इतिहास

इतिहास

माध्यमांचा उथळपणा
Pagan Britain हे
पुस्तक रोनार्ड हटन या अमेरिकन अभ्यासकानं लिहिलं आहे. अश्म युगापासून तर
ख्रिश्चॅनिटी येईपर्यंतचा काळ या पुस्तकात हटन यानी तपासला आहे. ब्रिटीश माणसाच्या
धर्मश्रद्धा हा मुख्य धागा आहे. ब्रिटीश परंपरा, मिथकं, धार्मिक विधी
यांच्याबरोबरच पुराणवस्तू संशोधकानी गोळा केलेल्या आर्टिफॅक्टसचा  अभ्यास त्यांनी केला आहे.
दोन हजार
वर्षापूर्वीच्या एका ब्रिटीश माणसाचे अवशेष 1984 साली वैज्ञानिकांनी हुडकले.  मरताना त्या माणसाचं वय 25 च्या आसपास असावं.
त्याच्या गळ्याभोवती आणि अंगावर भयानक-घातक जखमांच्या खुणा आढळल्या.
झालं. इतिहासाचे अर्थ
लावणारे मैदानात उतरले. तो माणूस हा नरबळी होता असा एक अर्थ लावला गेला.त्यासाठी
त्या काळात नरबळीची पद्धत असल्याचे पुरावे या बाबतीत उपयोगी पडले. एक तज्ञ म्हणाला
की जखमांच्या खुणावरून तो बळी मानायचं कारण नाही. कोणी तरी त्याचा गळा दाबून खूनही
केला असेल.
पुरावे असल्यावर आणि
नसतांनाही इतिहासाचे नाना अर्थ लावले जातात. हटन म्हणतात की बरेचवेळा आपापल्या
सोयी साठी  ( राजकीय व  इतर )असे अर्थ लावले जातात. स्त्रीवादी,
समानतावादी, निसर्गवादी, पर्यावरणवादी,मानवतावादी,विज्ञानवादी इत्यादी मंडळी
त्यांनी  आधीच घट्ट करून ठेवलेल्या मतांना
बळकटी देण्यासाठी इतिहासातल्या गोष्टी, घटना, वस्तू इत्यादी वापरतात. ब्रिटीश
इतिहासाकडंही राष्ट्रवादी, ख्रिस्ती, ज्यू, स्त्रीवादी, डावे इत्यादी लोक असेच
नाना प्रकारे पहातात,  बरेचवेळा त्यांच्या
प्रतिपादनाला फारच कमी आधार असतो. म्हणूनच हटन म्हणतात की माणसानं इतिहासाकडं डोळे
झाकून पहाता कामा नये, प्रत्येक गोष्टीला 
आव्हान देत, प्रश्न विचारत पुढं सरकलं पाहिजे.
थोडक्यात म्हणजे
प्रचारकांपासून  सावध रहा,आपलं डोकं चालवा.
 हटन पुस्तकात म्हणतात ”
प्राचीन इतिहासातले अनुत्तरीत प्रश्न, संदिग्धता आजच्या टेलेविजनला नको आहेत,
त्यांना पक्की उत्तरं हवी असतात.  लोकांसमोर विविध माहित मतं ठेवून, विविध पर्याय
ठेवून निर्णय लोकांवर सोपवणारे कार्यक्रम टीव्हीवर होत नाहीत.”
बाप रे. किती खरं.
आताशा लोकांकडं
लॅपटॉप, सेल फोन असतो. त्यावर विकीपेडिया किंवा तत्सम सर्च एंजिन्स असतात. दोन
मिनिटात सर्च मारून हाताशी येणाऱ्या माहितीवर माणसं मत तयार करतात. माणूस, विचार,
कार्यक्रम, घटना, प्रक्रिया, समाज इत्यादी गोष्टी. त्या  चांगल्या की वाईट, घ्यायच्या की टाकायच्या,
पुरोगामी की प्रतिगामी, काळ्या की गोऱ्या, पाप की पुण्य अशा दोन वर्गात टाकून
मोकळं  व्हायचं. प्रत्येक गोष्टीला अनंत
छटा आणि थर असतात ही गोष्ट टीव्हीला मान्य नसते. टीव्ही-इंटरनेटवर अवलंबून असणारी
माणसंही छटाहीन होतात.  मूळ पुस्तकं वाचणं,
अनेक पुस्तकं वाचून तुलनात्मक अभ्यास करणं नावाची गोष्ट आता निसटलीय.
टीव्हीतून, इतर
माध्यमातून आणि शिक्षणातूनही.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *