केजरीवाल यांना सल्ला
देणारे लेख नाणावलेले पत्रकार लिहीत आहेत. त्यात गोविंदराव तळवलकर आहेत, एम जे
अकबर आहेत. कित्येक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे हे पत्रकार सल्ले देत आहेत, मतं
मांडत आहेत. ते योग्य आहे, समजण्यासारखं आहे. मेघनाद देसाईंनीही केजरीवाल इवेंट जगात
इतरत्र इतर वेळी घडलेल्या घटनांच्या प्रकाशात तपासला आहे. एक लाट तयार होते. एक
वातावरण इमर्ज होतं. त्यात माणसं सत्तेत, विधीमंडळात फेकली जातात. काही काळानंतर
लाट ओसरते, वातावरण निवळतं आणि इमर्ज झालेली माणसं विस्मृतीत जातात, इतिहासातली एक
छोटीशी नोंद होतात. तळवलकर, मेघनाद देसाई ही नाणावलेली आणि विचारी माणसं आहेत.
त्यांच्या म्हणण्यात अर्थातच तथ्थ्य आहे.
अकबर सांगतात की
केजरीवालांनी जरा सबूरीनं घ्यावं, थांबावं. सल्ल्याच्या ठिकाणी सल्ला ठीक आहे.
परंतू काही वेळा माणसं टेकीला येतात.  टेकीला
आलेलं असणं, पाणी डोक्यावरून गेलेलं असणं याचाच अर्थ सबूरी संपलेली असते. अशा वेळी
माणसं बेभान होऊन काही तरी करतात. कधी हिंसा करतात, कधी उलथापालथ करतात, कधी कधी
क्रांतीही करून टाकतात, कधी क्षणैक उद्रेक करून गप्प रहातात. दिल्लीतली आणि
देशातली माणसं टेकीला आलेली आहेत. पैकी दिल्लीतल्या  माणसांनी केजरीवालांना निवडून दिलं, देशात काय
होईल ते माहित नाही.
केजरीवालांनी सुरक्षा
नाकारणं, दरबार भरवणं, लहान घरात रहायला जाणं या गोष्टी नाटक या सदरातल्या आहेत
असं गोविंदराव म्हणतात. वरील गोष्टी केजरीवालांनी केल्या हे खरं, पण ते नाटक आहे
की इतर काही हा अर्थ लावण्याचा प्रश्न आहे. सुरक्षेच्या गराड्यात,
हितसंबंधियांच्या घोळक्यात, सत्तेनं दिलेल्या अती सवलतीत मंत्री वगैरे रहातात ही
गोष्ट लोकांना बोचते. त्याला केजरीवालांची ही प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे,
त्यात मोठा तत्वज्ञानाचा वगैरे प्रश्न नाही. त्यामुळं तो प्रकार तेवढाच, तितक्याच
गंभीरपणे घ्यायला हवा.
केजरीवाल धरण्यात बसले
होते ते  दृश्य पहाण्यासारखं होतं. ते आणि
त्यांचे मंत्री आणि आसपासची जनता यात फरक दिसत नव्हता. ते अगदी सामान्य माणसासारखे
दिसत होते. त्यांना वेगळं काढताच येत नव्हतं. आपल्याला केजरीवाल माहित असल्यानं
आपण त्याना गर्दीत पटकन शोधू शकत होतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, जपान इथला एकादा
माणूस टीव्ही पहात असता तर त्याला जमलेल्या लोकांमधे मंत्री, मुख्यमंत्री सापडला
नसता.
सभोवताली
सुरक्षा,चमचे आणि हितसंबंधी यांचं प्रचंड कवच घेऊन फिरणाऱ्या आजच्या पुढाऱ्यांच्या
तुलनेत केजरीवालांचं धरणं वेगळं दिसलं. हा फरक लोकांच्या नजरेत भरणं ही आज एक
स्वतंत्र महत्वाची गोष्ट आहे.
जगात या पूर्वी काय
घडलं होतं त्याच्याशी तुलना करत केजरीवाल घटना पहाणं अनेक बाबतीत निरूपयोगी आहे.
एफेसाय वाढवून द्या, आमच्यावरचे खटले मागे घ्या, आमचे लांडे कारभार सांभाळून घ्या,
आम्हाला कॉलेज किंवा कारखान्याला वाट वाकडी करून परवानगी द्या, अमूक गोष्टीवरची
जकात वाढवा किंवा कमी करा, जमीन द्या, खाणी द्या, 
अशा मागण्या करत माणसं आज निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडं जातात.
त्यासाठी पैसे देतात. केजरीवालांकडं माणसं वरील गोष्टी घेऊन गेलेली नाहीत. शाळेत
प्रवेश, दिव्याला वीज आणि नळाला पाणी अशा गोष्टींसाठी बहुतांश माणसं त्यांच्याकडं
गेली. पैशाचा ढीग घेऊन नव्हे. हे वेगळेपण लक्षात घ्यायला हवं. सत्ता आल्यानंतर
केजरीवाल काय करतील हा भविष्य वर्तवण्याचा प्रश्न आहे.
केजरीवाल म्हणत आहेत
की त्याना जनतेला सत्ता द्यायची  आहे,
स्वतःकडं सत्ता घ्यायची नाहीये. केजरीवालांना नवा पक्ष उभारून आज उपलब्ध असलेल्या
दुकानांत एका नव्या दुकानाची भर घालायची नाहीये. थेट जनतेकडं सत्ता, पक्ष
संघटनेशिवाय राजकीय चळवळ या गोष्टी व्यवहाराच्या हिशोबात समजायला कठीण आहेत, त्यात
एक आंधळा ध्येयवाद आहे, एक  युटोपिया आहे
असं वाटतं. ते खरंही आहे.
नेमकी हीच गंमत आहे.
देशात कोंडी झालेली असतांना नाना गोष्टींबद्दल स्पष्टता नसलेल्या, अव्यवहारी
माणसाला लोकांनी निवडून दिलंय. काय होईल ते सांगता येत नाही.

ही घटना तशीच पहायला
हवी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *