शार्ले हेबडो

शार्ले हेबडो

 ७ जानेवारी २०१५ रोजी तीन जण एके सत्तेचाळीस घेऊन पॅरिसच्या शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसले. आतमधे संपादकीय बैठक चालली होती. बैठकीतल्या माणसांना ओळखून, त्यांची नावं घेऊन बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. १२ पत्रकारांना ठार मारलं. मारेकरी होते शेरीफ आणि सईद क्वाची, भाऊ भाऊ.
एकानं कारवाईच्या आधी एक व्हिडियो क्लिप पाठवली होती. आपण इराकमधल्या आयसिस या दहशतवादी संघटनेचे आहोत असं तो त्या क्लिपमधे म्हणाला. दुसऱ्यानं पोलिसांच्या गोळ्यांना बळी जाण्याआधी गर्वानं सांगितलं की त्याला येमेनमधल्या अल कायदाच्या शाखेनं या कारवाईसाठी धाडलं होतं.
अल बगदादी हा आयसिसचा निर्माता. तो आधी अल कायदामधेच होता. अल कायदा अगदी पोचू आहे, मुळमुळीत आहे असा आरोप करत तो बाहेर पडला. अल कायदाच्या अयमान जवाहिरीनं जाहीर केलं की आयसिस ही संघटना फारच जास्त हिंसा करते. हिंसेची तीव्रता हा मतभेदाचा मुद्दा. पश्चिमी देशांचा द्वेष हा दोघांचा समाईक मुद्दा.
शार्ली हेबडो हे एक नास्तिक डावं व्यंगपत्र. फ्रेंच. धर्मपुढारी हे त्यांचं आवडतं गिऱ्हाईक. पोप असो की महंमद, त्यांच्या ब्रशच्या फटक्यातून कोणी सुटत नव्हतं. इस्लामी दहशतवाद्यांना शार्ली हेबडोचं वर्तन मान्य नव्हतं. त्यांनी अनेक वेळा संपादकांना धमक्या दिल्या होत्या, जिवानिशी मारण्याच्या. संपादक आणि व्यंगचित्रकारांना पोलिस संरक्षण देण्यात आलं होतं.
खून पार पडले. फ्रेंच आणि युरोपीय जनतेत संतापाची तीव्र लाट उसळली. पॅरिसच्या चौकात वीस पंचवीस लाख लोक या खुनी उद्योगावर संताप व्यक्त करण्यासाठी गोळा झाले. फ्रान्स, ब्रीटन, जर्मनी इत्यादी देशांचे देशप्रमुख निदर्शनात सहभागी झाले.  साप्ताहिकाच्या मनोधैर्यावर परिणाम झाला नाही. साप्ताहिकानं महंमदांचं व्यंगचित्र पहिल्या पानावर प्रसिद्ध करून नेहमीसारखा अंक काढला. अंकाच्या पन्नास लाखावर प्रती संपल्या. पंधरा भाषांत तो अंक अनुवादित झाला.
आठवडाभर जगभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुस्लीमेतर लोकांनी संताप व्यक्त केला. मुस्लीमांनी खून व्हायला नको होते असं म्हटलं परंतू महंमदांची व्यंगचित्र काढायला नको होती, काढू नयेत असंही म्हटलं.
मुसलमानांचा राग दोन गोष्टींसाठी होता. महंमदांचं चित्र काढण्यासाठी, महंमदांवर व्यंगचित्रं काढण्यासाठी. महंमदांची चित्रं काढणं ही गोष्ट कुराणाला, इस्लामला मंजूर नाही असं सर्व मुसलमानांचं सार्वत्रिक म्हणणं होतं.
कुराणात किंवा सुन्नामधे ( महंमदांची वचनं आणि त्यांची वर्तणुक याचं संकलन ) काय म्हटलंय? आपलं चित्रं  काढू नये असं महंमदांनी म्हटलेलं नाही. तारिक रमादान हे मुसलमानांचे नेते म्हणतात की देवाला सौदर्य आवडतं येवढाच उल्लेख कुराणात आहे. 
मग चित्रं काढू नये ही आज्ञा इस्लाममधे आली कुठून?
सोळाव्या शतकापर्यंत मुस्लीम जगामधे महंमदांची चित्रं काढण्याची परंपरा होती. पॅरिसच्या, इस्तंबूलच्या संग्रहालयात महंमदांची अनेक चित्रं आहेत. त्यात महंमद नव्यानं धर्मात प्रवेश केलेल्या मुस्लीमाना मार्गदर्शन करताना दिसतात. काबामधे दगड उचलून ठेवण्याचं एक चित्र आहे. मदिनेवरच्या स्वारीचं चित्रं आहे. कुराणाचा साक्षात्कार करत असताना गुहेमधे जाताना चित्रं आहे. महंमद पाच दहा दिवसांचे असतानाचं बालमहंमदाचंही एक चित्र आहे. ख्रिस्ताच्या जीवनावर जशी अनंत चित्रं आहेत तशाच प्रकारची ही चित्रं आहेत. त्यावर पर्शियन शैलीचा प्रभाव दिसतो. ही चित्रं तेराव्या आणि पंधराव्या शतकातली आहेत.
म्हणजे सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत महंमदांची चित्रं काढली जात होती. 
ओरहान पामुकच्या माय नेम ईज रेड या कादंबरीत सतराव्या शतकातील ऑटोमन साम्राज्यातील चित्र आणि चित्रकारांचा विषय आहे. ऑटोमन सुलतान पश्चिमेत जाऊन आलेला असतो. व्हेनिसमधल्या पाश्चात्य शैलीनं तो प्रभावित होतो. विशेषतः पोर्ट्रेट्सनं. त्याला वाटतं की पश्चिमेप्रमाणं आपली पोर्ट्रेट निघावीत. आपल्या सल्तनतीचा इतिहास लिहावा व त्यात ही पोर्ट्रेट असावीत असं तो ठरवतो. परंतू तत्कालीन परंपरांवर इस्लामी विचारांचा प्रभाव असतो. म्हणजे अल्लाला जसं जग दिसलं असेल तसंच चित्रात आलं पाहिजे. त्यामुळं पर्वत, माणूस, उंट, कुत्रा इत्यादी एकाच उंचीचे.  कारण त्यांचा आकार अल्लानं ठरवलेला असतो. त्यामुळं दूरवरचा पर्वत लहान दिसतो आणि कुत्रा जवळ असल्यानं मोठा दिसतो ही अगदीच वास्तवाला धरून असलेली गोष्ट इस्लामला मान्य नव्हती. तेव्हां इस्लामविरोधी असलेली वास्तववादी आणि चित्रकाराला दिसलेली चित्रं काढणं असा गैरइस्लामी उद्योग त्याला करायचा होता. अर्थात तो त्याला गुप्तपणानंच करावा लागला.  त्या भानगडीत खून वगैरे होतात. याचा अर्थ कुठल्या तरी शैलीत महंमदांची चित्रं काढली जात होती.
सतराव्या शतकापर्यंत महंमदांची चित्रं काढली जात, फक्त एका वेगळ्या शैलीत. नंतर ही परंपरा लुप्त झाली. ती कां लुप्त झाली असेल याची कल्पना माय नेम ईज रेड या कादंबरीवरून येते. सुलतानाच्या मनात आलं आणि त्यानं परंपरा मोडली. सुलतान म्हणजे ताकदवान माणूस. त्याच्या हाती तलवार.  तो म्हणेल ते  खरं. ज्याच्या हाती तलवार, ज्याच्या हाती सत्ता तो खरा, त्याचं म्हणणं मानायचं.  चित्रं काढायची की नाही आणि ती कशी असावीत यामागं फार विचार वगैरे नव्हता.  कोणी तरी बलवान माणसानं प्रथा बदलली, नवी प्रथा पाडली आणि ती प्रस्थापित झाली.
 आज अल कायदा, तालिबान, तहरीके तालिबान पाकिस्तान, आयसिस, बोको हराम, येमेनी अल कायदा इत्यादी संघटना त्याना मान्य असलेला इस्लाम लोकांवर लादत आहेत. शार्ली हेबडोनं चित्रं काढायची नाही ही जबरदस्ती वरील लोकांनी चालवली आहे. या लोकांना महंमद बिन अल वहाब, हसन अल बाना, कुतुब सैद, अबुल आला मौदुदी या इस्लामी विचारवंतांचा पाठिंबा आहे. म्हणजे या विचारवंतांनी जे सांगितले तोच इस्लाम असं ही मंडळी मानतात. परंतू या मंडळींनीही जो इस्लामचा  अर्थ सांगितला तोही काळाला अनुसरूनच होता. कुराण, सुन्ना या गोष्टी महंमदांच्या मृत्यूनंतर बऱ्याच काळानंतर  एकत्रित केल्या गेल्या. म्हणजे महंमदांनी तोंडी सांगितलेल्या गोष्टी पिढ्यानपिढ्या पसरल्या व नंतर त्या लिहिल्या गेल्या. आणि त्यानंतर आजवर वेळोवेळी त्यांचे वेगवेगळे अर्थ लावले गेले. बहुतेक वेळा लावले गेलेले अर्थ जबरदस्तीनं, ताकदीचा वापर करून रूढ करावे लागलेले आहेत. उदा. अल कायदाने लावलेला शरीयाचा अर्थ हा ओसामा बिन लादेनचा अर्थ होता आणि तो ओसामाच्या ताकदीनं आणि प्रभावानं प्रस्थापित झाला होता.
मुस्लीम ब्रदरहूडचे संस्थापक हसन अल बाना यांचे बंधू जमाल अल बाना यांनी एक पुस्तक लिहून सांगितलं की मध्य युगापासून आजवर जे काही इस्लामचे अर्थ सांगितले आहेत ते सारे समुद्रात बुडवा. ‘ ते अर्थ इस्लामच्या मूळ उद्देशांशी विपरीत आहेत. कोणताही धर्म पाळण्याचं माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेणं, हिंसा करणं हेच मुळी इस्लामला मंजूर नाही. ‘ असं जमाल अल बाना यांचं म्हणणं होतं. इजिप्तमधल्या लोकांनी, अल अझरनं, इस्लामी पुढाऱ्यांनी जमाल यांना दुर्लक्षित केलं.
तेव्हां मुळातच चित्र काढायची परंपरा अनेक शतकं होती ती पाळायला हरकत नाही.  चित्रामधे व्यंगचित्र ही प्रथा काळानुरूप तयार झालेली असल्यानं, ती महंमदांच्या काळात नसल्यानं त्यांचा स्वीकार करण्याचं स्वातंत्र्य मुस्लीम समाजाला असायला हवं. व्यंगचित्रं म्हणजे एकादी घटना, एकादा विचार, एकादा माणूस यावरची कॉमेंट असते, टीका असते. महंमदांच्या चरित्रातली एक घटना सांगितली जाते. महंमदांच्या अंगावर एक बाई घाण टाकायची. एक दिवस झाला. दोन दिवस झाले. घाण टाकणं सुरुच. महंमद ते निमूट मान्य करायचे, त्यांनी त्या बाईला काही केलं नाही. एक दिवशी त्या बाईच्या घरावरून जात असतांना ती बाई बाहेर आली नाही, घाण टाकली गेली नाही. तेव्हां महंमद त्या घरात गेले आणि ती बाई ठीक आहे ना, आज तिनं घाण कां टाकली नाही याची चौकशी केली.
सोबत स्वीडनमधल्या व्यंगचित्रकारानं काढलेलं चित्रं आहे. इस्लामचं नाव घेणारे कशी हिंसा माजवत आहेत ते चित्रं सांगतंय. 
महंमद हे एक हाडीमाशी गृहस्थ होते. त्यांचं लग्न झालं होतं. त्याना मुलं होती. त्याना नातेवाईक होते. ते व्यापारही करत असत. थोडक्यात असं की ते एक माणूस होते, भले त्याना परमेश्वरानं साक्षात्कार दिला असला तरीही.  माणूस म्हणून ते त्या वेळच्या परिस्थितीतून वाट काढून आपल्या पाठिराख्यांचं नेतृत्व करत होते. त्यामुळंच त्यांच्या हातून परस्पर विसंगत गोष्टी घडणं शक्य होतं. त्या काळातल्या त्यांच्या सहकाऱ्यानी त्यावर आक्षेपही घेतले. शिया आणि सुनी यांच्यातलं वितुष्ट हे महंमदांच्या परंपरांवर असलेल्या आक्षेपातून उद्भवलेलं आहे.
महंमदांनी इस्लाम, इस्लामी राज्य स्थापन केलं तेव्हां इस्लामी आणि बिगर इस्लामी अशी जगाची विभागणी होती. बिगर इस्लामी जगानं इस्लामचा स्वीकार करावा नाही तर मरावं अशी  महंमदांची मांडणी. याच तत्वावर पुढं इस्लामी जग विस्तारत गेलं. इस्लामी मनावर अजूनही त्या तत्वाची मोहिनी आहे. विसाव्या शतकात जग बदललं. पूर्णपणे इस्लामी असे थोडेफार देश तयार झाले. बरेचसे देश सेक्युलर झाले, तिथं विविध धर्माची माणसं एकत्र राहू शकतात. तिथं अडचण निर्माण झाली. मुसलमानाना इतरांना मरा किवा इस्लामी व्हा असं आव्हान देता येईनासं झालं. त्यांना इस्लामी नसलेल्या समाजात रहावं लागलं. या स्थितीची इस्लामच्या तत्वाशी कशी सांगड घालायची? तारीक रमादान तसा प्रयत्न करत आहेत. 
 जगभर धर्म ही खाजगी गोष्ट झाली आहे ही गोष्ट इस्लामी समाज तत्वतः स्वीकारायला तयार नाही. बाहेरच्या व्यापक जगात इस्लामी समाजात आपली एक स्वतंत्र चूल मांडण्याची सवय कशी सांभाळून घ्यायची ते इस्लामी जगाला कळत नाहीये. फ्रान्स, अमेरिका, जर्मनी इत्यादी देशात स्टेट आणि धर्म या दोन गोष्टी वेगळ्या केलेल्या आहेत. अशा समाजात प्रत्येकाला आपला धर्म घरात पाळावा लागतो, आपल्या धर्मानुसार बाहेरच्या समाजानं वागावं असं म्हणता येत नाही. फ्रेंच समाजात लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टी घटनात्मक ठरल्या असतील तर त्यांच्याशी कसं जुळवून घ्यायचं असा प्रश्न मुस्लीम समाजासमोर आहे. तिथं व्यक्त होणाऱ्या गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त करणं, त्यांचा प्रतिवाद करणं, लोकशाही वाटेनं जाणं हा तिथल्या समाजांनी स्वीकारलेला मार्ग आहे. तो सोडून मारझोड, उध्वस्थ करणं, खून करणं या गोष्टी योग्य नाहीत.
बदललेल्या जगात इस्लामचं स्थान पुन्हा तपासायची वेळ आली आहे. ते इस्लामी समाजाला जमत नाहीये. त्यातून खुद्द इस्लामी समाजातच अडचणी निर्माण झाल्या आहेत.इराण, सौदी, कतार, बहारीन, नायजेरिया, येमेन, सीरिया, इराक, लेबेनॉन इत्यादी देशांतले विविध छटांचे इस्लामी समाज एकत्र नांदू शकत नाहीयेत, एकमेकांचे गळे कापत आहेत. वरील देशांत ते इस्लामी असूनही आपसात अजिबात पटत नाहीये. संस्कृती, भाषा आणि आर्थिक हितसंबंध हे घटक प्रभावी झाल्यामुळं इस्लाम या मुद्दयावर तयार झालेला पाकिस्तान फुटला, बांगला देश वेगळा झाला. आजही बलुचिस्तानं केव्हां वेगळा होईल ते सांगता येत नाही. मुसलमान असूनही पंजाबी आणि सिंधी मुसलमानांचं पटत नाही. साऱ्या जगानं, विविध संस्कृती आणि धर्मीयांनी शांततेनं आणि सहकार्यानं एकत्र नांदणं ही काळानुरूप आवश्यक घडलेली गोष्ट आहे. शिया सुनींनाही एकत्र नांदता येईल याची सोय इस्लामच्या तत्वात करावी लागणार आहे.बदलत्या परिस्थितीशी  इस्लामी तत्वांशी घालतांना इस्लामी समाजाला त्रास होतोय. 
बहुदा इस्लामचा राग व्यंगचित्रकारांवर नसावा. आपले अंतर्विरोध समजून घेता येत नाहीयेत, काळाच्या बरोबर जाता येत नाहीये ही खंत त्याना त्रास देत असावी. पश्चिमेवरचा रागही त्यातूनच येत असावा.  मौदुदींचे विचार लक्षात घेतले की इस्लामी समाजापुढच्या अडचणी लक्षात येतात. माणसानं केलेल्या कोणत्याही गोष्टी त्याना मान्य नाहीत. लोकशाही, समाजवाद, अर्थव्यवस्था, विज्ञान इत्यादी मानवानं तयार केलेल्या गोष्टी त्याना नको आहेत. अल्लानं आणि महंमदानं जे काही केलं तेवढ्यावरच जगाचं भागतं असं त्याना वाटतं.पण तसं म्हणणं असणारे इस्लामी गट आधुनिक शस्त्रं मात्र वापरतात. तिथं त्याना पश्चिमेतलं विज्ञान-तंत्रज्ञान चालतं.    आधुनिक जग आणि इस्लाम या दोन गोष्टींची सांगड घालणं इस्लामी विचारवंतांना जमत नाहीये. ही अडचण लवपण्यासाठी पश्चिमी जग, भांडवलशाही, जागतिकीकरण, उपभोग इत्यादी गोष्टींवर ते राग काढत आहेत. 
  तसलीमा नसरीन, अय्यान हिरसी इत्यादी माणसं इस्लाम सोडून बाहेर जायला निघाली आहेत. कारण त्यांना मुळापासूनच इस्लामची नव्यानं मांडणी आणि पुनर्विचार हवा आहे. आणखीही एक अडचण आहे. इस्लाम सोडून जाण्याचं स्वातंत्र्यही इस्लामी माणसाला नाही. त्याला देहांताची शिक्षा आहे. हे तर मानवी स्वातंत्र्याशी एकदम विसंगत आहे. हिंदू किंवा ख्रिस्ती माणूस आपला धर्म सोडून मुसलमान होतात तर मुसलमान दुसऱ्या धर्मात कां जाऊ शकत नाही?
इस्लामी समाजाच्या अडचणी त्याच समाजानं निस्तरायला हव्यात. त्याचा त्रास इतरांना होणं बरोबर नाही.
सोबत तीन चित्रं.  दोन चित्रं पंधराव्या शतकातील आहेत. त्यात महंमद मुसलमान झालेल्या लोकांना उपदेश करताना आणि स्वर्गात प्रवेश करताना दिसत आहेत. तिसरं  महंमदांचं स्वीडिश व्यंगचित्रकारानं काढलेलं व्यंगचित्र आहे.

One thought on “शार्ले हेबडो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *