लोकसत्ताच्या दिनांक 5 फेबच्या अंकात कांबळे यांचा लेख आहे. त्यात त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बाबत मुंडे यांनी केलेल्या विधानांचा तपशीलवार-साधार खुलासा केला आहे. त्यातला एक खुलासा आहे तो डॉ. आंबेडकरांना शामाप्रसाद  मुकर्जी यांनी राज्यसभेत पाठवलं या मुंडेच्या विधानासंदर्भात. आंबेडकर मुंबई विधानसभेच्या मतदार संघातून निवडून गेले होते, त्यांचा बंगालशी किंवा शामाप्रसाद मुकर्जींशी काहीही संबंध नाही हे कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे.
शामाप्रसाद मुकर्जी हे संघाचे-जनसंघाचे-भाजपचे नेते. त्यांनी आंबेडकरांना राज्यसभेत पाठवलं याचा अर्थ ते आंबेडकर-दलित यांचे समर्थक होते असं मुंडेना सुचवायचं होतं.
मुंडे यांचं विधान केवळ चुकीचं नव्हे तर एका भयानक मनोवृत्तीचं निदेशक आहे. इतिहासाचे अर्थ काढणं ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. साधनं,विश्वासार्ह पुरावे यांचा वापर करून अभ्यासक इतिहासाचे अर्थ लावत असतात. ते समजण्यासारखं आहे. परंतू मुंडे जे करत आहेत ते संकुचित राजकीय स्वार्थासाठी इतिहासाची सोयिस्कर मोडतोड, पुनर्लेखन.रामदास आठवले यांना केवळ मतांच्या हिशोबात फायदा मिळावा म्हणून भाजपनं राज्यसभेवर निवडून पाठवलं.बाकी काहीही नाही. आपला हा राजकीय संकुचित स्वार्थ नाही हे दाखवण्यासाठी आंबेडकरांनाही आपल्याच एका जुन्या नेत्यानं कसं राज्यसभेवर पाठवलं होतं हे दाखवण्याचा उद्योग  मुंडे यांनी केला.हा उल्लेख  वारंवार करून तेच सत्य आहे असं मुंडे सिद्ध करू शकले असते. सामान्य जन इतिहासात जात नसल्यानं आणि राजकीय पक्षांचे ढोल फार तीव्र असल्यानं जनतेनं काही काळ ते मानलं असतं. पुढं चालून मोदींचं राज्य आल्यावर इतिहासामधून वास्तवाचे संदर्भ काढून खोटा धडाही भविष्यातल्या मुरली मनोहर जोशींनी घातला असता. 
2014 च्या निवडणुकीत मोदींचा-भाजपचा प्रचार करण्यासाठी व्यावसायिकांची मदत घेऊन कितीतरी रुपये खर्च करू शकणाऱ्या माणसांनी इतिहासातल्या साध्या गोष्टी माहित करून मांडायला हव्यात. मोदींनी केलेली कित्येक विधानं धादांत असत्य असल्याचं स्पष्ट झालं असतांना मुंडेंचं वरील विधान झालं.
अशी माणसं फार घातक आसतात. अशी  माणसं राजकीय स्वार्थासाठी इतिहास वाट्टेल तसा मांडू शकतात. यातली जगातली दोन ठळक  उदाहरणं म्हणजे हिटलर  आणि स्टालीन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *