पुस्तकांची दुनिया

पुस्तकांची दुनिया

मुंबईतला फ्लोरा फाऊंटनचा फूटपाथ.
हुतात्मा चौकातल्या हुतात्मा स्मारकाच्या समोरचा कोपरा. इंग्रजी यू आकाराचा
फूटपाथ. पाठीमागं इमारतीच्या कंपाउंडच्या लोखंडी सळयांच आणि डोक्यावर ताडपत्रीचं
कायम तात्पुरतं छप्पर. फूटपाथवरच पुस्तकावर पुस्तक, त्यावर पुस्तक रचत
तीन फूट,
चार
फूट,
पाच
फूट उंचीच्या पुस्तकभिंती.   तीन चार
दुकानं. भिंतीच नसल्यानं एका दुकानापासून दुसरं दुकान वेगळं ठरवणं कठीण. मालकांनाच
ओळखता येतंच आपलं दुकान.  मोजदाद अवघड पण
दोन तीन लाख पुस्तकं असावीत असा दुकानदारांचा अंदाज.
  १९६० सालाच्या सुमाराला इथं  एकच दुकान होतं. आताच्या दुकानांपेक्षा लहान.
मालकाचं नाव रामबाबू.  जुनी पुस्तकं तिथं
मिळायची. जुनी म्हणजे दुर्मिळ आणि वापरून टाकलेली नवी पुस्तकं.  माणसं कथा कादंबऱ्या वाचतात. एकदा वाचून
झाल्यावर रद्दीत विकत. रद्दीतली ती पुस्तकं या दुकानात पोचत. काही वेळा माणसानं
रद्दीत टाकलेली पुस्तकं जुनी असतात, दुर्मिळ असतात. शे
दोनशे वर्षापूर्वीचं पुस्तक असतं, आता ते मिळत नाही.
काही पुस्तकांवर लेखकाच्या सह्या असत. काही पुस्तकं भारतात मिळण्याची शक्यता
नसलेली. काही पुस्तकांवर बंदी असल्यानं ती उघडपणे न मिळणारी. काही पुस्तकांच्या
अगदी मर्यादित आवृत्या निघालेल्या असल्यानं त्या दुर्मिळ असतत. काही पुस्तकांची
स्वतंत्रपणे काही वैशिष्ट्यं. उदा. शेक्सपियरच्या नाटकांचे संग्रह कुठंही मिळतात.
परंतू एकाद्या संग्रहात  रेखाचित्रं
काढलेली असतत. काही पुस्तकं नितांत सुंदर असत.अॅटलास, देशी आणि विदेशी पदार्थ कसे
करायचे ते सांगणारी पुस्तकं, मोटारी आणि विमानांची चित्रं असणारी पुस्तकं…..
पिवळ्या कव्हरांची चावट पुस्तकंही
मिळायची. ती इतर पुस्तकांमधे लपवून ठेवलेली असत. घेणाराही आपल्याकडं कोणी पहात
नाहीये ना याची खात्री करून पटकन पुस्तक घेत असे, घासाघीस न करता.
  तिथून जवळच एशियाटिक लायब्ररी. तिथं विद्वानांचा, वाचकांचा राबता.
त्यातले अनेक विद्वान या दुकानावर थांबायचे, उभ्या उभ्या पुस्तकं
चाळायचे,
साधारणपणे
दुकानात न मिळणाऱ्या पुस्तकांची चौकशी ते करायचे. दुकानातला माणूस चौकशी लक्षात
ठेवायचा. कागदावर लिहून घ्यायचा नाही. काही दिवसांनी ते पुस्तक उपलब्ध व्हायचं.
कुणी तुकारामाची गाथा घ्यायचं, कोणी सलमान रश्दीचं पुस्तक, कोणी बंदी असलेली इंग्रजी
पुस्तकं.
   इंजिनियरिंग, मेडिकल इत्यादी
शाखांची जाडजूड पुस्तकंही असायची. अनेक प्रकारचे विश्वकोष मिळायचे. एक रुपयापासून
हजार रुपयांपर्यंतची पुस्तकं.
माणसं तिष्ठत उभी राहून, उकीडवी बसून
पुस्तकांत रमलेली असायची.
मुंबईत पुस्तकांची दुकानं कमीच होती.
बहुतेक दुकानात पाठ्यपुस्तकं किंवा तसली पुस्तकं मिळायची. गंभीर, परदेशी, ताजी
इंग्रजी पुस्तकं तिथं न मिळायची. त्या वेळी इंटरनेट नव्हतं, फ्लिप कार्ट नव्हतं, अॅमेझॉन
नव्हतं.  त्यामुळं या दुकानाला महत्व आलं
होतं. काही काळानं समोरच्या फूटपाथवर आणखी एक असंच दुकान निघालं.  गिरगावात लॅमिंग्टन रोडवरही याच माणसानं एक
दुकान काढलं.
रामबाबूच्या मूळ दुकानाची आता चार पाच
दुकानं झाली आहेत. या चार पाच दुकानांपैकी एक दुकानदार आहे सुरेश. जेमतेमच
शिकलेला. इंग्रजीची अक्षर ओळख. लखनऊवरून मुंबईत आला, कामाच्या शोधात.
मुंबईत कामाचे अनेक तराफे. कुठला तरी तराफा तुमच्या नशीबी येतो.  रद्दी विकत घेणाऱ्या माणसाकडं सुरेश कामाला
लागला. रद्दी गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊ लागला. रद्दीतली पुस्तकं विकणाऱ्या
फूटपाथवरच्या दुकानदाराच्या संपर्कात आला. तिथं कामाला लागला. मेहनती असल्यानं
पगारवाढ मिळू लागली. सुरेशनं धंदा आत्मसात केला. यथावकाश हुतात्मा चौकातलं एक
दुकान घेतलं.
सुरेशला पुस्तकं घेण्यासाठी फिरावं लागत
नाही. येव्हाना म्हणजे २०१५ सालापर्यंत हा व्यवसाय आता व्यवस्थित स्थिरावला आहे.
रद्दीवाले हुशार झाले आहेत. रद्दीत आलेल्या पुस्तकांची वर्गवारी तेच करतात आणि
फूटपाथवर विकली जातील अशी पुस्तकं आणून सुरेश सारख्या दुकानदारांना विकतात. मुंबईत
कमी अधिक आकाराचे शेदोनशे  तरी असे दुकानदार
तयार झाले आहेत.
रद्दीवाला आणि सुरेश यांना लोकांना काय
आवडतं ते कळलंय. भरड कादंबऱ्या. शब्दकोष. पाठ्यपुस्तकं. गाईड्स. अन्नपदार्थ
शिकवणारी पुस्तकं. एका आठवड्यात अमूक भाषा शिका. यशस्वी होण्याचा मंत्र. कादंबरी
कशी लिहावी,
कविता
कशी करावी. अशी पुस्तकं जास्त खपतात. ज्या किमतीला रद्दीवाला देतो त्याच्या दुप्पट
किमतीला सुरेश ती विकतो. दोनशे पानाची भरड कादंबरी रद्दीवाला स्वतः दोन रुपयात
घेतो,
सुरेशला
पाच रुपयाला विकतो आणि सुरेश ती १० रुपयाला विकतो.
जुनं पुस्तक आलं की सुरेश आतलं पान उघडून
त्यावर पुस्तक केव्हां प्रसिद्ध झालंय ते पहातो. जेवढं जुनं तेवढी किमत
जास्त.   पुस्तकाचा विषय साहित्य, वैद्यकीय, इंजिनियरिंग असा
काहीही असला तरी चालतो. पुस्तकाच्या शीर्षकावरून विषय समजतो. तेवढं सुरेशला पुरतं.
सुरेश दोन पुस्तकांचा संच उघडून दाखवतो. पिवळ्या पडलेल्या पानावर साल लिहिलेलं
असतं १८३०. पुस्तक वैद्यकीय विषयावरचं असतं. सुरेश त्या पुस्तकाची किमत सांगतो पाच
हजार रुपये. मुळातली किमत असते एकादा पाऊंड. सलमान रश्दीची सेटॅनिक व्हर्सेस, अंबानींचं चरित्र ही
पुस्तकं भारतात विकली जात नाहीत हे त्याला कळलं आहे. छापील किमतीच्या दुप्पट पैसे
घेऊन सुरेश ती विकतो.
शिवाय नवीकोरी पुस्तकंही तो विकतो.
इंग्रजी. पुस्तकाची नवी आवृत्ती निघाली की आधीची आवृत्ती किलोच्या भावात विकली
जाते. परदेशात अशी पुस्तकं एक डॉलर, दोन डॉलरला रस्त्यावर विकायला ठेवतात. कित्येक
पुस्तकं तर एका डॉलरला चार पुस्तकं दुकानांच्या बाहेर ठेवलेली असतात. ती कोणी पैसे
न देता उचलून नेली तरी दुकानदार लक्ष देत नाही. अशी पुस्तकं मुंबईत पोचतात,
त्यापैकी काही सुरेशकडं.
 न्यू यॉर्क. ५९ वी  स्ट्रीट.  सहा मजली इमारत. विटांची. १९२० वगैरे काळातली. इमारतीच्या
शेजारी आधुनीक गगनचुंबी इमारती आहेत. त्यांची दर्शनी बाजू काचांनी मढवलेली. ही  बुटकी, जुन्या खिडक्यांची. या इमारतीत तळाला एक
बार आहे आणि एक लँपशेड्सचं दुकान आहे. या इमारतीत आर्गझी नावाचं जुन्या पुस्तकांचं
दुकान आहे. १९५३ मधे लू कोहेन या माणसानं ही इमारत विकत घेतली, त्यात हे दुकान
उघडलं.
आर्गझीमधे जुनी, दुर्मीळ, लेखकाची सही असलेली, देखणी, इत्यादी पुस्तकं
आहेत. त्या बरोबर नकाशे, चित्रांचे प्रिंटस
इत्यादी गोष्टीही आहेत.
बिल क्लिंटन दर वर्षी ख्रिसमसमधे या
दुकानात येतात आणि आपल्या मित्र-नातेवाईकांसाठी किमती भेटवस्तू-पुस्तकं खरेदी
करतात. लू आता म्हातारा झालाय. लू कोहेनच्या तीन मुली हे दुकान चालवतात. या
मुलींची वयंही सत्तरी ओलांडून गेली आहेत.
या दुकानाला १९२५ पासूनचा इतिहास आहे.
आधीचं   दुकान  सदतिसाव्या स्ट्रीटवर  होतं. 
कोहेनला एके दिवशी एका डॉक्टरचा फोन
आला. डॉक्टरनं घर बदललं होतं, जुन्या घरातील
पुस्तकं त्याला काढायची होती. कोहेन त्या घरी पोचला. घरात जमिनीपासून
तक्तपोशीपर्यंत पुस्तकांचे ढीग रचलेले होते. जिन्यांच्या पायऱ्याही पुस्तकानंच
भरलेल्या होत्या. डॉक्टरला पुस्तकाचा नाद. पुस्तकं येवढी झाली की त्यालाच घरात
रहायला जागा शिल्लक राहिली नाही.  तो
दुसऱ्या जागी रहायला निघाला.
कोहेननं पुस्तकांची संख्या पाहिली, चक्रावला. किती पैसे
सांगावेत ते कळेना. काही तरी अगदीच फालतू रक्कम सांगितली. कोहेनला वाटलं होतं की
डॉक्टर रदबदली सुरु करेल मग वाढवून द्यावी लागेल. डॉक्टर लगेच तयार झाला. डॉक्टरनं
अट घातली की सगळीच्या सगळी पुस्तकं घेतली पाहिजेत.
कोहेन दररोज पुस्तकं चाळत असे, हवी असलेली   पुस्तकं गाडीनं घरी आणे आणि नको असलेली पुस्तकं
फेकून देत असे. पुस्तकांची संख्या येवढी होती की कम पुरं करायला कोहेनला कित्येक
महिने लागले असते. डॉक्टरला तर ते घर महिन्याभरात खाली करायचं होतं, विकून टाकायचं होतं.
 कोहेननं ते घरंच विकत घेतलं. सावकाशीनं
पुस्तकांची छाननी झाल्यानंतर ते घर विकून टाकलं.
एकदा एका माणसाच्या घरी कोहेन पोचला.
तिथं दुसरा पुस्तक विक्रेता आधीच पोचला होता. दुसऱ्या विक्रेत्यानं सांगितलं की
कोहेन देईल त्यापेक्षा जास्त पैसे तो देईल. कोहेननं ते ऐकलं. विकणाऱ्याच्या कानात
तो म्हणाला ‘
तो
देईल त्या पेक्षा जास्त पैसे मी द्यायला तयार आहे.’ कोहेनला पुस्तकं
मिळाली.
 कोहेनच्या मुलीला  फोन आला. एक नर्तिका मरण पावली होती, तिचं घर खाली करायचं
होतं,
त्यात
पुस्तकं होती. आर्गझीबद्दल न्यू यॉर्कच्या लोकांना माहित असल्यानं असं काही घडलं
की आर्गझीला फोन येतात. बहीण पोचली. तिनं पुस्तकांवर नजर टाकली. तिच्या लक्षात आलं
की बहुतेक पुस्तकं बंडल आहेत. ‘ हे पहा. मी मला
पाहिजेत ती दहा पंधरा पुस्तकं नेईन, त्याचे १५० डॉलर
देईन.
‘ डील
झाला. बहिणीनं पुस्तकं कॅरीबॅगमधून नेली. त्यात लिओनार्दो दा विंचीनं काढलेल्या
चित्रांचं एक पुस्तक होतं. त्याची किमत सहज  पाच हजार डॉलर होऊ शकत होती.
 एकाद्या ठिकाणी सहा हजार पुस्तकांचं भांडार
असतं. बहिणी ते गोळा करतात. नंतर त्याचं वर्गीकरण करतात. त्यात दुर्मिळ पुस्तक, लेखकाची सही असलेली
पुस्तकं,
पहिल्या
आवृत्तीची पुस्तकं असं वर्गीकरण करून त्यांच्या किमती ठरवल्या जातात. कोणत्या
लेखकाला किती किमत आहे यावरून त्या त्या पुस्तकांची किमत ठरत असते. १०० डॉलर, १० डॉलर, ५ डॉलर अशी चिठ्‌या
चिकटवून पुस्तकं दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर
पाठवली जातात. काही पुस्तकं एक डॉलरला काढली जातात. एका खोक्यात भरून ती पहिल्या
मजल्यावर ठेवतात.
  एकदा गंमत झाली. संध्याकाळी दिवसाचा हिशोब करत
असताना जे एम कोट्झी या कादंबरीकाराची सही असलेलं पुस्तक एका माणसानं केवळ एका
डॉलरला नेलं होतं. बहिणी अतीव दुःखी झाल्या. कारण त्या पुस्तकाची किमत किमान ४००
डॉलर होती. चुकीचं लेबल लावल्याचा प्रताप. पण तशी चूक आयन रँडच्या दी फाऊंटनहेड या
कादंबरीच्या लेखिकेच्या सहीच्या पुस्तकाबाबत झालेली नाही. ते पुस्तक बाजूला ठेवलंय, खरेदीदार येईल
तेव्हां त्याचा खिसा पाहून त्या पुस्तकाची किमत ठरेल. जेम्स जॉईसच्या युलिसिस या
जागतीक साहित्यात महान मानल्या गेलेल्या महाकाय कादंबरीची पहिली आवृत्ती अगदी
मोजक्या प्रतींची होती. त्यातली एक प्रत आर्गझीकडं आहे. या पुस्तकाची किमत ६५ हजार
डॉलर ठरवलेली आहे. खरेदीदारही नक्कीच भेटणार. 
एक झेक श्रीमंत माणूस एकदा आर्गझीमधे आला. त्यानं पाच दुर्मीळ पुस्तकं भेट
देण्यासाठी घेतली आणि त्यासाठी ११ हजार डॉलर मोजले.
खरेदीदारांच्या गरजा आर्गझीला समजतात.
काही लोकांना घरातली कपाटं सजवण्यासाठी पुस्तकं लागतात. अशा पुस्तकांचं बाईंडिंग
चामड्याचं असतं,
त्यावर
छान एंबॉसिंग केलेलं असतं. आत मजकुर कसा असतो याला महत्व नसतं. आर्गझीच्या बहिणी
अशीही पुस्तकं जमवतात. अलिकडं एक फॅशन होती की घरात पांढऱ्या कव्हरचीच पुस्तकं
साचवायची. आर्गझीनं तशी पुस्तकं विकली. न्यू यॉर्कमधे एक माणूस असाही होता जो केवळ
फाटकी,
शिवण
उसवलेली,
कुरतडलेली
पुस्तकं गोळा करत असे. आतला मजकूर, लेखकाचं महत्व, दुर्मिळ असणं या
गोष्टी त्याला महत्वाच्या नाहीत. तर त्याच्यासाठी अशी खराब झालेली पुस्तकंही
आर्गझी गोळा करतं आणि बेश किमतीला विकतं.
न्यू यॉर्कमधलीच एक गोष्ट.
एक झांगड माणूस. नोकरी बिकरी नाही. एका
जुनाट घरात,
कमी
भाडं असल्यानं रहात होता. त्या घरात एक शब्दकोष होता. दोनेक  फूट उंचीचा, वजनदार.  काही हजार पानं. कंटाळा आला आणि खिशात पैसे नसले
की हा माणूस शब्दकोष चाळत असे. एके दिवशी या माणसाच्या खिशात पाव डॉलरही उरला
नव्हता. संध्याकालच्या जेवणाची ददात. शब्दकोष विकला तर शेपाचशे डॉलर मिळणार, मग
चैन.
कोषाचं ओझं डोक्यावर घेऊन हे ध्यान
जुन्या पुस्तकाच्या दुकानात लंगडत लंगडत पोचलं. आर्गझीच्या आसपासचंच दुकान
असणार.  या विभागात अशी अनेक दुकानं आहेत.
दुकानदारानं या घ्यानाकडं पाहिलं. म्हणाला पन्नास डॉलर देईन. या ध्यानानं रदबदली
केली. गयावया केलं.    दुकानदार हुशार.  या घ्यानाची परिस्थिती आणि निकड लक्षात घेऊन तो
पन्नास डॉलरवर पक्का राहिला. हे ध्यानही दोन दिवसांचा प्रश्न सुटला असं म्हणत पैसे
घेऊन मोकळं झालं.
नंतर तो कोष सहज हजार दोन हजार डॉलरला
विकला गेला असेल.
००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *