केजरीवाल

केजरीवाल

केजरीवाल हा एक इवेंट
आहे. इमरजंट आहे. अनेक लोकांनी स्वतंत्र हेतू बाळगून केलेल्या हालचालीतून ही घटना
घडली आहे. केजरीवाल सत्ता स्थापन करतील असं लोकांना वाटलंही नसणार. लोकांच्या ढोबळ
अपेक्षा तेवढ्या केजरीवालांना माहित होत्या. म्हणजे  वीज, पाणी इत्यादी. परंतू त्याच माणसांना
केजरीवाल यांनी मंत्री म्हणून कसं वागावं या बद्दलही अपेक्षा होत्या. त्या काही
मतदानात प्रतिबिंबित झालेल्या नव्हत्या. त्यांना अपेक्षित नसलेल्या अनेक गोष्टी
केजरीवाल करत जातील कारण त्या गोष्टी करू नयेत असं काही लोकांनी त्यांना
सांगितलेलं नव्हतं.
 कोणाला नुसतं पाणी हवं होतं, कोणाला नुसती वीज
हवी होती, कोणाचा भ्रष्टाचारावर राग होता, कोणाचा एकाद्या किंवा अनेक राजकीय पक्षांवर
राग होता, कोणाला समाजात आमूलाग्र बदल हवा होता, कोणाला क्रांती हवी होती,
प्रत्येकाची वेगळी तऱ्हा. केजरीवाल यांना तिसरंच काही तरी हवं असणार. राजकीय
पक्षांतली माणसं काही एका संस्कृतीची असतात, त्यांना पाठिबा देणारी बहुतांश माणसं
हितसंबंधी असतात. त्यामुळं त्यांचे उमेदवार आणि पक्ष यांच्याकडून चौकटीबाहेर काही
घडेल अशी अपेक्षा नसते.
केजरीवाल यांच्या
बाबतीत वेगळं घडण्याची अपेक्षा बाळगता येते कारण त्यांना  माणसांनी वेगळ्या कारणांसाठी पाठिंबा दिला,
अत्यंत मर्यादित अशा हेतूंसाठी पाठिंबा दिला.
वेगळेपण आणि
अनपेक्षित घडण्याची शक्यता हे केजरीवाल यांच्या बाबतीतले महत्वाचे मुद्दे आहेत.
दिल्लीबाहेरची,
त्यांना मत न दिलेली देशातली इतर माणसं : या
सर्वांच्या केजरीवाल यांच्याकडून नाना अपेक्षा आहेत, दिल्लीतल्या लोकांपेक्षा
वेगळ्या. त्यांना त्यांच्याकडून एक सम्यक, भारतीय जीवनाच्या सर्व अंगांना
स्पर्शणारा सर्वांगिण विचार हवा आहे. त्यांना एक जवळपास संपूर्ण निर्दोष राजकीय
पक्ष आणि नेता हवा आहे. देशासमोर दीर्घकाळापासून ताटकळत असलेले पाचपन्नास ते हजार
दोन हजार वर्षांच्या काळात किचकटलेले प्रश्न केजरीवालांनी सोडवावेत असं त्यांना
वाटतंय. गंमत अशी की परिपूर्ण विचारधारा, परिपूर्ण राजकीय पक्ष आणि परिपूर्ण नेता
या बाबत प्रत्येक माणसाचं मत  वेगळं असतं.
केजरीवाल कसे काय पुरे पडणार या नाना, एकमेकांशी संबंध नसलेल्या, एकमेकांना छेद
देणाऱ्या अपेक्षांना?
एक चाकोरीबाहेरचा
विचार.
सध्याच्या माहिती
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक भारतीय माणसाकडून त्याच्या अपेक्षित गोष्टींची
यादी बनवावी. उमेदवार, मंत्री, पक्षांनी कसं कसं वागावं याची. वागणं, बोलणं, कपडे,
अन्न सेवन, श्रद्धा, आर्थिक स्थिती, नातेवाईक, सांपत्तीक स्थिती, भाषा, यांच्यासह
तंत्रज्ञान-अर्थ-राजकीय-आंतरराष्ट्रीय-धार्मिक-सांस्कृतीक-भाषिक इत्यादी
बाबतीतल्या अपेक्षा त्यात व्यक्त 
व्हाव्यात. समजा सरासरी दहा हजार अपेक्षा होतील. त्या डिजिटाईज्ड कराव्यात.
10 हजार गुणिले 75 कोटी अशी अपेक्षायादी तयार होईल. ती हाताळू शकणारा कंप्यूटर आणि
सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग गुगल वगैरे लोक नक्की  करून देतील. या अपेक्षांवरची उमेदवारांची,
पक्षांची मतं जाणून घ्यावीत, त्यावर त्यांच्या सह्या घ्याव्यात.
तसं घडलं की परिपूर्ण
अशी निवडणूक पद्धत तयार होईल. नंतर मग केजरीवाल यांच्या बद्दलच्या अपेक्षा (
इतरांबद्दलच्याही), केजरीवाल यांनी केलेला अपेक्षाभंग (इतरांचेही अपेक्षाभंग )
इत्यादी गोष्टी आटोक्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *