केजरीवाल

केजरीवाल

दिल्लीत आम आदमी पार्टी एक नंबरवर निवडून आली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना हरवून. देशभर एक उत्साहाची लाट उसळली.  
आप आणि केजरीवाल हे अण्णा आंदोलनाचे फुटवे होते. अण्णा हजारेनी   केजरीवालना  निवडणूक लढू नका असं सांगितलं होतं. अण्णांचाही गोंधळ होता. एकदा ते केजरीवालना आशिर्वाद देणार म्हणाले एकदा त्याना पाठिंबा देणार नाही म्हणाले. केजरीवालांचं म्हणणं होतं की देशातली व्यवस्था भ्रष्ट असेल तर ती दुरुस्त करणं ही  आपली जबाबदारी  आहे. त्यासाठी  भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानं एक राजकीय पक्ष स्थापून निवडणुक लढवायला हवी आणि देशाला एक स्वच्छ सरकार द्यायला हवं.
आंदोलनकारी संघटनांमधे राजकीय पक्ष या विषयावर नेहमीच गोंधळी पेच राहिला आहे. राजकीय पक्षांवर नुसती टीका करण्यात मतलब नाही, तुमच्याजवळ जर योग्य कार्यक्रम असेल तुम्ही राजकीय आखाड्यात उतरून देशाला एक चांगला पर्याय दिला पाहिजे असं लोक आंदोलनकारी संघटनांना सांगत असत. त्यावर त्या संघटनांचं म्हणणं असं  निवडणूक प्रक्रिया   भ्रष्ट आणि धनसघन आहे. तिथं सामान्य माणसाला, पैशाचं पाठबळ नसणाऱ्याला वावच नाही. शिवाय निवडून येऊन तरी काय करणार? कारण नोकरशाही इतकी भ्रष्ट आहे की ती चांगलं काम करूच देत नाही.
या गोंधळामुळं देशात एक दुफळी झाली होती, आहे. एकीकडं राजकीय पक्ष (भ्रष्ट) आणि दुसरीकडं निव्वळ विरोध करणाऱ्या आंदोलनी संघटना ( तथाकथित स्वच्छ ). दोन्हींचे संबंध परस्परविरोधाचे, काहीसे कडवट. परिणामी देशाला काम करु शकणारा चांगला राजकीय पक्ष मिळत नाही.
केजरीवाल यांनी आप पार्टी स्थापन करून, निवडणूक लढवून एक प्रयोग आरंभला. दिल्लीत आपला सत्ता स्थापन करता आली इतकं यश मिळवलं. माध्यमांनी हे यश कसं मिळालं याची चर्चा सुरु केली. माध्यमं आणि देश आपच्या प्रेमात होता. आप पार्टीनं दिल्लीच्या प्रत्येक मतदार संघात स्वतंत्र जाहीरनामा तयार केला होता. हा जाहीरनामा स्थानिक लोकांशी संवाद करून, चर्चा करून, तयार झाला होता. मतदारसंघातल्या लोकांचे विचार आणि मागण्या त्या अनेक जाहिरनाम्यात प्रतिबिंबित झाल्या होत्या. निवडणूक प्रक्रियेत सामान्य माणसं पहिल्या प्रथमच इतकी सहभागी झाली होती. 
१९७७ च्या निवडणुकीतही जनतेचा सहभाग फार मोठा होता. पण तो सहभाग जनता पार्टीला निवडून देण्यापुरताच होता. जनता पार्टीला आकार देणं, त्या पार्टीचा विचार पक्का करणं, जाहीरनामा कसा असेल ते ठरवणं यात जनतेचा सहभाग  नव्हता. तो उद्योग जनता पक्षानं, त्यातल्या घटक पक्षांनी केला. दिल्लीतल्या िनवडणुकीत  मात्र गल्लोगल्ली आप पार्टीचे कार्यकर्ते फिरले, लोकांशी बोलले, त्यांचं म्हणणं त्यांनी जाहीरनाम्यात गुंफलं.पैसे खर्च न करता अगदी साधेपणानं आप पार्टीनं प्रचार केला. १९७७ नंतर असं प्रथमच घडत होतं, ते आश्वासक होतं.
निवडणुकीतल्या यशानंतर पहिले काही दिवस आप पार्टी आणि केजरीवाल यांनी केलेल्या हालचाली वेधक होत्या. सुरक्षारक्षक, गाड्यांचे ताफे इत्यादी गोष्टी टाळून केजरीवर स्वीडन इत्यादी देशातल्या मंत्र्यांप्रमाणे लोकांमधे वावरले. हे नवं होतं पण नाटक वाटावं इतकं बटबटीतही होतं. काही कामं केली खरी पण देखावा जरा जास्त झाला.
इथपर्यंत आप पार्टीची वाटचाल डोळे दिपवणारी, आश्वासक होती. देशभर त्यांचं कौतुक झालं. भाजप आणि काँग्रेसचं धाबं दणाणलं. बहुसंख्य असणारी सामान्य माणसं आपल्यापासून दूर चाललीत या विचारानं ते पक्ष चांगलेच हादरले.
देशात काँग्रेस आणि भाजप असे दोनच देशव्यापी आणि महत्वाचे पक्ष होते. डावे, द्रमुक, बीजू जनता, तृणमूल हे पक्ष मर्यादित ताकदीचे आणि मर्यादित पसरलेले पक्ष होते. भाजप-काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच आहेत, भ्रष्ट आणि निकामी आहेत अशी लोकांची भावना होती. अण्णा आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादातून ती भावना उघड झाली होती. राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष बंडल आणि इतर पक्ष दुर्लक्ष करण्याजोगे अशा स्थितीत देशाला एक तिसरा पर्याय मिळेल असं लोकांना आपमुळं वाटलं. 
आप पक्षाला लोकांनी पाठिंबा द्यायला सुरवात केल. लोक आपणहून उत्साहानं आपचे सभासद होऊ लागले.
अण्णा आंदोलन, आप पार्टीची निर्मिती आणि दिल्लीतलं यश या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत असं ठरवून मी अभ्यासाला सुरवात केली. अण्णा आंदोलन घडत होतं त्याच काळात इजिप्तमधे, अरब देशांमधे एक जनआंदोलन चाललं होतं. तिथं लक्षावधी लोक भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले होते, भ्रष्ट सत्ता उलथवायला निघाले होते. जगभरच एक असंतोषाची लाट आली होती. अमेरिकेतली ती लाट सौम्य होती. या गोष्टींचं भान ठेवून मी अभ्यासाला सुरवात केली. लोकांशी बोलायला सुरवात केली.
मुंबईत  तीन माणसांशी माझं सविस्तर, अनेक वेळा बोलणं झालं. पैकी एक व्यक्ती मध्यमवयीन पत्रकार होती. साधारणपणे डावी, गांधीप्रेमी. भाजप, काँग्रेस दोघांवरली या पत्रकाराचा राग होता. ती  मला म्हणाली ‘ मी आजवर कोणत्याही राजकीय पक्षाची सदस्य नव्हते. राजकारणाबाबत जागृत पण समीक्षक अशी माझी भूमिका होती. मला पहिल्या प्रथमच आपमुळं एक आशावादी चित्रं दिसतय. मला वाटतंय की आपण सदस्य व्हावं, आपल्या मतदार संघात कामं करावीत. मुंबईत रस्ते खराब, गुन्हे वाढत आहेत, स्त्रियंाना सुरक्षित वाटत नाहीये. कोणीही काहीही करत नाहीये. तेव्हां आपण आप पार्टीचं सदस्य व्हावं, रस्त्यावर उतरावं असं मला वाटतंय. ’ ही पत्रकार मराठी होती.
दुसरी व्यक्तीही स्त्रीच होती. ती एक डेंटिस्ट होती. गुजराती. ऊच्च मध्यम वर्गीय घरातली, चांगलीच सुखवस्तू. कधीही सार्वजनिक कार्यात भाग न घेतलेली. ती आपणहून आप पार्टीचा पत्ता शोधत गेली, तिथं जाऊन सभासद झाली. बरिस्ता कॉफी हाऊसमधे बसून ती माझ्याशी बोलली.
‘ मी डॉक्टर आहे. राजकारण हा माझा आवडीचा किंवा सवयीचा विषय नाही. उलट मला राजकारणाचा तिटकाराच आला होता. अण्णा आंदोलनानं मी सुखावले. आता केजरीवाल यांनी बिनापैशाची निवडणूक लढवता येते, लोकांशी प्रामाणिक रहाता येतं हे दाखवून दिलं. तरूण पिढीतला निराशावाद मावळू लागलाय, आपण सक्रीय व्हावं असं मला वाटू लागलंय. म्हणून काही काळ मी माझी प्रॅक्टीस मर्यादित करणार आहे, एकदम सोडणार नाहीये. सकाळपासून दुपारपर्यंत प्रॅक्टीस आणि संध्याकाळी आप पार्टीचं काम.’
तिसरा माणूस एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत व्यवस्थापनात होता. ख्रिस्ती. हा माणूस वळवळ्या होता. लहानपणापासूनच तो सार्वजनिक कामात असे. गोविंदा पथक, गणपती इत्यादीत तो उत्साहानं असे. तरूण झाल्यावर काय करणार? काँग्रेस, सेना, मनसे यांच्यात त्यानं लुडबूड केली. जमलं नाही. तिथल्या वातावरणाचा, भ्रष्टाचाराचा त्याला वीट आला. तो माजी पोलीस अधिकारी रिबेरो यांनी स्थापन केलेल्या नागरी काम करणाऱ्या संघटनेत दाखल झाला. तिथं तो चांगलाच रुळला होता.
‘ रिबेरो साहेबांबरोबरच्या कामात मी खुष आहे. पण शेवटी ते काम राजकीय नाही. चांगलं आहे पण त्यामुळं देशातल्या भ्रष्टाचाराला आळा घालता येत नाही. आम्हा मंडळींमधे यावर चर्चा होत असे. माझ्या बरोबर कॉर्पोरेट सेक्टरमधले अनेक लोक होते. काही बँकर्स होते. काही आयटीतले होते. या लोकांना राजकारणात रस नव्हता, देश स्वच्छ व्हावा असं वाटतं.  हा उद्योग इतर कोणीतरी करावा, अण्णा किवा मेधा पाटकर वगैरेंनी, आपण त्यात पडू नये असं त्यांना वाटतं. आपण अशा कामाला चार पैसे देऊ, देणग्या देऊ पण त्यात रस्त्यावर उतरणार नाही असं त्यांचं म्हणणं असे. मी  चळवळ्या आहे. मला स्वस्थ बसवत नाही.  आमची नागरी संघटना तटस्थ राहिली मी मात्र आप पार्टीचा सदस्य व्हायचं ठरवलं.’ 
या तीनही व्यक्तींशी मी दर काही दिवसांनी फोनवर, प्रत्यक्ष भेटून बोलत असे.
मुंबईत आप पार्टी तशी नवीच होती. तेव्हां जिथं काही घडलं आहे तिथं जायला हवं असा विचार करून मी दिल्लीत गेलो. 
आप पार्टीचा पत्ता शोधला. कनाट प्लेसमधे हनुमान मंदिर गल्लीत आप पार्टीचं ऑफिस आहे. तिथं पोचलो. तळ आणि पहिला मजला अशी इमारत. तळ मजल्यावर डाव्या उजव्या बाजूला खोल्या. प्रत्येक खोलीत तीन चार कंप्यूटर्स. खोलीत झाडू आणि केजरीवाल यांची चित्रं असलेलेली पोस्टर. कार्यकर्ते कंप्यूटरमधे माहिती नोंदवत होते. भेटायला आलेल्या लोकांना पत्रकारांना माहिती देत होते. दिल्लीत आपचं काम कुठं आहे, कार्यकर्ते कोण आहेत, त्यांचे फोन नंबर इत्यादी गोष्टी कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यात एक प्रोफेशनलपणा होता. बकबक नाही, वल्गना नाहीत. तिथंच मला उत्तर दिल्लीतल्या कार्यालयाचा, आमदाराचा फोन व पत्ता मिळाला.
इमारतीच्या बाहेरच्या बाजूला  काही वयस्क आणि मध्यम वयीन माणसं बसलेली होती. अघळ पघळ खादीचे कपडे. पंजाबी आणि उत्तर प्रदेशी हेल काढून माणसं चकाट्या पिटत होती. ‘ आता लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसची खैर नाही. अमूक मतदार संघात भाजपचे तीन तेरा वाजणार. तमूक मतदार संघात काँग्रेसचं डिपॉझिट जाणार. आताच्या परिस्थिती नुसार देशात आप पार्टीचे किमान तीनेकशे तरी उमेदवार निवडून येणार.’ असं माणसं बिनधास्त, पक्क्या विश्वासानं बोलत होती. चहा आणि समोसे खात. ही मंडळी आधी कुठल्या तरी पक्षात होती आणि नंतर आपमधे सामिल झाली होती. त्यांच्यात एक निगरगट्टपणा दिसत होता.
उत्तर दिल्लीत सुंदर नगरी विधानसभा मतदार संघ आहे. तिथं आपचा उमेदवार निवडून आला होता.  र्यक्षेत्रं होतं. पंधरा सोळा वर्षांपूर्वी तिथंच केजरीवाल यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती.  तिथं जायचं ठरवलं. निघालो.
मेट्रो ट्रेनची येलो लाईन राजीव चौकापासून काश्मिरी गेटकडं जायला निघते तेव्हां हळूहळू सुस्थित रस्ते मागं पडतात आणि धूळवाटा सुरु होतात. यमुना नदी ओलांडून ट्रेन काश्मिरी गेट स्टेशनशी पोचते तेव्हां मेट्रो संस्कृती आणि नमेट्रो संस्कृती यातला फरक दिसायला लागतो. काश्मिरी गेटपासून दिलशाद गार्डन स्टेशनपर्यंत जाताना मेट्रो संस्कृती जवळपास लुप्त होते. मेट्रोतल्या प्रवाशांचे कपडे वेगळे होतात. पँट शर्ट, कोट टाय, जीन्स टॉप लुप्त झालेले असतात. साधारणपणे स्वस्त साड्या, मळकट सलवार खमीस, कधीकाळी पांढऱ्या रंगाचा असलेला लेंगा, रंग न ओळखता येणारे शर्ट, आकार नाहिसा झालेल्या पँट्स दिसू लागतात.  डोक्यावर पोटली घेतलेली बाई.  कित्येक दिवस पाण्याच्या अभावी आंघोळ न केलेला हरयाणवी किंवा उत्तरप्रदेशी, सेलफोनवर जाहीर भाषण केल्यागत बोलणारी माणसं.  कचरा गोळा करणारी, फोनवरून मध्यस्थ दलाला जबरदस्त शिव्या देणारी पंजाबी पेहरावातली बाई. अशी माणसं तुमच्या सभोवताली वावरू लागतात. माणसं मोठ्या आवाजात बोलत असतात. दमदाट्या करतात, भाव करतात, वाटाघाटी करतात, भाषणं करतात. गलबला. मेट्रोत आणि बाहेरही.
मग रेड लाईन. दिलशाद गार्डनला जाणारी. गलबला वाढत जातो. मेट्रोतून बाहेर पाहिलं की इमारतींचं बदलतं रूप लक्षात येतं. दोन दोन तीन तीन मजली इमारती. उघड्या विटा. गिलावा नाही, रंग नाही. इमारतीचं स्ट्रक्चर म्हणून असणारे खांब आणि तुळया सरळ रेषेत नसतात, बाहेरून लाकडी फळ्या लावून उभे ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पोटात गोळा उठतो. भूकंप झाला तर काय होईल?
इमारती. मोकळ्या चौकटी, त्यात दरवाजे नाहीत, खिडक्याही नाहीत. घराच्या आतली फडताळं, कपाटं दिसतात.
मेट्रोतून बाहेर पडतांना मेट्रोच्या इमारतीतच मॅकडोनल्ड, डोमिनो पिझ्झा दुकानं. कोण जात असेल या दुकानांत? युनिफॉर्म घातलेले वेटर आळसावून उभे. फारसं कोणी येत नसावं.एकाच टेबलावर दोघं जणं बसली होती. मॅकडोनल्डमधे खाणं किंवा चहा घेणं परवडत नाही अशा माणसांच्या गर्दीत हे रेस्तराँ. कां अशा ठिकाणी काढलं? पैसं मिळवण्यासाठी नसेल, फायद्यासाठी नसेल. मॅकडोनाल्ड हा ब्रँड लोकांच्या डोळ्यात स्थिर व्हावा यासाठी केलेली गुंतवणूक.
दिलशाद गार्डन ते सुंदर नगरी. बस. आतमधे शिरल्यावर कंडक्टर दिसत नाही. तो एका सीटवर बसून असतो. प्रवाशानं त्याच्याकडं जायचं. त्याच्या हातात  अगदीच चिटोऱ्यासारखी तिकीटं. कंडक्टर तिकीट हातानंच दोन तीन ठिकाणी फाडून देतो. गर्दीत कोण तिकीट काढतय आणि कोण काढत नाही याकडं त्याचं लक्ष नसतं. 
बसेस, ऑटो, पायानं चालवायच्या रिक्षा, असंख्य पोचे असलेल्या, रंगाचा पत्ता नसलेल्या ‘ कॅब ‘ नावाच्या मारुती ओमनी टॅक्स्या. अतोनात गर्दी. वाहन डावीकडून नेणं ही प्रथा लोक पाळत नाहीत. कुठूनही वाहनं वाट काढत फिरतात. रस्त्याच्या बाजूंना लांब-रूंद-खोल नाले, कचऱ्यानं काठोकाठ भरलेले.  भरपूर चिखल आणि त्यात प्लास्टिक, धातू, कागद इत्यादींच्या वस्तू भरलेल्या. रस्त्याच्या मधोमध  कचऱ्याचे ढीग, नव्हे डोंगरच. प्लास्टिक आणि कागदाच्या अगणित वस्तू. माणसं-बाया त्या ढिगातून वेचक गोष्टी बाहेर काढून प्लास्टिकच्या पोत्यात भरून नेतात. अव्याहत हा उद्योग चाललेला.
सुंदर नगरी स्टॉपशी बस थांबते. बाहेर पडल्यावर प्रश्न पडतो की सुंदर  नगरी असं नाव का पडलं. सुंदर तर काहीच नाही. 
1976च्या आसपास दिल्ली सुंदर करायचं ठरलं. म्हणजे दिल्लीतल्या झोपड्या उठवायच्या आणि लोकांना दूर पाठवायचं, दिल्लीकराच्या, दिल्लीत येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेस पडणार नाहीत अशा ठिकाणी. हे घ्या थोडेसे पैसे. यमुनेच्या पलिकडं मोकळ्या वैराण जागेवर जा. तिथं तुमच्यासाठी प्लॉटचे आकार आखून ठेवले आहेत. तीस गज, साठ गज, नव्वद गज, दहा गज इत्यादी आकाराचे. नव्या दिल्लीच्या झोपड्यांत अनेक कोष्टी कुटुंबं होती. विणकर. त्याना कपडे तयार करणं, रंगवणं जमावं यासाठी थोडासा मोठा प्लॉट. बाकीच्याना लहान प्लॉट.विजेचं कनेक्शन आहे, पाण्यासाठी पाईप लाईन टाकलेली आहे. जा तिथं आणि तुम्हाला हवं ते करा. कसंही घर बांधा.
लोकांना उठवण्यात आलं. योजना काय आहे, तिचे तपशील, कुटुबांचे अधिकार, सरकारच्या जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी कोणालाच माहीत नव्हत्या. बहुतेक माणसं अशिक्षित असल्यानं कोणी सरकारी कचेरीत जाऊन चौकशी करणं शक्य नव्हतं.   सरकारी अधिकाऱ्याकड तोड वर करून विचारणा करणं म्हणजे तर सोडूनच द्या. 95 मधे भाजपचं सरकार आलं, जगमोहन दिल्लीचे प्रशासक झाल्यानंतर त्यांनी प्लान्स शोधून काढले तेव्हां त्या काळातल्या एनजीओना पत्ता लागला. तोवर लोकानी झोपड्या उभारल्या होत्या. 
वीज असण्यापेक्षा नसणंच जास्त. मनास वाटेल तशी घरं उभारल्यानं रस्ते लहान, वेडे वाकडे. सांडपाण्याची व्यवस्था नाही. वैद्यकीय व्यवस्था नाही. माणसं जगत होती झालं. 2000 च्या सुमाराला परिवर्तन संस्थेनं लोकांना संघटित केलं. माहितीच्या आधिकारावाटे योजना काय होती, अधिकार कोणते होते याची माहिती काढली, मागण्या करत आंदोलनं केली.
।।
सुंदर नगरी बस स्टँड संपला की पन्नास पावलांवर पायवाटेवरच एक देऊळ आहे. देवळाला लागूनच डावीकडं सुंदर नगरीत जाणारा रस्ता सुरु होतो. रस्त्यावर दुतरफा पायवाटा नाहीतच. दुकानांना, इमारतींना लागूनच फेरीवाल्यांच्या पथाऱ्या सुरु होतात. भाज्या, फळं,धान्यं, प्लास्टिकच्या वस्तू, खाण्याच्या वस्तू, कपडे, भांडी इत्यादी असंख्य वस्तू या पथारीवर पसरलेल्या. पथारी संपते तिथं रस्ता सुरु होतो. पण पाच सात फूट झाले की लगेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पथाऱ्या सुरु होतात. म्हणजे चालायला किंवा वहानांना फार तर दहाएक फूट जागा शिल्लक रहाते. समोरासमोर दोन कार आल्या की खलास. एक कार माग सरकवायची, दुसरीनं डावीकडं चेपून घ्यायचं असं करत करत कार सरकरणार. त्यामुळं इथं फारशा कार येतच नाहीत.
कुठल्याही दुकानात किंवा इमारतीत प्रवेश करायचा असेल तर रस्त्यावरच्या फेरीवाल्याच्या पथारीतून वाट काढावी लागते.
प्रचंड गलका, गजबज, धूळ, माशा इत्यादी.
आणि हो, या पथाऱ्या पसरलेल्या असतात नालीवर. या नालीत सांडपाणी साचलेलं, त्यात माशा वगैरे.
जागोजागी चौकशी करत होतो की  आप पार्टीचं ऑफिस कुठंय. प्रत्येक जण दूरवर बोट करून सांगत होता की सरळ जा, काही अंतर गेल्यावर तुम्हाला डाव्या हाताला ऑफिस लागेल. चालतोय चालतोय. बराच पुढं गेल्यावर एक माणूस म्हणाला की अरे तुम्ही बरेच पुढं आलात, मागं फिरा आणि त्या तिथं तुम्हाला ऑफिस सापडेल.
मी चुकलो कारण आप पार्टीचं ऑफिस पटकन ओळखता येण्यासारखं नव्हतं. एका अगदीच सामान्य, जुन्या इमारतीत ते होतं. दोन इमारतीच्या गिचमडीत एका अगदी छोट्या दरवाजावर झाडूचं पोस्टर आणि आप पार्टीचं नाव असलेला बोर्ड होता.अगदीच टपरीवर असलेल्या पाटीसारखा. दिल्लीत सरकार असलेल्या, मुख्यमंत्री असलेल्या पक्षाचं ऑफिस असल्यासारखं वाटत नव्हतं.
पाच सात पायऱ्या वर चढायचं आिण नंतर दहा पायऱ्या उतरून तळघरात जायचं. अगदीच विचित्र. खाली उतरल्यावर एक मोठा हॉल. त्यात एक सतरंजी पसरलेली. त्यावर कार्यकर्ते गटागटानं बोलत होते. एका कोपऱ्यात टेबल, चार पाच खुर्च्या आणि एक कंप्यूटर. कोपऱ्या कोपऱ्यात पोस्टर आणि पत्रकांचे गठ्ठे पसरलेले. भिंतीवर झाडूची पोस्टर्स.  
जमिनीवर बसलेल्या एका गटामधे गेलो. मुकेश मंडल नावाचा एक शाळकरी मुलगा तिथं त्याची केस समजून सांगत होता. 
जेमतेम पाच फूट उंचीचा मुलगा. काळासावळा. हातात प्लास्टिकची पिशवी. पिशवीत बरीच कागदपत्रं. 
” मी आमदाराकडून शिफारसपत्रं घ्यायला चाललोय. मला मुकर्जी शाळेत नववीत प्रवेश घ्यायचाय. आधीची शाळा आठवीपर्यंतचीच होती. आमदारांनी पत्र दिलं तर कदाचित प्रवेश मिळेल.”
” शाळेत प्रवेश आणि आमदाराचा काय संबंध? तू जिथं रहातोस त्या ठिकाणाच्या जवळच्या शाळेत तुला प्रवेश मिळायला हवा.” मी.
” ते बरोबर आहे. मी सीमापुरी विभागात रहातो. मुकर्जी शाळा तिथच आहे. परंतू तिथं प्रवेश देत नाहीयेत. ”
” कां ?” मी.
” जागा नाहीये म्हणून सांगतात. 50 हजार रुपये मागतात.”
” हे कसले पैसे?” मी.
” शाळा सरकारी आहे पण व्यवस्थापन खाजगी आहे. फी आहे दरमहा ३५ रुपये.व्यवस्थापन देणगी मागतंय. देणगी नाही तर प्रवेश नाही.   माझे वडील एका कारखान्यात काम करतात.  त्यांना महिन्याला पाच हजार रुपये पगार मिळतो. मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. घरात माझी आई आणि आजी  आहे. संसार चालवण्यात इतके पैसे खर्च होतात की आम्हा मुलांची फी जेमतेम भरणं शक्य होतं. देणगी कुठून द्यायची? म्हणून आमदाराची चिठ्ठी हवीय.”
मला प्रश्न पडला की आमदार कुठाय. गोल करून बसलेली साताठ माणसं अगदीच पोरसवदा, चंगीभंगी वाटावी अशी होती. जीन्स. चेक्सचं डिझाईन असलेले घट्ट शर्टस. छातीवरची बटनं उघडी.
समोर बसलेला वीस बावीस वर्षाचा धर्मेंद्र कोली हा आमदार होता. अजिबातच आमदार असल्यासारखा दिसत नव्हता. कॉलेज कट्टयावर जसं तरूण गप्पा करत बसलेले असतात तसं वातावरण. 
धर्मेंद्रनं कागद पाहिले. त्याच्या मित्रांशी चर्चा केली. दूर कोपऱ्यात कंप्यूटरवर बसलेल्या तरूणाला त्यानं हा मारली. पत्र द्यायला सांगितलं. धर्मेंद्र दहावी पास आहे. इंग्रजी फारसं येत नाही. ड्राफ्टिंग वगैरेही येत नाही. कार्यालयातले त्याचे सहकारी त्याच्यासाठी पत्रंबित्र लिहितात. 
तरूण टेबलापाशी गेला. खणातून लेटरहेड काढलं. कंप्यूटरवर पत्र लिहिलं. प्रिंटरवर छापून मुकेश मंडलच्या हाती दिलं.
पत्र लिहिणाऱ्या तरुणाचं नाव मुकेश कुमार मिश्रा. मूळचा हिमाचल प्रदेशातला. शिकण्यासाठी गाझियाबादमधे आला. तिथं त्यानं एमबीए केलं. एका कंपनीत नोकरीला होता.त्यानं पगार किती होता ते सांगितलं नाही पण पगार एकूणात चांगलाच होता असं त्याच्या बोलण्यात आडून आलं.   दिल्लीत तो अण्णांच्या कार्यक्रमात, भाषणांत हजर असे. देशातल्या राजकीय चिखलाला तो विटला होता. तो रहात होता तिथं समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा प्रभाव होता.दोन्ही पार्ट्या भ्रष्ट होत्या.मुकेशनं नोकरी सोडली. अण्णांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दोन वर्षं पूर्णवेळ आंदोलनाचं काम करायचं ठरवलं. तिथंच तो केजरीवालांच्या संपर्कात आला. प्रभािवत झाला. आप पार्टीचा पूर्णवेळ िवनावेतन कार्यकर्ता झाला. त्याच्या बरोबर आशुतोष कुमार नावाचा तरूण होता. तो बीएससी झाला होता. त्यानंही दोन वर्षासाठी पक्षाचं काम करायचं ठरवलं होतं. घरचं खाऊन. मला १९७४ साली जेपींचं आंदोलन सुरु झालं तेव्हां गुजरात आणि बिहारमधे भेटलेले तरूण आठवले. गंमत म्हणजे त्याच तरूणांमधे एक होते लालू प्रसाद यादव.
गप्पा मारता मारता कसा वेळ गेला कळलं नाही. दुपार उलटली होती. जेवायचं होतं. जमलेल्यांनी आपापले डबे काढले. गोल करून जेवण करायला सुरवात केली. माझ्यासमोर एक वर्तमानपत्राचा कागद ठेवण्यात आला. त्यात एकानं पोळ्या ठेवल्या. दुसऱ्यानं एक सुकी भाजी ठेवली. तिसऱ्यानं एक कांद्याची फोड, काकडीची फोड आणि लोणचं ठेवलं. जेवता जेवता गप्पा झाल्या. या गटामधे एक रामाश्रय नावाचे मध्यमवयीन गृहस्थ होते. पँट, खोचलेला शर्ट. ते याच वस्तीत रहातात. कुठेशी नोकरी करतात. केजरीवाल इथं कामासाठी आले तेव्हांपासून म्हणजे १९९८-९९ पासून रामाश्रय केजरीवाल यांच्यासोबत होते. त्यांनी त्यांच्या आणि केजरीवालांच्या आठवणी सांगितल्या.
याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर २००९ साली केजरीवाल मुक्काम करून होते.  मॅगसेसे पारितोषिकाच्या रकमेतून त्यांनी या वस्तीत काम उभं केलं. वस्तीतल्या लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली,  संघटित केलं, त्यांच्या मागण्या सरकार समोर मांडल्या, त्यांच्या समस्या सोडवल्या. माहिती अधिकाराचा वापर केला. रेशनवर मिळणारं धान्य ही मोठी समस्या होती. दुकानदार ते धान्य बाहेर विकत आणि इथल्या लोकांना खराब आणि अपुरं धान्य देत. केजरीवाल आणि धर्मेंद्र कोलीची बहीण संतोष कोली यांनी लोकांना संघटित केलं, रेशन माफिया उध्वस्थ केला, रेशन दुकानातून लोकांना धान्य देण्याची व्यवस्था केली. रेशन माफियाला दिल्लीतली नोकरशाही आणि भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षातल्या लोकांची मदत होत असे. १९९८ पासूनच या भागात केजरीवाल काम करत होते. त्या वेळी ते इन्कम टॅक्स विभागात अधिकारी होते. तरीही एकाद्या कार्यकर्त्याप्रमाणं लोकांमधे मिसळत, सरकारी कचेऱ्यांत त्यांच्यासोबत जात. केजरीवाल आयएएस दर्जाचे अधिकारी होते. तरीही दिल्ली सरकार आणि पालिकेतल्या अगदी तळातल्या कारकुनासमोरही ते सामान्य माणसाप्रमाणं उभे असत. स्थानिकांना या गोष्टीचं अप्रूप होतं. सरकारी कचेऱ्यांत जेव्हां केजरीवाल कोण आहेत ते कळे तेव्हां ते आश्चर्य चकीत होत, नंतर घाबरत पण नंतर सांगत की त्यांचा इलाज नाही, त्यांच्यावर दबाव असतो.
 रामाश्रयनी सोहन लाल नावाचा कार्यकर्ता मला दिला. त्यानं मला वस्तीत, लोकांमधे फिरवलं.
 घरांच्या बाजूनं सांडपाण्याच्या नाल्या. पूर्ण भरलेल्या. माशांचा थर. नालीवरच फळ्या टाकून बाया माणसं बसलेली. कोणी त्यावरच माशा वारत खात बसलेलं, मुलं त्यावर बसून शी करत होती. रस्ता असून नसल्यागत. मधे मधे कळकट दुकानं. घरांत संडास नव्हते. काही अंतरावर एक शौचालय होतं. सोहनलाल मला त्या शौचालयापाशी घेऊन गेला. दुरूनच दुर्गंधी येत होती. फार जवळ जाऊ शकलो नाही.
” या शौचालयाचा वापर करणं अशक्य. तरीही इतर कोणतीच सोय नसल्यानं माणसं त्यात जातात. शक्यतो टाळण्याची वृत्ती. त्यामुळं कॉन्सिटेपशनसारख्या व्याधी आणि त्यातून होणारे त्रास माणसं सहन करत असतात.”
हातात प्लास्टिक, पत्र्याचे डबे घेऊन स्त्री पुरुष शौचालयाबाहेर आतला माणूस बाहेर येण्याची वाट पहात उभे होते.
सारा प्रकार अंगावर शहारे आणणारा होता.
” इथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतू आवश्यक औषधं मिळत नाहीत. ”
सोहनलाल बीए शिकलेला आहे. तेवढ्यावर त्याला नोकरी मिळत नाहिये. नोकरी मिळवण्यासाठी कसला तरी कोर्स करावा लागेल. पण तेवढे पैसे त्याच्याकडं नाहीयेत.
एका घरात थांबलो. दहा बाय दहाची खोली असेल. सामान कोंबलेलं. कपाटात भांडी. कपाटावर टीव्ही. कपाट उघडून त्यातल्या एका डब्यातून पैसे काढून भंवरीबाईनं मुलाच्या हातात दिले आणि काही तरी आणायला पिटाळलं. आतून घर स्वच्छ होतं. चक्क एक कुठल्याशा कंपनीचा पाणी शुद्ध करणारं उपकरण होतं. त्या उपकरणाकडं मी पाहिल्यावर भंवरी हसून म्हणाल्या ” दिल्ली पालिका तर चांगलं पाणी देत नाही. मग काय करणार. ते उपकरण घेतलंय. वीज असेल तेव्हांच चालतं. ”
भँवरीबाईशी काय बोलावं ते कळेना. या झोपडपट्टीबाबत जनरल माहिती सांग असं म्हणालो. भंवरी बोलल्या. 
2000 च्या सुमारास माहिती अधिकाराच्या तरतुदीनुसार माहिती मिळायला लागली. सांडपाण्याची भुमिगत गटारं करण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या पाईप्सची खरेदी झाली होती पण प्रत्यक्षात ते बसवण्यात आले नव्हते. हँड पंपची तरतूद होती, त्यावर खर्च झाला होता पण हँड पंप बसवण्यात आले नव्हते. चौकात कारंजी कल्पिली होती. त्यावर खर्च झाला होता पण कारंजी कधीच झाली नाहीत. पैसे मधल्या मधे मारण्यात आले होते. मुळात नियोजनच कोणाला माहीत नसल्यानं भ्रष्टाचार झालाय हो लोकाना कळत नव्हतं.
लोकांना रेशन मिळत नव्हतं. सरकारनं गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत असे वर्ग केले होते. त्यांना भगवी, पिवळी, पांढरी अशी रेशन कार्डं दिली होती. मध्यम वर्गीय आणि श्रीमंत रेशनवर धान्य वगैरे कधीच घेत नव्हते. गरीबांना रेशन मिळायला हवं होतं पण मिळत नव्हतं, अपुरं मिळायचं किंवा वाईट प्रतीचं मिळायचं. परंतू विचारायची सोय नव्हती. अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोकाना किती आणि कोणत्या भावात रेशन मिळतं याची माहिती नव्हती. दुकानदार देईल ते आणि तितकंच घ्यायचं येवढंच माहीत होतं.
संतोष कोली ही तरूण मुलगी पुढं आली.  तिनं महिलांना संघटित केलं. मोर्चे काढले. माहितीच्या अधिकारात भ्रष्टाचार हुडकला.   महिलांना विधानसभेवर नेलं. तिनं सापाच्या शेपटावर पाय दिला होता. झोपडपट्टीवर राज्य करणाऱ्या माफियाला ती नडली. रेशन दुकानदारांची मोठी माफिया टोळी होती. रेशनवरचं धान्य हडप करणं यावर टोळी जगत होती. सरकारी योजनांतल्या पैशावरही ती टोळी ताव मारत होती.  या सर्व व्यवहारात सरकारी यंत्रणा आणि राजकीय पुढारी यांचं संगनमत होतं. संतोषनं ते सारं उघडं पाडल्यावर तिच्यावर हल्ले झाले. एकदा सर्जरीसाठी वापरल्या जाणारं ब्लेड तिच्या गळ्यावर फिरवण्यात आलं. जखमी अवस्थेत ती इस्पितळात गेली असता डॉक्टर तिला दाखल करून घेत   नव्हते. स्वतःच स्वतःवर हल्ला करून म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करून ती दाखल झालीय असं डॉक्टर म्हणत होते. पुढारी आणि माफियाच्या दबावाखाली. लोकांनी दबाव आणल्यावर आणि इच्छा शक्तीवर संतोष जगली. नंतर एका अपघातात ती वारली.
भँवरीबाईन संतोषची कथा सांगितली, तिच्यामुळं त्यांचे प्रश्न धसाला लागत होते ते सांगितलं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली ” आज ती असायला हवी होती. गेल्याच महिन्यात आमच्या या वस्तीच्या टोकाला असलेल्या झोपडपट्टीवर पालिकेचा बुलडोझर पोचला. आम्हाला कळल्या कळल्या आम्ही तिथं धावलो. तोवर काही झोपड्या पडल्या होत्या. परंतू उरलेल्या टिकल्या. संतोष असती तर पडलेल्या झोपड्याही वाचल्या असत्या.
संतोष केजरीवाल यांच्या आमपार्टीत सामिल झाली होती. ती आमदार होणार होती.  विधानसभा निवडणुकीच्या आधीच तिचं अपघाती निधन झालं.  तिचा भाऊ धर्मेंद्र कोली याला तिकीट मिळालं. तो आमदार झाला.
।।
आप पार्टीचं सरकार तयार झाल्यावर काय घडलं त्याची ही वानगी.
बेगमपुरा.
गोलगोल चिंचोळ्या गल्ल्यांची वसती. नाना प्रकारच्या इमारती. दुमजली, बैठ्या. मोडकळीला आलेल्या, भितींच्या विटा कोसळून मधे मधे खिंडारं झालेल्या, गिलावा नसलेल्या, मोडक्या दरवाजांच्या, दरवाजांच्या ऐवजी साड्या टांगून आडोसा केलेल्या, चकचकीत, दोन पुरुष उंचीच्या मजबूत लोखडी दरवाजांच्या.
गल्ल्या काही ठिकाणी अगदीच अरूंद. जेमतेम मोटार सायकल जाऊ शकते. इथं एकादं माणूस आजारी झालं तर अँब्युलन्स सोडाच, साधी कारही प्रवेश करू शकत नाही.
वस्तीत काही ठिकाणी डांबरी सोडाच साधा रस्ताही नाही. खड्डे, दगड, कचरा. इथं कधीही रस्ता असेल असं वाटत नाही. 
दुमजली इमारतींमधलं अंतर तळ मजल्यावर तीन चार फुटांचं. पहिल्या मजल्यापासून वर सर्व बाल्कन्या आणि गॅलऱ्या यांच्यातलं अंतर दहा बारा इंचांचं.दोन समोरासमोरच्या इमारतीतली माणसं गॅलरीत एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून बोलू शकतात अशी स्थिती. याच इमारतींच्या गच्चीपासून तर खालपर्यंत धबधबे कोसळावेत अशा विजेच्या वायरी लोबकळत्या. शहर उभारणीचे कोणतेही कायदे इथं कधीही पाळले गेलेले दिसत नाहीत. कोणीही यावं. कंत्राटदाराला सांगून घर बांधावं. कसंही.
वसतीच्या सुरवातीलाच एक दुमजली घर, या विभागातल्या कॉर्पोरेटरचं. तेही शेजारच्या इमारतींच्या खांद्याला खांदा लावून.
एक औषधाचं दुकान आणि त्याला लागून एक भंगार दुकान. दुकान कसलं एक बोळकांड. माणसं हातगाडीवरून लोखंडी वस्तू आणून या बोळकांडीतल्या मालकाला विकत होते.
चर्चा काढली. कसं चाललंय असं विचारलं. 
” आमच्या या वस्तीत गेल्याच वर्षी नवी पाईप लाईन टाकली गेलीय. ही एवढी मोठी.” भंगारवाला दोन्ही हात पसरून म्हणाला. ” आमच्याच वसतीत रहाणाऱ्या आमच्या भाजपच्या कॉर्पोरेटरनं नेटानं ते काम केलं. त्यामुळं आम्हाला आता पाण्याचा त्रास उरलेला नाही.”
” अरे वा ” म्हणालो.
भंगारवाला हसला. ” म्हणून मी भाजपवाल्याला मत देणार असं समजू नका. मत झाडूला देईन. ”
” कां ?” मी विचारलं.
” केजरीवालचा बोलबाला झाल्यापासून पोलिसांचा हप्ता बंद झालाय. आधी दररोज पोलिस फेरी मारायचा. काही ना काही तरी पैसे द्यायला लागायचे. आता पोलिस घाबरलेत. पैसे मागत नाहीत.”
” पैसे कां मागायचे?”
” काहीच कारण नाही. इथं भंगार घेऊन हातगाड्या माझ्या दुकानासमोर येतात. आता यात गैरकायदेशीर ते काय? मी हे गोडाऊन उभारलंय. म्युनिसिपालिटीनं मला ते कसं बांधलं याची चौकशी केली नाही. तरी पालिकावाला पैसे माग लागला तर ते मी समजू शकतो. पोलिसाला कसले पैसे द्यायचे? पण मी विचारू शकत नव्हतो. केजरीवालनं आवाज काढल्यावर अख्खं पोलिस खातं टरकलय. ”
।।
मी फिरत होतो तेव्हां लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. आप पार्टीला किती जागा मिळतील, किती मतं मिळतील असा विषय देशभर चर्चेत होता.पण त्यात एक खोच होती. आपचं दिल्लीतलं सरकार कोसळलं होतं. केजरीवालांना सत्ता सांभाळणं जमलं नाही. मुख्यमंत्री असूनही ते विरोधी पक्ष-अांदोलकाच्या भूमिकेत वावरले. त्यावर प्रचंड चर्चा झाल्या. काँग्रेस, भाजपनं आपविरोधात प्रचार मोहिम चालवली. एकेकाळी ज्या माध्यमांनी केजरीवाल यांना डोक्यावर घेतलं होतं त्या माध्यमांनी आता केजरीवालांना जाम झोडलं. 
दिल्लीत मी रिक्षावाल्याना भेटलो. दीडेक लाख रिक्षावाले आणि झोपडपट्टी व इतर ठिकाणची गोरगरीब जनत ही केजरीवालांची ताकद होती. मी दिल्लीत रिक्षावाल्यांना भेटलो. सुंदरनगरच्या झोपड्यांत तीन वेळा गेलो आणि प्रत्येक वेळी वेगळ्या विषयांवर बोललो.
रिक्षावाले आणि झोपडीवाले केजरीवाल यांच्यावर नाराज होते. केजरीवाल यांनी मस्ती करून सत्ता घालवली असं त्यांचं मत पडलं. सत्तेत राहून त्यांनी गरीबांचे प्रश्न सोडवायला हवं होतं असं त्यांचं मत होतं. पुढल्या वेळी, लोकसभेत त्यांना मत देणार कां असं विचारल्यावर बहुतेक लोक ‘ इलाज नाही. केजरीवालांचं वागणं पसंत नसलं तरी काँग्रेस-भाजपबद्दल आमची मतं बदललेली नाहीत. केजरीवाल भ्रष्ट नाहीत असं आम्हाला वाटतं. तेव्हां पूर्वीच्या उत्साहानं नाही तरी आम्ही आपच्या उमेदवाराना मतं देऊ. ’ असं काही जण म्हणाले. काही लोक तोंड आंबट करून म्हणाले ‘ सांगता येत नाही.पाहू ’. बेगमपुऱ्यातल्या भंगारवाल्याला पुन्हा एकदा भेटलो तेव्हां तो म्हणाला ‘ केजरीवालनं कामगिरी करून दाखवली होती हे खरंच आहे. पण त्याच्या वागण्यावर मी नाराज आहे. अशी धरसोड करणारा माणूस काय कामाचा? एकादे वेळेस मी मत देईनही. पण सांगता येत नाही.’
आप पार्टी अजून कशाचाच पत्ता नसतांना देशात आपचं सरकार येण्याची शक्यता वर्तवू लागली होती. दिल्लीतल्या आपच्या अपेशाबद्दल देशभर चर्चा चालली असली तरी देशात अनेक ठिकाणी माणसं उत्साहानं आपच्या बाजूला वळत होती. दोन प्रकारची माणसं त्यात होती. एक प्रकार महत्वाकांक्षी लोकांचा. या लोकांना निवडणुका लढवायच्या असतात, राजकारणात पडायचं असतं, पण प्रस्थापित चौकटीत ते जमत नाही. दुसरा प्रकार सामान्य माणसांचा. या माणसांना निवडणूक लढवायची नसते परंतू आपली राजकीय मतं लोकांसमोर यावीत, या मतांना एकादा प्रतिनिधी संसदेत मिळावा असं वाटतं. पहिल्या प्रकारातल्या लोकांनी उमेदवारी जाहीर केली, दुसऱ्या प्रकारातल्या लोकांनी आप पार्टीचं सभासदत्व घेतलं.
महाराष्ट्रात नागपूरमधे अंजली दमानिया यांनी उमेदवारी जाहीर करून आपण नक्की निवडून येणार असं सांगून टाकलं. नागपूरमधे लाखभर लोक उत्साहानं आणि आपणहून आप पार्टीचे सभासद झाले. लाखभर सभासद, त्यांच्या घरची प्रत्येकी दोन तीन माणसं म्हणजे तीन लाख मतं, त्यांचा प्रभाव असलेली प्रत्येकी दोन तीन लाख मतं असा हिशोब केला तर आप पार्टीला साताठ लाख मतं मिळणारच असा हिशोब मांडला गेला.
उत्तर प्रदेशात मुझफरनगर जिल्ह्यात महिनाभरात ७० हजार नागरीक आप पार्टीचे सदस्य झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मुझफरनगरमधे दंगल झाली होती. हिंदू मुसलमान. या दंगलीला भाजपनं चिथावणी दिली असा आरोप होता. त्यात समाजवादी पक्षाचाही हात असल्याची चर्चा होती. देशभर मुझफरपूर गाजत होतं आणि तिथं आप पार्टीची भलीमोठी सस्यता घडली होती. 
मुझफ्फरनगरमधे जायचं ठरवलं.   
मुझफ्फरनगर आणि आसपासच्या प्रदेशात मी 1980 मधे गेलो होतो. लोकसभेच्या निवडणुकांवर लिहिण्यासाठी. देशातल्या महत्वाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात फिरलो. राय बरेली ( इंदिरा गांधी ), सासाराम ( बाबू जगजीवनराम ), चौधरी चरणसिंग ( मेरठ-बागपत ) या मतदार संघात फिरलो. रायबरेली करून कानपूरला गेलो आणि तिथून मेरठ. बसनं प्रवास. बस फारच भयानक. रस्त्यावर कुठंही थांबत, बस स्टँड नावाची गोष्ट नसे. बसमधे काही सिटा नव्हत्याच. त्या जागी पोती ठेवली होती,टायर ठेवलेले होते. ड्रायव्हरच्या मागं, पुढं, बाजूला अशी माणसं बसत. मला सिमेंटच्या पोत्यावर बसायला सांगण्यात आलं. ते शक्य नाही म्हटल्यावर ड्रायव्हरच्या बाजूला ड्रायवरची खुर्ची आणि गियर यांच्या मधल्या जागेत पाय पसरून बसावं लागलं. वेळ रात्रीची. मी अस्वस्थ, बसमधली माणस मात्र सुखात. त्यांना कसलाही त्रास होता असं वाटलं नाही.  
या वेळी दिल्लीहून बसनं गेलो. दिल्लीबाहेर गाजियाबादमधे मोकळ्या मैदानाच्या परिघावर बसेस थांबतात. स्टँड नाही. माणसं, दुकानं यांच्या गराड्यात मधेच बसेस थांबतात. बसवाले मेरठ, खतौली असं ओरडतात. जवळ जवळ बखोटीला धरूनच बसमधे कोंबतात. 
बस. काही ठिकाणी सीट आहे पण सीटला पाठ नाही. त्यातल्या त्यात बरी म्हणजे पाठ असलेली सीट मला मिळाली. 
वाटेत जागोजागी बस थांबे. रस्त्यावर कोणीही हात दाखवला की बस त्याला घेऊन पुढं जाई. बसमधे किती माणसं आहेत याचा हिशोब नव्हता. माणसं कोंबली जात होती. रस्ता खराब म्हणजे अगदी खराब. समोरून उलट्या दिशेनं मोठाले ट्रकही यायचे. मोटार सायकलींचा सुळसुळाट. ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारे. मग सगळी बस ड्रायव्हरच्या दिशेनं घरंगळे. 
वाटेत मोदी नगरच्या जवळ वाहतूक थांबली. मोदी नगरच्या साखर कारखान्याकडं उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर जात असतात. ते हवे तिथं थांबतात, वाटा अडवतात. मग वाहतुकीचा तुंबा. पोलिसांचा पत्ता नाही. आमचा ड्रायव्हर कधी डाव्या बाजून कच्या रस्त्यानं-शेतातून बस नेई. धुळीचा खकाणा. बस इतकी तिरपी होई की आता ती उलथणार असं वाटे. कधी चुकीच्या बाजूनं म्हणजे उजव्या बाजूनं बस जाई आणि इतर वाहनांचा खोळंबा करे. दोनेक तास या खोळंब्यात आम्ही अडकलो होतो. धुळीचे लोट आसमंतात पसरत. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांतल्या समोशांवर, पेठ्यांवर, जिलब्यांवर पसरत. धूळ आणि माशा यांच्यात स्पर्धा चाले. धूळ आणि माशांचे संस्कार आटोपल्यावर मग लोक त्या पदार्थांवर ताव मारत.
130 मैल अंतर कापायला सहा तास लागले.
मुझफ्फरनगर साधारणपणे अस्वच्छ शहर. रस्त्यावर आणि बाजूंना वाहती गटारं. उकीरडे.
माणसं कसं काय असं राहू शकतात? इतकी वर्षं?
गर्दीचे रस्ते.आर्यपुरी. घरांच्या दारावरच्या पाट्या पाहिल्यावर लक्षात येतं की ही हिंदूंची वस्ती आहे. स्वच्छ. बरीच सुंदर. दारात कार उभ्या. दुमजली बंगले. चौकात मंदीर. काही अंतर गेल्यावर दुकानांवरच्या पाट्या पाहिल्यावर लक्षात येतं की आता मुसलमानांची वस्ती सुरू झालीय. गरीबी लक्षात येते. घरांच्या दारांच्या जागी साड्यांचे पडदे. दरवाजांच्या कमानींवर उर्दू वळणदार अक्षरं.
गावात टॅक्सी नाही, ऑटोही दिसत नाही. सायकल रिक्षा वस्त्या पार करत डॉ.जैदींच्या क्लिनिकवर घेऊन गेली. 
जैदींशी ओळख करून घेतली. जैदींनी त्यांच्या  सहकारी डॉक्टरांना बोलावून ओळख करून दिली. पैकी एका डॉक्टरची डेरेदार दाढी. तो मुसलमान आहे हे दिसत होतं. जैदींच्या वेषात वा कशावरही ते मुस्लीम असल्याची खूण नाही.
  जैदी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचीव होते. 
  जैदी घाईत होते. आम आदमी पार्टीची मीटिंग होती. तिथं त्यांना जायचं होतं.मुझफरनगर मतदार संघात मतदान पार पडलं होतं, मतमोजणीला वेळ होता.
 ” चला.मी तुमच्या बैठकीलाच येतो. तुमची हरकत नसेल तर.” मी म्हणालो.
जैदींच्या मोटारसायकलवर पाठीमागं बसलो. माझं सामान माझ्या पाठीवर. 
शिवमंदीर चौक पार करून आम्ही बाजारपेठेतल्या इमारतीत पोचलो. दुसऱ्या मजल्यावर एका रिकाम्या गाळ्यात बैठक चालली होती. बैठकीच्या परिघावर भिंतीला टेकून मी बैठक अनुभवली. थोड्या वेळानं माणसं वाढली, तेव्हां खोलीतून बाहेर पडून माणसं बाहेरच्या मोकळ्या जागेत जमा झाली. 
खडाजंगी झाली.  
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कुठल्या बूथवर कोणी जायचं, कोणत्या वस्तीत जाऊन मतदाराना बाहेर काढायचं,  मतदार यादी कोणी तपासायची इत्यादी सूचना दिल्या नव्हत्या. मतदानाच्या दिवशी आपचे फारच कमी कार्यकर्ते गावात रस्त्यावर आलेले दिसले. जे काही गोळा झाले त्यांची ना चहापाण्याची व्यवस्था, ना दुपारचं जेवण. 
एक जण उठला आणि म्हणाला की हा पक्ष इतर पक्षांसारखा नाही, ज्यानं त्यानं आपापली जबाबदारी घ्यायची, आपापल्या साधनांनिशी काम करायचं. तो म्हणाला की त्यानं आपणहून त्या दिवशी दहा हजार रूपये खर्च केले, लोकांना खायला घातलं, लोकांना गाड्या दिल्या. असंच प्रत्येकानं करायला हवं होतं.
त्यावर एक माणूस म्हणाला की तुम्ही तुमच्या पैशाचा गमजा मारू नका. हा काही पैसेवाल्यांचा पक्ष नाही.
आणखी एक चिडून बोलला की आपलं आपण याला अर्थ नाही. कामाची नीट आखणी तरी व्हायला हवी. ती पक्षानं केली नाही. 
जमलेले लोक शिरा ताणूताणू बोलत होते. पक्षाची कार्यकारिणी कोणती, पदाधिकारी कोणते, ते पक्षाचं काय काम करतात अशी विचारणी तावातावानं होत होती. पदाधिकारी काम करत नसतील तर त्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी झाली.
गंमत म्हणजे जी माणसं माहित नाहीत त्यांचेच राजीनामे मागितले गेले.
एक फार गरमागरम मुद्दा होता तो मुझफ्फरपूरनगरमधील आम आदमीचा उमेदवाराचा. हा उमेदवार आमच्यावर लादला गेला अशी तक्रार लोकं करत होते. एके दिवशी उमेदवार आला. त्यानं बैठकीत असलेल्या कोणाही कार्यकर्त्याला फोन केला नाही. कोणी तरी पाच दहा माणसं त्याची त्यानं गोळा केली आणि प्रचार केला. गाझियाबादहून तो आपले पैसे आणि मोजकी माणसं घेऊन आला. धड सभाही घेतल्या नाहीत. उपऱ्यासारखा आला आणि तसाच मतदानानंतर निघून गेला.  
” स्वतःला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते म्हणवणारे अमूक गृहस्थ कमळाचा बिल्ला लावून फिरतांना पाहिले. ”
” अमूक कार्यकर्ता म्हणवणारा माणूस भ्रष्ट आहे, त्याला कोणी कार्यकर्ता बनवलं.”
” अमूक कार्यकर्ता खूप पैसेवाला आहे. तो आम आदमीचा कार्यकर्ता होऊच कसा शकतो.”
” कार्यकारिणी अस्तित्वात आहे काय? ती काय करते? ”
” कार्यकारिणी आम्हाला विचारून नेमलेली नाही.”
” मी अनेक वर्षं कम्यूनिष्ट पार्टीत काम केलं आहे. माझी विनंती आहे की आपण शिस्त पाळायला हवी. अशा रीतीनं एकमेकांवर आरोप करत राहिलो तर पक्ष चालणार नाही.”
बराच काळ माणसं एकाच वेळी बोलत होती, कोणाचंही धड ऐकायला येत नव्हतं. शिरा ताणून बोलत होते. पारे चढले होते.
काही काळानं शांतता. बहुदा आरोप प्रत्यारोप संपले. मग जैदींनी भाषण करून खुलासा केला. 
” मी कुठल्याही पक्षाचा नाही, नव्हतो. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. रक्तदानासारखे कार्यक्रम आम्ही करतो.हे कार्यक्रम सर्व धर्माच्या लोकांसाठी असतात, गरीबांसाठी  असतात. काही तरी नवं घडतंय, चिखलातून बाहेर येण्याचा प्रयत्न होतोय असं वाटल्यावरून मी या पक्षात आलो. मला कोणीही बोलावलं नाही. उमेदवार गाजियाबादवरून आला. मला त्यानं फोनही केला नाही. पण मी यातलं काहीच मनावर घेतलं नाही. माझ्या घरातही वाद झाले. माझी पत्नी बंड करून उठली, ती म्हणाली की अजून कशाचाच पत्ता नसलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला ती मत देणार नाही. तिला स्वातंत्र्य आहे. मी समजावून सांगितलं, भूमिका सांगितली.   तिनं तिचा विचार स्वतंत्रपणे करावा असं माझं मत आहे. मी माझी प्रॅक्टीसही काही काळ दूर ठेवून पक्षाचं काम करतोय.   कोणी आरोप केला की  दुःख होतं. आजवर मी प्रामाणिकपणे पक्षासाठी झटलो. केजरीवालांचा परिचय नाही, तरी आपणहून मी कामाला जुंपून घेतलंय. माझा कोणाला त्रास होत असेल तर मला या जबाबदारीतून मोकळं करा….”
बैठकीतले तिघे चौघे उठले आणि एकदम बोलू लागले. कधी जैदीना उद्देशून तर कधी आपसात. राजीनाम्याची भाषा करू नये, राजीनामा देऊ नये असं त्यांचं म्हणणं. एक माणूस डोळे पुसू लागलं. बहुदा त्यानं आरोप केले असावेत. मला नीटसं कळत नव्हतं कारण ते पश्चिमी उत्तर प्रदेशातली स्थानिक हिंदी बोलत होते. बॉबी सिनेमातल्या एका गाण्यात – तुम देखते रहियो – अशी ओळ आहे. ही माणसं रहियो, करियो असं बोलत होती. मला त्यातले बारकावे कळत नव्हते.
शेवटी सत्तरी पार केलेले गृहस्थ उभे राहिले. सत्य प्रकाश. ते जिल्हा पक्षाचे अध्यक्ष होते. सभा लांबली असल्यानं माणसंही बहुदा थकली असावीत, त्यामुळं सत्यप्रकाश बोलू लागल्यावर सभेनं त्यांचं शांतपणे ऐकलं.
” इथे आरोप होताहेत. आमच्यावर. मी तोंड उघडलं तर अनेकांचं पितळ उघडं पडेल. मला त्यात पडायचं नाही. मागचं उकरून काढायचं म्हटलं तर त्याला अंत नाही. मी फक्त काय काय कसं कसं घडलंय ते तुमच्या माहितीसाठी ठेवतो. त्यातून तुम्ही काय तो बोध घ्यावा.”
सत्यप्रकाशनी पक्ष कसा स्थापन झाल्यापासूनच्या घटना सांगितल्या. दिल्लीतल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर लोकांनी आपल्याला पक्षाचे कार्यकर्ते व्हायचेय असं म्हणायला सुरवात केली. सदस्य करायचं म्हणजे काय करायचं? शाखा नाही, कार्यालय नाही, पदाधिकारी नाहीत. सत्यप्रकाश, जैदी अशा मंडळींनी आपणहून आपण आम आदमी पक्षाचे सदस्य होणार असं जाहीर केलं. दिल्लीवरून फॉर्म मागवले, ते भरून दिले. सत्य प्रकाश यांचं वय 77. ते पूर्वी जनता दलात होते. राजकारणातून काही निष्पत्ती होत नाही असं त्यांना वाटलं आणि एका निराशेतून त्यांनी राजकारण सोडून स्वतःच्या गावाच्या विकासाकडं जायचं ठरवलं. वयस्कांसाठी डोळ्यांचं आरोग्य, शस्त्रक्रिया इत्यादींची सोय करणारं इस्पितळ त्यांनी सुरु केलं. नंतर एक शाळाही  काढली. विद्यार्थ्यांना जगाच्या प्रवाहात नेण्याचा विचार त्यांनी केला. दिल्लीतल्या घटनांनंतर त्यांना वाटलं की देशासाठी काही तरी करण्याची संधी केजरीवाल निर्माण करत आहेत. म्हणून ते पुढं सरसावले.
सत्यप्रकाश अनुभवी, वयस्क, मुझफरनगरला माहित.त्यामुळं केजरीवाल यांनी त्यांनाच मुझफरनगरचं नियंत्रक, प्रमुख नेमलं. त्यांना आणि जैदींना दररोज शेदोनशे फोन येत, सदस्य होण्यासाठी. शेवटी काही दिवस रस्त्यावर एक टेबल ठेवून जाहीरपणे सदस्यता फॉर्म भरून घेण्यात आले. काही दिवसातच मुझफ्फरनगरमधे सत्तर हजार सदस्य झाले.
लगोलग लोकसभा निवडणुक आली. सदस्यांची सभा भरवणं, त्यातून कार्यकारिणी निवडणं जमलं नाही. सुरवातीच्या लोकांमधले दहा जण कार्यकारिणीत गेले. पक्षाला कचेरी नव्हती, फोन नव्हता. सत्यप्रकाश व त्यांचे सहकारी घरूनच फोनाफोनी करत होते. सारा मामला अनौपचारिक होता.
निवडणुकीत काय धोरण असावं, आम पार्टीच धोरण काय असेल यावर सत्यप्रकाश विचार करत. परंतू सदस्यांबरोबर बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही. केजरीवालांची वक्तव्य, त्यांनी पाठवलेलं छापील मटेरियल यातून अंदाज घेऊन पक्षाबद्दलच्या कल्पना कार्यकर्त्यांनी करून घेतल्या. गटागटानं माणसं भेटत आणि मुझफरनगरमधली परिस्थिती चर्चत. दंगल होऊन गेली होती. सर्वच पक्षांनी दंगलींना हातभार लावल्यानं माणसं हताश होती, संतापलेली होती. प्रस्थापित पक्षांपैकी कोणालाही मत द्यायचं नाही असं लोकांचं मत झालेलं होतं. त्या मताची माणसंही आम पार्टीच्या कार्यकर्त्यांशी निवडणुकीचा विषय काढत.
सत्यप्रकाश यांनी एक बैठक बोलवली. त्यात लोकसभेची निवडणुक लढवायला इच्छुकांनी अर्ज करावेत असं सांगितलं. बैठकीत फारशी माणसं नव्हती. चौघे पाच जणं इच्छुक होते. (चौघेही वरील  बैठकीत हजर होते.) चौघेही अगदी किरकोळ होते. ना त्यांना वजन होतं, ना अनुभव, ना पैसा. केवळ उत्साह. दिल्लीत केजरीवाल यांनी  उमेदवार ठरवला.  कळवला नाही, पाठवला.
निवडणूक पार पडली.  मतदारसंघ धर्मकसोटीवर विभागला होता. हिंदू आणि मुसलमान असे दोन स्पष्ट गट झाले होते. पक्षांनीही आपसात संगनमत केलं होतं. या वातावरणात आम आदमी पक्षाचा प्रभाव पडला नाही. आम कार्यकर्ते मनोमन समजून गेले होते की त्यांचा पराभव झाला आहे.
बैठक आटोपल्यावर मी सामानासकटच सत्यप्रकाश यांच्याकडं गेलो. सत्यप्रकाश जन्मापासूनच मुझफ्फरनगरमधे. 
” तुम्ही इथल्या राजकारणात भाग घेतला आहे. केजरीवाल यांच्या अगदीच चार दोन महिने वयाच्या पक्षात यावंसं तुम्हाला कां वाटलं ?”
” केजरीवालनं तळातल्या माणसांवर निर्णय सोपवला आहे. तुम्ही दिल्लीत काय घडलं पहा. तिथं दिल्ली विधानसभेसाठी प्रत्येक मतदार संघात स्वतंत्र जाहीरनामा तिथल्या स्थानिक लोकांनी तयार केला होता. लोकांना जे हवं होतं ते त्या जाहीरनाम्यात आलं. खालून वर अशी निर्णय पद्दती. दिल्लीत बसून भारताची धोरणं आखतात, लखनऊमधे बसून उत्तर प्रदेशची धोरणं आखतात. खेड्यात लोकांना काय हवंय ते त्यांना कळत नाही. उदा. पश्चिमी उत्तर प्रदेशात किती विचित्र स्थिती आहे पहा. काही गावांत जमिनीत पाणी साचलयं, जमिन चिबड झालीय, दर एकरी उत्पादन घसरलंय. तिथलं जादा पाणी काढणं आवश्यक आहे. उलट काही गावात पाणीच नाहीये.तिथं पाण्याची पातळी खूप खोल गेलीय, तिथं पाणी भरण्याची आवश्यकता आहे. जागोजागी जी परिस्थिती आहे तीनुसार वाट काढायला हवी. केजरीवाल तसा विचार करत आहेत.” सत्यप्रकाश म्हणाले.
” तळातल्या लोकांचं म्हणणं ऐकून धोरणं ठरावित हे खरं आहे. पण त्यासाठी तळातल्या लोकांकडं कार्यक्रम असायला हवेत, उपाय असायला हवेत, प्रश्नांची आणि उत्तरांची जाण असायला हवी. तळातली माणसं गोंधळली आहेत, खेड्यातली लोकं जगातल्या शक्यतांबाबत अज्ञानी आहेत. खेड्यातली माणसं अजूनही भावनात्मक आव्हानांना बळी पडतात, जात धर्माभोवतीच फिरत रहातात. मग खालून तरी निर्णय कोणता आणि कसा होणार ? ” मी विचारलं.
चाळीस टक्के मुस्लीम. खेड्यात. एकेकाळी जमीनदार होते. जमीनदारी गेली. आता तुटपुंज्या जमिनीवर गुजराण करतात. बहुसंख्य लोक मजुरी करतात.  शहरात किडुक मिडूक विकून पोट भरतात. शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळं चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. गुन्हेगारी हा एक व्यवसाय झालाय.  गावठी बंदुका तयार करणं, विकणं. त्या घेऊन छोटछोट्या टोळ्या करून राजकीय पुढाऱ्यांसाठी काम करणं. अपहरण करून पैसे वसूल करणं हा एक नवा धंदा. पकडले गेले तर तुरुंगात राहूनही टोळी चालवतात. पुढाऱ्यांचा पाठिंबा. सर्व पक्षांच्या.
हिंदूंची परिस्थिती तुलनेनं बरी. शिकतात. व्यवसाय करतात. चांगल्या नोकऱ्या करतात. व्यापारात आहेत. हिंदूंतही अलीकडं बेकारांची संख्या वाढतेय. विशेषतः दलितांमधे. त्यामुळं हिंदूंमधेही चलबिचल असते. तिथंही गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत.
‘ मुझफनगरमधे हिंदू आणि मुसलमान दोन्हीतल्या सर्वसामान्य माणसाची परिस्थिती वाईट आहे. दोन्ही समाजांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, तणावग्रस्त झालं आहे. दोन्ही समाज धार्मिक मारामाऱ्या करून आपलं नुकसान करून घेत आहेत. राजकीय पक्ष त्यावरच जगत आहेत.’ सत्य प्रकाश म्हणाले.
 हॉटेलवर उशीरा परतलो. सकाळी जाग आली ती कोणीतरी बेल वाजवल्यामुळं. इथं मुजफरपूरमधे मला भेटायला कोण अालं असेल असा विचार करत दरवाजा उघडला. दोघे जण होते. 
‘ कालच्या पार्टीच्या बैठकीला आम्ही हजर होतो. तुम्हाला भेटावंसं वाटलं म्हणून आलो. येऊ ना?’
एक जण जमिनीवर पसरतो त्या फरशांचा, टाईल्सचा व्यापारी होता. तो अमदाबादवरून फरशा आणत असे. अमदाबादचा त्याचा व्यापारी हिंदू होता. मुझफरपूरवरचे त्याचे उपव्यापारी हिदू होते. 
‘ मी असं सांगायला आलोय की आप पार्टी कशी असावी. माझं म्हणणं असं की निवडणुक लढणाऱ्याला पार्टीत मज्जाव असावा.निवडणुकीनं देशाचा सत्यानाश केलाय, देशात भ्रष्टाचार माजवलाय.’
‘ अहो. निवडणुकीशिवाय लोकशाही कशी चालणार? तुम्ही पार्टी काढायची म्हणता आणि निवडणुक लढवणार नाही? मग पार्टी कशाला हवी. गैरराजकीय संघटना स्थापन करून अण्णांसारखी काम करत रहा. काहीच हरकत नाही.’
‘ नाही. पार्टी तर काढायचीच. पण निवडणुकीत भाग घ्यायचा नाही.’ थोडा वेळ तो थांबला आणि विचार करून म्हणाला ‘ मला काय म्हणायचंय की पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी िनवडणूक लढवता कामा नये.’ 
त्याला बाजूला सारून दुसरा बोलला. हा तरूण बेकार होता. ‘ माझं म्हणणं असं की ज्याचं उत्पन्न ५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल त्याला पक्षाचं सदस्यत्वच देता कामा नये. केजरीवाल आणि अण्णा काय म्हणतात? ते म्हणतात की ही पार्टी गरीबांची आहे. खरं की नाही? म्हणूनच कोणीही धनवान माणूस पक्षात असता कामा नये?’
‘ धनवानाची तुमच्या मते व्याख्या काय?’ मी विचारलं.
‘ मी सांगितलं नाही का. महिना पाच हजार म्हणजे धनवान. हवं तर महिना दहा हजार म्हणा.’
दोघंही गंभीरपणानं बोलत होते. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की कधी तरी या देशातला प्रत्येक माणूस श्रीमंत होईल, महिना एक लाख रुपये मिळवेल अशा दिशेनं देशाची अर्थव्यवस्था विकसित करायला हवी. गरीबीत रहाण्यात काही मजा नाही. तर दोघेही तावातावानं आपल्या भूमिकेचा आग्रह धरत होते.
।।
मी मुंबईत परतलो.
मुंबईला निवडणुकीचा ज्वर आला होता.
 पत्रकार मैत्रिणीला भेटलो. ती आप पार्टीची सदस्य झाली होती. काय काम करायचं हे तिला कळत नव्हतं. म्हणून ती आपच्या काही नेत्यांना भेटायला गेली. मी त्या नेत्यांची नावं विचारली. ते नेते एके काळी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते-नेते  होते. 
‘ या समाजवादी नेत्यांना राजकारणात यश आलेलं नाही. ते निवडून येत नाहीत, त्यांच्या मागं लोकं नाहीत. त्यांना कधी सत्ता मिळवता आली नाही. इतरांच्याबरोबर ते सत्तेत सहभागी असत. पण त्यात त्यांना स्वतःच काही दाखवता आलं नाही. चर्चा फार करतात. एकूण त्या माणसांचं व्यक्तिमत्व विरोधकाचं, मागण्या करण्याचं, तक्रारी करण्याचं.   ही माणसं आप पार्टीत जाऊन काय करणार? ती आपली जुनी धोरणं, सवयी, विचार सोडणार आहेत कां? ही माणसं देशाला काय देणार?’ मी विचारलं.
पत्रकार मैत्रिण म्हणाली ‘ तुम्ही म्हणताय ते समजतय. पण मग आम्ही जावं कोणाकडं? काँग्रेस, भाजपकडं आम्ही जाऊ शकत नाही. मग कोणाकडं जायचं?’
‘ तुम्ही स्वतःची नवी वाट कां शोधत नाही? जुनं उपयोगी पडत नाही, अपेशी ठरतंय तर नवं शोधा की?’
संभाषण नंतर इतर विषयांकडं सरकलं.
डॉक्टर मैत्रिण भेटली. ‘ पक्षानं फार लोकांना तिकीटं दिलीत. लायकी नसलेले आणि नक्की हरणारे बरेच.  अनेकांना  सामाजिक कामाचा अनुभव नाही. मेधाताईंना  सामाजिक कामाचा रेकॉर्ड मोठा आहे. त्याही  हरणार आहेत. मला एक असं फीलिंग आहे की त्या निवडणुक जिंकण्यासाठी लढवत नाहीत, केवळ भाषणं करायला मिळतात, प्रेस मिळतो म्हणून लढतात. इतक्या जागा लढवायची आवश्यकता होती कां?’
‘ तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना विचारलंत? त्यांचं काय म्हणणं आहे?’ मी  विचारलं.
‘ खरं सांगू का. पक्षात कोणाला विचार करायला वेळच नाहीये. सारा गोंधळ आहे.’ डेंटिस्ट म्हणाली.
तिसऱ्या मित्राला भेटलो. तो म्हणाला ‘ फार गोंधळ आहे. केजरीवालांची िवधानं बुचकळ्यात पाडणारी आहेत. केजरीवालांना काय करायचं आहे ते कळत नाही. मी पक्ष सोडला आहे.’
।।
आप पार्टीनं ४३२ जागा लढवल्या. पंजाबमधून त्यांचे चार उमेदवार निवडून आले. स्वतः केजरीवाल दोन ठिकाणी उभे होते, पराजित झाले. ४१५ ठिकाणी उमेदवारांची डिपॉझिटं जप्त झाली. सरासरी प्रत्येक उमेदवाराला ९६८० च्या आसपासची मतं मिळाली.
२०१३ च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप पार्टीला ८० पैकी २८ जागा आणि  ३३ टक्के मतं मिळाली होती. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आप पार्टीचे सर्व उमेदवार पडले परंतू त्यांची मतटक्केवारी सहा टक्क्यानं वाढून ३९ टक्के झाली.
।।
आप पार्टीचा उदय २०११ साली झाला. २०१३ मधे दिल्ली विधानसभेत पूर्ण बहुमत नसतानाही आपला सरकार स्थापन करायची संधी मिळाली. आप सरकारनं वीज, पोलीस अशा केंद्र सरकारशी संबंधित अशा विषयावर एक घाव दोन तुकडे भूमिका घेतली. अशी झटपट भूिमका घेऊन ग्राहकांना योग्य भावात आणि पूर्णवेळ वीज मिळण्यासारखी नव्हती. वीज नििर्मती, वितरण, विजेचा दर ठरवणं यात अनेक संस्था गुंतलेल्या आहेत. हा गुंता सोडवायला वेळ लागणार होता. सरकार चालवता येत नसल्यानं काही तरी कारण शोधून सरकारच्या बाहेर पडायचा प्रयत्न आप पार्टी करत होती असा आरोप हे प्रकरण ज्या रीतीनं हाताळलं त्यावरून झाला. जनलोकपाल विधेयकाला राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतर आप सरकारनं राजीनामा दिला. दिल्लीतल्या गरीब लोकांचे अनेक प्रश्न होते. दिल्लीतली सामान्य माणसं सुरक्षा, आरोग्य, शिक्षण इत्यादी बाबींमुळं कातावलेली होती. हे प्रश्न न सोडवता नको जनलोकपाल विधेयक पुढं करून केजरीवाल यांनी सत्तेतून पळ काढला. सामान्य माणसाला ते आवडलं नाही. लोकसभा निवडणुकीतलं आपचं अपेश त्यातूनच आलं असं म्हणता येईल. परंतू दिल्लीत मात्र त्यांची मतं वाढली ही गोष्ट समजून घ्यायला हवी. त्यातून एक अर्थ असा काढता येईल की आप पार्टीनं जिथं लोकांमधे काम केलं होतं, अनेक वर्षं मेहनत केली होती तिथं लोकांनी त्यांना मतं दिली, त्यांनी राजीनामा दिला ही गोष्ट आवडली नसतांनाही.
दिल्लीनं आपला स्वीकारलं, भारत देशानं नाकारलं.
काही निष्कर्ष काढता येतील?
 केजरीवाल दिल्लीत एक एनजीओ काढून काम करत होते तेव्हां दिल्लीतल्या एका विभागालाच माहित होते. त्या विभागातल्या लोकांना केजरीवालांनी त्यांचे स्थानिक प्रश्न सोडवावेत असं वाटत होतं. तिथं केजरीवाल यशस्वी झाले. 
नंतर केजरीवाल अण्णांच्या आंदोलनात सामिल झाले. त्या वेळी ते देशासमोर आले. त्यांच्या बरोबरीनंच किरण बेदीही देशासमोर आल्या. दोघंही अण्णाचे नंबर दोन, तीन अशा रूपात देशासमोर होते, नंबर एक अण्णाच होते.  अण्णांकडून असलेल्या अपेक्षाच त्या दोघांकडूनही लोकांनी बाळगल्या होत्या.  भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, लोकपाल कायदा इत्यादी इत्यादी. 
केजरीवाल अण्णांच्या आंदोलनापासून वेगळे झाले, त्यांनी राजकीय पक्ष स्थापला आणि निवडणुक लढवायचं ठरवलं तिथून परिस्थिती बदलली, त्यांच्याबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा बदलल्या.
सुरवातीला त्यानी दिल्ली विधानसभा लढवली. क्षेत्रं लहान होतं. भाजप आणि काँग्रेस या दोन कसलेल्या राजकीय पक्षांशी लढत होती. दोन्ही प्रतिस्पर्धी तगडे होते, तुलनेत केजरीवाल किरकोळ होते. दिल्लीच नव्हे तर देशभरच्या लोकांना वाटलं होतं की या निमित्तानं केजरीवाल थोडा अनुभव गोळा करतील, पाच सात आमदार मिळवतील आणि इथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु होईल. म्हणजे माफक अपेक्षा होत्या.
दिल्लीत केजरीवालना मिळालेलं यश कोणालाच अपेक्षित नव्हतं.  बहुमत थोडक्यात हुकलं. काँग्रेस, भाजप, दोघांचाही पराभव करण ही गोष्ट सोपी नव्हती. ती केजरीवालनी साधली.
तिथून पुढली गोची सुरु झाली. देशाच्या पातळीवरच्या निवडणुका होणार होत्या. दिल्ली प्रमाणंच देशातही भाजप आणि काँग्रेसबद्दल लोकांना आपुलकी नव्हती. मोदी त्या वेळी रिंगणात नव्हते.  जे दिल्लीत घडलं ते देशात घडेल असं केजरीवालांना वाटलं. 
तसं केजरीवालांना कां वाटलं?
खरं म्हणजे जे केजरीवालांना वाटलं ते देशाला वाटलं नव्हतं. केजरीवाल दिल्लीत बहुमत मिळवू असं म्हणू लागले तेव्हां लोक काहीसे चक्रावले. केजरीवाल हुशार आहेत, चांगलं बोलतात, त्यांना प्रश्नांची आणि प्रशासनाची चांगली जाण आहे, साधारणपणे चारित्र्यवान आहेत ही गोष्ट लोकांना बरी वाटली होती. परंतू येवढ्यानं भागत नसतं. देशाचं नेतृत्व करायचं म्हणजे किती तरी अधिक गोष्टी लागतात.
केजरीवालांना दिल्लीत मिळालं त्या पेक्षा किती तरी जास्त यश मिळवलेली इतर किती तरी माणसं देशात आहेत, होऊन गेलीत. करूणानिधी आणि ज्योती बसू. दोघांनीही विधानसभा प्रचंड जागा मिळवून काबीज केल्या, कित्येक वर्षं राज्य चालवलं. काँग्रेस या दोघांनाही हात लावू शकली नाही. करूणानिधीना राजकारण उत्तम समजत होतं आणि बसूंची राजकारण-राजकीय विचारधारा यावर उत्तम पकड होती. दोघानीही राज्यकारभारही चांगला हाकला. पण ना त्यांना ना त्यांच्या पक्षाला त्यांना देशाच्या पातळीवर न्यावंसं वाटलं. एक काळ असा होता की बसूना दिल्लीला न्यावं असं अनेक पक्षांना वाटलं. खुद्द बसूंनीच त्याला नकार दिला.
जयललिता, ममताबाई यांनीही राज्यं भरपूर आमदारांसह काबीज केली. सर्व पक्षांना नेस्तनाबूत केलं. पण दोघींनी देशाच्या पातळीवर जायचा विचार केला नाही. स्वतःच्या प्रेमात असूनही त्या दोघीमधे देशाच्या पातळीवर जायचं म्हणजे काय लागतं याची योग्य जाण होती. राज्यात राहून देशाच्या राजकारणात एक मर्यादित भूमिका निभावावी असं त्यांनी ठरवलं.
नरेंद्र मोदी मैदानात उतरले तेव्हां त्यांच्याबद्दलही लोकांना शंका होती. एका परीनं तेही जयललिता, ममता, ज्योती बसू यांच्यासारखेच एका राज्यातले नेते होते. १० वर्षं त्यांनी गुजरात उत्तम सांभाळलं पण देशाला ते फारसे माहित नव्हते. त्यांचा स्वभावही काहीसा आतल्या गाठीचा होता. त्यामुळं हा माणूस देशाला कसं काय नेतृत्व देईल अशी एक शंका होती. केजरीवालांच्या तुलनेत त्यांचा क्रमांक अर्थातच बराच वरचा होता कारण त्यांच्यामागं १० वर्षं राज्य चांगलं चालवण्याचा अनुभव होता. पण भाजप-संघ या बऱ्याच अंशी देशपातळीवर असलेल्या संघटना त्यांच्या मागं उभ्या राहिल्या. मुख्य म्हणजे देश जिंकणं हे काय स्केलवरचं प्रकरण आहे याचा चांगलाच अंदाज त्यांना होता हे आधी माहित नव्हतं, ते त्यांच्या प्रचार मोहिमेत सिद्ध झालं. पक्ष संघटना, कार्यकर्ते, कल्पक प्रचार मोहिम आणि मुबलक पैसा हे घटक त्यांना देशाच्या पातळीवर न्यायला कारणीभूत ठरले.
केजरीवालांना दिल्लीतल्या एकदोन मतदार संघापलिकडं संघटना आणि कार्यकर्ते नव्हते. पैसे, साधनं ही गोष्ट कमी प्रतीची मानून पुढं सरकरणाऱ्या लोकांमधे ते वावरले. ( योगेंद्र यादव, अण्णा हजारे, मेधा पाटकर इ.) त्यांच्याजवळ इतके कमी पैसे होते की एक लोकसभा मतदारसंघही आजच्या परिस्थितीत लढवण्याइतकी त्यांची क्षमता नव्हती. मेधा पाटकर यांचं काय झालं ते पहा. त्यांना तर सारा देश ओळखतो. त्यांचं चारित्र्य, त्यांची कार्याबद्दलची निष्ठा या गोष्टी त्यांच्या शत्रूलाही मान्य होत्या. चुरगळेलेले कपडे घालून, हातात झोळ्या घेतलेले कार्यकर्ते घेऊन घरोघरी जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. साधारणपणे १९४० वगैरेच्या सुमाराला अशा रीतीनं समाजकार्य करण्याची पद्धत होती. आता ती मागं पडलीय. पाटकरांना ते मंजूर नव्हतं. परिणामी एका परीनं चांगल्या असलेल्या त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. संघटनेच्या बाबतीत तर त्यांची स्थिती केजरीवालांपेक्षाही वाईट. देशभर काही ठिकाणी त्यांनी विशिष्ट विषय घेऊन आंदोलनं केली. आंदोलनं होत गेली, विरत गेली. माणसं त्यांच्या स्वार्थासाठी गोळा होत, विखरून जात. चार पाच मुख्य मुद्दयांवर गोळा झालेल्या माणसांची संघटना त्यांनी बांधलेली नव्हती. त्यामुळं देशभर लोक त्यांना ओळखतात पण कोणी त्यांना देशाचा नव्हे राज्याचा नेताही मानत नाही.
याचं कारण शेवटी राजकारणाकडून, राजकीय पक्षाकडून, राजकीय नेत्याकडून जनतेच्या अपेक्षा असतात. भारतात बहुसंख्य जनतेचे नाना प्रश्न लोंबकळत पडलेले आहेत. रोजगार, आरोग्य, शिक्षण, घर इत्यादी अगदीच प्राथमिक गोष्टीही बहुसंख्य लोकांना मिळत नाहीत, त्या लोकांना हव्या आहेत. कोणी तरी असा माणूस ज्याच्या मागं संघटना-माणसं आहेत आणि जो वरील गोष्टी देण्याची शक्यता दिसतेय अशा माणसाला पक्षाला लोक निवडून देतात. जन सामान्यांना तत्वाचं वगैरे भान नसतं, त्यातलं त्यांना कळतही नसतं. समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, मानवता वगैरे गोष्टी त्यांना नीटशा कळतही नाहीत. माणसं दररोजच्या रामरगाड्यात इतकी भरडली जात असतात की दैनंदिन गरजांपलिकडचा व्यापक-वैश्विक वगैरे विचार ती करत नाहीत.
काँग्रेस, भाजप किंवा कोणत्याही पक्षाला लोक मतं देतात कारण एकूणात ही माणसं राज्य करतील,  अन्न वस्त्र निवारा इत्यादी गोष्टी ते देतील अशी एक आशा लोकांना असते. नेहरू, गांधी, आंबेडकर, फुले, विवेकानंद, सावरकर इत्यादी गोष्टींबद्दल त्यांना फारसं माहित नसतं.वरील माणसांबद्दलची माहिती असते ती पक्षातल्या काही मोजक्या मंडळींना. बहुसंख्य सामान्य मतदारांना  ती माणसं मोठीबिठी होती येवढंच समजतं.  यांच्या नावानं मतं मागणाऱ्या माणसांना लोक मतं देतात, त्या मोठ्या माणसांना नाही. 
खरं म्हणजे निवडणुक हा एक जुगार, सट्टा असतो. म्हटलं तर ती अंधश्रद्धा असते. उमेदवार आतून कसा आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याची क्षमता आहे की नाही हे फारसं माहित नसतांनाही माणसं त्यांना मतं देतात. कित्येक वेळा तर उमेदवाराबद्दल अनेक आक्षेप असतांनाही मतं देतात. रेसमधे माणसं घोड्याबद्दल काहीशी चौकशी करतात. म्हणजे घोड्याची आई, आजी, आजोबा इत्यादी कोण आहेत याची माहिती लोक घेतात, त्याचा पूर्वेतिहास पहातात आणि त्याच्यावर पैसे लावतात. शेवटी तो घोडा जिंकतो जिंकतही नाही. उमेदवारांच्या बाबतीतही तसंच काहीसं.
माहिती, समजुत, अपेक्षा यांची काही एक गोळा बेरीज करून मतदार मतदान करतात. अशा गोळाबेरजेत कार्यकर्ते, संघटना, साधनं आणि प्रतिमा या  गोष्टी असतात.  अमूक पक्ष आणि तमूक माणूस आपल्याला सुख देऊ शकेल अशी एक आशा त्यांच्या मनात पालवलेली असते.
 या साऱ्या गोष्टी केजरीवाल यांच्याजवळ नव्हत्या. म्हणूनच त्यांचा पराभव झाला.
।।

One thought on “केजरीवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *