पेशावरची शाळा

पेशावरची शाळा

पेशावरच्या शाळेत सात जिहादींनी 132 मुलं मारली. दोन चोरलेल्या गाड्यांतून जिहादी शाळेत पोचले. पंधरवडाभर आधी पाक-अफगाण सरहद्दीवर त्यांचं प्रशिक्षण झालं होतं, हल्ल्याचं नियोजन झालं होतं. एका अभ्यासवर्गासाठी हॉलमधे जमलेल्या विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार झाला. पळणाऱ्याना पाठून गोळ्या घातल्या. घाबरून थिजून बसलेल्या मुलांवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलं मेली आहेत की नाहीत ते तपासून त्यात जिवंत आढळलेल्यावर गोळ्या झाडल्या. 
रक्ताची थारोळी आणि प्रेतांचा खच एकदा पाहून झाल्यावर जिहादीनं आपल्या नेत्याला फोनवरून विचारलं ” मुलं मारून झालीत, आता काय करू.” पलिकडून उत्तर आलं ” आता सैन्याचे कमांडो येतील. त्यांच्यावर हल्ला करा आणि नंतर अंगावरचं बाँबजॅकेट फोडून आत्महत्या करा.”
सातही जिहादींनी नंतर जॅकेट फोडून आत्महत्या केली.
तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या पुढाऱ्यानी माध्यमांना हल्ल्याची आपली जबाबदारी कळवली.  ” विद्यार्थी सैन्यातल्या अधिकाऱ्यांची मुलं होती.सैन्यातले अधिकारी उत्तर वझिरीस्तानात आमच्या लोकांना, मुलांना मारत होते. त्यांना आमची दुःख कळावीत यासाठी हा उद्योग आम्ही केला आहे.”
वझिरीस्तान हा अफगाण-पाक हद्दीवरचा चिंचोळा प्रदेश. त्यात वझीर, मेहसूद जमातींची वसती आहे. या जमातीनी 2008 मधे तहरीके तालिबान पाकिस्तान नावाची संघटना बनवली. त्यात अनेक पोट जिहादी संघटनाही सामिल आहेत. शरीयाचं राज्य स्थापन करणं आणि पाकिस्तानी-गैर इस्लामी सरकारं नष्ट करणं असं तालिबानचं उद्दिष्ट आहे. पेशावरच्या आसपास, वझिरीस्तानात काही गावांत या संघटेनं आपलं शरीया राज्य प्रस्थापित केलं आहे. तिथं पाकिस्तानची कोर्टं चालत नाहीत, मुल्ला-तालिबान पुढारी यानी केलेला शरीया कायदा चालतो. म्हणजे शिक्षा म्हणून हातपाय तोडले जातात, शिरच्छेद केला जातो वगैरे. या व इतर विभागात गेल्या चार वर्षात सुमारे 1000 शाळा बंद करण्यात  आल्या आहेत, पाडण्यात आल्या आहेत. कारण त्या शाळांमधे दिलं जाणारं शिक्षण ” पश्चिमी ” होतं, इस्लामी नव्हतं. त्यांच्या लेखी शिक्षण म्हणजे केवळ इस्लामचं शिक्षण. 
मलालावर गोळीबार झाला तो याच भागात. याच विभागात सध्या पाकिस्तानी लष्कर झर्बे अजब या मोहिमे अंतर्गत तहरीके तालिबानच्या जिहादींना मारत आहे. आतापर्यंत सुमारे 1500 जिहादी लष्करानं मारले आहेत. त्याचा बदला म्हणूनच विद्यार्थी मारले गेले.
पाकिस्तानी सरकारनं, लष्करानं, आयएसआय या संघटनेनं 1980 च्या दशकात जिहादी निर्माण केले.  हज्जारो मदरशातून जिहादी प्रशिक्षित करून अफगाणिस्तानातल्या रशियाविरोधी लढाईत पाठवले. त्यासाठी सौदी-अमेरिकी पैसा आणि अमेरिकेची शस्त्रं वापरली. जिहादी शाळामधली इस्लामी शिक्षणाची पाठ्यपुस्तकं अमेरिकेतल्या छापखान्यात छापलेली होती. लाखो जिहादी पाकिस्ताननं अफगाणिस्तानात पेरले. अफगाणिस्तानवर आपला कबजा रहावा या हेतूनं.
अफगाणिस्तानात हे जिहादी 1980च्या दशकापासून तर थेट 2001 पर्यंत अफगाण तालिबान आणि अल कायदाच्या संपर्कात होते. अफगाण तालिबान केवळ अफगाणिस्तानापुरती क्रांती करत होतं. अल कायदानं त्याना वैश्विक क्रांती शिकवली. साऱ्या जगात शरीयाचं राज्य आणायचं, त्यासाठी तिथं असलेली गैरइस्लामी राज्यं नष्ट करायची ही कल्पना अल कायदानं तालिबानमधे रुजवली. यथावकाश ही कल्पना पाकिस्तानातून तिथं गेलेल्या पाकिस्तानी जिहादीमधेही रुजली. सुरवातीला अमेरिका अफगाण तालिबानच्या बाजूनं होती, रशियाचा पराभव करण्यासाठी. पण 2001 मधे न्यु यॉर्कमधे ट्विन टॉवर्स पडल्यानंतर अमेरिका अल कायदाबरोबरच तालिबानच्याही मागं लागली.
तिथं घोटाळा झाला. अफगाण तालिबानांबरोबरच पाकिस्तानी जिहादींवरही कारवाई करा असा घोषा अमेरिकेनं पाकिस्तानपाठी लावला. तिथं पाक सरकार आणि पाक जिहादी यांच्यात संघर्ष सुरु झाला.
यात आणखी एक उपघोटाळा आहे. पाकिस्तान सरकारनं मदरसे, मुल्ला, अमेरिकेचे पैसे आणि जिहादी अशी साखळी तयार केली होती. तयार होणारे जिहादी अफगाणिस्तान आणि भारतात वापरायचे असा पाकिस्तानचा डाव होता. त्यानुसार लष्करे तय्यबा, जैशे महंमद इत्यादी संघटना अमेरिकन पैसा आणि आयएसायचं प्रशिक्षण यांचा वापर करून काश्मिरात  धुमाकूळ घालत होते. पाकिस्तानच्या दृष्टीनं सारं ठीक चाललं होतं. परंतू जिहादी व्हायरस वैश्विक इस्लामी होता. शरीया आणि जिहादची तत्व यांच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक समाजाला नष्ट करणं हे जिहादी संघटनांचं कर्तव्य ठरल. त्यामुळंच पाकिस्तानातील शिया, अहमदी, ख्रिस्ती, मुहाजीर या माणसांनाही जिहादी संघटना मारू लागल्या. शेवटी एक तार्कीक टोक या संघटनानी गाठलं. पाकिस्तान सरकार अमेरिकेचा पैसा आणि आदेश यावर चालत असल्यानं तेही इस्लामी नाही असं ठरवून जिहादींनी पाकिस्तान सरकार, पाक लष्कर, पाक नौदल, पाक पोलिस यांच्यावर हल्ले करायला सुरवात केली.
आता मात्र मुशर्ऱफ-पाकिस्तानी लष्कराचे वांधे झाले. आता लष्करावरच डाव उलटला होता. लष्करानं या जिहादींना एकत्र करून त्यांचं लक्ष पुन्हा एकदा भारत आणि अफगाणिस्तानकडं वळवायचा प्रयत्न केला. परंतू ते जमेना.अमेरिकेकडून जिहादीवर कारवाईचा दबाव होता. पाकिस्तान डबल गेम करू लागलं. चार दोन जिहादी मारून अमेरिकेला खुष ठेवायचं पण प्रत्यक्षात जिहादींना संरक्षण द्यायचं असा डाव मुशर्रफ खेळले. स्वार्थी, काहीसे मुद्दाम झालेले बावळट आणि मूर्ख अमेरिकन हा डाव माहित असूनही मुशर्रफना पाठिंबा देत राहिले. 
 परंतू मोकला सुटलेला जिहादी वारू थांबायला तयार नव्हता.
2007 मधे त्यांनी इस्लामाबादवर शरीया लागू करायला सुरवात केली. लाल मशिदीचा ताबा घेऊन ते शरीयाचं केंद्र केलं. तिथले जिहादी शहरभर पसरून माणसांना, पोलिसांना मारू लागले. गळ्याशी आल्यावर पाक सरकारनं लाल मशिदीवर कारवाई केली, मशीदीतले जिहादी मारले. तिथून तहरीके तालिबान ही संघटना जिहादीनी स्थापन केली. जी आजवर सरकारचा दम काढत आहे.
थेट 1970 पासून सिद्ध झालं आहे की अतिरेकी इस्लामी विचारांपुढं पाकिस्तानातले राजकीय पक्ष आणि लष्कर नांगी टाकतं. 1960 पर्यंत सँडहर्स्ट मधे तयार झालेलं व्यावसायिक लष्कर झिया  उल हक यांनी इस्लामी केलं. भुत्तोंनी पीपल्स पार्टी काढली, समाजवाद हे त्या पक्षाचं ध्येय केलं. त्यात पहिलं वाक्य समाजवादाचं आणि दुसरं वाक्य इस्लामचं. नवाज शरीफनी 1991 साली कायदा करून शरीया हा पाकिस्तानातल्या कायद्याचा आधार असेल असं पक्कं केलं. 2013 च्या निवडणुकीत नवाज शरीफ यांनी तहरीके तालिबानचा पाठिंबा आणि पैसे घेतले. त्या निवडणुकीत शरीफ आणि इमरान खान या दोघांच्याच पक्षांना जाहीर सभा घ्यायची, प्रचार करायची परवानगी होती. इतरांच्या सभांमधे तालिबाननं स्फोट केले. पीपल्स पार्टीचे बिलावल भुत्तो तर जिवाच्या भीतीनं दुबाईत पळून गेले.
जिहादी इस्लामचा पगडा आणि भीती पाकिस्तानी समाजावर आहे. लष्कर, पोलीस, न्यायव्यवस्था आणि राजकीय पक्ष त्या दबावाखालीच वावरतात. सामान्य जनतेवरही शरीयाचा प्रभाव आहे. शरीया आणि जिहाद या इस्लाममधल्या तत्वांचा फेर विचार करावा असं पाकमधल्या बहुसंख्य जनतेला वाटत नाही. फेर विचार करण्याची क्षमता, स्वातंत्र्य, परिपक्वता, हिंमत पाकिस्तानी जनतेत नाही. शाळा उडवण्याची परवानगी इस्लाम देतं किंवा अशी परवानगी कोणी घेऊ शकतो यातच घोळ आहे ही  गोष्ट सामान्य इस्लामी जनता विचारात घेऊ शकत नाहीये. अय्यान हिरसी अली ही बंडखोर मुसलमान बाई इस्लाममधे बंड करून उभी रहाते याचा अर्थ इस्लामी जनतेला समजत नाही. आधुनिक जग आणि इस्लामची सांगड घालण्याची कुवत असणारे दोन चार टक्केही पाकिस्तानात नाहीत. भारताचा द्वेष, भारत आपल्याला नष्ट करू पहात आहे हा भयगंड या एकाच गोष्टीवर पाकिस्तानचं राजकारण चाललंय. शेजारी देश हे राजकीय-आर्थिक वास्तव समजून न घेता त्याला धार्मिक रूप देण्याचा मूर्खपणा जिन्नांनी केला. तीच परंपरा पाकिस्तानात अजूनही चालू  आहे. ना जनता ना राजकीय पक्ष ना लष्कर त्याच्या बाहेर यायला तयार  आहे. भारताची भीती दाखवून जगाकडून पैसे व मदत उकळण्याचा उद्योग पाकिस्तानी पुढारी आणि जनरल करत आले. त्यामुळं त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेकडंही दुर्लक्ष केलं. अमेरिका-सौदी इत्यादी देशांनी आपापले स्वार्थ पाहिले आणि पाकिस्तानात पैसे ओतले. भारतभीतीगंड आणि अमेरिकेनं ओतलेला पैसा यामुळं पाकिस्तानात दलदल झाली आहे. जिन्नांनी ही दलदल सुरु केली.

यातून पाकिस्तानला बाहेर कोण काढणार? जिहादीची निर्मिती पाकिस्ताननंच केली आहे, ती त्यानाच निस्तरावी लागणार आहे. ना अमेरिका, ना सौदी ना भारत या बाबत त्याना मदत करू शकतो. त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. समाजाची पुनर्रचना आधुनिक शिक्षणाच्या आधारे करायला हवी. त्यांनी हालचाली केल्या तर कदाचित जगभरचे इतर लोक मदतीला येतील.

One thought on “पेशावरची शाळा

  1. I think, Ayan Hirsi Ali does not consider herself now as a Muslim. She is against Islam. On this issue she had a debate with Muslim scholar Tariq Ramadan.
    Islam should be reformed by Muslim themselves who want to bring Islam in sync with the modern world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *