धर्माचा दरवाजा

धर्माचा दरवाजा

इराकमधे आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेनं गावंच्या गावं ताब्यात घेतली,त्यातल्या माणसांना ” आपल्या ” इस्लामचे बंदे व्हा असा आदेश दिलाय. जे हा आदेश पाळणार नाहीत त्यांचा छळ होतो, त्याना ठार मारलं जातं.
 आयसिसचा इस्लाम हा जगातल्या इतर रूढ इस्लामांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो नेमका कसा आहे आणि वेगळा कां आहे हे नीट समजलेलं नाही. सामान्यतः अल बगदादी हा त्यांचा पुढारी जे म्हणेल ते मान्य करणं असा त्या इस्लामचा अर्थ आहे. 
इराकमधले मुस्लीम असोत की ख्रिस्ती की आणखी कोणी. त्या सर्वांना जीव वाचला तर परागंदा व्हावं लागतं. ती माणसं शेजारच्या देशात पोचतात.
अशा रीतीनं अनेक लोक जॉर्डनमधे पोचले. ते मुसलमान होते. त्याना चर्चमधे आश्रय मिळाला. तिथंच ते सध्या रहात आहेत. ही माणसं पुन्हा इराकमधे परतणं शक्य नाही. त्यांची घरं, किडुकमिडूक, जगण्याची साधनं इत्यादी सारं नष्ट झालंय. जॉर्डनमधेच ती वाढतील. कशीबशी जगत रहातील. 
 यातले काही लोक ख्रिस्ती होत आहेत.
धर्मांतर.
00
फ्रान्समधे एका माणसानं  ‘ अल्ला हो अकबर ‘ अशा घोषणा देत कार बेदरकारपणे चालवली, लोकांमधे घुसवली, 15 माणसांना जबर जखमी केलं. जखमी झालेली माणसं कोणत्या धर्माची होती हे पाहून त्यानं ‘ कारवाई ‘ केलेली नाही. त्यात ख्रिस्ती असतील, मुसलमानही असतील, एकादा हिंदूही असेल किंवा ज्यू असेल.
पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांनी केलेल्या नोंदीत म्हटलंय की त्याला ‘ मेंटल इलनेस ‘,  मानसीक आजारपणाचा  इतिहास होता.
धर्माच्या नावाखाली इतरांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं म्हणजे मानसिक आजार.
00
जॉर्डनमधे पोचलेले मुसलमान ख्रिस्ती झाले. त्यांना काय मिळालं? चर्चनं आश्रय दिला, कदाचित जगण्याचं साधन दिलं. इस्लामनं जगणं अशक्य केलं, चर्चनं ते शक्य केलं. म्हणून ते ख्रिस्ती झाले असतील.  जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी.
इस्लामी लोकांनी दिलेल्या वागणुकीनं त्यांचं माणूसपण, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा हिरावून घेतली. चर्चनं त्यांना ज्या रीतीनं वागवलं त्यावरून त्याना त्यांचं हरवलेलं माणूसपण मिळालं. म्हणून ते ख्रिस्ती झाले. म्हणजे हे  मनानं धर्मांतर झालं.
00
भारतात दलितांना माणुसकीची वागणूक मिळत नव्हती. आज परिस्थिती  काहीशी सुधारलेली असली तरी त्याना कमी प्रतीचं माणूस समजलं जातं. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटु घातलाय पण माणूस म्हणून प्रतिष्ठेचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. म्हणूनच ते मुस्लीम किंवा ख्रिस्ती होऊ शकतात.  बौद्ध तर ते झालेच. मुस्लिम वा बौद्ध होण्यात ते सामाजिक कमीपणातून मुक्त होतात.
00
एकेकाळी आयसिस प्रमाणंच भारतात  इस्लामी लोकांनी हिंदूवर जबरदस्ती करून त्यांना मुसलमान बनवलं. तलवारीच्या जोरावर. हे धर्मांतर  जगण्याचं,पोटापाण्याचं धर्मांतर होतं. मुसलमान नाही झालात तर मराल, तेव्हां डोकं वाचवण्यासाठी मुसलमान होणं. पोटापाण्याचं धर्मांतर.
00
भारतात गेल्या वीसेक वर्षांत किती धर्मांतरं झाली ते कळत नाही. त्यातली किती पोटापाण्याची होती, किती जबरदस्तीची होती, किती मनानं ( मुसलमान मुलाशी लग्न करण्यासाठी मुसलमान होणं ) याची आकडेवारी सापडत नाही. पूर्वोत्तर भारतात ख्रिस्ती धर्माचं प्राबल्य आहे. चर्चकडं असलेली आर्थिक शक्ती माणसांना काही प्रमाणात तरी काम, जगणं देऊ शकते. त्यामुळं तिथं पोटापाण्यासाठी राजीखुषीनं धर्मांतरं झाली असणं शक्य आहे. बळजोरीनं किती धर्मांतरं झालीत त्याचा आकडा सापडत नाही.
00
खुषीनं किंवा जबरदस्तीनं धर्मांतर झालं तरी सामान्यतः कोणी माणूस लेखी,जाहीरपणे, कोर्टासमोर काहीही कबूल करत नाही. त्यामुळं धर्मांतरं जबरदस्तीनं झाली की खुषीनं ते ठरवणं फारच कठीण आहे. भारतात कायद्यानं वागायची  रीतसर लेखी नोंद ठेवायची सवय नसल्यानं माहितीचं खरं खोटेपण ठरवणं कठीण होतं.
00
धर्म माणसाला जन्मानं मिळतो. आई बाप एका धर्माचे असतात, बालपणात माणसं आईबाप व  नातेवाईकांवर अवलंबून असल्यानं त्या वातावरणात वाढतात आणि धर्म मान्य करतात. आईबापाकडून मिळालेल्या धर्माच्या उणे अधिकचा विचार सुरु होतो जगाचा अऩुभव घेतल्यानंतर. प्रत्येक माणसाला त्या त्या समाजातल्या वातारणानुसार आपल्या धर्माबद्दल काही शंका, आक्षेप, हरकती निर्माण होतात. धर्म ही गोष्ट फार म्हणजे फार जुनी असल्यानं धर्मावलंब काळ ठरवतो. त्यामुळंच बदलत्या काळात माणसाला आपापल्या वा इतर धर्मांबद्दल शंका, आक्षेप निर्माण होतच असतात.  आक्षेप आणि आवडणाऱ्या-सवयीच्या गोष्टी यांत एक संतुलन तयार होऊन माणूस धर्माला काही टक्के मंजुरी देऊन धर्मात टिकतो. संतुलन बिघडलं, आक्षेप वाढले तर माणूस धर्म सोडतो, एकादेवेळेस दुसऱ्या धर्मात जातो. ख्रिस्तीआणि हिंदू धर्मात ते शक्य होतं.
   ख्रिस्ती माणूस धर्म सोडून गेला तर त्याला धर्म आडकाठी करत नाही, मारीत नाही. हिंदू माणूस धर्म,देव, उपासना, रुढी इत्यादी गोष्टी मानेनासा झाला तरी हिंदू माणसं ते सहन करतात. तो दुसऱ्या धर्मात गेला तरी त्याला मारत नाहीत. एकेकाळी कदाचित बहिष्कार टाकून त्याचं जगणं अशक्य करत असतील. पण अलिकडं तसं घडत नाही. 
इस्लाममधे माणसानं  धर्म  सोडला, धर्मबाह्य वर्तन केलं तर त्याला मृत्यू दंड असतो. म्हणून इस्लामी माणसं इतर धर्मात गेल्याची उदाहरणं कमी सापडतात. हिंदू, ख्रिस्ती माणसं इस्लाममधे जाऊ शकतात, पण ती नंतर पुन्हा आपल्या धर्मात जाऊ शकत नाहीत. इस्लाममधे आत जाता येतं बाहेर येता येत नाही. जेथे इस्लामी  सत्ता आहे तिथं  असं घडतं.
 भारत देश इस्लामी देश नाही. मुसलमान माणूस हिंदू झाला तर तिथं मुसलमान त्याला मारत नाहीत, मारू शकत नाहीत कारण या देशात एक सेक्युलर कायदा चालतो. 
00
माणसानंच देव आणि धर्माची निर्मिती आपल्या सुखासाठी केलेली आहे. धर्मात मुळातच काही सोयी आहेत, काही निहित, मुळातलेच दोष आहेत. काळाच्या ओघात धर्म बदलावा अशी अपेक्षा आहे. ख्रिस्ती आणि हिंदू धर्मानं काही प्रमाणात काळानुसार बदल स्वीकारले आणि इतर धर्मांचं अस्तित्व मान्य करून त्यांच्यासह जगणं मान्य केलं. तसंच धर्मामधल्या फटी, धर्मातले दोष, काळाबरोबर निर्माण झालेल्या त्रुटी या गोष्टी काढून टाकण्याचे प्रयत्न ख्रिस्ती आणि हिंदू धर्मात झाले. स्वतःच्या धर्माची परखड चिकित्सा या धर्मांत होते. इतरांनीही तशी चिकित्सा केली तर ती ख्रिस्ती-हिंदू विचारात घेतात. त्या मानानं इस्लाम काळासोबत बदलला नाही. इस्लामेतर जग शुद्ध जग नाही यावर इस्लामचा विचार आधारलेला आहे. तो विचार  इस्लाममधे प्रभवी राहिला आहे. धर्माची मूलगामी चिकित्सा इस्लाममधे इतरांच्या तुलनेत खूपच कमी झाली. धर्मबाह्यता, धर्मनिंदा, जिहाद या गोष्टीच्या वाट्टेल तशा व्याख्या करून माणसांना तिथं मारून टाकलं जातं,जाऊ शकतं, तसं अनेक ठिकाणी घडलेलं आहे.इतरांनी इस्लामची केलेली चिकित्सा त्याना मान्य नसते.
भारतात  मुसलमानांचं वागणं वेगळं आहे. पाकिस्तान हा मुसलमानांचा देश आहे असं ठरल्यानंतरही फार फार मुसलमान भारतात राहिले. राजीखुषीनं. मुसलमान म्हणून ते भारतात जगतात आणि भारतीय म्हणूनही जगतात. त्यांनी मुसलमान म्हणून जगण्याला भारतातल्या ख्रिस्ती आणि हिंदूंचा आक्षेप नाही. भारताची राज्यघटना इस्लामी असावी असा त्यांचा आग्रह किवा विचार नाही. त्यामुळं इतर धर्मियांबरोबर सहजीवन व्यतित करण्याची त्यांची इच्छा दिसते.
 माणसं विचारांसाठी,  पोटापाण्यासाठी त्यांना योग्य तो धर्म स्विकारू शकतात. आधुनिक काळात माणसाला वयाची अठरा वर्षं  ओलांडल्यानंतर कुठल्याही धर्मात जायची सोय असायला हवी. धर्माच्या बाहेर पडायची सोय असावी. दुसऱ्या धर्मात जायची आणि तिथूनही बाहेर पडून आणखी कुठल्याही धर्मात जायची सोय असावी. 
00
आज जे ख्रिस्ती आहेत, बौद्ध आहेत, मुसलमान आहेत त्यांना कोणत्याही कारणानं हिंदू व्हावंसं वाटलं तर ती वाट सुलभ असली पाहिजे. त्यात कायदेशीर अडथळा असता कामा नये.  हिंदू झाल्यावर तो त्याची नोंद हिंदू म्हणून करेल. पण त्याला जात काही स्वीकारता येणार नाही. कारण जात फक्त म्हणजे फक्त जन्मानंच मिळते. तेव्हां जे कोणी नव्यानं हिंदू होतील त्यांचा एक वेगळा वर्ग व्हायला हवा,जात नसलेल्या हिंदूंचा वर्ग.
00
एक वांधा इथंही आहे. 
कोण हिंदू आहे हे  कोणी ठरवायचं. 
हिंदू समाजात अनंत पंथ, उपपंथ, उपासना पद्धती, देव, अवतार, संत इत्यादी आहेत. हिंदू समाजात नास्तिकही आहेत. तेव्हां यातल्या कोणाला हिंदू मानायचं आणि कुणी? परवा तर साईबाबाना मानणारे हिंदू नाहीत असं कुणी तरी भगवा  युनिफॉर्म घातलेल्या माणसानं ठरवून टाकलं. मोहन भागवत यांनी मार्क्सवाद्यांना धर्मबाह्य ठरवलं. भगव्या युनिफॉर्ममधे असोत की खाकी चड्डीतले असोत, ते ठरवतील तो हिंदू असं कसं चालेल? बरं त्यातूनही आणखी एक गोची. हे युनिफॉर्म आणि चड्डीवाले आता धार्मिक राहिलेले नाहीत. ते राजकीय झालेले आहेत. गेली दहाएक वर्षं ते उघडपणानं, जाहीरपणानं,विचारपूर्वक भारतीय जनता पक्षाचा भाग झाले आहेत. त्या पक्षात ते कार्यकर्ते पाठवतात, त्या पक्षाच्या बाजूनं भाषणं करतात, त्या पक्षाच्या विधीमंडळ पक्षाचे सदस्य आणि मंत्री यांच्याशी विचार आणि आदेशांचं आदान प्रदान करतात. त्यामुळं त्यांचे विचार हे धार्मिक नसून राजकीय ठरतात. 
00
90 टक्के माणसं आपापल्या परीनं हिंदू म्हणून जगत असतात. ती जिथं कुठं असतात तिथं आपापल्या परीनं कसं जगायचं ते ठरवत असतात. मालेगावमधे, वाराणशीत, लखनऊमधे, कारवारमधे. संघ परिवारातली माणसं तिथं उतरली की घोटाळे सुरू होतात. त्यांच्या हिंदुत्वविषयक विचारात भारतातल्या हिंदूंतही अनेक मतभेद आहेत. हिंदू असणाऱ्या लोकांचे त्यांच्या हिदुत्व विचारावर आक्षेप आहेत. एका वाक्यात बोलायचं तर ते भारतातल्या हिंदूंचे एकमेव प्रतिनिधी नाहीत. भाजप सत्तेवर  आल्याकारणानं त्या सत्तेचा वापर ते करू पहात आहेत, त्यांचा हिंदुत्व विचार लोकांवर लादण्याचा. 
00
 रामजादे कोण आणि हरामजादे कोण हे ठरवण्याचा खटाटोप हा राजकीय खटाटोप आहे. त्याचा निवडणून येण्याशी दाट संबंध आहे.
धर्मांतर, घर वापसी हा वाद संघ परिवाराचा-भाजपचा राजकीय खेळ आहे.
00
हिंदूच नव्हे तर सारेच धर्म कालसुसंगत करणं, सुखावह आणि माणसाला आनंद व स्वातंत्र्य देणारे करणं याकडं लक्ष द्यावं. हिंदू होण्यात सुख आहे, मानसीक आणि पोटापाण्याचं स्वातंत्र्य आणि सुख आहे अशी व्यवस्था व्हावी. लोक  आपणहून हिंदू धर्मात येतील. ती वाट शिल्लक असावी.
00
भारतीय राज्यघटनेत कुठल्याही जबरदस्तीला स्थान नाही. कामावर जबरदस्तीनं ठेवलं तर वेठबिगार होतो. कामावरून जबरदस्तीनं काढलं तर तेही कोर्ट बेकायदा ठरवून त्याला कामावर घेण्याचा आदेश देतं.
जबरदस्ती सिद्ध करण्याचे उपाय भारतीय कायद्यात दिलेले आहेत.  धर्मामधे प्रवेश करताना  किंवा धर्म सोडताना जबरदस्ती झाली तर कायद्यानं कारवाई करता यायला हवी. 
परवानगी असावी, जबरदस्ती नसावी.

00

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *