गांधीजींना शांततेचं नोबेल कां मिळालं नाही.

गांधीजींना शांततेचं नोबेल कां मिळालं नाही.

१९७४ साली नोबेल कमिटीनं मदर तेरेसा यांना शांततेचं नोबेल पारितोषिक नाकारलं. 
कारण?
मदर तेरेसांना शांततेचं नोबेल पारितोषिक द्यावं असं  भारतीय  खासदारानी नोबेल कमीटीला १९७४ साली लिहिलं होतं. शांततेचं नोबल अमूक एका माणसाला द्या अशी विनंती कोणीही करू शकतो.  संसदेतले लोक, अगदी नगरपालिका, जिल्हा परिषदेचेही लोक तशी विनंती करू शकतात.
ब्रीटनमधले भारताचे राजदूत बीके नेहरू यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना लिहिलं की त्यांनी नोबेल कमिटीला मदर तेरेसांना नोबेल द्यावं असं  लिहिलं तर त्याचा उपयोग होईल. इंदिरा गांधी विचार करत होत्या. मधल्या काळात नॉर्वेमधले भारताचे राजदूत शेळवणकर यांनी इंदिरा गांधी यांना पत्र लिहिलं आणि नोबेल कमिटीला पत्र न लिहिलं तर बरं होईल असं सांगितलं. कारण खासदारांनी पत्रं लिहिणं म्हणजे एक प्रचार मोहीम काढल्यासारखं आहे असं नोबेल कमीटीच्या सदस्यांना वाटलं होतं, तसं त्यानी शेळवणकरांकडं बोलून दाखवलं होतं. 
शेळवणकरांचं पत्र पोचायच्या आधीच इंदिरा गांधींनी शिफारशीचं पत्र नोबेल कमीटीला पाठवलं. बहुदा त्यामुळं नोबेल कमिटीचं मत आणखीनच वाईट झालं असावं. त्या वर्षी साखारॉव यांना शांततेचं नोबेल देण्यात आलं.
नंतर १९७९ साली मदर तेरेसा यांना नोबेल मिळालं.
सप्टेंबर महिन्यात नोबेल पारितोषकाच्या हालचाली सुरु होतात. विज्ञान, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकी या पारितोषिकांच्या बाबतीत आधीचे पारितोषिक विजेते, नामांकित आणि मान्यवर व्यक्ती, प्राध्यापक, संशोधक, विविध विषयांचे उत्तम जाणकार यांच्याकडं नोबेल समिती विचारणा करते. मतं मागवते. शांतता पारितोषिकांबाबत मात्र मामला खुल्ला असतो. जाणकार तर मतं पाठवतातच पण  जगातलं कोणीही नावं पाठवू शकतं. नावं तपासली जातात. पुरावे गोळा होतात. त्या व्यक्तिंचं वजन आणि पारितोषिक क्षमता किती आहे याची सखोल चौकशी होते. एकादा जाणकार सल्लागार सखोल अभ्यास सादर करतो. संभाव्यांची एक यादी तयार होते. शेवटी नोबेल कमीटीचे तहहयात सदस्य त्या यादीतून विजेत्याची निवड पुढल्या डिसेंबरमधे म्हणजे १४ महिन्यांनी करते.
कित्येक म्हणजे कित्येक वेळा पारितोषिक जाहीर झाल्यावर वाद होतात. लायक नसलेल्या व्यक्तीला ते मिळालं, लायक व्यक्तींना नाकारलं अशा तक्रारी होतात, नोबेल कमिटीवर पक्षपाताचा आरोप होतो. नोबेल हा गोऱ्यांचा खेळ आहे, नोबेल म्हणजे भांडवलशाहीचं पारितोषिक अशीही टीका होते.
1962 वॉटसन आणि क्रीक यांना डीएनएच्या शोधाबद्दल बक्षीस मिळालं. जाणकारांचं मत होतं की तो शोध रोझालिंड फ्रँकलिन यांना आधीच लागला होता. काहीही काम केलेलं नसतांना, प्रेसिडेंट झाल्याला तीनेक महिने झाले असतांना ओबामा यांना कां शांततेचं पारितोषिक दिलं असा सवाल झाला. नंतर ओबामा यांनी इराक, अफगाणिस्तानात भरपूर युद्ध केलंच. म्हणजे शांततेचं काय झालं असा प्रश्न लोक विचारतात. अमेरिकेनं वियेतनाम आणि कंबोडियात हज्जारो माणसं मारली.तरीही अमेरिकेचे परदेश मंत्री हेन्री किसिंजर यांना शांततेचं पारितोषिक कां दिलं असा प्रश्न लोकांनी विचारला. अराफत यांचा सगळा इतिहास हिंसेनं भरला असताना त्यांनाही पारितोषिक कां दिलं असं लोकांनी विचारलं.
 १९६२ सालच्या साहित्य नोबेल पारितोषिकासाठी  ग्रेप्स ऑफ राथ या कादंबरीचे लेखक स्टाईनबेक शर्यतीत होते. आधी आठ वेळा त्यांचं नामांकन होऊन त्याना नाकारण्यात आलं होतं. १९६२ साली एकूण ६६ साहित्यिकांचं नामांकन झालं होतं. एकेक लेखक गळू लागला.शेवटली तळातली अगदीच दोन तीन नावं उरल्यावर स्टाईनबेक यांचा विचार सुरु झाला. सुरवातीपासून त्यांच्या नावाचा विचार करायला कमिटी तयार नव्हती.कमिटीतल्या लोकांचं मत होतं की स्टाईनबेक हा तसा चांगला कादंबरीकार असला तरी सर्वोच्च दर्जाचा नाही.  इतर साहित्यीक वगळले गेल्यानं इलाज नाही म्हणून स्टाईनबेक यांना पारितोषिक द्यावं लागलं. न्यू यॉर्क टाईम्सनं स्टाईनबेकला  एक मर्यादित क्षमतेचा कादंबरीकार असं म्हणून पारितोषिकावर टीका केली. खुद्द स्टाईनबेक यांनी मान्य केलं आपल्या साहित्याची लायकी नोबेल पारितोषिकाची नाही. हा स्टाईनबेक यांचा विनय मानता येईल.साहित्याची गुणवत्ता हा बऱ्याच अंशी व्यक्तिसापेक्ष भाग असतो. कितीही मोठी साहित्य कृती घेतली तरी तिला नाकं मुरडणारी माणसं असतातच. मतंमांतरं असतात, त्यातून वाट काढायची असते. स्टाईनबेक यांना बक्षीस मिळालं त्याच्या आदल्याच वर्षी युगोस्लाव लेखक आयव्हो आंद्रिसिन यांना नोबेल मिळालं. स्पर्धेत जेआरआर टोल्किन होते. त्यांची लॉर्ड ऑफ रिंग्ज ही कादंबरी नोबेल कमिटीच्या सदस्यांना पसंत पडली नाही.
गांधीजींना पहिलं नामांकन १९३७ साली मिळालं. गांधीजींवर प्रेम करणाऱ्या मंडळींचे ‘ गांधीमित्र ‘  गट अमेरिकेत आणि युरोपात होते. त्या गटांपैकी नॉर्वेजियन गटानं त्यांचं नाव कमिटीला पाठवलं. कमिटीनं प्रोफेसर वर्म म्युल्लर यांना गांधीजी या विषयावरचं मत कमिटीसमोर मांडायला सांगितलं. म्युल्लर यांनी लिहिलं  ‘ गांधीजी हे थोर, तपस्वी पुढारी आहेत, त्यांना त्यांच्या देशात मोठा पाठिंबा आहे. परंतू ते कधी स्वातंत्र्य सैनिक असतात तर कधी हुकूमशहा, कधी ते तत्ववादी असतात तर कधी राष्ट्रवादी होतात, कधी ते एकदम येशू होतात तर कधी अगदी सामान्य माणूस.’ त्यांनी गांधीजींचे विरोधक काय म्हणतात याचीही नोंद घेतली होती. चौरी चौरा घटनेचा उल्लेख त्यांनी केला. गांधीजींचं अहिंसक अांदोलन हिंसक कसं झालं असा त्यांचा प्रश्न होता. द.आफ्रिकेतल्या गांधीजींच्या कार्याचा विचार करतांना ते म्हणाले ‘ गांधीजींचा संघर्ष तिथल्या भारतीयांसाठी होता, भारतीयांपेक्षाही जास्त वाईट स्थितीत असलेल्या स्थानिक काळ्यांसाठी नव्हता. ‘ गांधीजींचं कार्य वैश्विक पातळीवरचं होतं की भारतीय पातळीवर होतं असा प्रश्न म्युल्लर यांनी उपस्थित केला. त्या वर्षी शांततेचं नोबेल पारितोषिक सेसिल ऑफ चेलवूड यांना देण्यात आलं. चेलवूड वकील होते, ब्रिटीश संसदेचे सदस्य होते. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी शांततेला मारक ठरणाऱ्या देशांना शिक्षा व्हावी या उद्देशानं आंतरराष्ट्रीय शांतता संघटना स्थापली. त्यातून लीग ऑफ नेशन्स ही संघटना तयार झाली जिचं रुपांतर पुढं दुसऱ्या महायुद्धानंतर युनायटेड नेशन्समधे झालं.
१९३८ आणि १९३९ साली पुन्हा गांधीजींचं नाव कमिटीसमोर आलं. १९३७ साली जी माहिती आणि मतं कमीटीसमोर आली होती त्यात पुढल्या तीन वर्षात फारसा फरक पडलेला नव्हता. नवे मुद्दे समोर आलेले नव्हते. गांधीजींना पारितोषिक मिळालं नाही.
१९४७ साली गोविंद वल्लभ पंत आणि भाऊसाहेब खेर यांनी नोबेल कमिटीला एक संयुक्त शिफारसपत्र पाठवलं. ‘ भारतीय स्वातंत्र्याचे जनक, नीतीव्यवस्था आणि जागतीक शांतता प्रस्थापित करणारे नेते ‘ हे मुद्दे त्यांनी मांडले. पत्र पाठवलं तेव्हां भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्या वर्षी इतर सहा माणसं नामांकित झाली होती.
कमिटीनं जेन्स अरुप सीप यांची कमीटी नेमली. सीप यांनी १९३७ ते ४७ या काळाचा  अभ्यास करून रिपोर्ट दिला. पारितोषिक द्यायला हरकत नाही असा त्यांचा एकूण सूर होता. परंतू फाळणीनंतर झालेला रक्तपातही कमिटीसमोर होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं यात गांधीजींचा विजय झाला परंतू रक्तलांच्छित फाळणी झाली हा गांधीजींचा पराजय होता, त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचा पराजय होता असं त्यांचं मत पडलं. कमिटीच्या पाच सदस्यांपैकी दोघांना गांधीजींना पारितोषिक मिळावं असं वाटत होतं पण उरलेल्या तीन जणांचं मत वेगळं होतं. गांधीजीचं थोरपण मान्य करूनही त्यांचं म्हणणं होतं की शेवटी ते भारत या एका देशाचे नेते होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात शत्रुत्व, तणाव आणि हिंसा असताना त्या दोन देशांपैकी एका देशातल्या पुढाऱ्याला पारितोषिक देणं त्यांना योग्य वाटलं नाही. गांधीजी एका सभेत भाषण करताना म्हणाले की ज्या देशात लष्कर, विमानदळ, नौदळ इत्यादी गोष्टी आहेत त्या देशात मला स्थान नाही. हे त्यांचं म्हणणं त्यांच्या शांततेचा मुद्दयाला धरून होतं. त्याच भाषणात गांधीजी म्हणाले की ज्या रीतीनं पाकिस्तान वागत आहे ( हिंसा, काश्मिरात पठाण दहशतादी घुसवणं इत्यादी ) ते पहाता मी पाकिस्तानशी युद्धही पुकारायला तयार आहे. ही दोन विधानं कमीटी सदस्यांना परस्परांना छेद देणारी वाटली. गांधीजींच्या  अनेक विधानांमथे विसंगती वाटते कारण त्या विधानांना संदर्भ असतात. गांधीजी काळ आणि परिस्थितीनुसार आपले विचार बदलत असत. 
 गांधीजीनी भारत देशाला स्वातंत्र्य चळवळीसाठी संघटित केलं. ते मुख्य ध्येय. धर्म, तत्वज्ञान, अर्थविचार, सामाजिक विचार या गोष्टी ओघानं येत गेल्या, ती गांधीजींची मुख्य क्षेत्रं नव्हती. त्यामुळंच गांधीजींचा अर्थविचार, धर्मविषयक विचार या गोष्टी मर्यादित स्वरूपाच्या होत्या. जगानंही गांधीजींकडं एक राष्ट्राची उभारणी करणारा माणूस पाहिलं. हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं.  नेलसन मंडेलांचा लढा वर्णद्वेषाविरोधात होता. काळ्यांची गुलामी, एकाद्या वंशाची गुलामी असा सर्व जगाला व्यापणारा मुद्दा त्यांनी घेतला होता. दक्षिण आफ्रिकेचं स्वातंत्र्य हा आनुषंगिक भाग होता. मार्टिन लुथर यांचा लढाही काळ्यांच्या स्वातंत्र्याचा असल्यानं वैश्विक होता. 
गांधीजीचा अहिंसेचा विचार एकाद्या देशाचा नव्हता, साऱ्या जगाचा होता. नोबेल कमीटीलाही गांधीजींची अहिंसा पटत होती. पण त्यांच्यात देशात, त्यांच्याच लोकांनी, त्यांच्याच पाठिराख्यानी हिंसा कशी केली ते पश्चिमेतल्या लोकाना उमगलं नाही. हिंदू आणि मुसलमान दोघांनीही लाखो माणसं मारली. जो देश त्यानी स्वतंत्र केला त्याच देशानं लाखो लोकाना मारून फाळणी घडवून आणली ही गोष्ट लोकाना बुचकळ्यात टाकते. त्यामुळंच गांधीजी हे एक ऊच्च कोटीतले नेते होते हे कळत असूनही त्याना नोबेल पारितोषिक देताना नोबेल कमीटी गोंधळली.  
१९४८ सालासाठी पुन्हा गांधीजींना नामांकन होतं. नावाची शिफारस करणाऱ्यात दोन नोबेल विजेते होते.  कमीटीचे अघ्यक्ष सीप यांनी  गांधीजींच्या शेवटल्या पाच महिन्यांच्या हालचालीचं वर्णन करून ‘ ते एकादे धर्मसंस्थापक शोभावेत ‘ असं वर्णन केलं, पारितोषिक द्यावं असं सूचित केलं. कमिटीचा निर्णय होऊन पारितोषिक जाहीर व्हायच्या आधी दोन दिवस गांधीजींचा खून झाला.
आता पेच निर्माण झाला. डाग हॅमरशोल्ड यांना मरणोत्तर पारितोषिक दिलं गेलं होतं. परंतू कमिटीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्यानं ते मरणोत्तर बक्षीस मानलं गेलं नाही. गांधीजींच्या बाबतीत निर्णय होण्याआधीच मृत्यू झाला होता.
त्या वर्षी कोणालाच बक्षीस दिलं गेलं नाही.  त्या वर्षीची बक्षिसाची रक्कम गोठवण्यात आली, तिचं वाटप कमिटीनं केलं नाही.
नंतर कमिटीनं जाहीरपणे म्हटलं की ‘ गांधीजींना शांततेचं पारितोषिक देता आलं नाही याची खंत नोबेल कमीटीला वाटते. गांधीजी नोबेल पारितोषिकापेक्षा मोठे असल्यानं त्यांना पारितोषिक मिळालं नाही यानं फरक पडत नाही.’
 आईनस्टाईननाही अनेक वर्षं हुलकावणी मिळाली. १९१५ मधे आईनस्टाईननी रिलेटिविटीचा सिद्धांत मांडला होता. त्यात वर्षी खरं म्हणजे त्यांना फीजिक्सचं नोबेल मिळावं अशी अपेक्षा होती. खुद्द आईनस्टाईननाही तसंच वाटत होतं. परंतू त्या वेळच्या वैज्ञानिकांना वाटत होतं की त्यांचा सिद्धांत पुरेशा पुराव्यानिशी सिद्ध झालेला नाही.   १९०५ पासूनच त्यांनी केलेल्या कामामुळं त्याना नोबेलचं नामांकन मिळालेलं होतं परंतू नाना कारणांसाठी त्याना बक्षिस मिळालं नाही. एक कारण होतं की ते ज्यू होते. जर्मन सरकारचा नोबेल कमीटीवर दबाव होता, त्यांना बक्षीस देऊ नका असा आग्रह होता.१९१९ मधे अॅस्ट्रोफिजिसिस्ट एडवर्ड एडिंगटन यांनी सूर्यग्रहणाच्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास मांडला तेव्हां चार वर्ष आधीच आईनस्टाईन यांनी मांडलेला रिलेटिविटीचा सिद्धात खरा ठरला. तरीही आईनस्टाईनना बक्षीस िमळालं नाही.  कमिटीला एक अपराधीपणाची भावना होती. बक्षीस द्यायचं तर खरं पण रिलेटिविटीच्या सिद्धांताला ते दिलं तर आपण उघडे पडू अशा भावनेनं असेल कदाचित पण १९२१ साली एकदाचं, बारा पंधरा वर्षांच्या हुलकावणीनंतर आईनस्टाईनना नोबेल मिळालं.  तेही देताना त्यानी १९०५ साली केलेल्या कामाचा उल्लेख करून ते देण्यात आलं रिलेटिविटी सिद्धांताचा उल्लेख कमिटीनं केला नाही.
या बक्षिसात आईनस्टाईनना काहीच रस उरलेला नव्हता. समारंभ केव्हां होणार याची कुणकुण त्यांना होती. समारंभाला हजर रहायच्या ऐवजी ते जपानमधे भाषण देण्यासाठी निघून गेले. रहाता राहिले पैसे. ते तर त्यांनी १९१९ मधेच आपल्या घटस्फोटित पत्नी आणि दोन मुलांच्या नावे केले होते. घटस्फोटाच्या वेळीच आपल्याला मिळणारी नोबेलची रक्कम त्या तिघांना द्यावी असं त्यांनी घटस्फोटाच्या करारात लिहून ठेवलं होतं. आपल्याला नोबेल मिळणार याची खात्री १९१९ मधेच आईनस्टाईनना झाली होती.
अनेक वर्ष हुलकावणी देणारं बक्षीस आणि त्याचे पैसे यापैकी काहीच आईनस्टाईननी घेतलं नाही.

००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *