळी कंप्युटिंग, कृत्रीम बुद्धीमत्ता, माणूस, माणसाचा मेंदू इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मांडत आहेत. कंप्यूटरवर कृत्रीम पोट, कृत्रीम हृदय, कृत्रीम मेंदू  तयार करणं आणि प्रत्यक्षातल्या त्या व्यवस्था  यात जमीन अस्मानाचा फरक आहे असं वैज्ञानिक सांगतात. चेतना आणि मन या गोष्टी कृत्रीमरीत्या तयार करता येत नाहीत असं या लोकांचं म्हणणं आहे. यंत्रं आणि माणुस यातला फरक त्यातूनच दिसतो.
कंप्यूटरवर शब्दांची जोडणी करता येते, वाक्यं तयार करता येतात. ही भाषेची यांत्रिक अंगं झाली. भाषेत त्यापलिकडचं काही तरी असतं. भाषेत एक अर्थ असतो, एक तर्क असतो. तो अर्थ कंप्यूटर तयार करू शकत नाही, तो माणसाचा मेंदू, माणसाचं मन तयार करत असतं. हॉकिंग यांच्या डोक्यातले शब्द आणि वाक्यं कंप्यूटर जुळवतो, त्या पलिकडं जगाची मांडणी करणं, विश्वनिर्मितीचा सिद्धांत कंप्यूटरला मांडता येत नाही, तो हॉकिंग यांनाच मांडावा लागतो.
ज्ञान, चेतना हे दोन गुणधर्म मानवी मेंदूत, माणसामधे असतात. कंप्यूटरमधे ते नसतात. असणारही नाहीत. कंप्यूटर नावाच्या एका यंत्रामधे माणूस काही आज्ञा भरवतो, त्या आज्ञांनुसार कंप्यूटर कामं करतो. कंप्यूटरमधे स्वतंत्रपणे प्रज्ञा नसते. कंप्यूटरमधे अनेक प्रक्रिया घडतात, त्या कशा घडाव्यात ते माणसानं सांगितलेलं असतं.माणसाच्या मेंदूत असंख्य गुणिले असंख्य रासायनिक प्रक्रिया घडत असतात. परंतू माणसामधलं चैतन्य, चेतना, ज्ञान निर्मितीची क्षमता या गोष्टी असतात, त्या प्रत्येक माणसाच्या स्वतंत्र प्रेरणा आणि घटना असतात. कंप्यूटरमधे असंख्य प्रक्रियांची साखळी जुळवणारा वा नियंत्रित करणारा मेंदू, चेतना, ज्ञान निर्मिती नसते.
 यंत्रं निर्माण झाल्यावर थोरो, गांधी इत्यादी लोकांना जगाचा अंत दिसला होता, आता हॉकिंग इत्यादींना जगाचा अंत दिसतो आहे.
माणूस स्वतःचा नाश करू शकतो की नाही? होय आणि नाही अशी दोन्ही उत्तरं आहेत. माणूस किती शहाणा होणार त्यावर त्याचा नाश अवलंबून आहे. मानवी समाजाच्या उत्क्रांतीची दिशा शहाणपणाकडं आणि सुखाकडं आहे. यंत्रं नव्हती, शेतीही होत नव्हती तेव्हां माणूस भरपूरच क्रूर होता. काही हजार वर्षांपूर्वीचे अवशेष  सांगतात की अगदी लहान मुलांनाही बाणानं मारून टाकण्यात आलं आहे. दर शतकामधे माणसांनी मारलेल्या माणसांची संख्या कमी होत चाललीय. माणसाचं आयुष्मान वाढत चाललं आहे, माणसाचं शारीरीक जीवन किती तरी सुखी होत चाललंय. मानसिक जीवनात गडबडी जरूर होताहेत. अल कायदा आणि आयसिस निर्माण होताहेत पण त्यांना आटोक्यात आणणाऱ्या यंत्रणाही तयार होताहेत.
कंप्यूटर हे एक तंत्रज्ञान आहे. माणसानंच तयार केलेलं. सुरी तयार झाली. कोणी तिचा वापर फळं कापायला करू लागला कोणी माणसाचा गळा चिरायला. कृत्रीम बुद्धीमत्ता ही संकल्पनाच मुळात घोटाळ्याची आहे. कंप्यूटरला बुद्धीमत्ता आलेली नाही. कंप्यूटरची गणनाची क्षमता वाढली आहे येवढंच. माहितीचं माणसानं सांगितलेलं विश्लेषण कंप्यूटर अती वेगानं करू लागला आहे येवढंच. त्यावरून त्याला बुद्धीमत्ता प्राप्त झाली आहे असं म्हणता येत नाही.

हॉकिंग हा काही कच्चा माणूस नाही.  विचारी माणूस आहे, अत्यंत बुद्दीमान आहे. परंतू ते कृत्रीम बुद्धीमत्ता या विषयाचा एका मर्यादित अंगानं विचार करत आहेत.  कृत्रीम बुद्धीमत्ता या संकल्पनेला ज्ञान आणि चेतना हेही घटक आहेत. त्यांचा  विचार पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ करत नाहीत. पदार्थविज्ञान आणि चेतना-ज्ञाननिर्मिती-तत्वज्ञान हे दोन वेगवेगळे प्रांत आहेत. मानवी संहाराची शक्यता ही त्या मंडळींची  बौद्दिक  लठ्ठालठ्ठी आहे येवढंच. मानव समाज टिकून रहावा ही कळकळीची इच्छा त्यातून व्यक्त होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *